Wednesday 30 December 2015

नवीन वर्ष आणि आपले संकल्प... 

नवीन वर्ष म्हंटले कि संकल्पांचा पाउस, पण “संकल्प” या मानसिकतेपलीकडे जावून नवीन वर्ष सफल बनवण्यासाठी काही तरी वेगळे करण्याची वेळ आली आहे... प्रत्येकाला वाटते कि काही तरी ग्रेट मिळावं किंवा काही तरी ग्रेट घडावं.. पण तसे योग्य प्रयत्न मात्र होत नाहीत कारण आपण गडबडतो ते ध्येय ठरविण्यात आणि ते कसे साध्य करायचे याचा योग्य आराखडा नसलेमुळे... यासाठीच पाहिजे आपल्या ध्येयाचा अभ्यास आणि ध्येयापर्यंत पोचण्यासाठी जागरूकता आणि सातत्य...

तुमचा मोबाईल जेंव्हा स्लो चालतो किंवा काही गडबड असते तेंव्हा तुम्ही काय करता..?.. क्लीनअप किंवा रिसेट, अपग्रेड.. कारण त्याशिवाय मोबाईल चांगला चालू शकत नाही... अगदी त्याच पद्धतीने आपले आहे... मागील वर्षातील अपयशाचा आणि अपेक्षाभंगाचा भावनिक गोंधळ तसाच ठेऊन सर्वोत्तम कामगिरी होणे शक्य नाही... त्याकरिता आपल्याला हे दुःखं लोटूनच नव्या उमदेनी उत्कृष्ठ कामाने सफलतेचा शिखर सर करायचाय... काही अपयशी गोष्टींचा पूर्ण जागरूकतेने अभ्यास करा आणि पाठीवर अयोग्य विचारांचे ओझे घेवून पळणे सोपे कि न घेवून पळणे सोपे.. यावर नक्कीच विचार करा...

मन आणि विचार जितके अस्थिर राहतील... तितके आपले मन..विचार आणि कल्पनाशक्ती व्यापलेली राहते व तिचा उपयोग होत नाही... म्हणजेच आपण नवीन, वेगळे, अप्रतिम आणि अतुल्य काही करू शकत नाही... मनाला मशगुल ठेवणारा अयोग्य विचार नक्कीच आपल्या सफलतेचे प्रमाण कमी करतो... मग आपण एका धेयाकडून दुसऱ्या ध्येयाकडे वळतो... प्रत्येक कामात धरसोडवृत्ती, कोणतेच काम यामुळे पूर्ण होत नाही, कारण आपण कामाप्रती अभ्यासू, जागरूक आणि एकनिष्ठ प्रामाणिक नसतो... 

मित्रांनो.. परत एकदा वेगळ्या पद्धतीने सुचवतोय... कालच्या मानसिक आणि भावनिक गोंधळाला घेवून जर तुम्ही प्रत्येक नवीन दिवसाची किंवा वर्षाची सुरवात कराल... तर तुम्हाला तेच मिळेल जे तुम्हाला काल मिळाले होते... मग रोज दरवर्षी तेच ते हवे आहे का..?.. नाही ना..?.. मग अयोग्य सवयी आणि असंग सोडाच आणि आपल्याला सर्वोत्तम अभ्यास कामात व्यस्त ठेवा... मग भले ते तात्पुरते आपणास फायद्याचे न जाणवो पण दीर्घकाळासाठी योग्य असेल... भविष्य योग्य पाहिजे तर आजचे प्रयत्न देखील योग्यच पाहिजेत, तात्पुरत्या फायदेशीर गोष्टी आपणास दीर्घकालीन फायद्यापासून दूर नेतात, म्हणजेच आज क्षणिक सुखासीन ठरणाऱ्या गोष्टी खरेतर आपल्या दीर्घकालीन सुखातील अडथळेच.!.. यासाठी आपणाकडे योग्य-अयोग्य याची पारख आणि विवेक हवाच... याचबरोबर समाधान आणि सफलतेसाठी आपल्याला ध्येयाप्रती नियमितपणे प्रयत्न आणि परिश्रम हवेतच...

