Wednesday, 2 April 2014


कर्तव्याने घडतो माणूस....

कोणतेही कर्तव्य कर्म करीत असताना मन पूर्ण अलिप्त आणि समतोल असायला पाहिजे.... कारण श्रेष्ठ कार्ये पूर्ण सिद्धीस जाईपर्यंत यश आणि अपयश ह्यांचे धक्के आणि लाभहानी-मानहानीचे हेलकावे सहन करावे लागतात.... 'स्थितप्रज्ञ' व्यक्तीच अहंकार विसरून मान-अपमान, माझे, माझे न करता तत्वनिष्ठ राहून नीतीपूर्णतेने जीवनातील / प्रपंचातील अनेक लढाया हरते, पण शेवट गोड होतो, युद्ध जिंकून..!.. 

बघा, कृष्ण गीतेत अर्जुनाला हेच सांगत असतो ते आपण काव्यरूपाने पाहू....

मोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होईजे पार्था |
कर्तव्याने घडतो माणूस जाणूनिया पुरुषार्था ||

कर्तव्याच्या पुण्य पथावर मोहांच्या फूलबागा |
मोही फसता मुकशील वीरा मुक्‍तीच्या या मार्गा ||

क्षणभंगुर हे मान-अपमान खेळ ईशतत्वाचा |
भाग्य चालते कर्मपदांनी जाण खर्‍या वेदार्था ||

म्हणोनी कर्मफलाते अर्पून सोड अहंता वृथा |
सर्व धर्म परि त्यजुनी येई शरण मला सर्वार्था ||

आज काय होते खूपवेळा वेदांत नुसता लोकांना सांगितला जातो, पण स्थितप्रज्ञ तो स्वतः आचरणात आणतात.... त्यांच्यावर कठीण प्रसंग आला तरी ते डगमगत नाहीत.... नीतीमत्ता, तत्वनिष्ठता ते सोडत नाहीत वा त्यात तडजोड करीत नाहीत.... त्यामुळे त्यांना खरे समाधान मिळते, तर इतरांच्या पदरात असमाधान पडते.... तेव्हा, सद्गुरू जो बोध सांगतात.... त्याचे आपण थोडेतरी आचरण करायलाच पाहिजे, तरच आपण काहीतरी योग्य ते साधू शकतो..!.. 

श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे... माझ्या गुरूला हे आवडेल का..?.. अशा भावनेनें जगांत वागणें हाच सगुणोपासनेचा निर्गुण हेतू आहे.... गुरु अनुसंधानात राहून कर्तव्य केल्याने अशी भावना जागृत होतें..!..

गुरू चरणी ठेविता भाव | आपोआप भेटे देव |
गुरू भजनी असता ठाव | स्व ध्यानासी मिळे वाव ||

ईश्वराने माणसाला हा जो जन्म दिला आहे, त्याबरोबरच मानवी जीवनातील कर्तव्येही दिली आहेत.... ती कर्तव्ये कर्म केल्याशिवाय पुरी होत नाहीत.... एखाद्याला कुठलाही अधिकार प्राप्त होतो, त्याचबरोबर त्याच्यावर कर्तव्ये करण्याची जबाबदारी असते....  आजकाल माणूस लोभाच्या आकर्षणाने कर्म करण्यास प्रवृत्त होतो, एखादे कर्म केल्यावर मला काय मिळणार याचा तो प्रथम विचार करतो....  आणि तेथेच मोह्मायेने फासत जातो....


गीतेतील कर्म हे साध्य नाही तर ते ईश्वराची कर्म कुसुमानि पूजा करून त्यास प्रसन्न करून घेण्याचे साधन आहे.... गीतेने जी साधना सांगितली तिचा कर्मयोग हा पाया तर ज्ञानयोग हे शिखर आहे.... कर्मयोग हा अंतकरणशुद्धी द्वारा ज्ञानयोगास साधनभूत आहे, आणि ज्ञानयोग मोक्ष दायक आहे.... यथार्थपणे कर्म अकर्माचा विचार करताना ज्ञान्यानाही भ्रम होतो, कारण कर्माचे योग्य असणे हे कर्त्याचा श्रद्धाभाव, वृत्ती, परिस्थिती, काळवेळ यावर अवलंबून आहे.... काय योग्य आणि काय अयोग्य हे खरे सत्य कळण्यासाठी सद्गुरूला नम्रपणे शरण जाण्याशिवाय पर्याय नाहीच.... वृथा अहंकाराने मी असे करेन, तसे करेन अशा वल्गना करून काळ-वेळेचे गणित बिघडवू नयेच.... जे सत्य कळतेय ते योग्यतेकडे वळवण्याचा निश्चित निग्रहाने प्रयत्न म्हणजेच खरेतर कर्तव्य कर्म आणि साधकाचे कर्तुत्व होय....  ॐ श्री गुरुदेव दत्त....

No comments:

Post a Comment