|| ॐ श्री गुरुदेव दत्त ||
दिवाळी म्हणजे दीपोत्सव.. बाहेर तर दिवे पेटवायचे, पण खरा दिवा तर हृदयात पेटला पाहिजे..
दिवा हे ज्ञानाचे प्रतिक आहे..
हृदयात दिवा लावणे म्हणजे.. हृदयी सद्गुरू ह्या
निश्चित प्रकारच्या जाणीवेने दिवाळीचा सण साजरा करणे..
मज हृदयी सदगुरु। जेणे तारिला हा संसारपूरु । म्हणॉनि
विशेषे अत्यादरु । विवेकावरी ॥
गुरुबोधी विवेक विचाराने.. धनत्रयोदशीच्या
दिवशी वित्ताला अनर्थ न मानता जीवन सार्थक करण्याची शक्ती मानून महालक्ष्मीची पूजा
करायची.. नरक चतुर्दशीच्या दिवशी जीवनात नरक निर्माण करणारा आळस, प्रमाद, अस्वच्छता, अनिष्टता वगैरे नरकासुरांना मारणे.. दिवाळीच्या
दिवशी ‘तमसो
मा ज्योतिर्गमय’ मंत्राची
साधना करता करता जीवन पथ प्रकाशित करायचा..
जीवनाच्या वहीचा आढावा घेत वेळी जमेच्या बाजूला गुरु-ईशकृपा राहावी ह्यासाठी सद्गुरूंच्या गुरुबोध प्रकाशाने जीवन भरून काढायचे.. नव्या वर्षाच्या दिवशी जुने वैर विष विसरून शत्रूचेही शुभचिंतन करायचे.. नवे वर्ष म्हणजे शुभ संकल्पाचा दिवस.. भाऊबीजेच्या दिवशी बंधूच्या निर्व्याज प्रेमाने संपूर्ण स्त्री-समाज बहिणीच्या रुपात स्वीकारायचा.. सुंदर ज्ञान देणारा सद्गुरूंच्या बोधाचा ज्ञानदीप जर हृदयात प्रकाशित केला, तर आपले जीवन सदैव दिपोत्सवी महोत्सवा समान बनेल..!!
|| ॐ श्री गुरुदेव दत्त ||
जीवनामधील आनंद केवळ दिवाळीतील पाच दिवस न राहता, हा आनंद कायमचा राहावा ही सद्गुरूंची शिकवण असते.. ज्ञानेश्वर महाराज जीवनात निरंतर दिवाळी यावी, यासाठी आपण जे प्रयत्न केले ते सांगताना म्हणतात..
"मी अविवेकाची काजळी । फेडोनी विवेक दीप
उजळी । ते योगिया पाहे दिवाळी । निरंतर ।।"
मानवी जीवनामध्ये अविवेक हाच त्याच्या दु:खाला
कारणीभूत असतो.. या अविवेकाची माणसाच्या मन:पटलावर काजळी जमा झालेली आहे, ती काजळी ‘फेडून’ मी तेथे गुरुबोधाने विवेकाचा नंदादीप पेटवितो..
त्यामुळे अखंड दिवाळीचा आनंद मिळतो, एकदा विवेकाचा दीप उजळला की सद्विचारांकडे
जाणारी वाट दिसू लागते.. त्या वाटेवरून जाताना मिळणारा आनंद खंडित होणारा नसेल..
म्हणूनच ती दिवाळी ख-या अर्थाने अखंडित राहणारी असेल, असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात..
दिवाळीचा आनंद निरंतर जीवनात राहायचा असेल तर सद्गुरूंच्या
गुरुबोध विचारांचा उजेड आपल्या मागे-पुढे दाटला पाहिजे.. त्या उजेडात केलेली
वाटचाल आपला जीवनाचा प्रवास सुखकर करील.. त्यामुळे जीवनात आलेली दु:ख-दैन्य पळून
गेली नाहीत, तरी
त्यांचा मुकाबला करण्याचे सामर्थ्य आपल्याला प्राप्त होईल..!!