Tuesday, 23 October 2012

आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख.... दुर्गेचे आठवे रूप 'महागौरी'...

श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचि:।
महगौरी शुभं दान्महादेवप्रमोददा।।



दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय..... दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते.... महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुऊन जातात.... भविष्यात पाप-संताप, दु:ख त्याच्याजवळ कधीही येत नाही.... तो सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो.... या देवीचा रंग पूर्णत: गोरा आहे.... या गोर्‍यापराची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलापासून दिली आहे.... या देवीचे वय आठ वर्ष मानले जाते, 'अष्टवर्षा भवेद् गौरी।' तीचे वस्त्र आणि आभूषणदेखील श्वेत रंगाची आहेत.... 

महागौरीला चार भुजा आहेत.... वृषभ तिचे वाहन आहे.... तिच्या वरील उजव्या हातात अभयमुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे.... वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वर-मुद्रा आहे... महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे.... 

आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. गोस्वामी तुळशीदास यांच्या अनुसार तिने भगवान शंकराला पती करण्यासाठी कठोर संकल्प केला होता- जन्म कोटि लगि रगर हमारी। बर ॐ संभु न त रह ॐ कुँआरी।।

या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते.... तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने आंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली.... तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाते.... देवी महागौरीचे स्मरण, पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे.... आपण नेहमी तिचे ध्यान केले पाहिजे.... तिच्या कृपेमुळे अलौकीक सिद्धी प्राप्त होते.... महागौरी भक्ताचे संकट अवश्य दूर करते.... तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते.... तिला शरण जाण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे.... देवी महागौरीचा महिमा पुराणात वर्णिला आहे....

आदिशक्ती नमस्तुभ्यं....


आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख.... दुर्गेचे नववे रूप 'सिद्धीदात्री'....

सिद्धगन्धर्वयक्षारसुरैरमरैरपि।
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धीदा सिद्धीदायिनी।।



दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय.... ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे.... दुर्गा पूजेच्या नवव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते.... या दिवशी शास्त्रोक्त विधी पूर्ण निष्ठेने करणार्‍या साधकांना सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते.... ब्रह्मांडावर पूर्ण विजय मिळविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येते....

अणिमा, महिमा, गरीमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत.... देवी सिद्धीदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे.... भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या.... यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले होते.... या कारणामुळे त्यांना लोक 'अर्धनारीनटेश्वर' या नावाने ओळखतात....

देवी सिद्धीदात्री चार भुजाधारी आहे.... तिचे वाहन सिंह आहे.... ती कमळाच्या फूलावरही विराजमान होऊ शकते.... तिच्या उजव्या बाजूकडील खालच्या हातात कमळाचे फूल आहे....

देवी सिद्धीदात्रीची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने निरंतर प्रयत्न केले पाहिजेत.... तिच्या कृपेने अनेक दु:ख दूर करून तो सुखाचा उपभोग घेऊ शकतो.... त्यामधून त्याला मोक्षाचा मार्गही मिळतो.... नवदुर्गामध्ये देवी सिद्धीदात्री शेवटची देवी आहे.... या देवीची उपासना पूर्ण केल्यानंतर साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात....

आदिशक्ती नमस्तुभ्यं.....

Sunday, 21 October 2012

आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख..... दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री'.....

एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थित।
लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरी‍रिणी।।
वामपादोल्लसल्लोहलताकंटकभूषणा।
वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भययंकारी।।



दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे..... नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते.... या दिवशी साधकाचे मन 'सहार' चक्रात स्थिर झालेले असते.... यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धिंचे दरवाजे उघडू लागतात.... या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षित झालेले असते.... तिच्या साक्षात्कारापासून मिळणार्‍या पुण्याचा तो भागीदार होतो.... त्याच्या संपूर्ण पापांचा नाश होतो.... त्याला अक्षय पुण्य लोकांची प्राप्ती होते....

या देवीचा रंग काळा आहे.... डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत.... गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे.... तिला तीन डोळे आहेत.... हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत.... ते चमकदार आहेत....

कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात.... गाढव हे कालरात्री देवीचे वाहन आहे.... वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान करते.... उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे.... तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खड्ग (कट्यार) आहे....

कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयाकारी आहे.... परंतु ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव 'शुभंकारी' सुद्धा आहे.... यामुळे भक्ताने भयभीत होण्याचे काहीही कारण नाही.... देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे.... राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात.... ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी आहे.... या देवीचे भक्त पूर्णत: भयमुक्त असतात.... कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे पूर्ण पालन केले पाहिजे....

मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे.... ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणार्‍या शुभ कामांची गणना केली जाऊ शकत नाही.... आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा केली पाहिजे....

आदिशक्ती नमस्तुभ्यं.....
आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख..... दुर्गेचे सहावे रूप 'कात्यायनी' .....

चन्द्रहासोज्जवलकरा शार्दूलावरवाहना ।

कात्यायनी शुभं दद्यादेवी दानवद्यातिनी ।।




दुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते...... दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते..... या दिवशी साधकाचे मन 'आज्ञा' या चक्रात स्थिर होते..... योगसाधनेत या आज्ञा चक्राचे विशेष स्थान आहे.... या चक्रात स्थिर झालेला साधक कात्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून देतो.... परिपूर्ण आत्मदान करणार्‍या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते....

दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे एक कथा आहे.... कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते.... त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला.... या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला.... त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली.... भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती.... भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला....

काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला... तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले.... महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली.... म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले.... अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता... सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता.... अशी ही कथा पुराणात आहे....

कात्यायनी अमाप फलदायक आहे..... कालिंदीच्या यमुना किनारी भगवान कृष्‍णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी ब्रज गोपींनी या देवीची पूजा केली होती.... ही देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे... कात्यायनीचे रूप अत्यंत तेजःपुंज आहे.... तिला चार भुजा आहेत.... देवीचा उजव्या बाजूकडील वरचा हातात अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे.... डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे.... तिचे वाहन सिंह आहे....

कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार फळाची सहजतेने प्राप्ती होते... तो इहलोकात राहूनही त्याला अलौकीक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो.... जो व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो.... तो रोग, भय, दु:ख आणि संतापापासून मुक्त होतो.... सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे....

आदिशक्ती नमस्तुभ्यं.....

आद्यशक्तीची विविध रूपे दर्शविणारा नवरात्र उत्सव.... 

आपली भारतीय संस्कृती फार पुरातन आहे..... आपले पूर्वज निसर्गप्रेमी, निसर्ग पूजक व मूर्तीपूजक होते.... मानवी जीवनात आराध्य दैवतांची आराधना उपासना याला फार महत्व आहे.... जगामध्ये अशी कोणतीही नैतिकमूल्ये केवळ चांगली आहेत म्हणून टिकत नाहीत.... तर त्यांचे अस्तित्व टिकवून धरण्यासाठी त्यांच्या पाठीमागे समर्थ लोकांच्या तपश्चर्येचे पाठबळ असणे आवश्यक असते.... 

मानवी जीवनात स्थैर्य प्राप्त होण्यासाठी व आत्मिक बल वाढवून आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी उपासनेची अत्यंत गरज आहे.... त्यादृष्टीने भारतीय सणात नवरात्र, घटस्थापना, दसरा हा एक महत्वाचा सण गणला जातो.... नवरात्र - दसरा हा एक शक्तीपूजा तसेच शक्तीची अनेक रुपे आणि महिमा दर्शविणारा सण आहे..... 

अश्विन महिन्यात येणार्‍या या नवरात्र उत्सवाबाबत एक पौराणिक कथा प्रसिध्द आहे.... महिषासूर नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी आद्य देवांच्या पुष्यप्रकोपातून एक दैवी शक्ती निर्माण झाली.... या दैवी शक्तीने म्हणजेच जगदंबेने नऊ दिवस अविरत युध्द करून महिषासुराला मारले.... असुरी वृत्तीला दाबून, दैवी शक्तीची पुन्हा स्थापना करून देवांना अभय दिले.... ही दैवी शक्ती तीच आपली जगदंबा.... आपण या दिवसात आईजवळ शक्ती मागायची.... व आपल्यातील असुरी प्रवृत्तींवर विजय मिळवायचा.... 

नवरात्रीचे महत्व म्हणजे देवी शक्तीमाता त्रास देणार्‍या असुरांशी विविध रुपे धारण करून.... असुरी शक्तींशी अहोरात्र युध्द करून विजय प्राप्त करते.... म्हणजेच सर्वांच्या मुळाशी शक्तीच प्रेरक आहे..... म्हणूनच मूळ ओंकार तो ध्वनी.... तूज नाम ही भवानी... असे म्हंटले जाते.... देवीची विविध नांवे, रुपे, स्थाने व पीठे आहेत.... एकतत्वात विविधतत्व आहे.... जसे सोने हे एकच असेल तरी त्याच्यापासून विविध नक्षीचे आकाराचे दागिने तयार होतात... तसेच देवी आदिशक्तींची विविध रुपे व नावे आहेत.... 

