Thursday 14 August 2014


तिरंगा आणि आपण... 

स्वातंत्र्य... खळाळणाऱ्या झऱ्यासारखे... उत्तुंग पर्वतशिखरांसारखे... थांग लागू न देणाऱ्या दर्यासारखे... काठांवरील जीवन संपन्न करत निघालेल्या सरितेसारखे... सुपीकतेचे वरदान लाभलेल्या या भारतभूच्या विविधतेमधून एकतेचा संदेश देत भेटणारे... स्वातंत्र्य... माणसाला माणूस म्हणून जगू देणारे... मदतीचा हात देण्याची वृत्ती जोपासणारे... प्रत्येक श्‍वास मोकळेपणाने घेऊ देणारे... तरुणाईच्या ऊर्जेला अनुभवाचे बळ देणारे... हे स्वातंत्र्य माझ्या देशाचे... तुमच्या-माझ्यामध्ये भिनलेले... नवोन्मेषाचे अंकुर रुजवत निघालेले... अशा या स्वातंत्र्याच्या सन्मानचिन्हांच्या प्रवासाची स्वातंत्र्यदिनानिमित्त थोडक्‍यात ओळख...

माझ्या तरुण मित्रांनो.... दीर्घकाळ गुलामगिरीत राहून अथक संघर्षानंतर मुक्त झालेल्या देशाचे ध्वज, त्याची बोधचिन्हे, त्याचे राष्ट्रगीत यांचा उत्क्रांतही गुंतागुंतीचा, रंजक आणि आशयपूर्ण असतो... 15 ऑगस्ट 1947 ला लाल किल्ल्यावर मोठ्या ऐटीत फडकणाऱ्या तिरंग्याच्या जन्मकळाही शंभर-सव्वाशे वर्षे मागे जाऊन आपल्याला पाहाव्या लागतात.... तेहतीस कोटींहून अधिक देव, अनेक पंथ, धर्म असलेल्या भारतात यापैकी प्रत्येकाचा झेंडा होता आणि आहे.. अगदी मरीआईपासून ते रामकृष्णापर्यंत प्रत्येकाचे झेंडे आहेत; पण देश म्हणून आपला झेंडा नव्हता... अनेक संस्थानांत विभागल्या गेलेल्या प्रत्येकाचे झेंडे होते... आपल्याला गुलाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे झेंडे होते; पण भारताचा नव्हता... असायचे कारण नव्हते, कारण गुलामाला मालकाचा झेंडा मिरवावा लागत होता.... केशरी, पांढरा आणि हिरवा असे तीन रंग आणि चोवीस आऱ्यांचे अशोकचक्र मिरवणारा तिरंगा तसा वेगवेगळ्या अवस्थांतून इथपर्यंत पोचला आहे....

असा हा थोडक्यात इतिहास... राजा राममोहन रॉय यांनी सर्वप्रथम देशासाठी ध्वज असावा, असे स्वप्न परदेश दौऱ्यावर जाताना पाहिले होते, असे म्हणतात.... त्यानंतर भारतातील अनेक संस्थानिक 1857 च्या बंडात आपापला ध्वज घेऊन लढले आणि त्यातून देशासाठी एक स्वतंत्र ध्वज असावा, अशी कल्पना पुढे येऊ लागली... स्वातंत्र्यचळवळीत अनेक गट होते.... प्रत्येकाच्या मनात आणि विविध व्यक्तींच्या मनातही ध्वजाची कल्पना आकार घेत होती.... स्वातंत्र्यचळवळीला जोर आला तशी ध्वजाची कल्पना आकार घेऊ लागली.... वेगवेगळ्या कल्पना लढवल्या जाऊ लागल्या... 1921 मध्ये पी. वेंकय्या यांनी हिरव्या, तांबड्या रंगाचा ध्वज तयार केला... मध्ये चरखा टाकला.... महात्मा गांधींच्या सूचनेनुसार पांढरा रंग वापरून आणखी एक पट्टा तयार केला... कॉंग्रेसच्या अधिवेशनात हा ध्वज वापरला जाऊ लागला... तिकडे सुभाषचंद्र बोस यांनी तीन रंगांवर झेप घेणारा चित्ता टाकून ध्वज बनवला होता... स्वराज्य या नावाने ओळखला जाणारा झेंडा घेऊन मिरवणूक काढणाऱ्या कार्यकर्त्यांना 13 एप्रिल 1923 ला नागपुरात पोलिसांनी अटक केली होती... सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या झेंडा चळवळीत देशभर अनेकांना अटक झाली होती... 1931 मध्ये कॉंग्रेसने स्वीकारलेला तीन रंगांचा (केशरी, पांढरा आणि हिरवा), तसेच चरखा चित्र असलेला ध्वज स्वराज्य ध्वज म्हणून ओळखला जात होता....

