Wednesday 12 August 2015

गुरुतत्व ज्ञान आणि कृपा... 

आज बरेचजन असे असतात, त्याना गुरुचा अनुग्रह प्राप्त तर होतो, पण त्या अनुग्रहाचे महत्व आणि प्रयोजन बहुतेकांना कळून येत नाही... याला खूप विविध गोष्टी कारणीभूत असतात... पण प्रामुख्याने साधकाचा अहंकार आत्मभान जाणीवेतील ठळक अडथळा ठरतो... तोकडे ज्ञान, विद्या ही साधकाला सद्गुरू आणि साधन यापासून दूर नेते...

कसे आहे, वारकरी पंथातले अडाणी लोक 'विठ्ठल विठ्ठल' म्हणता म्हणता भगवंताला ओळखतात, पण शहाणे लोक परमार्थी ग्रथ वाचूनही त्याला ओळखीत नाहीत... काहीजण सर्व उपलब्धी असूनही काहीच न करता संसारात गुंतून –गुंतून जातात... घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली, तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामांसात जाऊन रक्तांत मिसळत नाहीत... तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही.... त्याचप्रमाणे, गुरुज्ञानाचे पर्यवसान आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते...

खूप साधक गुरुच्या अनुग्रहाने इतके भारावतात कि त्या गुरू कृपेच्या अहंकारात बुडून राहतात... मग नकळतपणे काही वेळा गुरूच्या नावाचा गैरवापरही होतो... काही साधक थोड्याफार काही कळून आलेल्या ज्ञानावर आपणास सर्व माहित आहे या अविर्भावातच दुसऱ्या साधकाशी वा इतरांशी वागतात... हि गुर्मी असते गुरुज्ञानाच्या अज्ञानाची... आणि हे सर्व दूर करणे फक्त साधकाच्याच हाती असते, गरज असते फक्त एका आत्मपरीक्षणाची...

सद्गुरू नेहमीच अव्यक्त बोधाने सांगत असतात... मला तुमचे कडून फक्त साधनेचे कष्ट नको, तर साधनेत सातत्य पाहिजे... आत्म जाणीवेकरिता कुणीही कष्ट करून नका, कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे... ती वस्तू सात्त्विक प्रेमाने साध्य होणारी आहे... आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो... तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा, आपपसांत प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय, प्रेममय दिसू लागेल, आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल... मग सुरु होईल तुमचा आत्मप्रवास...

मनुष्याचा स्वभावच असा असतो की, आपल्या कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानतो... पण आपली कल्पनाच किती संकुचित असते, याचे कोणी विचार करीत नाही... जो कल्पनेच्या पलीकडे आहे, जिथे कल्पना थांबते, ज्याला कल्पना बांधू शकत नाही, त्याला कल्पनेने कसे बरे ओळखता येईल..?.. जो ज्ञानाच्या पलीकडे राहिला आहे... त्याला माझ्या तोकड्या ज्ञानाने कसे आजमावता येणार..?..

माझ्या बुद्धीच्या पलीकडे तो आहे, तेव्हां गुरूला शरण जाऊनच त्याचे खरे ज्ञान होणार आहे... अविद्या ती हीच की आपल्या कल्पनेने होणारे ज्ञान हेच खरे मानणे... याकरिता श्रद्धा आणि कल्पना यांतला फरक ओळखावा... खरी श्रद्धा तीच की जी कल्पनेच्या पलीकडे राहते... गुरुवर श्रद्धा हवीच, पण अशी कल्पना कदापि नको, गुरूस वाटेल त्यावेळी तो मजवर कृपा करील... आज कृपेस प्राप्त होऊ इतपत प्रयत्न साधकाने केलेच पाहिजेत... तेही योग्य तत्वादी शरणागते... यासाठी पाहिजे तो योग्य अभ्यास...  प्रल्हादाइतके आपण गुरूला सत्यत्व देत नाही... कल्पनेची मजल प्रल्हादाने नाही चालविली... कल्पनेच्याही पलीकडे राहिला असे मानायला काय हरकत आहे..?..


ॐ श्री गुरुदेव दत्त...

No comments:

Post a Comment