Thursday, 11 April 2013

नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी....
नववर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारिक रुढी.....
रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण....
प्रफुल्लित होवो तुमचे जीवन सुगंधित जैसे चंदन....
मित्रांनो, आज गुढी पाडवा म्हणजे नव्या वर्षाचा नवा संकल्प करण्याचा शुभ दिवस.... या दिवसाचे पावित्र्यही फार मोठे आहे.... हिंदू धर्म आणि धर्मातील सण आणि शास्त्र यांचा किती निकटचा संबंध आहे याचा प्रत्यय गुढीपाडवा या सणाकडे पहिला कि येतो.... अन प्रत्येकासाठी पुन्हा आपल्या संस्कृती जवळ जायचा हा शुभ दिवस ठरतो....
चैत्र शुद्ध प्रतिपदा.... गुढी पाडवा..!!.. आपल्या मराठी मनाचा.... मानाचा आणि अस्मितेचा शुभदिवस..!!.. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त आणि हिंदू रीतीनुसार  प्रारंभ.... नव्यावर्षाचा... नव्या भविष्याचा... नव्या क्षितिजांचा...!.. बघा, खरेतर आयुष्यात आलेली आणखी एक संधी.... भूतकाळाच्या कटू गोड आठवणी भूतकाळातच ठेऊन त्यातून आलेला अनुभव वर्तमानात घेऊन येणे आणि वर्तमानातील कर्म आणि भूतकाळातील अनुभव यांच्या शिदोरीने भविष्य उज्वल बनवायची आणखी एक सूसंधी..!.. एक मुहूर्त....
बघा, याच दिवशी ब्रह्मदेवांनी विश्वाची उत्पत्ती केली.... याचदिवशी विष्णूदेवांनी मत्स्यावतार घेतला... याच दिवशी श्रीराम रावणरूपी अवगुणाला संपवून अयोध्येत परतले.... याच दिवशी सत्ययुगाची सुरुवात झाली.... बघा, याच दिवशी शालिवाहन राजाने राज्य विस्ताराकरिता दक्खनच्या पठारावर चढाई केली व हण या राजास पराभूत करून प्रतिष्ठान म्हणजे पैठण येथे येथे राजधानी स्थापन करून धर्मध्वजाखाली राज्यशासन केले व स्वताच्या शकाची (शालिवाहन शक ) निर्मिती केली.... याच दिवशी शेतकरी रब्बी हंगामात काढलेले धान्य बाजारात विकायला पाठवतो आणि याच दिवशी आपल्यातीलच काही लोक इतिहासात अजरामर होण्यासाठी नव्या उमेदीने सुरुवात करतात.... !! असा हा समृद्धीचा आणि मांगल्याचा गुढी पाडवा !!
बघा, सण आणि शास्त्र यांचा सुंदर संयोग म्हणजे गुढी पाडवा..!..आणि त्याहून येणारा संदेश अतीव महत्वाचा.... गुढीखाली ठेवलेला पाट हा स्थैर्याचे प्रतिक, वाहिलेले हळद कुंकू सौभाग्याचे प्रतिक, बांबू /वेळूची काठी सामर्थ्याचे प्रतिक, घातलेली जरीची साडी वैभवाचे प्रतिक, साखरेची माळ आणि लिंबाचा पाला एकत्र बांधून सुख आणि दुःख सोबतच येत असतात या संस्काराचे प्रतिक, पुष्पहार हा मांगल्याचा प्रतिक आणि सर्वात वरती असणारा गढू /कलश हा यशाचा, आधाराचा आणि सर्वसमावेशक गुणधर्माचे प्रतिक..!!.. गुढी उभारत असतानाचा प्रचलित मंत्र....
" ब्रम्हध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रदे |
प्राप्तस्मिनसंवत्सरे नित्यं मदग्रहे मंगलं कुरु" ||
याचा अर्थ असा.... ब्रम्हाचे प्रतिक असेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो.... सर्व प्रकारचे शुभ फळ मला मिळू दे... या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये मंगलमय वातावरण राहू दे अशी प्रार्थना करून सृष्टीच्या कर्त्या मी ब्रह्मदेवाची उपासना करतो....
मित्रांनो... गुढी पाडव्याच्या या शुभदिनी आपल्याला व आपल्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा..!!.. आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत हि शुभकामना... आणि आपल्यातील प्रेम, ऋणानुबंध असाच वृद्धिंगत होवोत हिच सद्गुरू चरणी प्रार्थना.... आजचा दिवस हा नुसता सण नाही तर संस्कारांचा, आपुलकीचा, ममतेचा, कर्तुत्वाचा आणि प्रारंभाचा खजिना आहे.... प्रत्येकाने यथाशक्ती त्याचा लाभ घ्यावा आणि उंचीवर असूनही अहंम् भाव नसलेले, जमिनीशी भक्कम नाते ठेवलेले, सुख आणि दुःख यांची जाण असलेले, सामर्थ्याचे, स्थैर्याचे, शौर्याचे, सौभाग्याचे, वैभवाचे, यशाचे, मांगल्याचे आणि समृद्धीचे असे आपले आयुष्य गुढी सारखे सजवावे....
                           संपली पानगळसंपला शिशिर.... अन संपली ती गर्द अवस....
                                               नवसुमने फ़ुलवीत आला..... वर्षाचा हा पहिला दिवस.....
                           नवा रंगनवा सुगंध.... नवा अभंगअंतरी घुमे....
                                               पांगुळल्या क्षीणल्या मनाला.... नवा अर्थनवदिशा गमे....
ॐ श्री गुरुदेव दत्त .....