मोबाईलच्या स्क्रीनला ओरखडा पडू नये म्हणून स्क्रीनगार्ड लावणारे आपण... आपल्या विविध अयोग्य सवयीं, अहंकारी धारणांमुळे निर्माण होणाऱ्या Attitudeने आपण सदैव इतरांना ओरखडतो, पण खरेतर आपण स्वतःलाच दुखावत असतो, कुढत असतो किवा शरीराला त्रास देत असतो... ज्या ठिकाणी मनाचे, भावनांचे आणि शरीराचे असंतुलन होते तिथे तिढा आणि अपयश वाढतच जाते... म्हणून आपल्याला आपल्या अवतीभवती असलेल्या अयोग्य नकारात्मक उर्जेचा बाय-बाय करावाच लागणार आहे... मोबाईल स्क्रीनची काळजी, तशी स्वतःची देखील घ्या म्हणजे सुष्पष्टता वाढेल आणि सोबत मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंपन्नता देखील... मन विचार आणि शरीर शक्य तितके स्क्रॅचप्रुफ ठेवा... जीवनाच्या सोबतच दर दिवसाचा आनंद आणि गोडवा वाढत जाईल... 







आयुष्यातील सवयी आणि संकल्प...  

नवीन दिवस असो किंवा नवीन वर्ष, निसर्ग सर्वांना एकसारखीच सुरवात देतो, पण तरीही प्रत्येकाच्या दिवसाचा आणि वर्षाचा एण्ड वेग-वेगळा का..?.. काही यशस्वी होतात तर काही नाही असे का..?.. मित्रांनो चांगली सुरवात करणे म्हणजेच अर्धे काम फत्ते झाल्यासारखेच असते… ज्या पद्धतीने आपली सुरवात होत असते त्यावरच त्या दिवसाचा, वर्षाचा किंवा कामाचा एण्ड अवलंबुन असतो…

नवीन वर्ष आले की संकल्पांचा पाउस, पण आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आणि योग्य दिशेने आगेकूच करण्यासाठी गरज आहे ती प्रभावी चॉइसेसची, ज्या फक्त चॉइसेसच नसून जगभरातील सफल लोकांच्या तीन सर्वोत्तम सवयी देखील आहेत… ज्या आपल्यालाही त्यांच्याप्रमाणे सफलता, समाधान, सन्तलुन, साहस आणि आत्मविश्वास देतील… सफल लोकांप्रमाणे सफलतेसाठी आपल्यालाही आपल्या दृष्टिकोनात आणि चॉइसेसमधे बदल करणे अनिवार्य आहे… कारण बदल, विकास आणि यश हे केवळ आपल्या निवडींवरच अवलंबुन असते… 

अ) योग्य पारख करणे (Appreciation ) : यशापयश हे केवळ आपण केलेल्या चॉइसेस वरुन ठरते म्हणूनच आपल्याला पारखी बनणे गरजेचे आहे... खरा पारखी व्यक्ती तोच असतो जो स्वत:ला पूर्णपणे ओळखतो आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे व्यक्ती, वस्तू, निर्णय, गुंतवणूक व इतर बाबींमधे योग्य निवडी आपण तेंव्हाच करू शकतो जेंव्हा स्वत:ला स्वत:च्या विचारांची, ज्ञानाचि, वैशिष्ट्यांची व अनुभवांची पूर्ण पारख असते... पारखी बना व काम, दिवस आणि वर्ष यशस्वी बनवा... 

ब) स्वीकृती करणे / मान्य करणे (Acceptance) : आपण विकासाकडे तेंव्हाच वळतो जेंव्हा एखादे ध्येय मान्य करतो... यानंतर आपल्या उणीवा, चूका व नकारात्मक गुणांची स्वीकृती केल्यावरच वयक्तिक तसेच व्यावहारिक बदल, सुधार आणि विकास शक्य आहे... 

