Sunday 23 November 2014


आपले अस्तित्व आणि आपली दिशा... 

माणूस इतिहासापासून आपण काहीच शिकत नाही... वर्तमानात न डोकावता थेट शेखचिल्ली बनून भविष्याच्या स्वप्नात भान हरवून जातो... माणसाचा आयुष्यभराच्या  प्रवासातील कल सतत  स्वत:ला सिद्ध करण्याकडे असतो.. आणि या सिद्ध करण्याच्या महत्वाकांक्षा त्याला ठार आंधळे, बहिरे आणि मुके करून जातात… या वेड्या हट्टापायी मूळ पाच इंद्रीयातील वरील तीन गोष्टीनां तो पारखा होतो... त्यानंतर त्याच्या बधीर झालेल्या संवेदना त्याचं स्पर्शज्ञान हिरावून नेतात… नि शेवटी श्वास नुसताच नावाला चालू असतो... त्याच्यातला माणूस केव्हाच संपलेला असतो... मग मागे उरत फक्त कलेवर... या धरतीवर एक ओझं..  ना त्यात असते जान... प्राण.. नि शान...

आपण काहीतरी बनायचा ध्यास घेतो त्यामागे काही अभ्यास.. चिंतन... संवाद नसतो... वारसाहक्कानं पदरात पडलेलं सामाजिक, आर्थिक स्थैर्य  नि सुबत्ता कुरवाळत आयुष्याचा भोग घेणं चालूच राहते... तथाकथित सामाजिक बांधिलकीच्या चार-दोन ठिकाणी चर्चा करून, आपला दिनदुबळ्याबाबतचा कळवळा आठ कॉलम मथळा व्हावा नि त्याची वाहिन्यावर ब्रेकिंग न्यूज व्हावी.. एवढी खुजी काहीवेळा जगण्याच्या विचारांची उंची असते... आचाराबाबत न बोललेलेच बरं...

माणूस म्हणून माणुसकीच्या वागण्यासाठी कधी आपण कुठं मेणबत्ती लावत नसतो.. कि विझू पहाणाऱ्या  मेणबत्त्यांना हात जोडून आसरा देत असतो... तत्वज्ञानाच्या परिसंवादात आपलं अस्तित्व उजळून निघण्यासाठी, समोरच्याचं वैचारिक वस्त्रहरण नि त्याही पुढे जावून शब्दश: वस्त्रहरण करण्यात आपल्याला आसूरी आनंद असतो... आपली काही खास वेगळी राजेशाही सरबराई समाजात होत राहावी असं आपल्याला वाटतं... आपला हा न्यूनगंड समाजातील बांडगुळाकडून हमखास जाणीवपूर्वक जपला जातो... आपल्याला आपल्या भोवतीचे भाट आपल्या उदो उदोच्या नाऱ्यात कोंडून टाकतात...

समाजातील या दोन्ही प्रवृत्त्तीनां विरोध करण्याइतकं नैतिक धाडस आपल्या अंगी येण्यासाठी प्रथम आपल्याला राजहंसाप्रमाने दूध आणि पाणी यांना वेगळे करण्याचं ज्ञान मिळवायला हवं... नि नुसतं ज्ञान मिळवून थांबून चालणार नाही तर त्या ज्ञानाचा उपयोग विचारात आणि आचारात करून या मानवाच्या कल्याणाच्या यज्ञात आपल्या म्हणून काही समिधा टाकता आल्या पाहिजेत... त्या टाकताना आपल्याला कुणी पहात आहे का नाही यासाठी पळभरही थांबायचं नाही.. आपला सेवाभाव कुणाच्या पैशाला चार लिहून मिळणाऱ्या मानपत्रांना तारण ठेवायचा नाही... आपली किंमत न अजमावता आपला आत्मा अनमोल आहे याचा विसर पडू द्यायचा नाही... श्रीराम...