साधकांसाठी नवरात्र म्हणजे उपासना करण्याचे नउ दिवस आहेत.... नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गादेवीचे तत्व..... इतर दिवसांच्या तुलनेत सार्वाधिक प्रमाणात कार्यरत असते त्याचा लाभ साधकांना साधनेत मिळतो....
  • महाकाली.... (शक्तिचे प्रतिक).... पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी देवीचे पूजन करायचे.... 
  • सत्वगुणी.... महालक्ष्मी (ऐश्वर्याचे प्रतिक)..... दुसरे तीन दिवस सत्वगुण वाढविण्यासाठी देवीचे पूजन करायाचे.... 
  • महासरस्वती.... (ज्ञानाचे प्रतिक)..... शेवटचे तीन दिवस साधना तीव्र करण्यासाठी देवीचे पूजन करायचे....

तसेच फक्त उपवास करायचा म्हणून नको.... उपवास म्हणजे काय हे जाणून घेणे महत्वाचे..... उपवास याचा अर्थ असा आहे.... उप म्हणजे जवळ जाणे.... वास करणे म्हणजे देवतांच्या सानिध्यात जाणे.... चला तर, घुमत असलेला साधनेचा सूर पकडून जीवन समर्पणाच्या संगीताने भारून टाका.... तीव्र साधनेने देवीला प्रसन्न करुया.... 


ॐ श्री गुरुदेव दत्त ..... आदिशक्ती नमस्तुभ्यं.....

Saturday, 20 October 2012

स्वप्न पाही आपुले मन.... पूर्ण कराया कष्टवावे तन.... 
                              जेणे सुखी सकल जन.... तेची सर्वोच्च ध्येय मान.... 

        मित्रांनो, अस म्हणतात.... स्वप्न पाहायला पैसे लागत नाहीत.... खरेही आहे ते.... पण स्वप्न पूर्ण करायचे म्हंटले तर.... एखाद्या स्वप्न पुर्ण झालेल्या स्वप्नवेड्याला विचारा.... त्याने स्वप्न पुर्ण करण्यासाठी काय किंमत चुकवली असेल ते.... बघा, तशी अनेक लोक आयुष्यात स्वप्न पाहतात... पण काहींचीच स्वप्न पुर्ण होतात.... यात त्यांचे नशिब वैगेरे काही नसते... फक्त त्यांनी घेतलेली मेहनत... कष्ट केलेले असते आणि त्याचेच त्याना फळ मिळते.... प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरूवात लहान स्वप्नापासुन होते.... आणि अशीच लोक त्याची स्वप्न पुर्ण करतात.... 

        जोपर्यंत माणूस कुठलं स्वप्नं पाहत नाही.... अन ते प्रत्यक्षात आणण्यासाठी अथक परिश्रम घेत नाही... तोपर्यंत यश मिळणं हि कठीण गोष्टच असते... कधी कधी शेकडो प्रयत्न करूनही यश मिळत नाही... म्हणून हिम्मत हरणारे लाखो आहेत.... पण जेव्हा दहा हजार वेळा प्रयत्न केल्यावर यशस्वी झालेल्या एडिसनची कहाणी त्यांना कळेल... तेहाच त्यांना यशासाठी किती संघर्ष करावा लागतो हे कळेल.... 

        बघा, या जगात तर भीक सुध्दा फुकट मिळत नाही.... ती सुध्दा कष्टाने मागावी लागते.... मग आपले स्वप्न देव कशाला फुकट पुर्ण करेल..... कष्टाला- मेहनतीला पर्याय कसा काय असु शकतो.... बघा, देव जरी पृथ्वीवर आला..... तर त्यालाही त्याच्या स्वप्नांसाठी लढावेच लागेल... मग आपली काय लायकी..... तेव्हा आपल्यालाही लढावे लागेल.... यशासाठी कष्ट मेहनतीला कोणताही पर्याय नाहीच.... 

