Tuesday 28 May 2013

स्वातंत्र्यवीर सावरकर.... अनादी मी अनंत मी....

इतिहासात सावरकरांचे स्थान अढळ आणि अद्वितीय आहे….. स्वातंत्र्यवीर सावरकर इतिहास घडविणारे इतिहासकार होते….. यांचे तेजस्वी व्यक्तीमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे….. दिक्कालाला भेदून भविष्याचा वेध घेणारा प्रतिभासंपन्न महाकवी.... आशयसंपन्न निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, रक्ताच्या शाईत बुडवून विद्युलतेच्या लेखणीने लिहीणारा व उज्ज्वल भूतकाल व श्रेष्ठ परंपरांचे ज्ञान घेऊन राष्टभक्तीचा स्फुल्लींग चेतविणारा ग्रंथकार.... अतीत कालातील घटनांचा अन्वयार्थ उलगडून दाखविणारा द्रष्टा इतिहासकार.... भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत.... जी सावरकरांची प्रतिभा अग्निकण उधळते तीच काव्यपुष्पेही उधळते.... बघा, सावरकरांचे भावोत्कट साहित्य प्रत्यक्ष अनुभूतीतून साकारलेले आहे.... सावरकरांनी ज्या ज्या वेळी कृतीसाठी पाऊल टाकले, त्यांच्या बंडखोर मनात ज्या संवेदना उमटल्या, त्यांच्या कविमनाचे जे जे सौंदर्यग्रहण केले, त्या सर्व गोष्टी त्यांच्या साहित्यातून जगापुढे मांडल्या.....

बघा, कोठडीच्या भिंतींवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी.... शब्दलालित्य, भावोत्कटता, विलक्षण मार्दव व माधुर्य ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत.... निबंधकार सावरकर हे तर्ककठोर, घणाघाती, अभ्यासपूर्ण, पल्लेदार शैलीमुळे अजरामर आहेत.... सुस्पष्ट विचार, तर्कसंगत मांडणी आणि अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांच्या निबंधांची बलस्थाने आहेत.... विषयाचा व्यासंग, स्वतंत्र दृष्टीकोन, विश्लेषक बुद्धी, डोळस स्वाभिमान आणि वस्तुनिष्ठ, साधार व स्फूर्तीदायक विवेचन ही त्यांच्या इतिहास ग्रंथांची वैशिष्ट्ये....

बघा, समाजसुधारक सावरकर हा स्वतंत्र अभ्यासाचा आणि लेखाचा विषय आहे..... त्यांचे सामाजिक कार्य देखील त्यांच्या देशभक्तिइतकेच प्रखर होते....

बघा, सावरकरांच्या देशभक्तीमध्ये अध्यात्मदर्शन देखील होते..... आपल्याकडे संगीत, कला, अध्यात्म इ. साधना करणार्‍या साधकांमध्ये गुरु-शिष्य परंपरा व अनुग्रह हा मोठा ठेवा आहे..... तशीच परंपरा राष्ट्र उभारणार्‍या क्रांतीकारकांच्या कार्यांत सुद्धा आहे..... दधिची ऋषींच्या अस्थींपासून वज्र बनवल्यानंतर आता काय करावे या विचारांत विधाता गुंतला असता, त्याला एक सुंदर स्वप्न पडले..... त्या स्वप्नाचे नाव होते, विनायक दामोदर सावरकर.....

बघा, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास सामाजिक न्याय व रास्त अनुशासन पुन्हा प्रस्थापित करता यावे यासाठीच गांडीव धनु्ष्यपुन्हा हाती घ्यावयास उद्युक्त केले.... म्हणून काय कोणी अर्जुनास वा कृष्णास हिंसक म्हणू शकेल काय..?.. सुयोग्य कारणासाठी सशस्त्र प्रतिकार करणे हे अध्यात्माशी पूर्णतः सुसंगत आहे.... किंबहुना गीतातत्वाचा मूलाधार आहे, हाच भारतीय दृष्टीकोन आहे.... तोच दृष्टीकोन सावरकरांचा होता.... बघा, योगीजन योगाभ्यास करताना शरीराची नाडी व श्वास यांच्यावर ताबा मिळविण्यासाठी चिंतनशील असतात.... पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी युरोपमध्ये अभ्यास करू  इच्छिणार्‍यांसाठी काही शिष्यवृत्त्या जाहीर केल्या होत्या..... त्यासाठी अर्ज सादर करताना सावरकर लिहीतात, "स्वावलंबन आणि स्वातंत्र्य म्हणजे देशाची नाडीआणि श्वासआहेत, असे मी मानतो..... अशी सावरकरांची देशभक्ती व अध्यात्मिक विचारधारा होती.....