  1. स्वीकार करा योग्य बदलांचा, विचारांचा व आचरणांचा...
  2. खरं जीवन असो किंवा फेसबुक स्वीकार करा मर्यादा, शिस्त, नियम, आदर व जवाबदार्या पाळण्याचा...
  3. स्वीकार करा सतत शिकण्याचा, विचारी, वास्तविक आणि संतुलित बनण्याचा... स्वीकार करा प्रोत्साहन व पाठिंबा देण्याचा आणि योग्य गुंतवणुकीचा... 
  4. स्वीकार करा शब्द पाळण्याचा, वचनबद्ध राहण्याचा, दुसऱ्याचे मन, मान, सन्मान आणि आदरभाव जपण्याचा तरच आपणास योग्य ते सर्व मिळेल... 
  5. घर, समाज, देश असो किंवा पर्यावरण प्रत्येकाच्या छोट्यातल्या-छोट्या योगदानानेच मोठ्यातले-मोठे बदल घडत असतात म्हणून स्वीकार करा जागरूक, सतर्क व कर्तव्यदक्ष राहण्याचा, निस्वार्थ सेवा करण्याचा, निसर्ग जपण्याचा आणि स्वभावात सौम्यता ठेवण्याचा...
क) प्रतिकार करणे (Resistance) : मित्रांनो, प्रतिकार करणे म्हणजे कोणाच्या विरूद्धात जाणे नसून नकारात्मक बाबींनपासून स्वत:ला थांबवणे व त्यापासून दूर राहणे... काही इइच्छा वा व्यसने तुम्हाला गुलाम करतील... भ्रष्ट्र आचार तुम्हाला कमजोर करील तर आळस तुम्हाला पराक्रमशून्य बनवेल मग असे असतांना आपले काम, दिवस किंवा वर्ष यशस्वी होईल कसे..?.. यासाठीच समृद्ध, सन्मानयुक्त आणि समाधानकारक प्रतिकार गरजेचा आहे... प्रतिकार करणे म्हणजे स्वता:ला खालील बाबींपासून दूर ठेवणे...

१) प्रतिकार करा नकारात्मक विचारांचा, वाइट सांगतीचा, वेळेच्या अपव्ययाचा व अयोग्य लोकांचा... 

२) प्रतिकार करा अज्ञानाचा, अवास्तविकतेचा, असंतुलित आहाराचा व वागण्याचा... काम नसतांही अयोग्यात बिझी राहण्याचा, राग व अहंकाराचा...

३) प्रतिकार करा सुविधांचा दूरउपयोग करण्याचा, टाळाटाळ करण्याचा, कारणे देण्याचा व इतरांना दुखावणार्या कृत्यांचा प्रतिकार करा...

४) प्रतिकार करा शॉर्टकट मारण्याचा, इतरांचे श्रेय लाटण्याचा, इतरांवर अन्याय करण्याचा... व्यसन, व्यंग व वायफळ गोष्टी करण्याचा...

मित्रांनो, आयुष्यात सर्व काही आपल्या चॉइसेसवर निर्भर आहे आणि म्हणूनच वरील तीन चॉइसेस निरंतर लक्षात ठेवा... कारण “अमल करो तो बनती है जिंदगी जन्नत भी, जहन्नुम भी”... मग करा तर एक दमदार सुरवात नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने, दर दिवशी आणि दरवर्षी... शेवटी परत एकदा सांगतो मित्रांनो, शेवट चांगला असो किंवा वाईट, सुखद असो किंवा दु:खद फरक असतो तो फक्त योग्य चॉइसेसचा...

Sunday 16 August 2015

बलशाली भारत होवोविश्वात शोभुनी राहो....

जयाचेनि पांखे न वैकल्यवारा | युगाब्दे जुनेरा, परी नित्य कोरा |
असा कालपक्षी अनंतात बाहे | स्वातंत्र्य जेथे, तिथे स्वर्ग आहे ||

निर्भ्रान्त आभाळ, आजाद वारे | सुजलाम भूमी, यज्ञीं निखारे |
जीवन जलाधार, सृजनास बीज | हिरव्या सुवर्णात पडे चंद्रवीज |
इतिहास गीते इथे गात आहे | स्वातंत्र्य जेथे, तिथे स्वर्ग आहे ||

नको रे मना स्वप्न क्षीरसागराची | नको वा अरण्येहि कल्पतरूंची |
नको रे घडे वा झरे अमृताचे | नको क्षुद्र शृंगार वा अप्सरांचे  |
आजाद नि:श्‍वास हा ध्यास आहे | स्वातंत्र्य जेथे तिथे स्वर्ग आहे ||

रणावीण स्वातंत्र्य कोणां मिळाले| सुंभापरि पीळ कुठले जळाले|
वस्त्या उडाल्या, उडे धूळ-धूर | कैसा घुमावा येथ स्वातंत्र्यसूर|
तरी क्रांतिचा येथ जयघोष आहे | स्वातंत्र्य जेथे, तिथे स्वर्ग आहे ||

