महाशिवरात्री म्हणजे परिवर्तनाचा
काळ.....
परमपिता शिव परमात्माबरोबर जोडली गेलेली `रात्री’ आध्यात्मिक रहस्याकडे संकेत करते…. आता
शिवरात्री म्हणजे काय..?.. तर ‘रात्री’ या शब्दाचा अर्थ अज्ञानाशी संबंधित आहे.... अज्ञाननिद्रेत झोपलेल्या, बुद्धी तमोगुणांनी व्यापलेल्या आत्म्यामध्ये विकाररुपी चोर,
लुटारु माणसांच्या सुखाला
लुटून त्याला नष्ट भ्रष्ट करीत असतात आणि त्यांनाच तो मित्र समजून उशाला घेऊन झोपत
असतो.... अशावेळी परमपिता, परमात्मा शिव विश्वाच्या कल्याणाकरिता
अवतारित होतात.... जेव्हा सर्व मनुष्यात्मे `माया’ म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार ह्या पाच विकारांमुळे दुःखी, अशांत, पापी, भ्रष्टाचारी होऊन जातात…. तेव्हा त्यांना पुन्हा पावन व संपूर्ण ज्ञानी बनवण्याचे कल्याणकारी कर्तव्य
करतात आणि म्हणूनच त्यांचे `शिव’ हे नाव सार्थक आहे….
शिव ह्या शब्दाचा अर्थ कल्याणकारी आहे…. शिव स्वयंभू आहेत.... सदा निराकारी स्थितीमध्ये, प्रकाशरुप, बिंदूरुप स्थितीमध्ये सहाव्या तत्त्वामध्ये किंवा
अग्नितत्त्वामध्ये राहतात.... शिवतत्व मनुष्य सृष्टीचे चैतन्य बीजरूप आहेत आणि
जन्ममरण, कर्म बंधनापासून मुक्त आहेत.... जेव्हा
व्यक्ती जागृतीत येते तेव्हा ह्यालाच परमात्म्याचा दिव्य जन्म वा दिव्य
अवतरण असे म्हटले जाते.... कारण ज्या
शरीराचा परमात्मा आधार घेतात तो देखील एक जन्म-मरण-कर्म-बंधनाच्या चक्रामध्ये
येणारा मनुष्य आत्मा आहे.... तो जो आहे, जसा आहे त्याला त्याच रुपामध्ये ओळखून त्यांच्या आठवणीत राहून आपल्याला आपल्या
मूळ आत्मा स्वरुपाला ओळखून, आपल्या मूळ गुणांना धारण केले जाते.... आत्मस्थित
शिवतत्त्व ज्ञानरुपी अमृत आणि योगरुपी
प्रकाशाद्वारे मनुष्यमात्रास सतोप्रधान बनवितात....
मात्र
या 'शिवशक्ती'ची आयुधे मात्र
सर्वस्वी वैशिष्टपूर्ण आहेत..... डमरू, त्रिशूळ आणि शंख या तिहेरी आयुधांच्या वापरातून
हा त्रिनेत्री देव आपले सातत्याने रक्षण करतो असे वाटते.... डमरू नादातून तो आपणास जागरूक करतो, त्रिशुळाच्या खणखणाटातून तो आपणास सजग ठेवतो तर शंखध्वनीतून तो आपणास भानावर आणतो....
म्हणजेच या रुद्रावतारी देवाचा या आयुधांचा प्रथम वापर हा नादब्रम्हातून
आहे... गरज आहे... आपण आपले कान जागृतीने उघडे
ठेवून ते ऐकण्याची.... डमरू' च्या आवाजातून जागरूक हो हे त्याचे सांगणे म्हणजे जगताना बरे वाईट, मोहमयी काय ते समजून घे....
या डमरूच्या आवाजातील संदेश जर आपल्यापर्यंत पोचलाच नाही.... तर 'त्रिशुळा'
चा खणखणाट आपणास बजावतो.... अरे तुझे कान उघडे आहेत.. पण
तू नाद ब्रह्मातील आवाज काय ध्वनित करतोय हेच ऐकत नाही आहेस.... आवाज
कानावर पडला... पण तो आत पोचलाच नाही तर त्याचा उपयोग नाही, हे विसरू नकोस....
जर डमरू आणि त्रिशुळ यांच्या आवाजातील ध्वनित अर्थ भक्तासाठी अपुरे
ठरले तर हा भैरव 'शंखा' च्या नाद लहरी
अश्याप्रकारे उमटवतो.... कि
त्या वाद-संवादी लहरीच्या नादमय
लाटा भक्त शिष्यास वास्तवता दाखवून जागृत करून जगाच्या
परिघाच्या पलीकडे नेवून जाणीवेतून नेणीवेत नेऊनच भानावर आणतात....
म्हणूनच
आपण देखील रुद्राच्या अभिषेकातून स्वतःस शुचिर्भूत करून घेण्याचे भाग्य आपल्या
पदरी पडून घेवू या...
ओंकार रुपी शिवाचे अनुभूतीच्या पलीकडील अशा त्यास
शरण जाऊ, यातच आपले परम भाग्य दडलेले आहे.... आजच्या
ह्या शिवरात्रीच्या महान पर्वाच्या दिवशी आपण सर्वानी दृढ
संकल्प करूया की, देहअभिमानाचा त्याग करून आत्मिक
स्थितीमध्ये स्थित होऊन आत्म्यांच्या मूळ गुणांना धारण करून आपण आपल्या जीवनामध्ये
आचरण करण्याचा प्रयत्न करू....
कदाचित या महारुद्राच्या निमित्ताने चराचरात दडून राहिलेले माझ्यातील
विश्व अथवा विश्वातील मी यांचे परस्परातील नाते उलगडले जाईल.... आणि थोड्या काळात माझ्यात कालातीत बदल घडेल.... कदाचित मला
अग्नीची होरपळ, पाण्याची तहान, विश्वाची व्याप्ती आणि श्रद्धेची अनुभूती यांची
अल्पशी जाणीव होईल... आणि माझ्या ओठी नेहमीच राहिल ते शब्द
ब्रम्ह असेल....
अहं निर्विकल्पो निराकार रूपो
विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वन्द्रियाणि ।
सदा मी समत्वं न मुक्तिर्न बन्धः
चिदानन्दरुपः शिवोSहं शिवो S हम ।।
ॐ श्री गुरुदेव दत्त....