Tuesday 1 November 2016

|| ॐ श्री गुरुदेव दत्त ||

प्रकाशरूपाने प्रकाशाची केलेली पूजा म्हणजेच दीपोत्सव..!

 प्रत्येकात अवस्थित असलेलं चैतन्य हा आंतर्प्रकाश आणि दिव्यांमधील प्रकाश हा बाह्य प्रकाश, ह्यांचं ज्ञान मनांत ठसवून दिवाळीच्या दिवशी खरोखरी ज्ञानाचा दिवा लावता आला पाहिजे..

 अज्ञानाच्या ह्या अंधाराच हरण केवळ आत्मज्ञानरुपी ' सोहं ' अर्थात ' तोच मी ' ह्या प्रकाशाने होतं.. त्या प्रकाशाकडे जाण्यासाठी मानवी जन्माचं खरं प्रयोजन काय, ह्याचा विचार जो करतो, त्याला काही ना काही मार्गाने सद्गुरुरूपी ईश्वरीतत्वाकडून मार्गदर्शन निश्चिन्तच मिळते..

 उपनिषदांतल्या तात्पर्यानुसार ईश्वरीयतत्वाशी नातं सांगणारा आपल्यातला आंतरप्रकाश आणि प्रत्यक्ष ईश्वरीतत्व ह्यांच्यातील मनाने मानलेलं अंतर हाच आपल्या मनातला अंधार आहे.. हे दूरत्व जेव्हा नाहीस होईल, तेव्हा त्याचबरोबर जीवनांतील अंधार कायमचा नाहीसा झालेला असेल.. मग नित्य दसरा - दिवाळी..! 


|| ॐ श्री गुरुदेव दत्त ||

दिवाळी म्हणजे दीपोत्सव.. बाहेर तर दिवे पेटवायचे, पण खरा दिवा तर हृदयात पेटला पाहिजे..  

दिवा हे ज्ञानाचे प्रतिक आहे..

हृदयात दिवा लावणे म्हणजे.. हृदयी सद्गुरू ह्या निश्चित प्रकारच्या जाणीवेने दिवाळीचा सण साजरा करणे..

मज हृदयी सदगुरु। जेणे तारिला हा संसारपूरु । म्हणॉनि विशेषे अत्यादरु । विवेकावरी

गुरुबोधी विवेक विचाराने.. धनत्रयोदशीच्या दिवशी वित्ताला अनर्थ न मानता जीवन सार्थक करण्याची शक्ती मानून महालक्ष्मीची पूजा करायची.. नरक चतुर्दशीच्या दिवशी जीवनात नरक निर्माण करणारा आळस, प्रमाद, अस्वच्छता, अनिष्टता वगैरे नरकासुरांना मारणे.. दिवाळीच्या दिवशी तमसो मा ज्योतिर्गमयमंत्राची साधना करता करता जीवन पथ प्रकाशित करायचा..

जीवनाच्या वहीचा आढावा घेत वेळी जमेच्या बाजूला गुरु-ईशकृपा राहावी ह्यासाठी सद्गुरूंच्या गुरुबोध प्रकाशाने जीवन भरून काढायचे.. नव्या वर्षाच्या दिवशी जुने वैर विष विसरून शत्रूचेही शुभचिंतन करायचे.. नवे वर्ष म्हणजे शुभ संकल्पाचा दिवस.. भाऊबीजेच्या दिवशी बंधूच्या निर्व्याज प्रेमाने संपूर्ण स्त्री-समाज बहिणीच्या रुपात स्वीकारायचा.. सुंदर ज्ञान देणारा सद्गुरूंच्या बोधाचा ज्ञानदीप जर हृदयात प्रकाशित केला, तर आपले जीवन सदैव दिपोत्सवी महोत्सवा समान बनेल..!!



|| ॐ श्री गुरुदेव दत्त ||

जीवनामधील आनंद केवळ दिवाळीतील  पाच दिवस न राहता, हा आनंद कायमचा राहावा ही सद्गुरूंची शिकवण असते.. ज्ञानेश्वर महाराज जीवनात निरंतर दिवाळी यावी, यासाठी आपण जे प्रयत्न केले ते सांगताना म्हणतात..