       मित्रांनो, कोणत्याही यशासाठी मनामध्ये ध्येय गाठण्याच्या महत्त्वाकांक्षेची ज्योत पेटवावीच लागते... उत्कृष्ट दर्जाचे काम करण्यासाठी उच्च विचारांची आणि भरपूर मेहनतीची कष्टाची गरज असतेच.... तसेच प्रत्येक वेळी आपल्या हाती यश येईलच असे नसते... पण अपयश आल्याने खचून न जाता पुन्हा त्या चिकाटीने उभे राहून प्रयत्न करावेच लागतात..... अपयश ज्या गोष्टींमुळे आले त्या गोष्टी टाळाव्याच लागतात..... आणि सकारात्मक विचारांनी त्या दिशेकडे वाटचाल करावी लागते.... मग नक्कीच तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकता.... 

     मित्रांनो, जीवनात आलेले अपयश हे भरपूर गोष्टी शिकवून जाते.... आपली शिकण्याची समजण्याची तयारी मात्र हवी.... आणि सहजासहजी मिळालेल्या यशाची किंमत शून्य असते.... त्यामुळे चुकीच्या मार्गाने लवकरात लवकर यश मिळवण्याच्या भानगडीत न पडता.... स्वतःच्या मेहनतीने, कष्टाने त्यामागे धावा.... थोडा वेळ लागेल.... आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी, पण त्याची किंमत तुम्हाला नाकीच माहिती असेल.... आणि मनाला ध्येयपूर्तीचे समाधान ही असेल.... 

      बघा, मित्रांनो आपले जीवन खुप सुंदर आहे..... एकदा आयुष्याशी झुंज देवुन पाहाच, ध्येय निश्चित करून योग्य मार्ग निवडून त्य मार्गी चाला. आपला ध्येय मार्ग आपल्या मेहनतीने, कष्टाने, कौशल्याने, कलागुणांनी प्रकाशमान करून उजळून टाका.... यशाची अमृत चव चाखा.... स्वःताचे नवे पर्व निर्माण करा....

 ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Friday, 19 October 2012

आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे पाचवे रूप 'स्कंदमाता'

सिंहासनगता नित्य पदमाश्रितकरद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी।



दुर्गेचे पाचवे रूप 'स्कंदमाता' या नावाने ओळखले जाते...... नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते..... या दिवशी साधकाचे मन 'विशुद्ध' चक्रात स्थिर झालेले असते..... भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते.....

भगवान स्कंद 'कुमार कार्तिकेय' नावानेही ओळखले जातात..... ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते.... पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे.... भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गाच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते..... स्कंदमाता चारभुजाधारी आहे.... तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा, जी वर उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे....

डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजुला उचललेली आहे.... त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे.... या देवीचा रंग पूर्णत: शुभ्र आहे..... ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते..... यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते.... तिचे वाहन सिंह आहे....

नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले आहे.... यावेळी चक्रात स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप पावते.... सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होऊन पदमासना स्कंदमातेच्या रूपात तल्ल‍ीन होते.... यादरम्यान साधकाला पूर्ण सावधगिरीने उपासना करणे आवश्यक आहे.... सर्वतोपरी एकाग्र होऊन साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे....

स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते.... मृत्यूलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो.... त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो.... स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते.... सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकीक तेज प्राप्त होते.... आपण एकाग्र मनाने पवित्र होवून मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे.... या भवसागरात दु:खापासून मुक्ती मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही...

आदिशक्ती नमस्तुभ्यं....
आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख.... दुर्गेचे चवथे रूप 'कुष्मांडा'....

सुरासम्पूर्णकलशं रूधिराप्लुतमेंव च।
दधाना हस्तपदमाभ्यां कुष्माण्डा शुभदास्तु में।।



दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव 'कुष्मांडा' आहे..... आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते..... संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुम्हड असे म्हणतात.... कुम्हड्यांचा बळी तिला अधिक प्रिय आहे.... या कारणामुळेही तिला कुष्मांडा म्हणून ओळखले जाते....

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते.... या दिवशी साधकाचे मन 'अदाहत' चक्रात स्थिर झालेले असते..... या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना केली पाहिजे.... सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती.... म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे....

या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे.... तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे..... तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे.... तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात.... ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे....

देवीच्या आठ भुजा आहेत.... ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे.... तिच्या सात हातात क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे.... आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे....

कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो.... या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते.... या देवीला प्रसन्न करण्यासाठी फार काही करावे लागत नाही.... मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते.... कुष्मांडाची उपासना मनु्‍ष्याला रोगापासून मुक्त करते.... त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे....

