Thursday, 30 June 2016

|| ॐ श्री गुरुदेव दत्त ||
जयजय शंकरानंदा अवधूता I अवधूत चिंतनी सिध्दांता II
त्रैलोक्य पावना त्रिदोष दहना I त्रिगुणातीता निरंजना II
साधकाच्या जीवनात गुरु सिद्धांत महत्वपूर्ण आहे..  गुरुतत्व हे सर्व अनुग्रहित साधकात असते.. साधकाने साधनेने ते जागृत करायचे हि सूत्रमय रचना.. हे तत्व जेव्हा जागृत होते.. त्यावेळी अज्ञान लोप पावून ज्ञान प्राप्त होत जाते..

सदगुरु तत्व सत्याचे, अंतिम वास्तविकता आणि स्वरूपाचे ज्ञान देतो.. अभ्यास चिंतन - मनन या त्रिसूत्रीने तत्व जागृती लाभते..!

शब्दांच्या पलिकडले काही I मौन एकटे बोलत राही II
अर्थ जयाचा गहन गूढसा I चिंतन मनन करुन पाही II

निशंक हो, निर्भय हो मना रे.. जसजसे आपण निशंक होऊ तसतसे सद्गुरू आपल्याला पात्रतेपेक्षा भरभरून देईल हे निसंशय सत्य आहे.. साधकाने सद्गुरू कृपेच्या गुरुप्रेमाच्या प्रवाहात एखाद्या वाळक्या पानाप्रमाणे पडावं आणि तो गुरु प्रवाह जसा जसा पुढे जाईल तसं तसं त्याच्या बरोबर नि:शंकपणे जात रहावं..

या अपरोक्ष-प्रत्यक्ष.. ज्ञानप्राप्तीच्या अगोदर होणार्‍या.. परोक्ष-अप्रत्यक्ष ज्ञानाचा अधिकार काय सांगावा..!  हाच तो अनुभव-अनुभूती-दृष्टांत या द्वारे होणारा गुरुबोधरूपी ज्ञानयोग”.. वाचन-श्रवण-मौन-मनन-चिंतन याच्या अंगाने होणारा आणि निदीध्यासात रमणारा हाच तो.. आत्मस्वरूपी परमात्मा,,!!

निशब्द मन मौन | एकांती समाधी ध्यान |
अभ्यास श्वास ध्यास | उन्नती शुद्ध वास ||

सोहम देह स्थिती | अनुभूति विश्व मूर्ती |

करुनी देह पावरी | ऐकू हंसनाद अंतरी ||






























यश आणि त्याची पाच गुपिते... 

योग्य यश म्हणजे काय हे न समजताच, जीवनात प्रत्येकाला यशस्वी व्हायचे असते... योग्य यश ही एक वृत्ती असते, घटना नसते... प्रत्येक धंद्यात आणि संस्थेत अशी परिस्थिती येत असते की जी हाताळायचे कौशल्य तुमच्यात असावे लागते... हे कौशल्य आपल्या आतून येते आणि त्या आतल्या जागेला मी आध्यात्मिक म्हणतो... यश मिळविण्यासाठी पाच गोष्टींची गरज असते...

१... अनुकूल वातावरण : शांतता आणि भरभराट या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात... अस्वस्थ वातावरणात भरभराट होऊ शकत नाही... इतरांबरोबर काम करताना सुद्धा तुम्हाला संघभावनेने काम करावे लागते... त्तुम्च्या गटातील सर्वांशी आदराची भावना ठेवा आणि इतरांवर खापर फोडण्याच्या भानगडीत अडकू नका... आणि आणखी एक म्हणजे गटाच्या नेत्याने पारदर्शक, विश्वासाचे, सहकार्याचे आणि आपलेपणाचे वातावरण ठेवावे... जर सगळे लक्ष फक्त स्वःताचा निव्वळ नफा यावर असेल तर काहीच होणार नाही... लोकांच्या मनात आतूनच स्फूर्ती निर्माण करणे हीच सर्वात परिणामकारक क्लुप्ती आहे...