"मी अविवेकाची काजळी । फेडोनी विवेक दीप उजळी । ते योगिया पाहे दिवाळी ।  निरंतर ।।"

मानवी जीवनामध्ये अविवेक हाच त्याच्या दु:खाला कारणीभूत असतो.. या अविवेकाची माणसाच्या मन:पटलावर काजळी जमा झालेली आहे, ती काजळी फेडूनमी तेथे गुरुबोधाने विवेकाचा नंदादीप पेटवितो.. त्यामुळे अखंड दिवाळीचा आनंद मिळतो, एकदा विवेकाचा दीप उजळला की सद्विचारांकडे जाणारी वाट दिसू लागते.. त्या वाटेवरून जाताना मिळणारा आनंद खंडित होणारा नसेल.. म्हणूनच ती दिवाळी ख-या अर्थाने अखंडित राहणारी असेल, असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात..

दिवाळीचा आनंद निरंतर जीवनात राहायचा असेल तर सद्गुरूंच्या गुरुबोध विचारांचा उजेड आपल्या मागे-पुढे दाटला पाहिजे.. त्या उजेडात केलेली वाटचाल आपला जीवनाचा प्रवास सुखकर करील.. त्यामुळे जीवनात आलेली दु:ख-दैन्य पळून गेली नाहीत, तरी त्यांचा मुकाबला करण्याचे सामर्थ्य आपल्याला प्राप्त होईल..!!



Thursday 30 June 2016

|| ॐ श्री गुरुदेव दत्त ||
जयजय शंकरानंदा अवधूता I अवधूत चिंतनी सिध्दांता II
त्रैलोक्य पावना त्रिदोष दहना I त्रिगुणातीता निरंजना II
साधकाच्या जीवनात गुरु सिद्धांत महत्वपूर्ण आहे..  गुरुतत्व हे सर्व अनुग्रहित साधकात असते.. साधकाने साधनेने ते जागृत करायचे हि सूत्रमय रचना.. हे तत्व जेव्हा जागृत होते.. त्यावेळी अज्ञान लोप पावून ज्ञान प्राप्त होत जाते..

सदगुरु तत्व सत्याचे, अंतिम वास्तविकता आणि स्वरूपाचे ज्ञान देतो.. अभ्यास चिंतन - मनन या त्रिसूत्रीने तत्व जागृती लाभते..!

शब्दांच्या पलिकडले काही I मौन एकटे बोलत राही II
अर्थ जयाचा गहन गूढसा I चिंतन मनन करुन पाही II

निशंक हो, निर्भय हो मना रे.. जसजसे आपण निशंक होऊ तसतसे सद्गुरू आपल्याला पात्रतेपेक्षा भरभरून देईल हे निसंशय सत्य आहे.. साधकाने सद्गुरू कृपेच्या गुरुप्रेमाच्या प्रवाहात एखाद्या वाळक्या पानाप्रमाणे पडावं आणि तो गुरु प्रवाह जसा जसा पुढे जाईल तसं तसं त्याच्या बरोबर नि:शंकपणे जात रहावं..

या अपरोक्ष-प्रत्यक्ष.. ज्ञानप्राप्तीच्या अगोदर होणार्‍या.. परोक्ष-अप्रत्यक्ष ज्ञानाचा अधिकार काय सांगावा..!  हाच तो अनुभव-अनुभूती-दृष्टांत या द्वारे होणारा गुरुबोधरूपी ज्ञानयोग”.. वाचन-श्रवण-मौन-मनन-चिंतन याच्या अंगाने होणारा आणि निदीध्यासात रमणारा हाच तो.. आत्मस्वरूपी परमात्मा,,!!

निशब्द मन मौन | एकांती समाधी ध्यान |
अभ्यास श्वास ध्यास | उन्नती शुद्ध वास ||

सोहम देह स्थिती | अनुभूति विश्व मूर्ती |

करुनी देह पावरी | ऐकू हंसनाद अंतरी ||






























यश आणि त्याची पाच गुपिते... 

