Friday, 22 August 2014


आत्मस्वर : गुरुदेव

गुरु तोची देव.. "गुरुदेव'' ही चारच अक्षरे ! परंतु त्यात केवढे प्रचंड सामर्थ्य साठवलेले आहे. ज्या शब्दात प्रेरणा आहे, ज्यात तेजोमयता आहे, ज्यात निराकारता आहे, जे ज्ञानमय, शक्तीमय असे आहे. असे गुरुपद कुणीही, कधीही विसरु शकणार नाही. श्रद्धेचा पूर्णाविष्कार, समर्पणाची संपूर्णता, प्रेमाची दयार्दता ज्यात जाणवते ते गुरुदेव, ज्यांच्या शब्दांतून निरामय, निर्विकार, निःस्वार्थ, निस्सीम, निर्विकल्प, निष्काम असे प्रेम, भक्ती, करुणा यांच्या सतत आणि सातत्याने साक्षात्कार घडत असतो, असे गुरुदेव स्वामी शंकरानंद. ज्यांच्या पदन्यासात तरलता आहे, ज्यांच्या वाणीत मुर्तीमंत माधुर्य आहे, ज्यांच स्मितही मधुर आहे आणि माधुर्याशिवाय आणखी काहीही नाही, असे गुरुदेव स्वामी शंकरानंद.

सद्गुरू स्वयं निराकार आहे, परंतू इतरांसाठी आकारात बद्ध झालाय, जो स्वतः विभूती असून लोकांच्या कल्याणासाठी व्यक्तीच्या रुपात संचार करण्याचे सदैव कष्ट घेत असतो, तो सदगुरु ज्यांना ज्यांना भेटतो त्यांचे (साधकांचे) आयुष्य पुलकित होते. जीवनाचे साध्य स्पष्ट दिसते. अहंकाराचा नाश होतो. बुद्धीची जागा श्रद्धेने व्यापून जाते.

सद्गुरू दर्शन झाल्यावर अश्रुंचे रूपांतर आनंदाश्रूत.. आनंदाश्रृंचे परिवर्तन तीर्थाश्रूत करणारे आपले गुरुदेव, खऱ्या अर्थाने आपल्या शिष्यावर अधिराज्य गाजवतात. या राज्यात सक्ती नसते तर भक्ती असते, चमत्कार नसतो तर साक्षात्कार असतो, तेजस्विता आणि मनस्विता यांचा तो मनोहरी संगम असतो, ज्या संगमातले तरंग हे सुद्धा मोरपिसासारखे असतात. प्रत्येक भावनेचे भावात परिवर्तन होऊन हा मधुर भाव जणू श्रीकृष्णाच्या माधुर्यांच दर्शन घडवत असतांना सद्गुरुंच्या मुखातून "मधुराधिपते रखिलं मधुरं" असे मोरपंखी मधुर शब्द उत्स्फूर्तपणे बाहेर पडले तर आश्चर्य ते काय ?

स्वामी मछिंद्रनाथांसारखा नैतिक वैराग्याचा स्वीकार, संन्यस्तवृत्ती, भारतभर संचार, ध्यान साधनेतून ज्ञानाची कठोर उपासना या सर्वांचा परिपाक म्हणजे हा "मधुरभाव" नाही का ? तोच गुरुदेवांच्या ठिकाणी असतो.

आपले सद्गुरू तुमच्या अगदी समीप आहेत, फक्त हृदयाच्या नेत्रांनी त्यांना शोधावे लागेल, भक्तीच्या निरांजनांनी त्यांना ओवाळावे लागेल, मग तीर्थाश्रृंनी त्यांना अभिषेक करावा हीच शिष्याच्या जीवनाची पूर्तता..

परमार्थात हे सर्व फक्त बोलून वा भावना मनी ठेऊन होत नाही. तर यासाठी प्रत्यक्ष कृती (साधना) करावी लागते. कृती केल्यानंतरच अनुभूती येते व अनुभूती आल्यावरच परमार्थिक प्रगती होते. म्हणून साधकाची कृती म्हणजे प्रत्यक्ष साधना. साधने शिवाय पारमार्थिक प्रगती होणे शक्य नाही. गुरु साधनेने षड्रिपु दूर होतील, काम क्रोध, मोह ,लोभ,मद मत्सर या वृत्ती लोपून सात्विक होतील. ईश्वराचे गुण आपल्याठायी यायला लागतील.

स्वतःच्या मनाने जर आपण साधना केली तर त्यातून परमार्थिक उन्नती होत नाही. कारण आपण परिपूर्ण नसल्यामुळे आपले विचार हे सुद्धा परिपूर्ण नसतात. यासाठी गुरु अनुग्रहित साधनेचे तत्त्व महत्वाचे आहे.  गुरूंच्या बोधाचा अभ्यास करावा, त्या ज्ञानाचा अंगीकार करावा व शुद्ध पवित्र आचरण करीत साधना करावी.

नाथ महाराज आपल्या गुरूंविषयी म्हणतात गुरु माता, गुरुपिता, गुरु आमची कुलदेवता.. प्रत्येक शिष्य आपल्या गुरूंची महती सर्वांना सांगत असतो, कारण गुरु हेच सर्वस्व आहे.. गुरु हे ईश्वर आहे, गुरु हेच परमेश्वर आहे.. आपल्या सद्गुरूंच्या आठवणीत सर्व देवतांचे स्मरण अंतर्भूत आहे..! ॐ श्री गुरुदेव दत्त...







No comments:

Post a Comment