बघा, लंडनमधील सर्व आघात सावरकरांनी अत्यंत संयमाने व योग्याच्या स्थितप्रज्ञ वृत्तीने सहन केले..... सावरकरांना विवेकानंदांविषयी जागतिक स्तरावरील बुद्धिमान पुरुषम्हणून मनस्वी आदर होता.... वेदांतील विचार व विवेकानंदांचे विचार एकच होत, हे विवेकानंदांच्या कार्यामधून त्यांना जाणवले होते.... विवेकानंद आपल्या देशबांधवांना उद्देशून म्हणत, "तुमचे स्नायू, तुमचे बाहू अधिक बलवान झाले की तुम्हास भगवत्‌ गीताअधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल.... अलौकिक बुद्धिमत्ता असलेला तसाच अचाट शक्तिसंपन्न कृष्ण कसा होता, तेही तुमच्या सळसळत्या रक्ताला उमगेल.... उपनिषदांचा अर्थही नीटपणे समजेल आणि आत्मन्चे दिव्यत्व सुद्धा उमगू शकेल..... हीच मध्यवर्ती कल्पना सावरकरांच्या स्वतंत्रतेचे स्तोत्रया कवितेमध्ये आहे.....
मोक्ष मुक्ति ही तुझीच रुपे तुलाच वेदांती ।
स्वतंत्रते भगवती, योगीजन परब्रह्म वदती ॥
योगीजन सुद्धा स्वातंत्र्यदेवतेस परब्रह्म म्हणून संबोधतात, आणि आपला आदर व्यक्त करतात.... देशाकडे मातृभूमी म्हणून पाहण्याची अध्यात्मिक संकल्पना फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे..... वेदांमधील पृथ्वीसूक्तापासून बंकीमचंद्रांच्या वंदेमातरम्पर्यंत ही प्रथा अंमलात आणली गेली आहे..... अथर्ववेदात याचे सुरेख वर्णन आहे....
वेदांचे जाणकार सावरकर हे पण या देशभक्तिच्या आध्यात्मिक अंगाचे चांगले ज्ञान होते.... म्हणूनच कालिदासाशी स्पर्धा करणारे उपमा कौशल्य, मोगलांचे सिंहासन फोडणार्‍या मराठी भाल्यांचे लखलखीत तेज आणि संतकवींचे भावमाधुर्य हे गुण सावरकरांच्या कवितेत असतात....

बघा, इ. स. १९२८ मध्ये रत्नागिरीतल्या अखिल-हिंदू गणेशोत्सवात वीर सावरकरांचे कुंडलिनीया विषयावर भाषण झाले होते.... तेव्हा ते म्हणाले होते, की बंदिवासात असताना एकांतातली करमणूक म्हणून मी कुंडलिनीच्या जागृतीचा आनंद अनुभवला आहे.... म्हणूनच सावरकर हे त्या अंदमानच्या यमपुरीतल्या सर्व हाल अपेष्टा सहन कअरून तिथे मृत्युवरही मात करू शकले.... ते ह्या सोहंम् व ध्यानयोग यांच्या नियमित अभ्यासामुळेच.... बंदीगृहात दिवसभर सक्तमजुरीची कामं करून कोठडीत कोंडलं गेल्यावर, सावरकर हा ध्यानाभ्यास करीत.... स्वामी विवेकानंदांचा राजयोगहा ग्रंथ ते उघडीत, त्यातल्या स्वामींच्या चित्राला नमस्कार करीत आणि नासिकाग्रावर दृष्टी रोखून ध्यान सुरू करीत.... सप्तर्षीह्या आर्या वृत्तांतल्या कवितेत त्यांनी म्हटलयं....
योगीराजाचा त्या ग्रंथ श्री राजयोगमी उघडी
शांत रसाचा पेला दूर करावा गमेचि जो न घडी ॥
बघा, सावरकर सांगत जो जो योग साधना करील त्या प्रत्येकाला जगातल्या कुठल्याही धर्माच्या अनुययाला - अर्थात साधना करील त्याला योगानंद लाभणे शक्य आहे.... कुंडलिनी ही मानव मात्रात असते, योगशास्त्र ही हिंदुराष्ट्राची जगाला मोठी देणगी आहे... म्हणूनच सावरकरांनी हिंदू ध्वजावर कुंडलिनी अंकित केली आहे... सावरकरांना योगाविषयी विचारलं तर ते उत्तर देत, की हा सर्वांशीच चर्चेचा विषय नाही, स्वतः करून अनुभव घेण्याचं हे शास्त्र आहे.... हा अनुभव रोज ते स्नानानंतर अर्धा तास करीत असत.... ह्या योगा अभ्यासाच्या बळावरच ते पूर्वी मृत्युला मृत्यो, येतोस तर ये कोण भितोय तुला हे आपल्या काव्यात अजरामर करून ठेवले आहे....
अनादि मी अनंत मी अवध्य मी भला ।
मारिल रिपू असा जगती कवण जन्मला ।
त्यांच्या समग्र जीवनातील प्रत्येक घटना असामान्य अलौकिक व रोमांचक होती, त्यांनी जगावं कसं तसेच समाधानानं मरावं कसं हे शिकवलं....