२... कामातील कौशल्य : कर्माच्या फळाशी गुंतून न रहाणे हेच भगवद्गीतेचे सार आहे... जर एखाद्या युद्धजन्य वा प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही तुमच्या मनाला सावरू शकत असलात तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सांभाळून घेऊ शकता... कर्माच्या या कौशल्याला योग म्हणतात... योगाच्या या कौशल्यामुळेच उद्धटपणा हा आत्मविश्वासात, लीनता नम्रतेत, परावलंबित्व परस्परावलंबनाची जाणीव होण्यात आणि मर्यादित मालकीची भावना पूर्णत्वात एकत्वाची भावना निर्माण होण्यात परिवर्तीत होतो... काम करत असताना जर सगळे लक्ष जर फक्त आपल्या स्वार्थप्रेरित फायदेशीर अंतिम निकालावर असेल तर तुम्ही काम करू शकत नाही... फक्त जे काम करत असाल त्यात तुम्ही प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने १०० % द्या...

३... सिंह होणे : संस्कृतमध्ये एक म्हण आहे, “ ज्याच्याकडे सिंहासारखे धैर्य असेल त्याच्याकडे मोठी संपत्ती चालून येते...” आत आणि बाहेर जाणाऱ्या श्वासाइतकेच आस्था आणि वैराग्य हे दोन्ही एकमेकाला पूरक आहेत... तुम्ही श्वास आत घेता पण तो जास्त काळ आत रोखून धरू शकत नाही, तुम्हाला तो बाहेर सोडावाच लागतो... त्याचप्रमाणे गोष्टी घडण्यासाठी तुम्हाला आस्था असावी लागते तसेच सोडून देण्यासाठी वैराग्य असावे लागते... जेव्हा तुम्हाला भरभराटीची हाव नसते तेव्हा तेव्हा ती तुमच्याकडे चालून येते...

४... नशिबाचा एक अंश : सुबत्ता प्राप्त होण्यासाठी जर केवळ स्वत:च्या मेहनतची गरज असेल तर असेल तर असे अनेक लोक कां आहेत जे खूप मेहनत करतात पण त्यांची भरभराट होत नाही ? ही अगम्य गोष्ट किंवा नशीब अथवा प्रारब्ध भोग अध्यात्माने उचलून धरले आहे... सगळी भौतिक सृष्टी, लहरींच्या एका सृष्टीने चालते जी आपल्याला जे दिसते त्यापेक्षा सूक्ष्म असते... अध्यात्मामुळे बुद्धीला आणि अंतर्ज्ञानाला धार चढते... जेव्हा तुम्ही आस्था आणि वैराग्य यात समतोल साधता तेव्हा तुम्हाला अंतर्ज्ञान प्राप्त होते... फायद्याबरोबरच सेवा, गोष्टी मिळविण्यासाठीची धडपड आणि त्याच बरोबर समाजाला परत देण्यासाठीची करुणा... अंतर्ज्ञान म्हणजे योग्य वेळी योग्य विचार येणे आणि हाच व्यवसायात यश मिळण्यासाठी असलेला एक महत्वाचा घटक आहे...

५... ध्यान : तुमच्या जबाबदाऱ्या आणि ध्येय जितके मोठे तितकी तुम्हाला ध्यान करण्याची जास्त गरज आहे... प्राचीन काळी, ध्यान हे आत्म्याच्या शोधासाठी, सिद्धी प्राप्त होण्यासाठी आणि दु:ख आणि त्रासावर मात करण्यासाठी वापरले जायचे... आजच्या काळात मनावरचा ताण समाजातील तणाव यासाठीही ध्यान करावे लागते... करायचे खूप असते आणि वेळ थोडं असतो आणि तेवढी शक्ती नसते... लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या कामाचा भारही कमी करू शकत नाही आणि वेळही वाढवू शकत नाही... पण तुम्ही तुमची शक्ती, ऊर्जा वाढवू शकता... ध्यानामुळे तुमचे तुमचा ताण तणाव नाहीसा होतो इतकेच नाही तर तुमच्या क्षमताही वाढतात, तुमची मज्जासंस्था आणि मन बळकट होते...शरीरातील विषारी द्रव्यांचा निचरा होतो आणि सर्व प्रकारे तुमचे तेज वाढते... आपण जड मूलतत्व आणि चैतन्य या दोन्हीपासून बनलो आहोत... शरीराच्या काही भौतिक गरजा असतात आणि आपल्या आत्म्याचे पोषण अध्यात्माने होते... सर्वात महत्वाचे म्हणजे, आनंदाने बहरून जाणे, आत्मविश्वास, करुणा, उदारपणा आणि कोणीही घालवू शकणार नाही असे धैर्य हीच योग्य यशाची खूण आहे... जीवनात काहीही झाले तरी या गोष्टी तुम्ही टिकवू शकलात तर तुम्ही खऱ्या अर्थाने यश मिळवले आहे... ॐ श्री गुरुदेव दत्त...