योग्य यश म्हणजे काय हे न समजताच, जीवनात प्रत्येकाला यशस्वी व्हायचे असते... योग्य यश ही एक वृत्ती असते, घटना नसते... प्रत्येक धंद्यात आणि संस्थेत अशी परिस्थिती येत असते की जी हाताळायचे कौशल्य तुमच्यात असावे लागते... हे कौशल्य आपल्या आतून येते आणि त्या आतल्या जागेला मी आध्यात्मिक म्हणतो... यश मिळविण्यासाठी पाच गोष्टींची गरज असते...

१... अनुकूल वातावरण : शांतता आणि भरभराट या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात... अस्वस्थ वातावरणात भरभराट होऊ शकत नाही... इतरांबरोबर काम करताना सुद्धा तुम्हाला संघभावनेने काम करावे लागते... त्तुम्च्या गटातील सर्वांशी आदराची भावना ठेवा आणि इतरांवर खापर फोडण्याच्या भानगडीत अडकू नका... आणि आणखी एक म्हणजे गटाच्या नेत्याने पारदर्शक, विश्वासाचे, सहकार्याचे आणि आपलेपणाचे वातावरण ठेवावे... जर सगळे लक्ष फक्त स्वःताचा निव्वळ नफा यावर असेल तर काहीच होणार नाही... लोकांच्या मनात आतूनच स्फूर्ती निर्माण करणे हीच सर्वात परिणामकारक क्लुप्ती आहे...

२... कामातील कौशल्य : कर्माच्या फळाशी गुंतून न रहाणे हेच भगवद्गीतेचे सार आहे... जर एखाद्या युद्धजन्य वा प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही तुमच्या मनाला सावरू शकत असलात तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सांभाळून घेऊ शकता... कर्माच्या या कौशल्याला योग म्हणतात... योगाच्या या कौशल्यामुळेच उद्धटपणा हा आत्मविश्वासात, लीनता नम्रतेत, परावलंबित्व परस्परावलंबनाची जाणीव होण्यात आणि मर्यादित मालकीची भावना पूर्णत्वात एकत्वाची भावना निर्माण होण्यात परिवर्तीत होतो... काम करत असताना जर सगळे लक्ष जर फक्त आपल्या स्वार्थप्रेरित फायदेशीर अंतिम निकालावर असेल तर तुम्ही काम करू शकत नाही... फक्त जे काम करत असाल त्यात तुम्ही प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने १०० % द्या...

३... सिंह होणे : संस्कृतमध्ये एक म्हण आहे, “ ज्याच्याकडे सिंहासारखे धैर्य असेल त्याच्याकडे मोठी संपत्ती चालून येते...” आत आणि बाहेर जाणाऱ्या श्वासाइतकेच आस्था आणि वैराग्य हे दोन्ही एकमेकाला पूरक आहेत... तुम्ही श्वास आत घेता पण तो जास्त काळ आत रोखून धरू शकत नाही, तुम्हाला तो बाहेर सोडावाच लागतो... त्याचप्रमाणे गोष्टी घडण्यासाठी तुम्हाला आस्था असावी लागते तसेच सोडून देण्यासाठी वैराग्य असावे लागते... जेव्हा तुम्हाला भरभराटीची हाव नसते तेव्हा तेव्हा ती तुमच्याकडे चालून येते...

४... नशिबाचा एक अंश : सुबत्ता प्राप्त होण्यासाठी जर केवळ स्वत:च्या मेहनतची गरज असेल तर असेल तर असे अनेक लोक कां आहेत जे खूप मेहनत करतात पण त्यांची भरभराट होत नाही ? ही अगम्य गोष्ट किंवा नशीब अथवा प्रारब्ध भोग अध्यात्माने उचलून धरले आहे... सगळी भौतिक सृष्टी, लहरींच्या एका सृष्टीने चालते जी आपल्याला जे दिसते त्यापेक्षा सूक्ष्म असते... अध्यात्मामुळे बुद्धीला आणि अंतर्ज्ञानाला धार चढते... जेव्हा तुम्ही आस्था आणि वैराग्य यात समतोल साधता तेव्हा तुम्हाला अंतर्ज्ञान प्राप्त होते... फायद्याबरोबरच सेवा, गोष्टी मिळविण्यासाठीची धडपड आणि त्याच बरोबर समाजाला परत देण्यासाठीची करुणा... अंतर्ज्ञान म्हणजे योग्य वेळी योग्य विचार येणे आणि हाच व्यवसायात यश मिळण्यासाठी असलेला एक महत्वाचा घटक आहे...

