Sunday, 9 February 2025

 महाकुंभ : आता विश्वात्मक होवे (१)

त्रिवेणी संगमाचे घडोनिया स्नान I अंतरीचा दिप उजळला II

कोणत्याही तीर्थस्थानी एकदा किंवा अनेकदा निव्वळ स्नान करून आपल्याला अमरत्वाचा किंवा चैतन्याचा अनुभव येईलच असे सांगता येत नाही..! तरीदेखील मग म्हणतो तसा, अमरत्वाचा किंवा चैतन्याचा अनुभव न येता देखील; कोट्यावधी लोक कुंभ मेळ्याला का येतात..? केवळ पापमुक्ती होते ह्या भावनेने..? पण कुंभ मेळा किंवा इतर तीर्थयात्रा यांचा मूळ हेतू हाच आहे ह्यात शंका नाही..!

खरेतर पापमुक्ती होणेहे शब्द; स्वत:तील अमरत्वाचा वा चैतन्याचा अनुभव घेण्याची अदृश्य जाणिवेची  तळमळ होय..! स्वत:तील अमरत्वाचा वा चैतन्याचा अनुभव घेण्याची तळमळ लागणे; ही मानवी जन्म प्राप्ती नंतरची मूलभूत प्रवृत्ती आहे.. ही मूलभूत प्रवृत्ती आपल्याला कळो वा न कळो; टाळू म्हणून टाळता येत नाही..!

म्हणूनच जरी मायेचा दाट प्रभाव असला तरी, करोडो लोक केवळ कुंभमेळ्याची ठिकाणेच नव्हे तर सर्वच तीर्थक्षेत्रांमध्ये पिढ्यान पिढ्या जातात आणि स्नान करतात..! अमरत्वाचा संपूर्ण किंवा यथार्थ अनुभव त्यांना लगेच येतो असे नाही.. पण त्या दिशेने त्यांचा प्रवास कळत-नकळत चालू होतो वा राहतो.. पुढेमागे पूर्व संचिताने काहींची गुरुभेट होऊन योग्य असा अनुग्रहित मार्ग लाभतो..! 

मायेच्या प्रभावाखालील दृश्य जगतात होणारी, अमृतत्वाची पुसटशी जाणीव देखील वैयक्तिक आणि सामाजिक अशा जीवनाच्या सर्व अंगांमध्ये चैतन्य भरणारी; आणि सर्वंकष उत्क्रांती, व सर्वंकष विकास घडवून आणणारी असते..!   अन हाच कुंभमेळ्याच्या एकात्मिक स्नानाच्या, संपूर्ण कल्याणाचा, सर्वंकष विकासाचा आणि अंतर्बाह्य उत्क्रांतीचा उदात्त हेतू; आपण ध्यानात घ्यायला हवा..!

आज आपण कुंभमेळ्याबद्दल अनेक प्रवाद ऐकतो.. त्यामुळे मनाचा गोंधळ उडतो..  ह्याला प्रमुखपणे दोन कारणे आहेत..  पहिले म्हणजे : आज आपल्यातल्या तमोगुणी असुर वृत्तींनी; अर्थात; संकुचितपणा, भित्रेपणा, भाबडेपणा, भोळेपणा, क्रूरपणा, स्वार्थांधता, ढोंग, लबाडी, चोरी, व्यसने हयांनी; आपले जीवन पोखरले आहे.. आपल्या अशा जीवनाचेच प्रतिबिंब कुंभ मेळ्यात पडते..

दुसरे म्हणजे : पृथ्वी, पाणी, हवा इत्यादी सर्व आसमंतच नव्हे तर आपली मने देखील प्रदूषित झाली आहेत.. आपली वृत्ती कुत्सित आणि दृष्टी कलुषित झालेली असल्याने आपल्याला पवित्र आणि मंगल असे काही दिसतच नाही..! 

पण; आपण कोणतीही आध्यत्मिक साधना (सगुणी-निर्गुणी) करीत राहिलो, वा अन्य मार्गाने आपली चित्तशुद्धी झाली, तर आपल्याला समजते की; पापमुक्तीसाठी असो वा अन्य काही कारणास्तव; अशा परंपरा चालू राहिल्यामुळे; होम-हवन, साधन मार्ग, गुरु-परंपरा हयांचा सखोल आणि विविध स्तरांवरील मूलगामी अभ्यास होऊन आणि त्यांच्यातील लोककल्याणकारी असे सर्व जतन करून वा जोपासले जाऊन अनिष्ट, ते सर्व नष्ट करणे आपल्याला शक्य होणार आहे..!!  ॐ श्री गुरुदेव दत्त...

 



महाकुंभ : आता विश्वात्मक होवे (२)

अमृतानुभवे चैतन्य संजीवनी I तेथींचा जिव्हाळा तेथे बिंबे I

आज मायेच्या सर्वांगीण प्रभावामुळे खूपजण कुंभमेळा व इतर उत्सवांकडे, धार्मिक कडवेपणाने पाहतात, काहीजण न्यूनगंडातून पाहतात, काहीजण तुच्छतेने पाहातात, काहीजण भाबड्या भक्तिभावाने पाहतात, काही जण राजकीय फायद्या-तोट्याच्या दृष्टीने पाहतात, तर काहीजण आर्थिक नफ़ा-नुकसानीच्या दृष्टिकोनातून पाहतात.. पण निखळ जिज्ञासेने आणि तितक्याच प्रामाणिकपणे क्वचितच काहीजण कुंभमेळ्याचा आणि एकूण समाजकल्याणाचा अभ्यास आणि विचार करतात..!

कुंभमेळा वा उत्सवाच्या निमित्ताने; आपल्या संपूर्ण वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर चैतन्य-स्मरणरुपी अमृतमंथनाचे संजीवक परिणाम म्हणजेच आपल्या अंतरात्म्याशी किंवा ईश्वराशी म्हणजेच अमृतमई चैतन्य उगमाशी असलेले नाते जाणवणे.. किंबहुना आपले विचार, भावना, वासना आणि आपल्या कृती म्हणजेच आपला धर्म किंवा स्वधर्म येथूनच उगम पावतो किंवा प्रगट होतो याची होणारी जाणीव..!