किती येक चंद्रावळी त्या निमाल्या | किती सूर्यमाळाहि अस्तास गेल्या  |
किती येक पर्जन्य उदधि मिळाले  | कितीयेक वारे गगनि निमाले |
जगाची रहाटी तरी चालताहे | स्वातंत्र्य जेथे तिथे स्वर्ग आहे ||

कधीं बुद्धीतें अन्‌ भ्रमाने गिळावे | कधिं वा स्मृतीने उगा आंधळावे |
पडावे पुन्हा, अन्‌ पुन्हा सावरावें | पुन्हा सावरावे अन्‌ धडपडावे |
पडीधडपडीचा प्रवाहोचि वाहे | स्वातंत्र्य जेथे तिथे स्वर्ग आहे ||

कुण्या कागदामाजि गुंडाळलेला  | जगाचा नकाशाच विस्तारलेला |
इथे ओढिल्या शाईच्या काही रेघा | भूमीस पडती तिथे खोल भेगा |
हुश्‍शार! सरहद्द ही जन्मताहे | स्वातंत्र्य तेथे, जिथे स्वर्ग आहे ||

जयाचेनि पांखे न वैकल्यवारा | युगाब्दे जुनेरा, परी नित्य कोरा |
असा कालपक्षी अनंतात बाहे | स्वातंत्र्य जेथे, तिथे स्वर्ग आहे ||

प्रिय भारतीय मित्रानो, काल आपला स्वातंत्र दिन साजरा झाला... पण भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व नक्की काय व कसे आहे, हा विचार आला की मनात अस्वस्थता निर्माण होते... आजचा स्वातंत्र्यदिन साजरा करताना दहशतवाद, स्वैराचार, भ्रष्टाचार, बॉम्बस्फोट या साऱ्या विचारांचा मनात कल्लोळ उठतो...

स्वातंत्र्याला इतकी वर्षे झाल्यानंतरही ही अवस्था असावी ही जाणीव खिन्न आणि उद्विग्नकरणारी आहे.... खरेतर आथिर्क व लष्करीदृष्ट्या सार्मथ्यवान आणि ज्ञान विचारांनी समृद्ध असलेला आपला भारत देश… मग आपल्या समाजात जागरूकता का नाही... आपला समाज संकुचित मन बंद मगरमिठीतून कधी मुक्त होणार.?. जागृती कधी आणि कशी होणार.?.  आपण खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र होणार कधी…..?

मुळात स्वातंत्र्य ही संकल्पनाच त्यावेळीहि आणि आजही एवढी मोठी आहे की त्याचा खरा-खुरा अर्थ लोकांपर्यंत पोचवण्याचे फार मोठे आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे... स्वातंत्र्य तर मिळाले... पण पुढे काय.?.  खूप मोठ्या  दूरदृष्टीची त्यावेळीहि आणि आजही गरज होतो आणि आहेच...

जगा समोर एक आदर्श असणारा आमचा हा स्वातंत्र्य लढा यशस्वी झाला... आमची लोकशाही आपल्या पायावर भक्कमपणे उभी राहिली, हा क्षण जगाला एक प्रकारे दाखवून देत होता कि भारताने एका फार मोठ्या सामाजिक क्रांतीकडे आपले पाहिले पाऊल टाकले आहे, केवळ भारतातच नव्हे तर सबंध जगामध्ये एक विश्वास निर्माण झाला.... हा विश्वास होता सामाजिक एकतेचा..!.. हा विश्वास होता समानतेचा..!.. प्रत्येक भारतीयाच्या स्वातंत्र्याचा..!.. हा विश्वास होता त्याला सन्मानाने जगण्याचा, मग त्याचा धर्म, जात, भाषा, लिंग कोणतेही असो सर्व जन एकाच पातळीवर, कोणी हि मोठा नाही किंवा लहान नाही... सर्व भारतीय समान..!..

