Thursday 3 April 2014

प्रपंच - परमार्थ....

मानव म्हणजे देह आणि आत्मा ह्यांचा संयोग आहे…. आणि त्याचे व्यक्तरूप या संसाररूपी मायेत कार्यरत होते.... साधकाला देहासाठी प्रपंच तर आत्म्यासाठी परमार्थ करावा लागतो…. दोहोंची यथायोग्य सांगड आवश्यक आहे…. प्रपंच म्हणजे सर्वस्व असे न मानता आत्म्याकडे लक्ष ठेवण्यास परमार्थाची गरज आहे…. प्रपंच करतानाच योग्य त्या पद्धतीने परमार्थ केला तर प्रपंच आणि परमार्थ ह्यांचा संगम होवू शकतो…. मानसिक शांतीसाठी तर परमार्थ अतिशय निकडीचा आहे…. आपले विचार नको तेथे भरकटत असतात…. नको ते विचार आपल्या मनावर हुकुमत गाजवितात, हे कशाचे लक्षण आहे..?.. भौतिक साधनांनी मनाला शांती लाभत नाहीं…. परमार्थाने नको ते विषय दूर झाले की मन स्थिर होते…. मन निर्विषय होणे हेच मनाच्या शांतीचे कारण आहे…. आत्म प्राप्तीसाठी लागणारे साधन आपल्याच देहात आहे…. 

प्रपंच हे ना सर्वस्व |
करावा आपण नित्य परमार्थ ||
मनःशांतीचे कारण गुरु |
पाठीराखा "तो" एक समर्थ ||

आज अज्ञानाने दृश्य विश्वात माणूस रमतो.... तसा तो अतिंद्रिय अदृश्य विश्वातही रमतो.... त्याचे इंद्रिय गोचर दृश्य विश्वात रमणे म्हणजे प्रपंच.... आणि अतिंद्रिय अदृश्य विश्वात रमणे... म्हणजे परमार्थ... असे श्री के. वि. बेलसरे म्हणत.... कारण अतिंद्रिय अदृश्य जग हे ईशतत्व संकल्पनांचे बनलेले असते.... ह्या संकल्पनाचे जगत माणसाच्या विवेक शक्तीतून निर्माण होते.... म्हणूनच विवेक शक्ती व वैराग्य या दोन्ही गोष्टींवर समर्थ रामदास जोर देतात.... 

समर्थ म्हणतात... आधी प्रपंच करावा नेटका .... आधी प्रपंच नीट करायला सांगतात म्हणजे संसार म्हणजे काय ते खरे सत्य जाणा.... ती जाणीव झाली कि मग परमार्थाकड़े वळायला सांगतात... कारण ते म्हणतात... की प्रपंच सोडून परमार्थ केला तर तुम्ही कष्टी व्हाल... कारण तुमच लक्ष सगळ प्रपंचाकड़े राहणार आहे.... प्रपंचापासून दूर जाऊन ही परमार्थ साधणार नाही.... आणि परमार्थ सोडून प्रपंच केलास तरी तू दु:खी होशील.... यमयातना भोगशील... म्हणून भगवंताची भक्ती करावी... परमार्थाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा.... कारण संसारामध्ये राहून जो मुक्त दशा अनुभवतो.... तो खरा योगी असतो... कारण योग्य काय आणि अयोग्य काय याचा सारासार विचार त्याच्या मनात अखंड जागा असतो..... म्हणून समर्थ सांगतात.... 

झाडाच्या पानावरील अळी सुध्दा आधार बघून पाय उचलते.... क्षुद्र कीटक ही आधार बघून पाय उचलतो.... विचार पूर्वक कर्मे करतो.... मग बुध्दीमान असलेला माणूस अविवेकाने भलतेच का करतो.... म्हणून समर्थ अखंड चाळणा करायला सांगतात.... समर्थ दूरदृष्टी विकसित करायला सांगतात... त्यामुळे सर्व बाजूंनी सावधपणा राखता येतो... साधकाला थोरपण मिळते... आणि स्वत:चे व दुस-याचे समाधान टिकवता येते.... 

मग श्री गोंदवलेकर महाराज म्हणत तसे.... ज्याच्या प्रपंचात पाठीराखा सद्गुरू-भगवंत आहे... जो योग्य-अयोग्य काय हे यथार्थपणे जाणतो... तत्व-नीती पूर्णार्थाने जपतो, त्याचा प्रपंचच परमार्थ होतो.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त....

No comments:

Post a Comment