सर्वसामान्यपणे आत्मचैतन्य विस्मरणामुळे आपली उर्जा, आपले संकल्प, आपली कृती ही आपल्यातील जडत्वाकडे म्हणजेच देह्बुद्धिमय वैयक्तिक आणि संकुचित स्वार्थाकडे खेचली जात असते.. अशा भौतिक मायेच्या प्रभावी तऱ्हेने लाखो लोकांची उर्जा, संकल्प आणि कार्य जेव्हां संकुचित स्वार्थाच्या दिशेला वळतात, तेव्हां त्यातून स्वार्थांध आणि समाजद्रोही धोरणे, रूढी, परंपरा, कायदे, नियम, संकेत, योजना, कार्यक्रम इत्यादी तयार होतात.. यातूनच सामूहिक अवनती अनुभवास येत असते..!

याउलट कुंभमेळा वा इतर उत्सव यांमुळे, आत्मचैतन्य जागृत-जाणीवेने सळसळते, आपले विचार, आपल्या भावना, आपल्या वासना, आपली शक्ती आणि आपले संकल्प; उदात्त बनतात आणि आणि सामुहिक कल्याणाच्या दिशेने वळतात.. अशा तऱ्हेने लाखो लोकांचे विचार, भावना, वासना, शक्ती आणि संकल्प; एकत्र काम करू लागले, की समष्टीच्या कल्याणाचे भव्य दिव्य पर्व सुरु होते..!

अणुबॉम्ब किंवा हैड्रोजनबॉम्ब ह्या विनाशक बॉम्बनी एकाच वेळी लाखो लोक मरतात; तर अशा पारंपारिक विधायक बॉम्बने एकाच वेळी लाखो लोक उन्नत होतात.. जसे युद्धाच्यावेळी रणभेरी वाजू लागल्या की योद्ध्यांच्या अंगात जशी एकदम वीरश्री संचारते, तसे, उत्सव वा कुंभमेळा या ठिकाणी लाखो जीवांच्या आंत कळत-नकळत एकदम चैतन्य जाणीव संचारते.. नकळतच आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला अंतर्बाह्य व्यापणारी; उर्ध्वगामी उत्क्रांती सुरु होते..!

परिणामी; नंतरच्या काळात आपण आपापल्या क्षेत्रात अत्युत्तम काम करून कृतार्थ होऊ लागतो.. ह्या कृतार्थतेमध्ये वैयक्तिक जीवनाचे जसे सार्थक आहे, तसेच वैश्विक सामाजिक जीवनातील सलोखा आणि सुसंवाद आणि सहकार्य आहे.. म्हणूनच आपले पारंपरिक उत्सव आणि कुंभमेळा हे स्वधर्म आणि विश्वधर्म यांच्याशी अतूटपणे संलग्न आहेत..!!  ॐ श्री गुरुदेव दत्त...

Saturday, 1 January 2022

Happy New Year







ज्ञानेश्वरी अभ्यास चिंतन..

जेथोनि हें पार्था । विपरीत ज्ञान । विस्तारोनि स्वप्न | जागृतीत ॥९२९॥

क्षर पुरुष तो । खेळे रात्रंदिन । जगामाजीं स्वप्न । जागृतींनीं ॥९३३॥

त्या चि स्वप्न आणि । जागृति ह्या दोन । अवस्था जेथोन । उद्भवती ॥ ९३४ ॥

जयालागीं घन। अज्ञान-सुषुप्ति । ऐसें नांव देती । सुविख्यात ॥९३५॥

जयामाजीं एक । न राहतें न्यून । तरी तो चि पूर्ण । ब्रह्मलाभ ॥९३६॥

स्वप्न-जागृतीस । पुन्हा न तो घेता । तरी म्हणूं येता । ब्रह्मभाव ॥९३७॥

अभंग ज्ञानेश्वरी - अध्याय  १५

माउली सांगतात.. की माणूस गाढ झोपेत असतो, तेव्हा जागेपणाचं ज्ञान त्याला नसतं, हे झालं अज्ञान.. तो जागा होतो तेव्हा 'आपण जागे झालो', ही जाणीव त्याला होते, हे झालं जाग आल्याचं ज्ञान..

पण नंतर ते ज्ञान आणि अज्ञान दोन्ही मावळतं.. त्यामुळे दिवसभर जागे असतानाही ' मी जागा आहे ' ही जाणीव त्याला होत नाही..! अगदी त्याचप्रमाणे देहबुद्धीचं अज्ञान जाऊन आत्मज्ञान झालं की नंतर ज्ञान 'झाल्या'ची जाणीवही ओसरते आणि तो सदाजागृत अर्थात अखंड जाणिवेनुसार वावरू लागतो, हा स्वरूपी ब्रह्मभाव..!

मात्र यासाठी साधकाला आधी जागं करणारं जे साधन आहे ते ज्ञान आणि अज्ञान या दोहोंपेक्षा अलिप्त असलं पाहिजे.. करणारं साधन. ज्ञान आणि अज्ञान या दोन्हीच्या पलीकडे असणं आवश्यक आहे.. जे स्वतः जागृत आहे, तेच दुसऱ्याला जागवू शकते.. जो जागाच आहे, तोच झोपलेल्याला जागं करू शकतो..!

संत सांगतात, '' त्या अज्ञानाची निवृत्ती करण्यासाठी ज्ञान व अज्ञान या दोहोंपेक्षा तिसऱ्या कोणत्या तरी वस्तूची गरज लागते.. त्यालाच साधना प्रदान करणारे सद्गुरू म्हणतात.. जे ज्ञान आणि अज्ञानामध्ये अडकलेले नाही.. ते दोन्हीच्या पलीकडे आहे, अलिप्त आहे.. !