आज ६९ वर्षे पूर्ण झाली, एकदा मागे वळून बघावेसे नाही का वाटत..?. ज्या भारत देशाचे स्वप्न आम्ही पाहिले होते तो देश हाच आहे का.?. उत्तर नाही असेल तर, का नाहीये तो तसा.?. कोण शोधणार याचे उत्तर.?. काही तरी चुकल्यासारख वाटतंय का तुम्हाला.?. हे असच चालत राहणार आहे का.?. ६९ वर्षे झाली, उद्या ७० ही होतील, आपण स्वतंत्र दिनाचे शतकहि साजरे करू; पण तुम्हाला वाटते का त्यावेळी काही बदललेले असेल.?. जर हे असेच चालणार असेल, तर मला तरी नाही वाटत काही बदलले असेल... कुठे तरी चुकतंय.?. आपला काल-आज-आणि उद्या ह्या तिन्हीचा विचार करण्याची वेळ आली आहे... आणि हा विचार कुठल्या तरी पिढीला एकदा करावाच लागतो... मग तो आपणच का करू नये.?.

आजच्या तरुणांच्या मनात आजही तेच देशप्रेम, राष्ट्राभिमान पाहायला मिळतो का, त्यांच्या काय अपेक्षा आहेत किंवा त्यांच्या दृष्टीने याचे महत्त्व काय आहे.. तर बहुतेक जणांना दृष्टीने आजच्या मितीला १५ ऑगस्टचा दिवस म्हणजे फक्त हक्काच्या सुट्टीचा दिवस म्हणून पाहिला जातो... वर्षा सहलीचे कार्यक्रम ठरतात... भारतमातेच्या स्वतंत्र्यादिनाची अशी दयनीय स्थिती झाली आहे... ‘कोणत्याही देशातील तरूणांच्या ओठावर कोणती गाणी आहेत ते मला सांगा म्हणजे मी त्या देशाचे भवितव्य सांगतो,’ असे स्वामी विवेकानंद सांगायचे.... म्हणजे समाज काय वाचतो, त्या समाजातील विचारवंत काय बोलतात, काय लिहितात हे पाहणे सामाजिक आरोग्याच्या दृष्टिने महत्त्वाचे असते...

खरे पाहता हि आजची तरुण पिढी खूप भाग्यवान आहे... कारण त्यांचे आई- वडील त्यांना काहीही कमी पडू नये म्हणून सतत प्रयत्न करतात... घर, पैसा, गाडी.. सगळ सगळ.. सगळी सुख... पण त्यामुळे नकार, अपयश.. यांची त्यांना सवयच नाही... कधी जीवनात संकटे, अपयश यांना सामोरे जायची वेळ आली... तर ते हे पेलवू शकतील का.?. हे सगळ पेलावायला त्यांचे मन आणि शरीर दोन्हीही तवढे कणखर पाहिजे... नेहमीच जीवनात आपल्याला हव्या त्याच गोष्टी, घटना घडत नाहीत... काही वेळेला संघर्षमय जीवनच माणसाचे मन कणखर बनवते..

पण आजच्या पिढीला विवेकानंद, सावरकर, टिळक, गांधी वाचायला वा अनुभवयाला वेळा नाही... नुसते तोकड्या माहितीवर कोणी सावरकर वा गांधी यावर टीका करतात... या सर्वात आपले योगदान देशासाठी आणि समाजाकरिता किती हा प्रश्न नेहमीच विसरला जातो... आपण सर्वजण आज स्वतंत्र भारताचा आनंद उपभोगत आहोत.... पण हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी आपले तन -मन -धन वेचले... यात नावे तरी किती घ्यावी... प्रत्येकाचे जीवन हे असामान्य जीवन... अफाट बुद्धिमत्ता, देशावरील जाज्ज्वल्ल्य प्रेम, देश बांधवाना सुखी करण्याची प्रबळ इच्छा, यासाठी प्रसंगी सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी.. अशा व्यक्तिमत्त्वाचे लेणे लाभलेल्या अनेकांच्या त्यागातूनच देश स्वतंत्र झाला...

जे स्वातंत्र्य मिळवायला इतके वर्ष घणाचे घाव सोसावे लागले, ते स्वातंत्र्य आपण जोपासायला हवे आहे... आणि ते सर्वस्वी आजच्या तरुण पिढीच्या हातात आहे... त्याकरता हातात बंदुकी आणि तलवारी घेऊन उभे राहणे गरजेचे नाही..!. त्यासाठी जीवनाला ध्येय हवे... कला, उद्योग, नोकरी.. पत्येक ठिकाणी उंची गाठण्याचा यत्न हवा...स्वबळावर, स्वतःचे जीवन समृद्धीच्या शिखरावर नेऊन, आपल्याबरोबर समाजाचे हित कसे साधता येईल, यासाठीचे कळकळीचे प्रयत्न हवे आहेत...