शुभ संकल्पाची गुढी....

मित्रांनो, उद्या चैत्र शुद्ध  प्रतिपदा... म्हणजे गुढी पाडव्याचे निमित्ताने मी आपणास 'भारतीय संस्कृती आणि आपल्या पूर्वजांचे ज्ञान' या ठेव्याचा वापर करीत वळवू इच्छित आहे.... आगळ्या वेगळ्या संकल्पाकडे..... भारतीय संस्कृतीस अनुसरून आपण आपली वनसंपदा जपण्याचा संकल्प करीत यावर्षी एक आगळा वेगळा उपक्रम सिद्धीस नेवू या..... यावर्षी आपण राहत असलेल्या परिसरात एक वृक्ष लावणे व जोपासणे हे प्रथम उद्दिष्ट पार पाडू..... कदाचित आपण यापूर्वीच कोणत्याही मुहूर्ताची वाट न पाहता वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीपणे राबविला असेल, अभिनंदन.... कारण ते नक्कीच सुजाण नागरिकत्वाचे लक्षण आहे....

बघा, यावर्षी उच्च पातळीवर हा प्रयोग अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी एक वृक्ष आपण राहतो त्या परिसरात लावून तो जोपासला पाहिजे... प्रत्येक भारतीय नागरिकाने, आपल्या भूमीचे ऋण फेडण्यासाठी, एकतरी वृक्ष किंवा औषधी वनस्पती लावण्याचा संकल्प करून, त्याची पूर्तता या शुभदिनी पूर्ण करून यात सहभागी झाले पाहिजे.... बघा, ज्ञानेश्वरी समजावून घेताना जसे फक्त ज्ञानेश्वरीचे वाचन न करता 'एक तरी ओवी अनुभवावी' हे जसे संतांनी सागितले आहे.... तसेआज आपणा सर्वांनी जाणावे..... प्रत्येकाने 'एक तरी फांदी जगवावी.'.... ही नवकाळाची गरज आहे.... नव वर्षाच्या निमित्ताने सृजन वाचकांना यापेक्षा अधिक सांगणे न लगे....

झाड तोडूनी... प्रदूषण करोनी... काय कोणी मिळविले....
पूर, दुष्काळ, वादळात सर्वस्व मात्र गमाविले
थांबुवया हे सारे आपण... करुनी पुन्हा वृक्षारोपण....
झाडे लावू.. झाडे जगवू... वसुंधरेला पुन्हा सजवू....
पर्यावरणाच्या गुढीसंगे, स्वागत करूया नववर्षाचे,
नवसंकल्प हाची असू दे... वसुंधरा ही पुन्हा फुलू दे....  वसुंधरा ही पुन्हा फुलू दे....
"नवे प्रयत्न, नवा विश्वास, नव्या यशासाठी नवी सुरवात".... येणारे नवीन "मराठी" वर्ष (चैत्र शके १९३५) आपल्याला यशाचे, सुखाचे, समृद्धीचे जाओ.... गुढीपाडवा आणि नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेछा..!!..
ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Wednesday, 3 April 2013


 















मेरा भारत महान.....