ॐ श्री गुरुदेव दत्त....


Friday 24 May 2013



अध्यात्माचे डोही.... आनंद तरंग.....
मित्रांनो... माणसाचा मुळभाव आहे आनंद शोधणे.... म्हणूनच माणूस नेहमी आनंदाच्या शोधात असतो.... घरदार, नोकरी, पैसा, गाडी, जमीनजुमला, मूलबाळ यातच खरा आनंद आहे असे त्याला वाटते.... परंतु हे सगळे मिळाल्यावरही माणूस तृप्त होतो का..?.. नाही..!!.. अतृप्तच असतो... कारण तो शोधात असतो सच्चिदानंद आणि हा सच्चिदानंद ऐहिक गोष्टींमधून मिळत नाही.... त्यासाठी त्याला शिरावे लागते अध्यात्मामध्ये....
बघा, अध्यात्म म्हणजे काय..?.. २४ तास पोथ्या-पुराण करणे, उपास, नवस, पूजापाठ म्हणजे अध्यात्म नव्हे.... अध्यात्म म्हणजे सोप्या शब्दात.... कुणाच्या अध्यात नाही आणि मध्यात नाही आणि दुसऱ्याच्या मनाचा विचार करणे.... भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे.... ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः । मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ॥... म्हणजेच ईश्वर हा प्रत्येकाच्या शरीरात असतोच... त्यामुळे प्रत्येकाचे मन जपणे महत्त्वाचे असते.... बघा, गोड-गोड बोलून स्वतः:चा फायदा करून घेणे याला संधीसाधूपण म्हणतात.... मन जपणे म्हणजे दुसऱ्याच्या मनाला आनंद मिळेल असे वागणे.... त्यासाठी दुसऱ्याचा फायदा करण्याची वृत्ती पाहिजे.... यातून आपल्या पदरी पुण्य पडते.... समोरचा व्यक्ती जर कृतघ्न असेल आणि असूयेने प्रेरित होऊन नुकसान करत असेल.... तर अशा व्यक्तीला काय वाटते याचा विचार करणे भेकडपणाचे ठरते....
जे वाईट ते आपण करत नाही पण दुसऱ्यांकडून करवून घेतो तो सुद्धा दुसऱ्यावर अन्यायाच होतो.... बघा, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात.... आपल्याला जे आवडतं, जे भावत ते दुसऱ्याला आवडेलच असे नाही.... माझ ते सगळंच चांगलं आणि दुसऱ्याचं वाईट हे पापच नव्हे काय..?.. बघा, आपल्या क्षणभंगुर जीवनातील खरे सार आहे.... आयुष्यात मिळणारी संगत..!.. बघा, सत्संगामुळे वाल्याचा वाल्मीकी होतो.... चांगलं कुटुंब, चांगले शेजारी, चांगले मित्र, चांगले पुस्तक याचा सहवास लाभला तर जीवनाच्या वृक्षाला सत्कृतीची फळे येतात.... सज्जनांच्या सुसंगतीचा लाभ मिळत नसेल तर.... Better alone than in Bad Company....
बघा, ज्याच्याकडे माणुसकी आहे तो पुण्यवान.... माणुसकी म्हणजे तरी नक्की काय..?.. दुसऱ्याच्या नयनातले अश्रू पाहून गलबललेलं हृदय.... दुसऱ्याचा आनंदी, हसरा नूर पाहून स्वतः:शीच हसलेला उर... या भावना म्हणजे माणुसकी..!.. पण आजच्या युगात माणसात पशुत्वाचा संचार झालेला आहे.... दुसऱ्याचं प्रेम, दुसऱ्याची संपत्ती, दुसऱ्याचा आनंद, दुसऱ्याचं स्वातंत्र्य ओरबाडण्याच्या तो मागे लागला आहे..... त्याचे डोळे गलिच्छ पाहण्यात आनंद मानत आहेत.... त्याची जीभ दुसऱ्याच्या कुटाळया, निंदा करण्याच काम करते आहे हे कटू सत्य जाणणाऱ्या बहिणाबाई आर्ततेने म्हणतात.... "अरे माणसा माणसा कधी होशील माणूस..?..