ब्रिटिश भारत सोडणार, हे निश्‍चित झाले आणि 23 जून 1947 ला डॉ. राजेंद्रप्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम, सरोजिनी नायडू आदींची समिती नेमण्यात आली... या समितीने तिरंग्याची शिफारस केली... चरख्याच्या जागी अशोकचक्र आले... चरखा बदलण्याची कल्पना महात्मा गांधींना फारशी रुचली नव्हती, असे म्हणतात... 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र देशाचा ध्वज म्हणून तिरंगा फडकला... तिरंग्याच्या वापरासंबंधी, त्याच्या आकारासंबंधी अतिशय कडक नियम आहेत... तिरंग्याचा अवमान झाल्यास दंड आणि तुरुंगवास, अशी शिक्षेची तरतूद आहे... पण आपल्याला ते पुर्णपणे माहीत नाहीत... आणि आपल्या काही प्रमाणात आपल्या राज्यकर्त्यांनाही...

देशाची शान असलेल्या या तिरंग्याचा वापर सर्वसामान्यांनाही करता यावा, यासाठी उद्योगपती जिंदाल यांनी न्यायालयात जाऊन लढाई केली... आणि तिरंगा सर्वांसाठी खुला झाला... पण काही अटी आणि नियमांनीच... या संहितेनुसार काही नियम...

1. राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा... जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे...
2. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये... कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये... इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये...
3. राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये... केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये... तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये...
4. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे... ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे...  त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये.. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही...
5. ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये... कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही... तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये...
6. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही... ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही...
7. केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो... राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत... शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील...
8. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल... सरकारी अधिकार्यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे... आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात...
9. ध्वजाचा आकार म्हणजे aspect ratio आणि रंग योग्य हवा...  
10. रंग उडालेला, फाटलेला राष्ट्रध्वज फडकावण्यास योग्य नसतो... असे करणे म्हणजे ध्वजाचा अपमान करणे आहे हे लक्षात ठेवा.... राष्ट्रध्वजाची अशी स्थिती झाल्यास गुप्तपणे त्याला अग्नीच्या स्वाधीन केले पाहिजे... किंवा वजन किंवा रेतीत बांधून पवित्र नदी किंवा जलसमाधी दिली पाहिजे... पार्थिव शरीरावरून उतरवलेल्या ध्वजाच्या बाबतीतही असे केले पाहिजे...
15 औगस्ट – 26 जानेवारीला तिरंगा फडकावण्याचे स्वातंत्र्य सर्वांनाच मिळाले आहे... विशिष्ट व्यक्तींना मोटारीवर तिरंगा लावण्याचा अधिकार आहे... विशिष्ट शासकीय इमारतींवरही तो फडकत असतो....