आदिशक्ती नमस्तुभ्यं....

Thursday, 18 October 2012


आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख..... दुर्गेचे तिसरे रूप 'चंद्रघंटा''....

पिण्डजप्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर्युता।।
प्रसाद तनुते महां चंद्रघंटेती विश्रुत।।


दुर्गेच्या तिसर्‍या शक्तीचे नाव 'चंद्रघंटा' आहे..... नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी या देवीची पूजा केली जाते.... तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते.... या दिवशी साधकाचे मन 'मणिपूर' चक्रात प्रविष्ट होते.... चंद्रघंटेच्या कृपेने अलौकीक वस्तुचे दर्शन होते..... दिव्य सुगंधाचा अनुभव येतो.... किंवा विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला येतो.... हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान राहण्यासाठी असतात....

देवीचे हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे..... तिच्या मस्तकावर घंटेच्या आकराचा अर्धचंद्र असल्यामुळे तीला 'चंद्रघंटा देवी' असे म्हटले जाते.... शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे..... या देवीला दहा हात आहेत.... या दहा हातामध्ये खड्ग, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत.... तीचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते....

माँ चंद्राघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जाते.... माँ भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते.... तीचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो.... तीच्या घंटेच्या आवाज प्रेतबाधेपासून भक्तांचे रक्षण करतो.... . या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास घंटेचा आवाज निनादतो.... या माँ देवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्ण आहे.... या देवीची आराधना केल्यास वीरता-निर्भयता बरोबर सौम्यतेचा विकास होवून संपूर्ण शरीरात कांती-गुणांची वाढ होते.....

आवाजात मधुरता येते.... माँ चंद्राघंटाचे भक्त आणि उपासक जेथे जातात तेथील लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात.... आपण आपले मन, वचन, कर्म हे पवित्र करून देवीची उपासना करण्यासाठी तयार व्हा.... तीची उपासना केल्यामुळे सर्व संसारीक संकटातुन मुक्ती मिळते.... आपण नेहमी तीची उपासना करण्यासाठी अग्रेसर असावे.... इहलोक आणि परलोक दोन्हीच्या कल्याणकारी आणि समृद्धीसाठी तीचे लक्ष आहे.....

आदिशक्ती नमस्तुभ्यं.....
                                        
मित्रांनो, आज आपण ऑप्रा विन्फ्रे यांचे व्यक्तिमत्व जाणूया.... 

मित्रांनो, ऑप्रा विन्फ्रे आज सगळ्यात श्रीमंत अॅफ्रो-अमेरिकन स्त्री आहे..... तसेच जगातील खूप प्रभावी व्यक्तिमत्त्वाची स्त्री आहे..... पण इथवर पोहोचण्यामागे तिचा फार मोठा जीवन संघर्षहि आहे..... कमालीचं दारिद्य ते ३२ व्या वर्षी अब्जाधीश होण्याचा प्रवास तिने केलाय..... हे करताना तिने आयुष्यात खूप काही पाहिलंय, सोसलंय..... 

ऑप्रा विन्फ्रे विवाहित नसलेल्या जोडप्याची मुलगी..... तिच्या आईला तिला पोसणं म्हणजे कठीणच होतं.... मग अशावेळी तिची रवानगी तिच्या आजीआजोबांकडे करण्यात आली होती.... तिथेही गरीबी आणि आजूबाजूला दारिद्य, गुन्हे, ड्रग्ज, व्यसनाधीन पुरुषांकडून मारहाण, अत्याचार असं सगळं समोरं होतंच......  अशा परिस्थितीत विन्फ्रेच्या वाट्याला वेगळं काही येण्याची शक्यताच नव्हती. ...... ऑप्रा विन्फ्रेचे आयुष्य गरिबीच्या चटक्यांनी भाजून निघालं होतं….. ९ व्या वर्षी बलात्काराचा भीषण अनुभव तिला घ्यावा लागला….. १४ व्या वर्षी तिच्यावर मातृत्व लादलं गेलं….. तिला झालेला मुलगा काही दिवसांतच मेला.....

भूतकाळाच ओझं माथ्यावर घेऊन चालताना तिच्यापुढे तीनच मार्ग होते….. आत्महत्या करणं... लाजिरवाण जीण जगणं.... किंवा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उंच भरारी घेणं….. ऑप्रा विन्फ्रेने तिसरा पर्याय निवडला, आणि नैराश्याने ग्रासलेल्या जगातल्या लाखो स्त्री पुरुषांना तिने जगायची एक नवीन उमेद दिली…. 