५... ध्यान : तुमच्या जबाबदाऱ्या आणि ध्येय जितके मोठे तितकी तुम्हाला ध्यान करण्याची जास्त गरज आहे... प्राचीन काळी, ध्यान हे आत्म्याच्या शोधासाठी, सिद्धी प्राप्त होण्यासाठी आणि दु:ख आणि त्रासावर मात करण्यासाठी वापरले जायचे... आजच्या काळात मनावरचा ताण समाजातील तणाव यासाठीही ध्यान करावे लागते... करायचे खूप असते आणि वेळ थोडं असतो आणि तेवढी शक्ती नसते... लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या कामाचा भारही कमी करू शकत नाही आणि वेळही वाढवू शकत नाही... पण तुम्ही तुमची शक्ती, ऊर्जा वाढवू शकता... ध्यानामुळे तुमचे तुमचा ताण तणाव नाहीसा होतो इतकेच नाही तर तुमच्या क्षमताही वाढतात, तुमची मज्जासंस्था आणि मन बळकट होते...शरीरातील विषारी द्रव्यांचा निचरा होतो आणि सर्व प्रकारे तुमचे तेज वाढते... आपण जड मूलतत्व आणि चैतन्य या दोन्हीपासून बनलो आहोत... शरीराच्या काही भौतिक गरजा असतात आणि आपल्या आत्म्याचे पोषण अध्यात्माने होते... सर्वात महत्वाचे म्हणजे, आनंदाने बहरून जाणे, आत्मविश्वास, करुणा, उदारपणा आणि कोणीही घालवू शकणार नाही असे धैर्य हीच योग्य यशाची खूण आहे... जीवनात काहीही झाले तरी या गोष्टी तुम्ही टिकवू शकलात तर तुम्ही खऱ्या अर्थाने यश मिळवले आहे... ॐ श्री गुरुदेव दत्त...

Saturday 11 June 2016

तोरा मन दर्पण कहलाये...

काय हवं..?.. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळ असलं तरी, त्यातली एक गोष्ट कॉमन असते… प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आपल्याच "मनातली" हवी असते...

 ‘अपने आप को पहचानिए’ असेही हिंदीत म्हटले जाते... व्यक्तिमत्त्व हे त्यावरून घडते... अशा विचारांचे मनन, चिंतन, वाचन माणसाने सातत्याने करावे... हे फारच उपयुक्त ठरते... त्यामुळे स्वत:ची ओळख होते... आपणास सहज स्वत:विषयी काही विचारलं तरी आपण बोलण्यास कचरतो... स्वरूप ओळखा असे संत सांगतात... ज्यांना स्वरूप कळाले त्यांनीच जगावर राज्य केले अन् तेच आजही करताहेत...

संत कबीर यांचा एक दोहा आहे...  
अपने अपने चोर को, सब कोय डारै मार
मेरा चोर मुझको मिलै, सरबस डारू वार
संत कबीर दोह्यात आपणास हेच सांगतात... जगातले सर्वच आपापल्या शत्रूंना मारून टाकतात... मात्र पकडले न जाणारे मन मला मिळाले तर मी त्याला मारणार तर नाहीच उलट माझे सर्वस्व त्याला अर्पण करेन, त्याच्याशी मैत्री करेन... स्वत:ची ओळख होण्यासाठी स्वत:चे मन, प्रवृत्ती, कल, सवयी यांचा अभ्यास होणे महत्त्वाचे... एकदा का हा अभ्यास झाला म्हणजे गुण-दोष दिसतात... दोष कमी करत गेलो की मग गुण वाढीस लागतात...

आपण काय करतो, का करतो, त्याचे काय परिणाम होणार हे कळते... त्यावेळी आपले मन आपणास सापडते... ‘तोरा मन दर्पण कहलाये’ असं दर्पणासमान मन आपणास सारे काही दाखवते... मग काय हा अल्लाऊद्दीनचा दिवा असलेलं आपलं मन हवं ते मिळवून देतं व आयुष्यातल्या अडचणी, संकटे, दु:ख यावर उपाय सापडतो व आपल्या आयुष्याला आकार मिळतो...