बघा, सध्या नुकताच कुंभ मेळा होऊन गेला.... साधु - संत, लाखो भाविक तिथे जमले होते आणि वर्षभर ही वर्दळ राहणार होती.... प्रश्न केवळ भाविकांच्या भक्तीचा नाही.... त्या अनुषंगाने इतरही अनेक प्रश्न निर्माण होतात.... या लाखोंच्या समुदायाची बडदास्त ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस, राज्य सरकारला तारेवरची कसरत करावी लागत होती.... त्यासाठी हजारो कोटी गोदेच्या पाण्यासारखे वाहवल्या जात होते.... मानवी श्रमाचे वाया जाणारे तास गृहीत धरल्यास हा खर्च कितीतरी वाढतो.... या खर्चापासून होणारी मिळकत किती, हा प्रश्न उपस्थित केल्यास काय उत्तर देता येईल.... हा प्रचंड पैसा आणि ही प्रचंड मानवी श्रमशक्ती योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे खर्च झाली असती तर..?.. 

बघा, आज कित्येक गावात पिण्याचे पाणी उपलब्ध नाही.... पक्या सडका नाहीत, आरोग्याच्या प्राथमिक सुविधा नाही, शाळा नाहीत.... कुंभमेळ्यावर सरकारतर्फे होणारा खर्च आणि तिथे येणाऱ्या लाखो भाविकांचा वाया जाणारा वेळ, वाया जाणारे श्रम जर या खेड्यापाड्यांच्या विकासाकडे वळवता आले असते तर..!.. परंतु ही जाणीव सरकारला नाही आणि जनतेलाही नाही.... आम्ही वाया घालवत असलेल्या शक्तीचे, ऊर्जेचे हे एकच उदाहरण नाही.... अशी असंख्य उदाहरणे देता येतील....

क्रिकेटसारख्या सर्वच दृष्टीने निरर्थक खेळापायी वेडी झालेली जनता आपला वेळ, पैसा आणि श्रमशक्ती अक्षरश: वाया घालवित असते.... क्रिकेटचे सामने असले की, हजारो लोक मैदानावर आणि अक्षरश: कोट्यवधी दूरचित्रवाणीसमोर निव्वळ बसून असतात.... या लोकांनी त्याऐवजी प्रत्येकी तासभर जरी कुदळीचे धाव घातले तरी उत्तरेतील गंगा दक्षिणेतील गोदावरीला सहज जोडता येईल.... परंतु हे कळेल तेव्हाच ना..!!.. आपण आपली प्रचंड ऊर्जा शक्ती, जी मानवी श्रमात, बुध्दीत दडलेली आहे, अक्षरश: वाया घालवित असतो.... आपला बहुतेक वेळ संदर्भहीन बोलण्यात, संदर्भहीन ऐकण्यात आणि निरर्थक वागण्यात खर्च करीत असतो.... हीच ऊर्जा योग्य दिशेने कार्यान्वित केली तर आपल्या देशाचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही.... 

बघा, आम्ही दिवसातून दहा वेळा घर झाडून स्वच्छतेचा दिखावा करू, परंतु धुळ का निर्माण होते याचा शोध घेऊन ते कारणच समूळ नाहिसे करण्याचा प्रयत्न करणार नाही.... प्रत्येक बाबतीत असेच आहे.... बघा, आज जाणवते नदीत गळ टाकून शांतपणे बसणाऱ्या कोळ्यासारखी आपली अवस्था आहे.... माशाला वाटले तर तो गळाला लागेल, अन्यथा आम्ही 'ठेविले अनंते तैसेची राहू'..... 

बघा, आज जर विश्लेषणात्मक नजरेने पाहिले तर भारतात तीन प्रकारचे लोक राहतात.... एक ज्यांना काहीच कळत नाही म्हणून काहीच न करणारे आणि दुसरे ज्यांना काहीच कळत नाही म्हणून काहीही करणारे.... बघा, यापेक्षा तिसरे फार वाईट... ज्यांना बरेच कळते पण ते काहीच करत नाहीत.... ज्या दिवशी या देशातील लोकांना आपण काय करतो आहोत किंवा काय केले पाहिजे हे कळेल त्याच दिवशी 'मेरा भारत महान' हे अभिमानाने म्हणण्याचा हक्क त्यांना प्राप्त होईल....

बघा, आज भले सर्व म्हणतील अगदी बरोबर मुद्दे मांडले.... पण ऐकून वाचून सारे आपलेच खरे करत बसतील.... म्हणूनच असले मोठे विषय आणि समस्या या चर्चा करून सुटणार नाहीत हे त्रिवार सत्य..... मग काय करावे..!!.. हीच ऊर्जा योग्य दिशेने कार्यान्वित केली तर... म्हणजे छोटासा का असेना, आपल्याच पातळीवर जर बदल घडवून आणला तर होणारा कायापालट पाहून एक दिवस आपण नक्कीच म्हणू शकू.... मेरा भारत महान.....