बघा, मग या सर्व संसारगाड्यात मानवी जीवनाला योग्य ती गती आणि हेतू देणारा खरा आधार स्तंभ म्हणजेच 'अध्यात्म' होय.... बघा, अध्यात्म्याच्या अभावी जीवनाचा प्रवास शुद्धीवर नसलेल्या नावाड्याने नाव हाकारावी तद्वत होत असतो.... ध्यात्माने चेतनेच्या एका दारातून 'प्रीती' आत येते तर दुसऱ्या दारातून 'भय' बाहेर पडते.... आध्यात्माने व्यक्तीची विवेक बुद्धी जागृत होते, सुख- दु:खाकडे समभावाने पाहण्याची दृष्टी निर्माण होते....
बघा, सध्याच्या धकाधकीच्या जमान्यात सतत ताणतणावाखाली वावरणाऱ्या मनामुळे व्यक्तिमत्वाचे संतुलन भंग पावते.... त्यानंतर विचार आणि भावना उत्तेजित होतात.... ह्याचा परिणाम मानसिक यंत्रणेवर होतो.... ती अधिकतम कार्यरत होते, ताण-तणाव पचवता न आल्याने व्यक्ती दुर्बल होते.... मनोबल क्षीण होते.... मन जितके चंचल, अस्थिर तितके ते भावनेच्या विकाराच्या अधीन होते.... बघा, विकार जरी संपूर्ण नष्ट करता येत नसले तरी त्यांना वळण लावता येते.... म्हणजेच अध्यात्माने मन स्थिर आणि प्रसन्न करता येते....
बघा, मन हा आपल्या मानवाच्या वृत्तीचा आरसा आहे.... तो आज अविचार, चंचलता, बेफिकिरी आणि विकृती सारख्या धुळीने झाकला आहे.... मग त्यांत मनुष्याला स्वत:ची स्वच्छ प्रतिमा कशी दिसणार..?.. " बघावे आपणासी आपण ! तया नाव आत्मज्ञान !!".... बघा, प्रत्येक व्यक्तीपाशी एक विलक्षण अशी सुप्त दिव्यशक्ती सहवास करीत असते.... ती शक्ती ध्यात्माने जागृत करता आली तर ज्याला 'दैव' म्हणता ते सुद्धा अनुकूल होइल.... आपले नाणे जेवढे खणखणीत तेवढे सौख्य- समाधान ही खणखणीत.... नाणे जितके मोठे तितकीच शांती.... तृप्ती त्याच दर्जाची....
बघा, ह्या प्रांतात प्रतारणा, फसवेगिरी ह्यांना स्थान नाही.... इथे डोळे मिटले कि प्रकाश असतो.... शांतीत नाद असतो.... तर स्पर्शात उत्कटता नांदते.... ध्यात्माने सदचरणाचा उगम होतो.... आणि सदाचारच मनाचा खरा अलंकार होय.... आध्यात्मिक विचारांचा माणूस 'क्षमाशील' बनतो.... आणि क्षमाशील माणसाला स्वरक्षणासाठी चिलखताचीच काय, पण सुरक्षा रक्षकांच्या कवचात जखडून घेण्याची आवशकता नाही....
बघा, अध्यात्म एक अथांग सागरच आहे.... अनादी अनंत आकाश आहे.... एक गगनचुंबी शिखर आहे.... पण एकदा का हे शिखर गाठलं की, मग जीवनांत निरामय आनंद मिळणार ह्यात शंका नाहि.... आध्यात्म हा विषय गूढ, गहन, जरी असला, तरी ह्या विषयाचे आकर्षण सर्वांनाच वाटत आहे.... मन हे भगवंताने बहाल केलेले हे वाद्य जीवनाचे संगीत करण्यासाठीच आहे.... हे का एकदा उमजले तर नित्य जीवन महोत्सव करण्याची सुसंधी लाभेल....