आपल्याही आसपास सकारात्मक विचार करून आपल्या स्वत:च्या आयुष्याला, दुस-याच्या आयुष्यालाही आकार देण्याचा सातत्याने प्रयत्न करणारी व्यक्तिमत्त्वे आढळतात... फक्त उघड्या डोळ्यांनी त्यांना अनुभवण्याची गरज असते... जसा कुंभार ओल्या मातीला आकार देत असतो, प्रसंगी तो धपाटाही देतो व आतून आधारही...


थोडक्यात सांगायचं तर अडचणीपासून कोणीही सुटलेला नाही... अडचणीविना जीवन एक भ्रम आहे... वाळवंटातल्या मृगजळाप्रमाणे अशा जीवनामागे धावून मानसिक व शारीरिक शक्ती वाया घालविण्याऐवजी अडचणी पेलून त्यावर मात करण्यातच खरे कौशल्य आहे... आयुष्याचा भागाकार करतांना बाकी शून्य येते, यात काही नवीन नाही... पण तुम्ही भाग कोणत्या गोष्टींनी देतात हे फार महत्त्वाचे आहे..!.. 

अशा सुविचारातून गुण घेऊ या अन् म्हणू या ‘सकारात्मक विचारच देतील आयुष्याला आकार’ आणि चला आयुष्य सकारात्मक विचारानं जगू या..!.. ॐ श्री गुरुदेव दत्त... 

Monday 22 February 2016

अध्यात्म-स्वरूप...
माणसाचे सत्य स्वरूप देहाच्या माध्यमातून पूर्णपणे अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न करीत असते... त्याला मनुष्याचे अंतःस्थ दोष व बाह्य जग दडपण्याचा प्रयत्न करीत असतात... या संघर्षाचे नाव जीवन होय.!. या व्याख्येतील सत्य स्वरूप म्हणजेच प्रत्येक माणसाचे अध्यात्म होय...
ते कसे.?. तर सोन्याचे नाना अलंकार घडवावे व त्यांना अंगठी, हार, बांगड्या इ. नावे द्यावीत, त्याप्रमाणे एकाच परमात्मतत्त्वापासून सारे वस्तूमात्र व प्राणीमात्र आकारास आले आहेत... म्हणूनच सर्व चराचर मूलतः परब्रह्मस्वरूपच आहे... परब्रह्माचे जे स्वरूप, त्याचा जो भाव तोच सर्व भूतांसाठी अध्यात्म झाला... पण सोन्याच्या दागिन्यावर चांदीचा मुलामा दिल्यास त्याचे सोनेपण जसे झाकले जाते, अगदी तसेच जगाच्या सहवासात मूळ स्वरूपावर बाह्य विषयांची म्हणजेच चांगल्या व वाईट गुणांची रंगरंगोटी होऊन प्राणीमात्र आपले परब्रह्मपण हरवतात व जन्म-मृत्यूच्या बंधनात अडकतात...
मग धुळीने माखलेल्या आरशात दिसणारे प्रतिबिंब जसे मलिनच भासते, त्याप्रमाणे गुणांच्या प्रभावाखाली मनुष्यादि देहांच्या ठिकाणी असलेले मूळ स्वरूप गुणात्मक, बद्ध भासते... असे हे जीवाच्या ठिकाणी असलेले मूळ स्वरूपावरील बाह्य विषयांचे भासमात्र आच्छादन हाच जीवाचा बंध होय आणि निर्विषयी देह-जीवाच्या माध्यमातून होणारी स्वस्वरूपाची निर्दोष व यथार्थ अभिव्यक्ती म्हणजेच जीवासाठी मोक्षप्राप्ती होय..!..
अशा प्रकारे सत्य, शिव आणि सुंदर असे प्रत्येकाचे मूळ स्वरूप व देहादि माध्यमातून गुणांच्या पडद्यातून परावर्तित होणारे स्वरूप अनुक्रमे शिव व जीव म्हणून ओळखले जाते... पहा यात.!. जीवा-शिवाचे नाते किती घट्ट आहे.!. इतके की त्याला अद्वैताशिवाय दुसरे काय नाव देणार.?. हे अद्वैत जाणणे म्हणजे जीवाने आपले शिवपण जाणणे व स्वाधीन गुणांच्या पडद्याआडून ते साकारणे म्हणजेच अध्यात्म जाणणे होय.!. हेच प्रत्येकासाठी परम-प्राप्तव्य म्हणजे परमार्थ आहे.!. ॐ श्री गुरुदेव दत्त...