ज्ञान आणि अज्ञान म्हणजे काय..?  याचा गुरुबोध साधकाला देतात..  जेव्हा ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडे असलेले साधन अभ्यासाने जागृत होते, तेव्हा ते साधकाला जागवू शकते.. कारण ते स्वतःला ज्ञान आणि अज्ञानाने बांधलेले नाही, तर ते पूर्णपणे मुक्त असे असते.. ! ॐ श्री गुरुदेव दत्त...




Monday, 20 July 2020

आत्मरूपी विद्या दाविते स्वरुप - चैतन्याचा दीप उजळोनि
दीप हा प्रकाश, जीवन व ज्ञानाचे प्रतीक आहे.. दीप मानवाला मंद प्रकाशाने आत्मज्योतीचे मार्गदर्शन करतो व अंतर्मुख करतो.. अंत:करणातला प्रकाश साधकाला निश्चितपणे एक प्रश्न विचारतो, "मी कोण आहे ? कोs हं..?" आणि ह्याचे उत्तर जेव्हा साधकाला साधनेने मिळायला लागते.. तेव्हा गुरुकृपेने ज्ञानदीप प्रज्वलित झाला आहे असे समजायला हरकत नसते..
मनाच्या अज्ञान अंध:कारामध्ये छोटे छोटे काजवेस्वरूप लुकलुकणे अनुभवतो ते इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त यांचे होय.. ह्या सर्वांमध्ये कुठेतरी उर्जात्मक हालचाल होते आणि ते प्रकाशतात.. ह्या सर्वाना प्रकाश पुरविणारा 'स्वयंप्रकाशित' असा एकच अद्वय दीप असतो तो म्हणजेच 'ब्रम्हतत्व' होय..
यो दीप ब्रह्मस्वरुपस्त्वम्‌ | स्वयं दीप भव ||
सद्गुरू म्हणतो,, मार्गाची खुण दाखवून दिली, आता स्वयं दीप भव.. स्वयंप्रकाशित होणे म्हणजे नेमके काय..? डोळ्यांचा इंद्रियांचा उपयोग महत्त्वाचा असला तरी खरी शक्ती आत्म्यातच आहे.. त्या आत्मप्रकाशात आहे.. या आत्मप्रकाशाचा मार्ग गुरुबोधाने ज्ञान-ईश्वरी चिंतन-मननात प्रगटतो..

ध्याता ध्यान ज्ञानेश्वरी | ब्रह्मानंदलहरी प्रगट होय |
आत्मरूपी विद्या दाविते स्वरुप | चैतन्याचा दीप उजळोनि ||
परंतु इथे अवधान साधन सातत्य हवे.. नाहीतर गुरुने अनुग्रह देऊन अद्वय दीप खुण दाखवली, पण आपण काहीवेळ फडफडलो आणि मंदावलो, असे होणे नको..
परि जैसें ज्याचें | मन बुद्धि चित्त | होतसे मी व्यक्त | तैसा तेथें ||
म्हणजेच बुद्धी निर्मळ असेल तर सर्वत्र आनंदच दिसतो, नाही तर एकाच दिव्याने अनेक दीप लावले असले तरी त्यातले काही दिवे प्रकाश देतात.. त्याचवेळी काही मात्र मंदावतात.. स्वयंप्रकाशित आपल्याला व्हायचं असेल, तर आपलं स्वयंप्रकाशित होणं अस्सल हवं..! ते तकलादू किंवा फडफडत्या पणतीसारखं नसावं.. तर नैष्ठिकपणे तेवत राहणाऱ्या एखाद्या ज्योतीसारखं असावं..!!
हा प्रवास तसा अनवट आहे.. प्रचंड नैष्ठिकही आहे.. पण त्या प्रवासाचा एक घटक होणंही तेवढंच आनंददायी आणि ऊर्जस्वल आहे.. या ऊर्जस्वल, अनवट प्रवासाला पूर्ण समर्पित होणे, हेच गुरुसाधनी साधकाचा उद्धार करते..
ॐ श्री गुरुदेव दत्त...

Tuesday, 28 November 2017

शुक्लपक्ष भृगुवासर, रात्रौ आषाढीची नवमी ।


आज आषाढ शुध्द नवमी ! स्वामीजींच्या जीवनातला हा अत्यंत महत्त्वाचा दिवस..! याच दिवशी स्वामीजींना मृत्यूचे दर्शन झाले.. या घटनेचा उल्लेख स्वामीजींनी आपल्या "अमृतधारा" या काव्यात केला आहे..

शुक्लपक्ष भृगुवासर, रात्रौ आषाढीची नवमी ।
अठराशे छप्पन्न शकाब्दी, मृत्यू पावलो आम्ही ।।


चार - दोन दिवस असाच आजारी पडलो.. जरा बरे वाटल्यावर चार - दोन फर्लांग हिंडून आलो.. परतताना थकवा वाटू लागला.. त्यांतच चढण चढून घरी आल्याने दमून , घरी अंथरुण घालून स्वस्थ पडून राहिलो.. थकल्यासारखे वाटत आहे हे कोणाजवळच बोललो नाही, पण मनात मात्र घाबरलो होतो..

सोहम् भजन चालू होते.. काही वेळाने डोळ्यांपुढे अंधारी आली व मनात एक विचार अत्यंत जोराने बळावला, तो असा - " माझे देहावसान आता समीप आले आहे, माझी हृदयक्रिया आता बंद पडणार..!"

हा विचार बळावतांच मागील सर्व गोष्टी विजेसारख्या डोळ्यांपुढे येउन गेल्या, व देहाचीच आसक्ती सोडण्याचा प्रसंग समीप येउन ठेपल्यामुळे मेंदूला (ज्ञानतंतूंना) एकाएकी जबर आघात बसला.. डोळ्यांपुढे मृत्यूचे विराट दर्शन होताच, एका झटक्यासरशी कामक्रोधादि विकारांचा चक्काचूर उडाला, आणी अंतःकरण भयाने व्यापले गेले..