"स्वभाव: अध्यात्मं उच्चते" याचा अर्थ... स्वत:मध्ये स्थिर भाव असतो म्हणजे जेथे आत्म्याचे अधिपत्य असते.... त्याला ' अध्यात्म ' म्हणतात.... या आधी सर्व मायेच्या अधिपत्याखालीसतात.... परंतु जेव्हा ' स्व'- भाव म्हणजेच सहज स्वरूपस्तिथी (स्वत: मध्ये स्थिरभाव निर्माण होणे) प्राप्त होते.... म्हणजेच आत्म्याचे अधिपत्य त्यात प्रवाहित होते.... हेच खरे 'अध्यात्म' हीच अध्यात्माची परमोच्च अवस्थां होय.... चित्त शुध्द झाल्याशिवाय आत्म्याची अनुभूती येत नाही.... बघा, " ज्याची स्वत:वर सत्ता असते, तोच खरा सत्ताधीश..!.." आपण मनाच्या ताब्यात न जाता मनालाच आपल्या कक्षेत ठेऊन मनाला प्रसन्नमय राखणे ह्या समान 'सिद्धी' फक्त ध्यात्मानेच साधता येते....
बघा, अध्यात्मात कर्माला फार महत्व आहे.... आपल्याला कर्म करण्यासाठी जी शक्ती प्राप्त झालेली आहे ती म्हणजे परमात्म-शक्तीचा आविष्कार होय.... कर्माशिवाय मनुष्य जगूच शकत नाही.... आपण जर सारे कर्मशून्य होऊ, तर जग चालेल कसे... बघा, सारी सृष्टी कर्म करून राहिली आहे.... प्रत्येकाने कर्म केलेच पाहिजे.... शरीराने कर्म करायचे व ते कर्म करताना बुद्धी वापरावयाची....  
बघा, आपले हे कर्म कसे उत्पन्न होते.... आपण केलेला प्रत्येक विचार, आपण केलेली प्रत्येक क्रिया काही काळाने सूक्ष्म रूप धारण करते, जणू बीजरूप धारण करते, आणि अव्यक्त रूपाने या सूक्ष्म शरीरात राहते, आणि कालांतराने फिरून प्रकट होऊन अनुरूप फल देते.... या फलांनी माणसाचे जीवन नियंत्रित होत असते.... याप्रमाणे माणूस स्वतःच्या कर्मानीच स्वतःचे जीवन घडवत असतो.... बघा, माणूस आणखी कोणत्याही नियमाच्या अधीन नाही, केवळ स्वतःच्याच कर्म बंधनानी तो बांधला आहे...."
बघा, आज अध्यात्मात प्रगती साधून साधक व्हायचे असेल तर होणारे प्रत्येक कर्म सावध चित्ताने झाले पाहिजे.... आज रागावणे, भांडणे-वादावादी करण्यात, तक्रारी करण्यात काय अर्थ आहे..?.. बघा, जो आपल्या वाट्याला आलेल्या सामान्य कामाविषयी कुरकुर करतो.... तो सर्वच कामांविषयी कुरकुर करील.... नेहमी कुरकुर करणारा मनुष्य जीवनात नेहमी दुख: भोगतो.... कोणतेही काम हाती घेवो, त्यात त्याला यश म्हणून येत नाही.... पण जो मनुष्य अंग मोडून आपले कर्तव्य कर्म चोखपणे बजावतो तो यशस्वी होतो आणि त्याला अधिकाधिक उच्च कार्ये करण्याची संधी मिळते.... म्हणूनच आत्म परिवर्तनाने वाद करण्यापेक्षा संवाद आणि तक्रारीपेक्षा सहकार साधा....  
बघा, आपली जी वर्तणूक आहे ती प्रत्येकालाच आदर्श वाटते.... पण हे अंश सत्य असते, मानवास त्याच्या सत्य ताकदीचा अंदाजनसतो.... तो याहीपेक्षा कैक पटीने चांगला वागू शकतो... पण केव्हा.... जेव्हा त्याला स्वतःला हे कळेल कि आपण वाईट वागतो....
बघा, सारांश अध्यात्मात पाऊल पुढे पडावयाचे असेल तर कर्म, कर्तव्य, गुरु व साधना महत्वाचे.... आणि गुरूने   सांगितलेले साधन सोडून चालणार नाही.... तसेच साधन किती वेळ केले याला महत्त्व नसून ते कसे झाले याला महत्त्व आहे.... साधनाचे अभ्यासाने कर्मांचा नाश होतो.... बघा, अध्यात्मात साधनास सुरवात होणे हे फार अवघड आहे.... पण एकदा का सुरवात झाली की मग भराभर वाटचाल होते....
ॐ श्री गुरुदेव दत्त....