आज तरुणाई इंटरनेट, मोबाइल यावर ध्वजाचे फोटो वापरते, पण त्यात रंग, आकार याचे काहीच भान नसते... आणि नुसता झेंड्याचा फोटोनेच त्यांचे बेगडी देशप्रेम उतू जाते... आजची पिढी सर्वच बाबतीत उतावीळ आहे... आणि ते विसरतात, भारतीय स्वातंत्र्य यज्ञात आपल्या जन्माच्या समिधा करून हुतात्म्यांनी आपणाला हे स्वातंत्र्य बहाल केले... आणि आज नव्या क्षितिजाला साद देत भारत देश जागतिक महासत्ता बनण्याची स्वप्न पाहू लागलाय..!.. आणि का पाहू नयेत ? पण या संक्रमण काळात स्वतःला भारतीय म्हणवून घेणारांनी क्षणभर थांबून स्वतःला आरशा पुढे उभे करून आत्मचिंतन करण्याची आवश्यक्ता आहे असे मला वाटते.. कारण आज खरोखरच आपणामध्ये किती राष्ट्रप्रेम शिल्लक आहे ते आज तपासण्याची गरज आहे... कारण मागच्या पिढीने किमान स्वातंत्र्याच्या गोष्टी तरी ऐकविल्या त्यामुळे आज राष्ट्रप्रेम या शब्दाचा तरी आपणास अर्थ समजत असावा..?.. फार आत्मकेंद्री आणि स्वार्थी जीवन जगत आहोत आपण, इतके कि नात्यातील मायेचा ओलावाही औपचारिक होत चाललाय..!..

देश कार्यासाठी घरावर तुळशी पत्र ठेवनाराची पिढी केंव्हाच इतिहास जमा झालीय.. छ. शिवरायांचे गोडवे गाताना शिवराय आपल्या घरी जन्मू नयेत ही प्रत्येकाची इच्छा म्हणजे गाव जाळला तरी आपल्या घराला धग लागू नये... दानधर्मही incom tax मधून वजावट मिळण्यासाठी करतो.. संसारात कोणाचीहि वर्दळ नकोशी वाटते, आणि प्रत्येक हितसंबंध फायदा बघून जोडले जातात... या सर्वात देश, समाज कसे असणार..?.. आणि आपल्यातली संपलेली राष्ट्रप्रेमाची भावना हेच उदया आपल्या सर्वनाशाचे कारण असेल... त्या मूळ घरभेद्याची निर्माण झालेली पैदास संपवण्यासाठी मनामनात राष्ट्रप्रेम जागलच पाहिजे..!!..

१५ ऑगस्ट आणि २६ जाने .ला जेंव्हा वातावरण राष्ट्रभक्तीने दरवळत असते... तेंव्हा तत्कालीन राष्ट्रप्रेम जागे होते, आणि ते एन्जॉय करताना प्रचंड प्रमाणात प्लास्टिकच्या तिरंगी झेन्ड्याची खरेदी भल्या उत्साहात केली जाते व जसजसा सूर्य माथ्यावर चढू लागतो... तसा हा कैफ उतरत जाते व खरेदी केलेले झेंडे निर्माल्य बनून रस्त्यावर पायदळी, गटारात पडतात... पण आता ती निरुपयोगी वस्तू बनते... सकाळी झेंड्यासाठी भांडणारी भावंडे दुपारी कोपऱ्यात पडलेल्या कचरा रुपी झेंड्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत... तिरंगा म्हणजे या देशाची अस्मिता, प्राण गेला तरी हातातला ध्वज न झुकू देणाऱ्याचे आपण वारसदार..!.. तिरंग्याचे हे प्रतिरूप पायदळी तुडवताना त्या हौतात्म्याच्या मनाला काय वेदना होत असतील..?..

एक विनंती... कृपया प्लास्टिक झेंडे अजिबात खरेदी करू नये... ध्वज वंदना नंतर हे झेंडे सन्मान पूर्वक व्यवस्थित ठेवावेत व नजरेला पडेल तो झेंडा उचलावा व त्याचा अवमान होणार नाही... याची काळजी घ्यावी...

उत्सव तीन रंगाचा... आभाळी आज सजला...
नतमस्तक मी या सर्वांसाठी... ज्यांनी भारत देश घडविला...
भारत देशाला मानाचा मुजरा...

ॐ श्री गुरुदेव दत्त...