भयातून भक्तीचा - (पूर्ण शरणागतीचा) उदय झाला.. आणी भक्तीने चिरशांति प्राप्त झाली..!"

लेखन संदर्भ : पावसचा प्रेमदिप - स्वामी सत्यादेवानंद

ॐ श्री गुरुदेव दत्त...







आत्मतत्त्व स्वरूपम्  |  शंकरानंद सद्गुरुम्  |
अज्ञान तम नाशाय |  वन्दे सर्वात्मकं गुरुंम्  ||
गुरुपौर्णिमा हा गुरू-शिष्य दोघांचाही आनंदसोहळा आहे..  गुरूचा शिष्याबद्दल आत्मविश्‍वास नि शिष्याची गुरूविषयी कृतज्ञता दोन्हीही या प्रसंगी व्यक्त होतात.. एका अर्थानं तो समसमा संयोग असतो.. वसंत ऋतूत आम्रवृक्षावर कोकिळानं पंचम सुरात आर्त गीत गावं, तसा हा योग असतो गुरुपौर्णिमा..!

गुरुतत्त्व आपल्याला खुपदा बोधात्मक अबोलपणे सुचवत असते.. कर्तव्यापुरते रहा हो आसक्त | अंतरी विरक्त रहा हो तुम्ही ||.. यावेळी आपण सद्गुरूला प्रार्थना करायची..
जे टाळणे अशक्य.. दे शक्ती ते सहाया..
जे शक्य साध्य आहे.. निर्धार दे कराया..
मज काय शक्य आहे.. आहे अशक्य काय..
माझे मला कळाया.. दे बुद्धी स्वामीराया..
तू बुद्धी दे.. तू तेज दे.. नवचेतना विश्वास दे..
जे सत्य शांत सर्वथा.. आजन्म त्याचा ध्यास दे..



आत्मतत्त्व स्वरूपम्  |  शंकरानंद सद्गुरुम्  |
अज्ञान तम नाशाय |  वन्दे सर्वात्मकं गुरुंम्  ||
गुरुपौर्णिमा हा गुरू-शिष्य दोघांचाही आनंदसोहळा आहे..  गुरूचा शिष्याबद्दल आत्मविश्‍वास नि शिष्याची गुरूविषयी कृतज्ञता दोन्हीही या प्रसंगी व्यक्त होतात.. एका अर्थानं तो समसमा संयोग असतो.. वसंत ऋतूत आम्रवृक्षावर कोकिळानं पंचम सुरात आर्त गीत गावं, तसा हा योग असतो गुरुपौर्णिमा..!
एका अर्थाने गुरुपौर्णिमा उत्सवाचा उद्देश आहे मागे वळून बघणे.. गुरु अनुग्रह म्हणजे सुंदरम् असा अनुपम योग.. अंतर्ध्यानाकडील प्रवासाचे ते पहिले पाऊल.. अंतरंग सुंदर होण्याचा तो प्रारंभ बिंदू.. या सुंदरम क्षणाच्या स्मृतिचे चिंतन-मनन-निधिध्यास आणि ध्यानात परिवर्तन..
अन् प्रारंभ करायचा स्वताःतल्या सुंदराचा शोध घ्यायला.. अंतरंग उजळनाऱ्या प्रकाश ज्योतीचा शोध घ्यायला.. तिमिरातून तेजाकडे जाताना हवी असते साथ एका ज्योतीची.. भरकटलेल्या ध्येयाला योग्य मार्ग दाखविण्यासाठी गरज असते गुरुतत्व उजळनीची..!
गुरु म्हणजे ज्ञानाचा मधुर सागर आहे.. जलाशयात पाणी विपुल आहे.. परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही.. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही..!
॥ सद्गुरू तं सततं नमामि ॥  सर्व कर्म सद्गुरूचरणी अर्पण करता आले पाहिजेत, तरच साधना निरपेक्ष होते..!!

सृष्टी कितीही बदलली तरी माणूस पूर्णतः सुखी होत नाही.. पण दृष्टी बदलली तर नक्कीच सुखी समाधानी होतो.. अशी दृष्टी साधकाला गुरु साधनेने प्राप्त होत असते..



गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे.. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय.. म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही.. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही..
जसजसे आपण निशंक होऊ तसतसे माझ्या कल्पनेप्रमाणे सद्गुरू आपल्याला पात्रतेपेक्षा भरभरून देईल हे निसंशय सत्य आहे....
साधकाने सद्गुरू कृपेच्या गुरुप्रेमाच्या प्रवाहात एखाद्या वाळक्या पानाप्रमाणे पडावं आणि तो गुरु प्रवाह जसा जसा पुढे जाईल तसं तसं त्याच्या बरोबर नि:शंकपणे जात रहावं.... या अपरोक्ष-प्रत्यक्ष... आत्मज्ञान व्हायच्या अगोदर होणार्‍या... परोक्ष-अप्रत्यक्ष ज्ञानाचा अधिकार काय सांगावा..!!.. हाच तो अनुभव-अनुभूती-दृष्टांत या द्वारे होणारा गुरुबोधरूपी ज्ञानयोग”.... वाचन-श्रवण-मौन-मनन-चिंतन.... याच्या अंगाने होणारा.... आणि निदीध्यासात रमणारा हाच तो.... आत्मस्वरूपी परमात्मा..

 चित्त स्मरणी गुरुदेव पाही I गुरु माझ्या जवळी राही II
जाणावी साधना हीच खरी I नेई आपणा मोक्ष घरी II

  ॥ सद्गुरू तं सततं नमामि ॥ सर्व कर्म सद्गुरूचरणी अर्पण करता आले पाहिजेत, म्हणजे उपासना निरपेक्ष होते !!