Saturday, 11 June 2016

तोरा मन दर्पण कहलाये...

काय हवं..?.. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळ असलं तरी, त्यातली एक गोष्ट कॉमन असते… प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आपल्याच "मनातली" हवी असते...

 ‘अपने आप को पहचानिए’ असेही हिंदीत म्हटले जाते... व्यक्तिमत्त्व हे त्यावरून घडते... अशा विचारांचे मनन, चिंतन, वाचन माणसाने सातत्याने करावे... हे फारच उपयुक्त ठरते... त्यामुळे स्वत:ची ओळख होते... आपणास सहज स्वत:विषयी काही विचारलं तरी आपण बोलण्यास कचरतो... स्वरूप ओळखा असे संत सांगतात... ज्यांना स्वरूप कळाले त्यांनीच जगावर राज्य केले अन् तेच आजही करताहेत...

संत कबीर यांचा एक दोहा आहे...  
अपने अपने चोर को, सब कोय डारै मार
मेरा चोर मुझको मिलै, सरबस डारू वार
संत कबीर दोह्यात आपणास हेच सांगतात... जगातले सर्वच आपापल्या शत्रूंना मारून टाकतात... मात्र पकडले न जाणारे मन मला मिळाले तर मी त्याला मारणार तर नाहीच उलट माझे सर्वस्व त्याला अर्पण करेन, त्याच्याशी मैत्री करेन... स्वत:ची ओळख होण्यासाठी स्वत:चे मन, प्रवृत्ती, कल, सवयी यांचा अभ्यास होणे महत्त्वाचे... एकदा का हा अभ्यास झाला म्हणजे गुण-दोष दिसतात... दोष कमी करत गेलो की मग गुण वाढीस लागतात...

आपण काय करतो, का करतो, त्याचे काय परिणाम होणार हे कळते... त्यावेळी आपले मन आपणास सापडते... ‘तोरा मन दर्पण कहलाये’ असं दर्पणासमान मन आपणास सारे काही दाखवते... मग काय हा अल्लाऊद्दीनचा दिवा असलेलं आपलं मन हवं ते मिळवून देतं व आयुष्यातल्या अडचणी, संकटे, दु:ख यावर उपाय सापडतो व आपल्या आयुष्याला आकार मिळतो...

आपल्याही आसपास सकारात्मक विचार करून आपल्या स्वत:च्या आयुष्याला, दुस-याच्या आयुष्यालाही आकार देण्याचा सातत्याने प्रयत्न करणारी व्यक्तिमत्त्वे आढळतात... फक्त उघड्या डोळ्यांनी त्यांना अनुभवण्याची गरज असते... जसा कुंभार ओल्या मातीला आकार देत असतो, प्रसंगी तो धपाटाही देतो व आतून आधारही...


थोडक्यात सांगायचं तर अडचणीपासून कोणीही सुटलेला नाही... अडचणीविना जीवन एक भ्रम आहे... वाळवंटातल्या मृगजळाप्रमाणे अशा जीवनामागे धावून मानसिक व शारीरिक शक्ती वाया घालविण्याऐवजी अडचणी पेलून त्यावर मात करण्यातच खरे कौशल्य आहे... आयुष्याचा भागाकार करतांना बाकी शून्य येते, यात काही नवीन नाही... पण तुम्ही भाग कोणत्या गोष्टींनी देतात हे फार महत्त्वाचे आहे..!.. 

अशा सुविचारातून गुण घेऊ या अन् म्हणू या ‘सकारात्मक विचारच देतील आयुष्याला आकार’ आणि चला आयुष्य सकारात्मक विचारानं जगू या..!.. ॐ श्री गुरुदेव दत्त...