मेरा भारत महान.....
बघा, सध्या नुकताच कुंभ मेळा होऊन गेला.... साधु - संत, लाखो भाविक तिथे जमले होते आणि वर्षभर ही वर्दळ राहणार होती.... प्रश्न केवळ भाविकांच्या भक्तीचा नाही.... त्या अनुषंगाने इतरही अनेक प्रश्न निर्माण होतात.... या लाखोंच्या समुदायाची बडदास्त ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस, राज्य सरकारला तारेवरची कसरत करावी लागत होती.... त्यासाठी हजारो कोटी गोदेच्या पाण्यासारखे वाहवल्या जात होते.... मानवी श्रमाचे वाया जाणारे तास गृहीत धरल्यास हा खर्च कितीतरी वाढतो.... या खर्चापासून होणारी मिळकत किती, हा प्रश्न उपस्थित केल्यास काय उत्तर देता येईल.... हा प्रचंड पैसा आणि ही प्रचंड मानवी श्रमशक्ती योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे खर्च झाली असती तर..?..
बघा, आज कित्येक गावात पिण्याचे पाणी उपलब्ध नाही.... पक्या सडका नाहीत, आरोग्याच्या प्राथमिक सुविधा नाही, शाळा नाहीत.... कुंभमेळ्यावर सरकारतर्फे होणारा खर्च आणि तिथे येणाऱ्या लाखो भाविकांचा वाया जाणारा वेळ, वाया जाणारे श्रम जर या खेड्यापाड्यांच्या विकासाकडे वळवता आले असते तर..!.. परंतु ही जाणीव सरकारला नाही आणि जनतेलाही नाही.... आम्ही वाया घालवत असलेल्या शक्तीचे, ऊर्जेचे हे एकच उदाहरण नाही.... अशी असंख्य उदाहरणे देता येतील....
क्रिकेटसारख्या सर्वच दृष्टीने निरर्थक खेळापायी वेडी झालेली जनता आपला वेळ, पैसा आणि श्रमशक्ती अक्षरश: वाया घालवित असते.... क्रिकेटचे सामने असले की, हजारो लोक मैदानावर आणि अक्षरश: कोट्यवधी दूरचित्रवाणीसमोर निव्वळ बसून असतात.... या लोकांनी त्याऐवजी प्रत्येकी तासभर जरी कुदळीचे धाव घातले तरी उत्तरेतील गंगा दक्षिणेतील गोदावरीला सहज जोडता येईल.... परंतु हे कळेल तेव्हाच ना..!!.. आपण आपली प्रचंड ऊर्जा शक्ती, जी मानवी श्रमात, बुध्दीत दडलेली आहे, अक्षरश: वाया घालवित असतो.... आपला बहुतेक वेळ संदर्भहीन बोलण्यात, संदर्भहीन ऐकण्यात आणि निरर्थक वागण्यात खर्च करीत असतो.... हीच ऊर्जा योग्य दिशेने कार्यान्वित केली तर आपल्या देशाचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही....
बघा, आम्ही दिवसातून दहा वेळा घर झाडून स्वच्छतेचा दिखावा करू, परंतु धुळ का निर्माण होते याचा शोध घेऊन ते कारणच समूळ नाहिसे करण्याचा प्रयत्न करणार नाही.... प्रत्येक बाबतीत असेच आहे.... बघा, आज जाणवते नदीत गळ टाकून शांतपणे बसणाऱ्या कोळ्यासारखी आपली अवस्था आहे.... माशाला वाटले तर तो गळाला लागेल, अन्यथा आम्ही 'ठेविले अनंते तैसेची राहू'.....
बघा, आज जर विश्लेषणात्मक नजरेने पाहिले तर भारतात तीन प्रकारचे लोक राहतात.... एक ज्यांना काहीच कळत नाही म्हणून काहीच न करणारे आणि दुसरे ज्यांना काहीच कळत नाही म्हणून काहीही करणारे.... बघा, यापेक्षा तिसरे फार वाईट... ज्यांना बरेच कळते पण ते काहीच करत नाहीत.... ज्या दिवशी या देशातील लोकांना आपण काय करतो आहोत किंवा काय केले पाहिजे हे कळेल त्याच दिवशी 'मेरा भारत महान' हे अभिमानाने म्हणण्याचा हक्क त्यांना प्राप्त होईल....
बघा, आज भले सर्व म्हणतील अगदी बरोबर मुद्दे मांडले.... पण ऐकून वाचून सारे आपलेच खरे करत बसतील.... म्हणूनच असले मोठे विषय आणि समस्या या चर्चा करून सुटणार नाहीत हे त्रिवार सत्य..... मग काय करावे..!!.. हीच ऊर्जा योग्य दिशेने कार्यान्वित केली तर... म्हणजे छोटासा का असेना, आपल्याच पातळीवर जर बदल घडवून आणला तर होणारा कायापालट पाहून एक दिवस आपण नक्कीच म्हणू शकू.... मेरा भारत महान.....
No comments:
Post a Comment