जयजय शंकरानंदा अवधूता I अवधूत चिंतनी सिध्दांता II
त्रैलोक्य पावना त्रिदोष दहना I त्रिगुणातीता निरंजना II














मुळांची वाढ आणि ज्ञानगर्भ... 

संपर्काच्या अभावात अन संपर्काच्या अडचणीमुळे... अविश्वासाच्या भिंती उभ्या राहतात... अन मग बाळसे धरु लागलेल्या रोपट्याची वाढ का होत नाही... हे समजत नाही... केवळ जमीन आहे म्हणुन ते वाढेल हा माणसाचा आशावाद झाला... पण मातीला नेमके काय हवे आहे?.. 

हे रोपाने अंर्तमुख होवुन नको का बघायला... मातीवर विश्वासा हा हवाच... माती नेहमीच प्रेमाने त्याचा सांभाळ या निश्चयावर असते... मुळांनी काही प्राप्त करून घेण्यासाठी खोल जायलाच पाहिजे... पण रोप जितके मातीच्या आतल्या प्रेमावर अवलंबुन आहे तसेच आणखी कितीतरी गोष्टीवर... 

माती आणि रोपे यातही वेगवेगळे विविधतेचे फरक... काही रोप ताठरत राहतात... पण बाहेरचे रोप ताठ ठेवायचे असेल तर... मुळांना पसरणे गरजेचे असते... रोपाची उगाच मी आहे तसाच असेन... अन काहिच न करता वाढावे अशी अपेक्षा चुकिची असते...  रुजण्याची ओढ हवी... मातीत गाडुन घेता यायला हवे... एका थेंबासाठी जमीन पोखरावी यावी लागते... हीच खरी ज्ञानाची ओढ... 

म्हणतात ना एक क्षण भाळण्याचा, बाकी सारे सांभाळण्याचा... मातीत मायेचा ओलावा असतोच मातीची रचना आकार देण्यासाठी असते, मायेचा ओलावा देत घडवणे घट्ट आधार देणे हा तीचा धर्म... तिच्यात रूजणार्या बीजाने ठरवले पाहिजे, किती खोलवर रूजायचे मातीला किती घट्ट धरून ठेवायचे... मुळे जितकी खोलवर जातील तितके झाड भक्कम... हेच मूळ ज्ञानगर्भाचे सत्य... ॐ श्री गुरुदेव दत्त... 

Tuesday, 1 November 2016

|| ॐ श्री गुरुदेव दत्त ||

प्रकाशरूपाने प्रकाशाची केलेली पूजा म्हणजेच दीपोत्सव..!

 प्रत्येकात अवस्थित असलेलं चैतन्य हा आंतर्प्रकाश आणि दिव्यांमधील प्रकाश हा बाह्य प्रकाश, ह्यांचं ज्ञान मनांत ठसवून दिवाळीच्या दिवशी खरोखरी ज्ञानाचा दिवा लावता आला पाहिजे..

 अज्ञानाच्या ह्या अंधाराच हरण केवळ आत्मज्ञानरुपी ' सोहं ' अर्थात ' तोच मी ' ह्या प्रकाशाने होतं.. त्या प्रकाशाकडे जाण्यासाठी मानवी जन्माचं खरं प्रयोजन काय, ह्याचा विचार जो करतो, त्याला काही ना काही मार्गाने सद्गुरुरूपी ईश्वरीतत्वाकडून मार्गदर्शन निश्चिन्तच मिळते..

 उपनिषदांतल्या तात्पर्यानुसार ईश्वरीयतत्वाशी नातं सांगणारा आपल्यातला आंतरप्रकाश आणि प्रत्यक्ष ईश्वरीतत्व ह्यांच्यातील मनाने मानलेलं अंतर हाच आपल्या मनातला अंधार आहे.. हे दूरत्व जेव्हा नाहीस होईल, तेव्हा त्याचबरोबर जीवनांतील अंधार कायमचा नाहीसा झालेला असेल.. मग नित्य दसरा - दिवाळी..! 


|| ॐ श्री गुरुदेव दत्त ||

दिवाळी म्हणजे दीपोत्सव.. बाहेर तर दिवे पेटवायचे, पण खरा दिवा तर हृदयात पेटला पाहिजे..  

दिवा हे ज्ञानाचे प्रतिक आहे..

हृदयात दिवा लावणे म्हणजे.. हृदयी सद्गुरू ह्या निश्चित प्रकारच्या जाणीवेने दिवाळीचा सण साजरा करणे..

मज हृदयी सदगुरु। जेणे तारिला हा संसारपूरु । म्हणॉनि विशेषे अत्यादरु । विवेकावरी

गुरुबोधी विवेक विचाराने.. धनत्रयोदशीच्या दिवशी वित्ताला अनर्थ न मानता जीवन सार्थक करण्याची शक्ती मानून महालक्ष्मीची पूजा करायची.. नरक चतुर्दशीच्या दिवशी जीवनात नरक निर्माण करणारा आळस, प्रमाद, अस्वच्छता, अनिष्टता वगैरे नरकासुरांना मारणे.. दिवाळीच्या दिवशी तमसो मा ज्योतिर्गमयमंत्राची साधना करता करता जीवन पथ प्रकाशित करायचा..

जीवनाच्या वहीचा आढावा घेत वेळी जमेच्या बाजूला गुरु-ईशकृपा राहावी ह्यासाठी सद्गुरूंच्या गुरुबोध प्रकाशाने जीवन भरून काढायचे.. नव्या वर्षाच्या दिवशी जुने वैर विष विसरून शत्रूचेही शुभचिंतन करायचे.. नवे वर्ष म्हणजे शुभ संकल्पाचा दिवस.. भाऊबीजेच्या दिवशी बंधूच्या निर्व्याज प्रेमाने संपूर्ण स्त्री-समाज बहिणीच्या रुपात स्वीकारायचा.. सुंदर ज्ञान देणारा सद्गुरूंच्या बोधाचा ज्ञानदीप जर हृदयात प्रकाशित केला, तर आपले जीवन सदैव दिपोत्सवी महोत्सवा समान बनेल..!!



|| ॐ श्री गुरुदेव दत्त ||

जीवनामधील आनंद केवळ दिवाळीतील  पाच दिवस न राहता, हा आनंद कायमचा राहावा ही सद्गुरूंची शिकवण असते.. ज्ञानेश्वर महाराज जीवनात निरंतर दिवाळी यावी, यासाठी आपण जे प्रयत्न केले ते सांगताना म्हणतात..

