काय रे! साधना करतोस ना? (सद्गुरू बोध कथा)
स्वामीजी म्हणाले, एक गोष्ट सांगतो.. समर्थ अक्कलकोटात असताना भास्कर नावाचा एक कृष्णभक्त श्रीकृष्ण दर्शनास वृंदावन क्षेत्राकडे जाताना अक्कलकोट परिसरातून जात असतो. निर्मनुष्य पायवाटेवर त्याच्या अंगावर झाडाची फांदी तुटून पडते व तो जखमी होऊन असहाय अवस्थेत तेथेच त्या फांदीखाली पडलेला असतो. स्वामी समर्थ तेथे प्रकट होऊन त्याच्या अंगावरील ती भरभक्कम फांदी बाजूला करतात व गुप्त होतात. पायाला जबर मार लागलेला भास्कर अक्कलकोटातील वाटसरूंसाठी असलेल्या धर्मशाळेत येतो. तोपर्यंत स्वामीस्थानावर स्वामी बाळप्पाला जंगलातून एका विशिष्ट झाडाची मुळी घेऊन यायला सांगतात व स्वतः सहाणेवर ती मुळी घासून लेप तयार करतात व तो लेप घेऊन स्वतः धर्मशाळेत भास्कर कडे येतात व त्याला तो लेप दुखऱ्या भागी लावायला सांगतात.
त्यावेळी भास्कर समर्थ स्वामींना विचारतो की तुम्ही कोण? त्यावेळी स्वामी प्रेमाने गरजतात की, "काय रे! साधना करतोस ना? मग आम्हाला ओळख की!".
गुरुबोध मर्म : स्वामी इथे त्यांच्या प्राप्तीचे मर्म आपणा सर्वांना सांगून जातात. तुला वाटते ना की तू साधना करतोस, ध्यान धरतोस, प्राण वर चढवतो, नाकाच्या शेंड्यावर अर्धोंमिलीत नजर लावून बसतोस, कपाळात पाहतोस, हृदय चक्रावर लक्ष केंद्रित करतोस, नाभिस्थानाकडे नाही आतून पाहतोस मग मी समोर आल्यावर मला का ओळखत नाहीस. तू आतापर्यंत साधना म्हणून जे जे काही केलंय ते व्यर्थ गेलेले नाही. त्याचंच फळ म्हणून मी आज तुझ्यासमोर स्वतः येऊन उभा आहे.
पण मी साधना करतो, मी साधना करतो असा सुक्ष्म अहंकार तुझ्यात तू उत्पन्न करून ठेवला आहे. व ध्यानासाठी माझं एक विशिष्ट रूप तू तुझ्या डोळ्यासमोर धरून चाललास.परिणामी तू तुझ्या नजरेवर पडदे टाकून घेतलेस, जाणीवेच्या खिडक्या बंद करून बसलास.
त्रिमूर्ती दत्ताला श्रीपाद श्रीवल्लभांपासून वेगळा समजलास. श्रीगुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना श्रीपाद श्रीवल्लभांपेक्षा वेगळा समजलास. एवढेच काय मलाही या तिघांपासून परका समजलास. त्यामुळे तू माझ्या ठिकाणी अद्वैत साधू शकत नाहीस. तुझं आराध्य दैवत श्रीकृष्णाला तू माझ्यात पाहू शकत नाहीस हा तुझा दोष आहे.
तिकडे बाळप्पा अनुसंधानात राहून, मी सांगेन ते, सुखकारक असेल अशा विचाराने अहोरात्र कार्यरत आहे.. मला नजरेतून काही क्षणही दूर न होऊ देण्यासाठी तो निशीदीनी झटत आहे. ती आहे खरी साधना.
साधना आपल्याला ओळख देत नाही तर ती ओळखायला शिकवते हे मर्म आहे. आणि ९९.९९ टक्के स्वतःला साधक म्हणवून घेणारे स्वतःला ओळख मिळावी म्हणून बाह्य देखावा जाणते अजाणतेपणी उभा करतात. एका विशिष्ट टर्निंग पॉइंटवर योग्य दिशेने वळलं नाही तर आतापर्यंतचा प्रवास कसा फेल होतो याचं हे सर्वत्र उदाहरण आहे. साधना योग्यच आहे, साधना करणं योग्यच आहे. फक्त साधना मार्गावर चालताना एक छोटंसं वळण येणार आहे. तिथं स्वतःच्या साधनेच्या हायवेचा गर्व न धरता त्या बारीक पायवाटेवर वळायचं आहे जी तुम्हाला तुमच्या खऱ्या सतगुरू पर्यंत घेऊन जायला आसुसलेली आहे. पण ती वाट ओबडधोबड दिसते म्हणून तिच्याकडे नाक मुरडत पाहून तिथं न वळता स्व साधनेच्या स्वकल्पित हायवेवर चालतच राहिला तर त्या हायवेला ना अंत आहे, ना थांबा आहे, ना त्यापुढे एखादं वळण आहे. योग्य वळणावर वळले नाही तर प्रवासाला अंत नाही, गंतव्य स्थान नाही.
मला चौबळ महाराजांनी सांगितले की पावसला स्वरुपानंदांकडे जा. तीन शब्दांचा खेळ आहे. त्याकाळी पावस म्हणजे आडवळणाचा प्रवास, हायवेवर सरळ न जाता वळण हे घ्यावे लागते. हेच वळण महत्वाचे आहे. नाही वळले तर प्रवासाला अंत नाही!
सारबोध : अध्यात्म मार्गावरील चकाचक देखाव्याला भुलू नये हेच शिकवून जाते. आपण जर चुकून झगमगाटाच्या वाटेवर गेलो तर आपल्याला वळता येत नाही. कोणी थांबू देत नाही. कोणी आपल्या चुकीवर खेद व्यक्त करत नाही. कारण तो हायवे जरी कोठे पोचत असला तरी तो आपला योग्य मार्ग नसतो. आपली जन्माची उद्दिष्टे साध्य करून देणारा नसतो.
भारताच्या दक्षिण टोकापासून निघालेले एकोणीस वर्षांचे श्री एम् भारताच्या उत्तर टोकाला पोहचतात. रस्ता संपतो पण गुरू भेटत नाही. आता मागे फिरून काय करायचे त्यापेक्षा देह गंगार्पण केलेला बरा या विचारात ओबडधोबड व्यास गुहेत धूर दिसतो. तेथे काय आहे, कोण आहे हे तर पाहू म्हणत तेथे पोहोचताच "ये मधू" असा आतून आवाज येतो आणि श्री एम् यांचा प्रवास सार्थकी लागतो. तसेच काहीसे, पण प्रत्येकाने आत्मपरीक्षणाने हे ओळखणे गरजेचे असेल..! ॐ श्री गुरुदेव दत्त...
No comments:
Post a Comment