आज आपल्याला ज्ञात असते, इतिहासाने, परंपरेने सांगितलेले... आपणास नुसती माहिती कळते यांनी स्वातंत्रासाठी बलिदान केले... बस्स, यापुढे आपणास जास्त काही ज्ञान नसते.. वा तशी गरज वाटत नाही... पण खरा ज्ञानाचा वारसा या संतरुपी व्यक्तीच्या चरित्रातच दडलेला आहे... असे जागृत पुरूष हे तत्व स्थितीत असतात... त्यांच्यातील काम, क्रोध, मोह, माया, मत्सर यांचा निरास झालेला असतो आणि त्यांचे जीवनच जगाच्या कल्याणासाठी असते... आजच्या पिढीला विवेकानंद जाणून घेण्यात इंटरेस्ट नाही हे मोठे दुर्दैव... यामुळेच आत्मजागृती आज फार कमी प्रमाणात दिसून येते... महान संतरूपी व्यक्तींनी रंगवलेल्या नव्या स्वतंत्र भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी तरुणपिढीची आहे आणि ते ध्येय तरुण पिढीने बाळगले पाहिजे आणि माझ्या मते आपल्या सर्वांत ते बळ आहे..!.

आज आपण या व्यक्तींचे चरित्र का अभ्यासावे.?. आज बहुतांशी संस्कार हे दृक-श्राव्य माध्यमातूनच होताना दिसतात... पालक-शिक्षक यांना देखील अध्येयाने ग्रासल्याची व्यथा दिसते... यामुळे युवा पिढीला प्रबोधन काही होत नाही... जे प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतात, त्यांचेकडे हेकेखोर तर्कट बुद्धीने पाहिले जाते... हे भोगकारक  मानसिक गुलामगिरीचेच प्रतिक आहे... ज्यावेळी आपण या संतरुपी व्यक्तींचे चरित्र अभ्यासू, त्यावेळी आपणासहि जाणवत जाते... आपले ध्येय काय आहे... आपल्यावर स्वावलंबनाचे संस्कार होतात... देशकार्य म्हणजेच देवकार्य या उक्तीचा खरा अर्थ कळू लागतो... कसे आहे, ज्यावेळी आपण देशासाठी, समाजासाठी काही कार्य करू लागतो... त्यावेळी आपला स्वार्थीपणा हळू हळू लयाला जातो... आपल्या दुसर्यासाठी काही करण्याचे प्रयोजनाने आपण नकळत पूर्ण समाधानाचे काही क्षण अनुभवत असतो... निष्काम भावाने आपणाला आपली ओळख होत जाते... आत्मजाणीव वाढते... आपला प्रवास उन्मुक्त आत्मउन्नतीकडे नकळत होत जातो...
    
आज तरुण पिढीकडे गुणवत्ता आहे, पण इच्छाशक्ती नाही..!. महाभयंकर मनभोगी व्यसनाच्या आहारी गेलेली हि तरुण मुले पहिली कि मनाला अत्यंत कष्ट होतात... मुलांच्या हातात सर्व ऐश्वर्य कष्टाविना मिळाल, कि त्यांना त्याची किंमत नसते, तसं आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच होऊ नये असे प्रामाणिकपणे वाटते... आम्हाला काही देशाचे महत्व नाही, आम्ही आमच्या कर्तुत्वाच्या जोरावर इतर समृद्ध देशात राहू शकतो... काय करायचे आहे अशा अविकसित देशात राहून... आम्ही काही या देशाला बदलू शकत नाही... अशा मानसिकतेत आज आपण आहोत... आज कोणालाच त्याग नको आहे, भोगवादी प्रवृत्ती वाढत आहे... त्याग म्हणजे बुरसटलेले विचार हेच आजचे विचारधन...