"मी अविवेकाची काजळी । फेडोनी विवेक दीप उजळी । ते योगिया पाहे दिवाळी ।  निरंतर ।।"

मानवी जीवनामध्ये अविवेक हाच त्याच्या दु:खाला कारणीभूत असतो.. या अविवेकाची माणसाच्या मन:पटलावर काजळी जमा झालेली आहे, ती काजळी फेडूनमी तेथे गुरुबोधाने विवेकाचा नंदादीप पेटवितो.. त्यामुळे अखंड दिवाळीचा आनंद मिळतो, एकदा विवेकाचा दीप उजळला की सद्विचारांकडे जाणारी वाट दिसू लागते.. त्या वाटेवरून जाताना मिळणारा आनंद खंडित होणारा नसेल.. म्हणूनच ती दिवाळी ख-या अर्थाने अखंडित राहणारी असेल, असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात..

दिवाळीचा आनंद निरंतर जीवनात राहायचा असेल तर सद्गुरूंच्या गुरुबोध विचारांचा उजेड आपल्या मागे-पुढे दाटला पाहिजे.. त्या उजेडात केलेली वाटचाल आपला जीवनाचा प्रवास सुखकर करील.. त्यामुळे जीवनात आलेली दु:ख-दैन्य पळून गेली नाहीत, तरी त्यांचा मुकाबला करण्याचे सामर्थ्य आपल्याला प्राप्त होईल..!!



Thursday, 30 June 2016

|| ॐ श्री गुरुदेव दत्त ||
जयजय शंकरानंदा अवधूता I अवधूत चिंतनी सिध्दांता II
त्रैलोक्य पावना त्रिदोष दहना I त्रिगुणातीता निरंजना II
साधकाच्या जीवनात गुरु सिद्धांत महत्वपूर्ण आहे..  गुरुतत्व हे सर्व अनुग्रहित साधकात असते.. साधकाने साधनेने ते जागृत करायचे हि सूत्रमय रचना.. हे तत्व जेव्हा जागृत होते.. त्यावेळी अज्ञान लोप पावून ज्ञान प्राप्त होत जाते..

सदगुरु तत्व सत्याचे, अंतिम वास्तविकता आणि स्वरूपाचे ज्ञान देतो.. अभ्यास चिंतन - मनन या त्रिसूत्रीने तत्व जागृती लाभते..!

शब्दांच्या पलिकडले काही I मौन एकटे बोलत राही II
अर्थ जयाचा गहन गूढसा I चिंतन मनन करुन पाही II

निशंक हो, निर्भय हो मना रे.. जसजसे आपण निशंक होऊ तसतसे सद्गुरू आपल्याला पात्रतेपेक्षा भरभरून देईल हे निसंशय सत्य आहे.. साधकाने सद्गुरू कृपेच्या गुरुप्रेमाच्या प्रवाहात एखाद्या वाळक्या पानाप्रमाणे पडावं आणि तो गुरु प्रवाह जसा जसा पुढे जाईल तसं तसं त्याच्या बरोबर नि:शंकपणे जात रहावं..

या अपरोक्ष-प्रत्यक्ष.. ज्ञानप्राप्तीच्या अगोदर होणार्‍या.. परोक्ष-अप्रत्यक्ष ज्ञानाचा अधिकार काय सांगावा..!  हाच तो अनुभव-अनुभूती-दृष्टांत या द्वारे होणारा गुरुबोधरूपी ज्ञानयोग”.. वाचन-श्रवण-मौन-मनन-चिंतन याच्या अंगाने होणारा आणि निदीध्यासात रमणारा हाच तो.. आत्मस्वरूपी परमात्मा,,!!

निशब्द मन मौन | एकांती समाधी ध्यान |
अभ्यास श्वास ध्यास | उन्नती शुद्ध वास ||

सोहम देह स्थिती | अनुभूति विश्व मूर्ती |

करुनी देह पावरी | ऐकू हंसनाद अंतरी ||






























यश आणि त्याची पाच गुपिते... 

योग्य यश म्हणजे काय हे न समजताच, जीवनात प्रत्येकाला यशस्वी व्हायचे असते... योग्य यश ही एक वृत्ती असते, घटना नसते... प्रत्येक धंद्यात आणि संस्थेत अशी परिस्थिती येत असते की जी हाताळायचे कौशल्य तुमच्यात असावे लागते... हे कौशल्य आपल्या आतून येते आणि त्या आतल्या जागेला मी आध्यात्मिक म्हणतो... यश मिळविण्यासाठी पाच गोष्टींची गरज असते...

१... अनुकूल वातावरण : शांतता आणि भरभराट या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात... अस्वस्थ वातावरणात भरभराट होऊ शकत नाही... इतरांबरोबर काम करताना सुद्धा तुम्हाला संघभावनेने काम करावे लागते... त्तुम्च्या गटातील सर्वांशी आदराची भावना ठेवा आणि इतरांवर खापर फोडण्याच्या भानगडीत अडकू नका... आणि आणखी एक म्हणजे गटाच्या नेत्याने पारदर्शक, विश्वासाचे, सहकार्याचे आणि आपलेपणाचे वातावरण ठेवावे... जर सगळे लक्ष फक्त स्वःताचा निव्वळ नफा यावर असेल तर काहीच होणार नाही... लोकांच्या मनात आतूनच स्फूर्ती निर्माण करणे हीच सर्वात परिणामकारक क्लुप्ती आहे...

