आत्मरूपी विद्या दाविते स्वरुप - चैतन्याचा दीप उजळोनि
दीप हा प्रकाश, जीवन व ज्ञानाचे प्रतीक आहे.. दीप मानवाला मंद प्रकाशाने आत्मज्योतीचे मार्गदर्शन करतो व अंतर्मुख करतो.. अंत:करणातला प्रकाश साधकाला निश्चितपणे एक प्रश्न विचारतो, "मी कोण आहे ? कोs हं..?" आणि ह्याचे उत्तर जेव्हा साधकाला साधनेने मिळायला लागते.. तेव्हा गुरुकृपेने ज्ञानदीप प्रज्वलित झाला आहे असे समजायला हरकत नसते..
मनाच्या अज्ञान अंध:कारामध्ये छोटे छोटे काजवेस्वरूप लुकलुकणे अनुभवतो ते इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त यांचे होय.. ह्या सर्वांमध्ये कुठेतरी उर्जात्मक हालचाल होते आणि ते प्रकाशतात.. ह्या सर्वाना प्रकाश पुरविणारा 'स्वयंप्रकाशित' असा एकच अद्वय दीप असतो तो म्हणजेच 'ब्रम्हतत्व' होय..
यो दीप ब्रह्मस्वरुपस्त्वम् | स्वयं दीप भव ||
सद्गुरू म्हणतो,, मार्गाची खुण दाखवून दिली, आता स्वयं दीप भव.. स्वयंप्रकाशित होणे म्हणजे नेमके काय..? डोळ्यांचा इंद्रियांचा उपयोग महत्त्वाचा असला तरी खरी शक्ती आत्म्यातच आहे.. त्या आत्मप्रकाशात आहे.. या आत्मप्रकाशाचा मार्ग गुरुबोधाने ज्ञान-ईश्वरी चिंतन-मननात प्रगटतो..
ध्याता ध्यान ज्ञानेश्वरी | ब्रह्मानंदलहरी प्रगट होय |
आत्मरूपी विद्या दाविते स्वरुप | चैतन्याचा दीप उजळोनि ||
परंतु इथे अवधान साधन सातत्य हवे.. नाहीतर गुरुने अनुग्रह देऊन अद्वय दीप खुण दाखवली, पण आपण काहीवेळ फडफडलो आणि मंदावलो, असे होणे नको..
परि जैसें ज्याचें | मन बुद्धि चित्त | होतसे मी व्यक्त | तैसा तेथें ||
म्हणजेच बुद्धी निर्मळ असेल तर सर्वत्र आनंदच दिसतो, नाही तर एकाच दिव्याने अनेक दीप लावले असले तरी त्यातले काही दिवे प्रकाश देतात.. त्याचवेळी काही मात्र मंदावतात..
स्वयंप्रकाशित आपल्याला व्हायचं असेल, तर आपलं स्वयंप्रकाशित होणं अस्सल हवं..! ते तकलादू किंवा फडफडत्या पणतीसारखं नसावं.. तर नैष्ठिकपणे तेवत राहणाऱ्या एखाद्या ज्योतीसारखं असावं..!!
हा प्रवास तसा अनवट आहे.. प्रचंड नैष्ठिकही आहे.. पण त्या प्रवासाचा एक घटक होणंही तेवढंच आनंददायी आणि ऊर्जस्वल आहे.. या ऊर्जस्वल, अनवट प्रवासाला पूर्ण समर्पित होणे, हेच गुरुसाधनी साधकाचा उद्धार करते..
ॐ श्री गुरुदेव दत्त...