Tuesday 12 January 2016



आज स्वामी विवेकानंद जयंती.!.  गुरुतत्त्व स्मरण... वैदिकांचे अपार ज्ञान, बुद्धांची विश्व कवेत घेणारी करुणा, ख्रिस्ताचे प्रेम, इस्लामचा बंधुभाव हे सारे गुण एकत्र करून त्यापुढे मनुष्याचा अनंत विकास करता येईल असे सारे गुरुतात्विक विश्वधर्मात सामावलेले आहे..!!..

अयोग्य आचार-विचार यांचे सिंचन म्हणजे दुर्दैवी भूतकाळ... उज्ज्वल भविष्यासाठी याकडे Rearview aspect ठेऊन... शिस्त, बंधन, संयम, प्रेम, करुणा, सहिष्णुता, विश्वास यावर आधारलेल्या गुरुतत्वी विश्वधर्माच्या चिंतनाचा जणू थोडक्यात आराखडाच स्वामीजींनी गुरुतत्त्व विचारांनी सा-यांच्या डोळ्यापुढे उभा केला.!!.. स्वामीजींचे विचार तत्वसार म्हणजे... मनुष्यातले सुप्तावस्थेत असलेले ईश्वरी तत्त्व प्रत्यक्ष प्रकट करणे हेच सत्याचे एकमेव उद्दिष्ट आहे.!.

उठा, जागे व्हा..!!.. ध्येय योग्य प्रयत्नातून प्राप्त होईपर्यंत क्षणभरही थांबू नका.!. ध्येय उदात्त असू द्या..!. क्षुद्र (सुखासीन इच्छा-आकांक्षा) ध्येयापेक्षा अपयश बरे... उदात्त ध्येय समोर ठेवून शरीर, मन, बुद्धी, पंचप्राण असे तुमचे सारे सामर्थ्य पणाला लावा... सूर्योदयाने सारे जग प्रकाशमान झाले की काजवे लुप्त होतात... तसाच ज्ञानाचा, पराक्रमाचा, सत्याचा, वैराग्याचा पवित्र सूर्य अंत:करणात प्रकाशू दे...


मग धुके वितळून जावे, तसे सारे अमंगळ दुबळेच नाहीसे होईल... उठा, धैर्याने, कणखरपणाने सा-या जबाबदा-या स्वत:च्या खांद्यावर घ्या..!. आपणच स्वत:चे ध्येय निश्चित करीत असतो... आपण अमृततत्त्वाचे वारसदार आहोत..!. स्वामीजींचा विश्वधर्म संदेश आणि त्यातले सामर्थ्य आपण सर्वांनी हृदयी धारण करावे..!.. ॐ श्री गुरुदेव दत्त... 

Sunday 3 January 2016

मनमोराचा पिसारा - कबीरांचं मानसशास्त्र

संत कबीरजींनी अनेक दोहे रचले, पदं लिहिली आणि गात गात ते लोकांपर्यंत पोहोचवत गेले... प्रस्थापित शिक्षण, गाथा पांडित्य यांचा गंध नसलेल्या या साध्या सुध्या विणकरानं, जगाला खूप ज्ञान आणि समज दिली... 

विज्ञानशाखा म्हणून मानसशास्त्राचा उदय होण्यापूर्वी कबीरजींनी मनावर चिंतन केलं... मनाचं स्वरूप जाणलं आणि त्यावर दोहे लिहिले... याअर्थाने संत कबीर मानसतज्ञ होते फक्त पुढे डॉक्टर हि उपाधी नव्हती... तसे पाहिल्यास सर्वच spriritual acheivers मानसतज्ञ असत्तात...  