इथे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो, आज आपण जी प्रगती केली आहे, ती आधुनिक काळातील काही त्यागी व्यक्तींमुळेच... यांचेमुळेच आपल्या शैक्षणिक संस्था उच्च दर्जाचे ज्ञान देऊ शकतात... याच ज्ञानाच्या जोरावर काहीजण आत्मकेंद्रित होऊन बाहेर जातात... आज इस्रो वा इतर संशोधन क्षेत्रात काम करणारे संशोधक बाहेर देशीचे नागरिक सहज होऊ शकले असते... जयंत नारळीकर, अब्दुल कलाम, नारायण मूर्ती, असे कितीएक यांनी हा त्याग केला नसता तर..?..
म्हणूनच वाटते, अजूनही आशेचा किरण आहे... आजूबाजूला अनेक बुद्धिमान तरुण स्व-कर्तृत्वावर शिखराला गवसणी घालून बसलेले पहिले कि मनाला उभारी येते... आपले आई, वडील, भावंडे... आणि त्याच बरोबर समाजासाठी काही करण्याचा त्यांचा प्रयत्न मनाला सुखावून जातो... या सर्वांच्या रूपाने ईश्वराचे अंश आजही कार्य करत आहेत अशी सतत मनाला जाणीव होते... आणि या मुठभर ध्येयासक्त तरुणांना सांगावेसे वाटते... अब तुम्हारे हवाले वतन साथियो....

इथे आपल्या विषयाच्या बाहेर येणारी एक बोधकथा सांगतो... हि बोधकथा सावधानतेसाठी आहे...
एक दिवस एक कावळा आणि त्याचा मुलगा झाडावर बसले होते... कावळ्याचा मुलगा वडिलांना म्हणाला "मी आजपर्यंत सगळ्या प्रकारचे मांस खाल्ले... पण, दोन पायांच्या माणसाचे मांस कधीच खाल्ले नाही... बाबा, कसा स्वाद असतो हो या दोन पायांच्या जीवाच्या मांसाचा.?.

वडील कावळा म्हणाला.. "आजपर्यंत मी जीवनात ३ वेळा माणसाचे मांस खाल्ले आहे... खूपच चविष्ट असते ते.!"
मुलगा कावळा लगेच हट्ट करू लागला कि त्याला पण माणसाचे मांस खायचे आहे... वडील कावळा म्हणाला, "ठीक आहे, पण थोडा वेळ वाट पहावी लागेल आणि मी जसे सांगेन तसे तुला करावे लागेल... माझ्या वाडवडिलांनी मला हि चतुराई शिकवून ठेवली आहे, ज्यामुळे आपल्याला खाणे मिळू शकेल... मुलगा कावळा "होय" म्हणाला...

त्यानंतर वडील कावळ्याने मुलाला एका जागी बसवले व तो उडून निघून गेला आणि परत येताना मांसाचे २ तुकडे तोंडात घेवून आला... एक तुकडा स्वतःच्या तोंडात धरला व दुसरा तुकडा मुलाच्या तोंडात दिला, तुकडा तोंडात घेता क्षणी मुलगा म्हणाला, "शी बाबा, तुम्ही कसल्या घाणेरड्या चवीचे मांस आणले आहे... असले खाणे मला नको..."

वडील कावळा म्हणाला, "थांब, तो तुकडा खाण्यासाठी नसून फेकण्यासाठी आहे... हा एक तुकडा टाकून आपण आता मांसाचे ढीग तयार करणार आहोत... उद्या पर्यंत वाट बघ... तुला मांसच मांस खायला मिळेल आणि ते सुद्धा माणसाचे..".

मुलाला हे काही कळले नाही कि एका मांसाच्या तुकड्यावर मांसाचे ढीग कसे काय निर्माण होणार.?..

पण त्याचा त्याच्या वडिलावर विश्वास होता... थोड्या वेळाने कावळा वडील एक तुकडा घेवून आकाशात उडाला आणि त्याने तो तुकडा एका मंदिरात टाकला आणि परत येवून दुसरा तुकडा उचलला व तो दुसरा तुकडा एका मशिदीच्या आत टाकला... मग तो झाडावर येवून बसला...

वडिल कावळा मुलाला म्हणाला, "आता बघ उद्या सकाळपर्यंत मांस खायला मिळते कि नाही ते..?.."