२... कामातील कौशल्य : कर्माच्या फळाशी गुंतून न रहाणे हेच भगवद्गीतेचे सार आहे... जर एखाद्या युद्धजन्य वा प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही तुमच्या मनाला सावरू शकत असलात तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सांभाळून घेऊ शकता... कर्माच्या या कौशल्याला योग म्हणतात... योगाच्या या कौशल्यामुळेच उद्धटपणा हा आत्मविश्वासात, लीनता नम्रतेत, परावलंबित्व परस्परावलंबनाची जाणीव होण्यात आणि मर्यादित मालकीची भावना पूर्णत्वात एकत्वाची भावना निर्माण होण्यात परिवर्तीत होतो... काम करत असताना जर सगळे लक्ष जर फक्त आपल्या स्वार्थप्रेरित फायदेशीर अंतिम निकालावर असेल तर तुम्ही काम करू शकत नाही... फक्त जे काम करत असाल त्यात तुम्ही प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने १०० % द्या...

३... सिंह होणे : संस्कृतमध्ये एक म्हण आहे, “ ज्याच्याकडे सिंहासारखे धैर्य असेल त्याच्याकडे मोठी संपत्ती चालून येते...” आत आणि बाहेर जाणाऱ्या श्वासाइतकेच आस्था आणि वैराग्य हे दोन्ही एकमेकाला पूरक आहेत... तुम्ही श्वास आत घेता पण तो जास्त काळ आत रोखून धरू शकत नाही, तुम्हाला तो बाहेर सोडावाच लागतो... त्याचप्रमाणे गोष्टी घडण्यासाठी तुम्हाला आस्था असावी लागते तसेच सोडून देण्यासाठी वैराग्य असावे लागते... जेव्हा तुम्हाला भरभराटीची हाव नसते तेव्हा तेव्हा ती तुमच्याकडे चालून येते...

४... नशिबाचा एक अंश : सुबत्ता प्राप्त होण्यासाठी जर केवळ स्वत:च्या मेहनतची गरज असेल तर असेल तर असे अनेक लोक कां आहेत जे खूप मेहनत करतात पण त्यांची भरभराट होत नाही ? ही अगम्य गोष्ट किंवा नशीब अथवा प्रारब्ध भोग अध्यात्माने उचलून धरले आहे... सगळी भौतिक सृष्टी, लहरींच्या एका सृष्टीने चालते जी आपल्याला जे दिसते त्यापेक्षा सूक्ष्म असते... अध्यात्मामुळे बुद्धीला आणि अंतर्ज्ञानाला धार चढते... जेव्हा तुम्ही आस्था आणि वैराग्य यात समतोल साधता तेव्हा तुम्हाला अंतर्ज्ञान प्राप्त होते... फायद्याबरोबरच सेवा, गोष्टी मिळविण्यासाठीची धडपड आणि त्याच बरोबर समाजाला परत देण्यासाठीची करुणा... अंतर्ज्ञान म्हणजे योग्य वेळी योग्य विचार येणे आणि हाच व्यवसायात यश मिळण्यासाठी असलेला एक महत्वाचा घटक आहे...

५... ध्यान : तुमच्या जबाबदाऱ्या आणि ध्येय जितके मोठे तितकी तुम्हाला ध्यान करण्याची जास्त गरज आहे... प्राचीन काळी, ध्यान हे आत्म्याच्या शोधासाठी, सिद्धी प्राप्त होण्यासाठी आणि दु:ख आणि त्रासावर मात करण्यासाठी वापरले जायचे... आजच्या काळात मनावरचा ताण समाजातील तणाव यासाठीही ध्यान करावे लागते... करायचे खूप असते आणि वेळ थोडं असतो आणि तेवढी शक्ती नसते... लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या कामाचा भारही कमी करू शकत नाही आणि वेळही वाढवू शकत नाही... पण तुम्ही तुमची शक्ती, ऊर्जा वाढवू शकता... ध्यानामुळे तुमचे तुमचा ताण तणाव नाहीसा होतो इतकेच नाही तर तुमच्या क्षमताही वाढतात, तुमची मज्जासंस्था आणि मन बळकट होते...शरीरातील विषारी द्रव्यांचा निचरा होतो आणि सर्व प्रकारे तुमचे तेज वाढते... आपण जड मूलतत्व आणि चैतन्य या दोन्हीपासून बनलो आहोत... शरीराच्या काही भौतिक गरजा असतात आणि आपल्या आत्म्याचे पोषण अध्यात्माने होते... सर्वात महत्वाचे म्हणजे, आनंदाने बहरून जाणे, आत्मविश्वास, करुणा, उदारपणा आणि कोणीही घालवू शकणार नाही असे धैर्य हीच योग्य यशाची खूण आहे... जीवनात काहीही झाले तरी या गोष्टी तुम्ही टिकवू शकलात तर तुम्ही खऱ्या अर्थाने यश मिळवले आहे... ॐ श्री गुरुदेव दत्त...

Saturday, 11 June 2016

तोरा मन दर्पण कहलाये...

काय हवं..?.. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळ असलं तरी, त्यातली एक गोष्ट कॉमन असते… प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आपल्याच "मनातली" हवी असते...

 ‘अपने आप को पहचानिए’ असेही हिंदीत म्हटले जाते... व्यक्तिमत्त्व हे त्यावरून घडते... अशा विचारांचे मनन, चिंतन, वाचन माणसाने सातत्याने करावे... हे फारच उपयुक्त ठरते... त्यामुळे स्वत:ची ओळख होते... आपणास सहज स्वत:विषयी काही विचारलं तरी आपण बोलण्यास कचरतो... स्वरूप ओळखा असे संत सांगतात... ज्यांना स्वरूप कळाले त्यांनीच जगावर राज्य केले अन् तेच आजही करताहेत...