कुंभै बांधा जल रहै, जल बिन कुंभ न होय
ज्ञानै बांधा मन रहे, मन बिनु ज्ञान न होय – (संत कबीर)

मन म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम आणि मन म्हणजेच हार्डडिस्क, मन म्हणजेच मेमरी आणि मन म्हणजेच मनाच्या विविध क्षमता, असं थोडक्यात कबीर म्हणतात... त्या काळी संगणकीय शब्द नव्हते इतकंच... कुंभामध्ये पाणी साठवता येतं कारण कुंभाला मातीच्या भिंती असतात... हा कुंभ बनविण्याकरिताही मातीत पाणी मिसळावं लागतं... पाणी, कुंभ आणि माती यांच्या परस्परपूरक नात्यामधून ते शक्य होतं...

मन बांधण्याकरिता, ज्ञानाच्या आणि आत्मभानाच्या भिंती लागतात... परंतु ज्ञान आणि आत्मभान या संकल्पनाही ‘मन’ या ऑपरेटिंग सिस्टमशिवाय निर्माण होत नाहीत... ज्ञानार्जनासाठी मन हवं आणि मन जाणण्याचे ज्ञान हवे... ज्ञान, मन आणि त्यांना जोडणाऱ्या मनाच्या प्रक्रिया या परस्परपूरक गोष्टी असाव्या लागतात... म्हणजेच कबीरजीं म्हणतात, मनाचं कार्य कसं चालतं याची चांगली जाण आहे...

मन आणि शरीर यांचं नातं कसं असतं..?. ते नातं सशक्त नि परस्परसाहाय्यक असलं पाहिजे... तर मनाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शरीर साथ देतं आणि शारीरिक श्रम करण्यासाठी मनाचा पाठिंबा मिळतो... परंतु मन आणि शरीर एकमेकांशी असं नातं जुळवत नाहीत... उलट एकमेकांना खोडय़ात टाकतात... विचलित करतात... उदा.

काया देवल मन धजा, विषय लहर फहराय
मन चलते देवल चले, ताका सरबस जाय – (संत कबीर)

आपलं शरीर म्हणजे एक देवालय आहे... त्या देवळावर ‘मन’ नावाची ध्वजा फडकते... हे मन विषयासक्त होतं, ऐहिक सुखाला लोलुप होतं आणि अस्थिर होतं, विचलित होतं... ज्या देवळावरची ध्वजा अस्थिर आहे, ज्या देवळावर स्वार्थी मनाची ध्वजा फडकते आहे, ते देऊळ तितकंच अस्वस्थ राहतं... अवघं जीवन चंचल मन आणि अस्थिर शरीरामुळे सर्वनाशाकडे वाटचाल करतं...

मन आणि शरीर या दोन संकल्पना आहेत, त्या जणू काही स्वतंत्रपणे आपापलं कार्य करतात, या सार्वत्रिक गैरसमजाची जाणीव कबीरजींना होती... मन आणि शरीर या वस्तुत: स्वतंत्र गोष्टी वाटत असल्या तरी त्या एकजीव आणि एकजिनसी असतात याचं भान होतं... मन आणि शरीर यांच्या अद्वैतावर त्यांनी इथे भाष्य केलं आहे...
मनाच्या अस्थिरतेचं स्वरूप जाणण्याचा त्यांनी प्रयत्न केला... मन दुभंग होण्याची अवस्था हा मानसिक विकारच, यावर कबीरजी म्हणतात-

धरती फाटै मेघ मिलै, कपडा फाटै डौर
तन फाटैको औषधि, मन फाटै नहिं ठौर – (संत कबीर)

आणि

मेरे मन में परि गई ऐसी एक दरार
फाटा फटिक पषान ज्यूं, मिलै न दूजी बार – (संत कबीर)

कबीरजींच्या काळात त्यांना गवसलेल्या सत्याला आता नवं वळण लागलंय असे मी म्हणतोय... कबीरजी..!.
फाटलेल्या जमिनीला पाऊस सांधतो, फाटक्या कपडय़ाला दोर शिवतो, जखमी शरीरावर औषध आहे... पण मन फाटलं तर औषध नाही... आता आहे हं.. कबीरजी... गुरुकृपेचे...


माझ्या मनाला (संशय नावाची) दरार पडलीय... दुभंगलेला दगड जोडता येत नाही, तद्वतच तुटकं मन साधता येत नाही... कबीरजी प्रयत्न चाललेत या दिशेनं तुमचेही कृपाशीर्वाद हवेत...