Sunday, 9 February 2025

 महाकुंभ : आता विश्वात्मक होवे (१)

त्रिवेणी संगमाचे घडोनिया स्नान I अंतरीचा दिप उजळला II

कोणत्याही तीर्थस्थानी एकदा किंवा अनेकदा निव्वळ स्नान करून आपल्याला अमरत्वाचा किंवा चैतन्याचा अनुभव येईलच असे सांगता येत नाही..! तरीदेखील मग म्हणतो तसा, अमरत्वाचा किंवा चैतन्याचा अनुभव न येता देखील; कोट्यावधी लोक कुंभ मेळ्याला का येतात..? केवळ पापमुक्ती होते ह्या भावनेने..? पण कुंभ मेळा किंवा इतर तीर्थयात्रा यांचा मूळ हेतू हाच आहे ह्यात शंका नाही..!

खरेतर पापमुक्ती होणेहे शब्द; स्वत:तील अमरत्वाचा वा चैतन्याचा अनुभव घेण्याची अदृश्य जाणिवेची  तळमळ होय..! स्वत:तील अमरत्वाचा वा चैतन्याचा अनुभव घेण्याची तळमळ लागणे; ही मानवी जन्म प्राप्ती नंतरची मूलभूत प्रवृत्ती आहे.. ही मूलभूत प्रवृत्ती आपल्याला कळो वा न कळो; टाळू म्हणून टाळता येत नाही..!

म्हणूनच जरी मायेचा दाट प्रभाव असला तरी, करोडो लोक केवळ कुंभमेळ्याची ठिकाणेच नव्हे तर सर्वच तीर्थक्षेत्रांमध्ये पिढ्यान पिढ्या जातात आणि स्नान करतात..! अमरत्वाचा संपूर्ण किंवा यथार्थ अनुभव त्यांना लगेच येतो असे नाही.. पण त्या दिशेने त्यांचा प्रवास कळत-नकळत चालू होतो वा राहतो.. पुढेमागे पूर्व संचिताने काहींची गुरुभेट होऊन योग्य असा अनुग्रहित मार्ग लाभतो..! 

मायेच्या प्रभावाखालील दृश्य जगतात होणारी, अमृतत्वाची पुसटशी जाणीव देखील वैयक्तिक आणि सामाजिक अशा जीवनाच्या सर्व अंगांमध्ये चैतन्य भरणारी; आणि सर्वंकष उत्क्रांती, व सर्वंकष विकास घडवून आणणारी असते..!   अन हाच कुंभमेळ्याच्या एकात्मिक स्नानाच्या, संपूर्ण कल्याणाचा, सर्वंकष विकासाचा आणि अंतर्बाह्य उत्क्रांतीचा उदात्त हेतू; आपण ध्यानात घ्यायला हवा..!

आज आपण कुंभमेळ्याबद्दल अनेक प्रवाद ऐकतो.. त्यामुळे मनाचा गोंधळ उडतो..  ह्याला प्रमुखपणे दोन कारणे आहेत..  पहिले म्हणजे : आज आपल्यातल्या तमोगुणी असुर वृत्तींनी; अर्थात; संकुचितपणा, भित्रेपणा, भाबडेपणा, भोळेपणा, क्रूरपणा, स्वार्थांधता, ढोंग, लबाडी, चोरी, व्यसने हयांनी; आपले जीवन पोखरले आहे.. आपल्या अशा जीवनाचेच प्रतिबिंब कुंभ मेळ्यात पडते..

दुसरे म्हणजे : पृथ्वी, पाणी, हवा इत्यादी सर्व आसमंतच नव्हे तर आपली मने देखील प्रदूषित झाली आहेत.. आपली वृत्ती कुत्सित आणि दृष्टी कलुषित झालेली असल्याने आपल्याला पवित्र आणि मंगल असे काही दिसतच नाही..! 

पण; आपण कोणतीही आध्यत्मिक साधना (सगुणी-निर्गुणी) करीत राहिलो, वा अन्य मार्गाने आपली चित्तशुद्धी झाली, तर आपल्याला समजते की; पापमुक्तीसाठी असो वा अन्य काही कारणास्तव; अशा परंपरा चालू राहिल्यामुळे; होम-हवन, साधन मार्ग, गुरु-परंपरा हयांचा सखोल आणि विविध स्तरांवरील मूलगामी अभ्यास होऊन आणि त्यांच्यातील लोककल्याणकारी असे सर्व जतन करून वा जोपासले जाऊन अनिष्ट, ते सर्व नष्ट करणे आपल्याला शक्य होणार आहे..!!  ॐ श्री गुरुदेव दत्त...