संत कबीर यांचा एक दोहा आहे...  
अपने अपने चोर को, सब कोय डारै मार
मेरा चोर मुझको मिलै, सरबस डारू वार
संत कबीर दोह्यात आपणास हेच सांगतात... जगातले सर्वच आपापल्या शत्रूंना मारून टाकतात... मात्र पकडले न जाणारे मन मला मिळाले तर मी त्याला मारणार तर नाहीच उलट माझे सर्वस्व त्याला अर्पण करेन, त्याच्याशी मैत्री करेन... स्वत:ची ओळख होण्यासाठी स्वत:चे मन, प्रवृत्ती, कल, सवयी यांचा अभ्यास होणे महत्त्वाचे... एकदा का हा अभ्यास झाला म्हणजे गुण-दोष दिसतात... दोष कमी करत गेलो की मग गुण वाढीस लागतात...

आपण काय करतो, का करतो, त्याचे काय परिणाम होणार हे कळते... त्यावेळी आपले मन आपणास सापडते... ‘तोरा मन दर्पण कहलाये’ असं दर्पणासमान मन आपणास सारे काही दाखवते... मग काय हा अल्लाऊद्दीनचा दिवा असलेलं आपलं मन हवं ते मिळवून देतं व आयुष्यातल्या अडचणी, संकटे, दु:ख यावर उपाय सापडतो व आपल्या आयुष्याला आकार मिळतो...

आपल्याही आसपास सकारात्मक विचार करून आपल्या स्वत:च्या आयुष्याला, दुस-याच्या आयुष्यालाही आकार देण्याचा सातत्याने प्रयत्न करणारी व्यक्तिमत्त्वे आढळतात... फक्त उघड्या डोळ्यांनी त्यांना अनुभवण्याची गरज असते... जसा कुंभार ओल्या मातीला आकार देत असतो, प्रसंगी तो धपाटाही देतो व आतून आधारही...


थोडक्यात सांगायचं तर अडचणीपासून कोणीही सुटलेला नाही... अडचणीविना जीवन एक भ्रम आहे... वाळवंटातल्या मृगजळाप्रमाणे अशा जीवनामागे धावून मानसिक व शारीरिक शक्ती वाया घालविण्याऐवजी अडचणी पेलून त्यावर मात करण्यातच खरे कौशल्य आहे... आयुष्याचा भागाकार करतांना बाकी शून्य येते, यात काही नवीन नाही... पण तुम्ही भाग कोणत्या गोष्टींनी देतात हे फार महत्त्वाचे आहे..!.. 

अशा सुविचारातून गुण घेऊ या अन् म्हणू या ‘सकारात्मक विचारच देतील आयुष्याला आकार’ आणि चला आयुष्य सकारात्मक विचारानं जगू या..!.. ॐ श्री गुरुदेव दत्त... 

Monday, 22 February 2016

अध्यात्म-स्वरूप...
माणसाचे सत्य स्वरूप देहाच्या माध्यमातून पूर्णपणे अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न करीत असते... त्याला मनुष्याचे अंतःस्थ दोष व बाह्य जग दडपण्याचा प्रयत्न करीत असतात... या संघर्षाचे नाव जीवन होय.!. या व्याख्येतील सत्य स्वरूप म्हणजेच प्रत्येक माणसाचे अध्यात्म होय...
ते कसे.?. तर सोन्याचे नाना अलंकार घडवावे व त्यांना अंगठी, हार, बांगड्या इ. नावे द्यावीत, त्याप्रमाणे एकाच परमात्मतत्त्वापासून सारे वस्तूमात्र व प्राणीमात्र आकारास आले आहेत... म्हणूनच सर्व चराचर मूलतः परब्रह्मस्वरूपच आहे... परब्रह्माचे जे स्वरूप, त्याचा जो भाव तोच सर्व भूतांसाठी अध्यात्म झाला... पण सोन्याच्या दागिन्यावर चांदीचा मुलामा दिल्यास त्याचे सोनेपण जसे झाकले जाते, अगदी तसेच जगाच्या सहवासात मूळ स्वरूपावर बाह्य विषयांची म्हणजेच चांगल्या व वाईट गुणांची रंगरंगोटी होऊन प्राणीमात्र आपले परब्रह्मपण हरवतात व जन्म-मृत्यूच्या बंधनात अडकतात...
मग धुळीने माखलेल्या आरशात दिसणारे प्रतिबिंब जसे मलिनच भासते, त्याप्रमाणे गुणांच्या प्रभावाखाली मनुष्यादि देहांच्या ठिकाणी असलेले मूळ स्वरूप गुणात्मक, बद्ध भासते... असे हे जीवाच्या ठिकाणी असलेले मूळ स्वरूपावरील बाह्य विषयांचे भासमात्र आच्छादन हाच जीवाचा बंध होय आणि निर्विषयी देह-जीवाच्या माध्यमातून होणारी स्वस्वरूपाची निर्दोष व यथार्थ अभिव्यक्ती म्हणजेच जीवासाठी मोक्षप्राप्ती होय..!..
अशा प्रकारे सत्य, शिव आणि सुंदर असे प्रत्येकाचे मूळ स्वरूप व देहादि माध्यमातून गुणांच्या पडद्यातून परावर्तित होणारे स्वरूप अनुक्रमे शिव व जीव म्हणून ओळखले जाते... पहा यात.!. जीवा-शिवाचे नाते किती घट्ट आहे.!. इतके की त्याला अद्वैताशिवाय दुसरे काय नाव देणार.?. हे अद्वैत जाणणे म्हणजे जीवाने आपले शिवपण जाणणे व स्वाधीन गुणांच्या पडद्याआडून ते साकारणे म्हणजेच अध्यात्म जाणणे होय.!. हेच प्रत्येकासाठी परम-प्राप्तव्य म्हणजे परमार्थ आहे.!. ॐ श्री गुरुदेव दत्त...