गरिबीला धोबी पछाड घालणाऱ्या ऑप्राने लागोपाठ २४ वर्ष " ऑप्रा विन्फ्रे टोक शो " सदर करून टेलीविजनच्या माध्यमातून तब्बल १४ हजार कोटी रुपये कमावले…. अन एक विश्वविक्रम केला... अर्धीअधिक संपत्ती तिने गरिबांचे अश्रू पुसण्यासाठी खर्ची घातले….. ऑप्रा विन्फ्रेच्या त्या अफाट कर्तुत्वाला आणि श्रीमंतीतही माणुसकी जपणाऱ्या महान मानवतेला आपण सर्वानीच सलाम केला पाहिजे....

ऑप्रा विन्फ्रेने पाहिलेली गरिबी भयानक होती.... गोणपाट शिवून ती अंगावर फ्रॉक म्हणून वापरायची.... गरिबाला अब्रू नसते.... याचा अनुभव तिने वयाच्या ९ व्या वर्षीच घेतला. चुलत भाऊ, काका, त्यांचे मित्र सर्वानीच तिचा लैंगिक छळ केला..... १४ व्या वर्षी मुल झालं तेही दगावलं.... 

जगाचा इतका कटू अनुभव गाठीशी घेऊन जगणं कठीण होतं.... पण ती हिम्मत हारली नाही.... आयुष्यात जे काही करायचं ते उत्कृष्टच करायचं हा तिने ध्यास घेतला.... पुढची २० वर्ष तिला कठोर परिश्रम करावे लागले.... वयाच्या ३० व्या वर्षी टेलीविजन क्षेत्रात तिने प्रवेश केला.... पण ती काही एखाद्या टेलीविजन किंवा चित्रपटातील नायिकेप्रमाणे दिसायला सुंदर नव्हती..... ती सडपातळ, कमनीय बांधा असलेली किंवा नजरेत भरण्याइतकी दिमाखदारही नव्हती.... पण तिची इच्छा शक्ती जबरदस्त होती..... 

पुढली २४ वर्ष तिने अर्ध्या अमेरिकेला वेड लावलं होतं.... तीचा टोक शो पाहण्यासाठी झाडून सारी अमेरिका टी.वी.समोर बसू लागली ती..... पैशाच्या थैल्या घेऊन मोठ मोठी चानल्स तिच्या दाराशी उभी राहू लागली होती.... पैसा आणि श्रीमंती पायाशी लोळण घेऊ लागली.... तेव्हा भूत काळातल्या आठवणींनी ओप्रचा मन कासावीस व्हायचं....

गरिबीमुळे आपल्या नशिबी जे भोग आले ते इतर कुणाच्या वाटेला येऊ नयेत... म्हणून तिने गरिबांच्या संस्थांवर पैशाचा वर्षाव केला.... आज वार्षिक १२०० कोटी उत्पन्न असलेल्या ओप्राची कहाणी सर्वांनाच प्रेरणादायी अशी आहे..... 

तिची हि कहाणी.... माझ्या असंख्य मित्रांना आयुष्यात कधीच खचू देणार नाही.... हा मला विश्वास आहे.... तुम्ही देखील आयुष्यात जे काही कराल ते उत्कृष्टच करायचा प्रयत्न करा.... त्यासाठी शर्तीचे प्रयत्न करा..... तुमची स्वप्नं नक्कीच ध्येयापर्यंत पोहोचतील यात शंकाच नाही....

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती - आत्मविश्वास...... अपयशाने खचू नका.... अधिक जिद्दी व्हा..... संभ्रमाच्या वेळी नेहमीच आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या...... मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.....

आयुष्यात आपल्याला भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात...... तसेच आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही..... अशावेळी लक्षात ठेवा तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे....... परिस्थितीवर यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही...... ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये....

आताच्या परिस्थितीचे रुप बदलण्यासाठी अगदी मनापासून प्रयत्न करा..... परिस्थितीच्या अधीन होऊ नका, परिस्थितीवर मात करा.... 

मित्रानो, ऑप्रा विन्फ्रे सारख्या माणसांनी हे जग भरलेले आहे..... म्हणनूच त्यांच्या कडून स्फूर्ती घेऊन सामान्य माणसे असामन्य होतात.....

ॐ श्री गुरुदेव दत्त .....