थोड्याच वेळात सगळीकडे गलका झाला, ना कुणाला कुणाचे ऐकू येत होते, ना कोणी कोणाचे ऐकून घेत होते... फक्त धर्म भावना विखारी झाली होती... धर्माच्या नावाखाली रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या... आई, मुलगा, बहिण, भाऊ, वडील, काका, शेजारी, मित्र असे कोणतेच नाते लक्षात न घेत फक्त धर्म बघून एकमेकांवर वार चालू होते... आमच्या धर्माचा अपमान झाला त्याचा बदला घेतलाच पाहिजे.. असे दोघेही म्हणत होते आणि यात निरपराध मारले जात होते...

खूप वेळ यातच निघून गेला आताशा गाव शांत होवू लागले होते... कारण रस्त्यावर फक्त आणि फक्त रक्तच  सांडलेले दिसत होते... विशेष म्हणजे ते रक्त लाल रंगाचे होते... त्यात कुठल्याच धर्माची वा जातीची छटा नव्हती... ते फक्त एकच धर्म पाळत होते ते म्हणजे प्रवाही पणाचा...

गांव निर्मनुष्य भकास झाले होते... सर्वत्र भयाण शांतता पसरली होती... या धुमश्चक्रीतून फक्त २ जीव सुटले होते ते म्हणजे झाडावरचे कावळे... आता कावळ्याचे पोर माणसाची शिकार करायला शिकले होते...  कावळ्याच्या पोराने बापाला प्रश्न विचारला, "बाबा, हे असेच नेहमी होते का.?. आपण भांडणे लावतो आणि माणसाच्या लक्षात कसे येत नाही..?."

कावळा म्हणाला, "अरे या मुर्ख माणसाना कधीच आपला धर्म कळला नाही... माणुसकी हा धर्म सोडून ते नको त्या गोष्टी करत बसले आणि आपल्यासारखे कावळे त्यांचा फायदा घेवून जातात, हे त्यांच्या लक्षातही येत नाही... माणूस म्हणून जगण्यापेक्षा यांनी जात आणि धर्म यांचेच जास्त प्रस्थ माजविले आहे... आणि त्याचा गैरफायदा इतर तिसरे कोणी तरी घेवून जातात..." इतके बोलून दोघे बाप-लेक मांस खाण्यासाठी उडून गेले...

होईल का या प्रबोधनातून सुरुवात नव्या परिवर्तनाची....

परिवर्तनाची प्रक्रिया हि एक सुंदर तपश्चर्या आहे असे मला वाटते... आपणही तपश्चर्या निष्ठेने, विवेकाने, संयमाने, परस्पर विश्वासाने, परस्पर सहाय्याने करू या... परिवर्तनवादी कार्यकर्ता होण्यासाठी व्यक्तीने आधी चांगला माणूस कसे बनायचे ते शिकले पाहिजे आणि तसे बनले पाहिजे, असे मी मानतो... जे हि प्रक्रिया पूर्ण करून कार्यकर्ते बनले आहेत, त्यांच्या पुढे मी नतमस्तक आहे... कारण कृतीशिवाय उपदेश करणे हे मूर्खांचे लक्षण होय... जर एखादा कृतीशून्य वागत असेल तर... रात्रंदिवस केलेले उपदेश उपयोगी पडत नाही...

तसेच शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती नाही, असे इतिहास सांगतो... अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मत्सुद्दी व लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत... म्हणूनच सक्तीच्या व मोफत योग्य शिक्षणाची भारताला अत्यंत गरज आहे...

आतापर्यन्तचा आपला प्रवास पाहिल्यावर तरी कदाचित येणाऱ्या पिढीला काही तरी चुकत असल्याची जाणीव होईल आणि त्यांचे विचार बदलतील असे वाटते... अब्दुल कलाम सरांच्या संदेशाने आपण या संपादित लेखाचा शेवट करू... “यश खूप दूर आहे असे जेंव्हा आपल्याला वाटते... तेव्हा ते खूप जवळही असू शकते... जेंव्हा तू प्रतिकुल परिस्थतीशी झगडत असशील, तेव्हा खरेच प्रयत्न करणे मात्र सोडू नकोस... प्रयत्नांनीच तुला थकवा येईल, तेव्हा थोडा विसावा घे, पण माघार घेऊ नकोस अजिबातच माघार घेऊ नकोस... येणाऱ्या सर्व आव्हानांसाठी सज्ज रहा त्यांना खंबीर मनाने सामोरे जा... ऐरण झालास तर घाव सोस... हातोडा झालास तर घाव घाल..!..


ॐ श्री गुरुदेव दत्त...