अध्यात्म-स्वरूप...
माणसाचे सत्य स्वरूप देहाच्या माध्यमातून पूर्णपणे अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न करीत असते... त्याला मनुष्याचे अंतःस्थ दोष व बाह्य जग दडपण्याचा प्रयत्न करीत असतात... या संघर्षाचे नाव जीवन होय.!. या व्याख्येतील सत्य स्वरूप म्हणजेच प्रत्येक माणसाचे अध्यात्म होय...
ते कसे.?. तर सोन्याचे नाना अलंकार घडवावे व त्यांना अंगठी, हार, बांगड्या इ. नावे द्यावीत, त्याप्रमाणे एकाच परमात्मतत्त्वापासून सारे वस्तूमात्र व प्राणीमात्र आकारास आले आहेत... म्हणूनच सर्व चराचर मूलतः परब्रह्मस्वरूपच आहे... परब्रह्माचे जे स्वरूप, त्याचा जो भाव तोच सर्व भूतांसाठी अध्यात्म झाला... पण सोन्याच्या दागिन्यावर चांदीचा मुलामा दिल्यास त्याचे सोनेपण जसे झाकले जाते, अगदी तसेच जगाच्या सहवासात मूळ स्वरूपावर बाह्य विषयांची म्हणजेच चांगल्या व वाईट गुणांची रंगरंगोटी होऊन प्राणीमात्र आपले परब्रह्मपण हरवतात व जन्म-मृत्यूच्या बंधनात अडकतात...
मग धुळीने माखलेल्या आरशात दिसणारे प्रतिबिंब जसे मलिनच भासते, त्याप्रमाणे गुणांच्या प्रभावाखाली मनुष्यादि देहांच्या ठिकाणी असलेले मूळ स्वरूप गुणात्मक, बद्ध भासते... असे हे जीवाच्या ठिकाणी असलेले मूळ स्वरूपावरील बाह्य विषयांचे भासमात्र आच्छादन हाच जीवाचा बंध होय आणि निर्विषयी देह-जीवाच्या माध्यमातून होणारी स्वस्वरूपाची निर्दोष व यथार्थ अभिव्यक्ती म्हणजेच जीवासाठी मोक्षप्राप्ती होय..!..
अशा प्रकारे सत्य, शिव आणि सुंदर असे प्रत्येकाचे मूळ स्वरूप व देहादि माध्यमातून गुणांच्या पडद्यातून परावर्तित होणारे स्वरूप अनुक्रमे शिव व जीव म्हणून ओळखले जाते... पहा यात.!. जीवा-शिवाचे नाते किती घट्ट आहे.!. इतके की त्याला अद्वैताशिवाय दुसरे काय नाव देणार.?. हे अद्वैत जाणणे म्हणजे जीवाने आपले शिवपण जाणणे व स्वाधीन गुणांच्या पडद्याआडून ते साकारणे म्हणजेच अध्यात्म जाणणे होय.!. हेच प्रत्येकासाठी परम-प्राप्तव्य म्हणजे परमार्थ आहे.!. ॐ श्री गुरुदेव दत्त...
खूप छान
ReplyDelete