Thursday, 11 April 2013

नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी....
नववर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारिक रुढी.....
रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण....
प्रफुल्लित होवो तुमचे जीवन सुगंधित जैसे चंदन....
मित्रांनो, आज गुढी पाडवा म्हणजे नव्या वर्षाचा नवा संकल्प करण्याचा शुभ दिवस.... या दिवसाचे पावित्र्यही फार मोठे आहे.... हिंदू धर्म आणि धर्मातील सण आणि शास्त्र यांचा किती निकटचा संबंध आहे याचा प्रत्यय गुढीपाडवा या सणाकडे पहिला कि येतो.... अन प्रत्येकासाठी पुन्हा आपल्या संस्कृती जवळ जायचा हा शुभ दिवस ठरतो....
चैत्र शुद्ध प्रतिपदा.... गुढी पाडवा..!!.. आपल्या मराठी मनाचा.... मानाचा आणि अस्मितेचा शुभदिवस..!!.. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त आणि हिंदू रीतीनुसार  प्रारंभ.... नव्यावर्षाचा... नव्या भविष्याचा... नव्या क्षितिजांचा...!.. बघा, खरेतर आयुष्यात आलेली आणखी एक संधी.... भूतकाळाच्या कटू गोड आठवणी भूतकाळातच ठेऊन त्यातून आलेला अनुभव वर्तमानात घेऊन येणे आणि वर्तमानातील कर्म आणि भूतकाळातील अनुभव यांच्या शिदोरीने भविष्य उज्वल बनवायची आणखी एक सूसंधी..!.. एक मुहूर्त....
बघा, याच दिवशी ब्रह्मदेवांनी विश्वाची उत्पत्ती केली.... याचदिवशी विष्णूदेवांनी मत्स्यावतार घेतला... याच दिवशी श्रीराम रावणरूपी अवगुणाला संपवून अयोध्येत परतले.... याच दिवशी सत्ययुगाची सुरुवात झाली.... बघा, याच दिवशी शालिवाहन राजाने राज्य विस्ताराकरिता दक्खनच्या पठारावर चढाई केली व हण या राजास पराभूत करून प्रतिष्ठान म्हणजे पैठण येथे येथे राजधानी स्थापन करून धर्मध्वजाखाली राज्यशासन केले व स्वताच्या शकाची (शालिवाहन शक ) निर्मिती केली.... याच दिवशी शेतकरी रब्बी हंगामात काढलेले धान्य बाजारात विकायला पाठवतो आणि याच दिवशी आपल्यातीलच काही लोक इतिहासात अजरामर होण्यासाठी नव्या उमेदीने सुरुवात करतात.... !! असा हा समृद्धीचा आणि मांगल्याचा गुढी पाडवा !!
बघा, सण आणि शास्त्र यांचा सुंदर संयोग म्हणजे गुढी पाडवा..!..आणि त्याहून येणारा संदेश अतीव महत्वाचा.... गुढीखाली ठेवलेला पाट हा स्थैर्याचे प्रतिक, वाहिलेले हळद कुंकू सौभाग्याचे प्रतिक, बांबू /वेळूची काठी सामर्थ्याचे प्रतिक, घातलेली जरीची साडी वैभवाचे प्रतिक, साखरेची माळ आणि लिंबाचा पाला एकत्र बांधून सुख आणि दुःख सोबतच येत असतात या संस्काराचे प्रतिक, पुष्पहार हा मांगल्याचा प्रतिक आणि सर्वात वरती असणारा गढू /कलश हा यशाचा, आधाराचा आणि सर्वसमावेशक गुणधर्माचे प्रतिक..!!.. गुढी उभारत असतानाचा प्रचलित मंत्र....
" ब्रम्हध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रदे |
प्राप्तस्मिनसंवत्सरे नित्यं मदग्रहे मंगलं कुरु" ||
याचा अर्थ असा.... ब्रम्हाचे प्रतिक असेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो.... सर्व प्रकारचे शुभ फळ मला मिळू दे... या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये मंगलमय वातावरण राहू दे अशी प्रार्थना करून सृष्टीच्या कर्त्या मी ब्रह्मदेवाची उपासना करतो....
मित्रांनो... गुढी पाडव्याच्या या शुभदिनी आपल्याला व आपल्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा..!!.. आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत हि शुभकामना... आणि आपल्यातील प्रेम, ऋणानुबंध असाच वृद्धिंगत होवोत हिच सद्गुरू चरणी प्रार्थना.... आजचा दिवस हा नुसता सण नाही तर संस्कारांचा, आपुलकीचा, ममतेचा, कर्तुत्वाचा आणि प्रारंभाचा खजिना आहे.... प्रत्येकाने यथाशक्ती त्याचा लाभ घ्यावा आणि उंचीवर असूनही अहंम् भाव नसलेले, जमिनीशी भक्कम नाते ठेवलेले, सुख आणि दुःख यांची जाण असलेले, सामर्थ्याचे, स्थैर्याचे, शौर्याचे, सौभाग्याचे, वैभवाचे, यशाचे, मांगल्याचे आणि समृद्धीचे असे आपले आयुष्य गुढी सारखे सजवावे....
                           संपली पानगळसंपला शिशिर.... अन संपली ती गर्द अवस....
                                               नवसुमने फ़ुलवीत आला..... वर्षाचा हा पहिला दिवस.....
                           नवा रंगनवा सुगंध.... नवा अभंगअंतरी घुमे....
                                               पांगुळल्या क्षीणल्या मनाला.... नवा अर्थनवदिशा गमे....
ॐ श्री गुरुदेव दत्त .....

No comments:

Post a Comment