 



महाकुंभ : आता विश्वात्मक होवे (२)

अमृतानुभवे चैतन्य संजीवनी I तेथींचा जिव्हाळा तेथे बिंबे I

आज मायेच्या सर्वांगीण प्रभावामुळे खूपजण कुंभमेळा व इतर उत्सवांकडे, धार्मिक कडवेपणाने पाहतात, काहीजण न्यूनगंडातून पाहतात, काहीजण तुच्छतेने पाहातात, काहीजण भाबड्या भक्तिभावाने पाहतात, काही जण राजकीय फायद्या-तोट्याच्या दृष्टीने पाहतात, तर काहीजण आर्थिक नफ़ा-नुकसानीच्या दृष्टिकोनातून पाहतात.. पण निखळ जिज्ञासेने आणि तितक्याच प्रामाणिकपणे क्वचितच काहीजण कुंभमेळ्याचा आणि एकूण समाजकल्याणाचा अभ्यास आणि विचार करतात..!

कुंभमेळा वा उत्सवाच्या निमित्ताने; आपल्या संपूर्ण वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर चैतन्य-स्मरणरुपी अमृतमंथनाचे संजीवक परिणाम म्हणजेच आपल्या अंतरात्म्याशी किंवा ईश्वराशी म्हणजेच अमृतमई चैतन्य उगमाशी असलेले नाते जाणवणे.. किंबहुना आपले विचार, भावना, वासना आणि आपल्या कृती म्हणजेच आपला धर्म किंवा स्वधर्म येथूनच उगम पावतो किंवा प्रगट होतो याची होणारी जाणीव..!

सर्वसामान्यपणे आत्मचैतन्य विस्मरणामुळे आपली उर्जा, आपले संकल्प, आपली कृती ही आपल्यातील जडत्वाकडे म्हणजेच देह्बुद्धिमय वैयक्तिक आणि संकुचित स्वार्थाकडे खेचली जात असते.. अशा भौतिक मायेच्या प्रभावी तऱ्हेने लाखो लोकांची उर्जा, संकल्प आणि कार्य जेव्हां संकुचित स्वार्थाच्या दिशेला वळतात, तेव्हां त्यातून स्वार्थांध आणि समाजद्रोही धोरणे, रूढी, परंपरा, कायदे, नियम, संकेत, योजना, कार्यक्रम इत्यादी तयार होतात.. यातूनच सामूहिक अवनती अनुभवास येत असते..!

याउलट कुंभमेळा वा इतर उत्सव यांमुळे, आत्मचैतन्य जागृत-जाणीवेने सळसळते, आपले विचार, आपल्या भावना, आपल्या वासना, आपली शक्ती आणि आपले संकल्प; उदात्त बनतात आणि आणि सामुहिक कल्याणाच्या दिशेने वळतात.. अशा तऱ्हेने लाखो लोकांचे विचार, भावना, वासना, शक्ती आणि संकल्प; एकत्र काम करू लागले, की समष्टीच्या कल्याणाचे भव्य दिव्य पर्व सुरु होते..!

अणुबॉम्ब किंवा हैड्रोजनबॉम्ब ह्या विनाशक बॉम्बनी एकाच वेळी लाखो लोक मरतात; तर अशा पारंपारिक विधायक बॉम्बने एकाच वेळी लाखो लोक उन्नत होतात.. जसे युद्धाच्यावेळी रणभेरी वाजू लागल्या की योद्ध्यांच्या अंगात जशी एकदम वीरश्री संचारते, तसे, उत्सव वा कुंभमेळा या ठिकाणी लाखो जीवांच्या आंत कळत-नकळत एकदम चैतन्य जाणीव संचारते.. नकळतच आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला अंतर्बाह्य व्यापणारी; उर्ध्वगामी उत्क्रांती सुरु होते..!

परिणामी; नंतरच्या काळात आपण आपापल्या क्षेत्रात अत्युत्तम काम करून कृतार्थ होऊ लागतो.. ह्या कृतार्थतेमध्ये वैयक्तिक जीवनाचे जसे सार्थक आहे, तसेच वैश्विक सामाजिक जीवनातील सलोखा आणि सुसंवाद आणि सहकार्य आहे.. म्हणूनच आपले पारंपरिक उत्सव आणि कुंभमेळा हे स्वधर्म आणि विश्वधर्म यांच्याशी अतूटपणे संलग्न आहेत..!!  ॐ श्री गुरुदेव दत्त...

No comments:

Post a Comment