Sunday 10 March 2013


 ऋषितुल्य व्यक्तिमत्व.... भाई (प्रभाकर नाईक-साटम) दि. १९-१२-२०१२ 


आज बापूकाका (प्रवीण देशमुख) म्हणाले.... चला भाईना भेटायला जाऊ.... ते भारतातील एकमेव टॅपेस्ट्री चित्रकार आहेत.... आज जगात ते नावाजलेले सर्वोत्कृष्ट टॅपेस्ट्री चित्रकार आहेत.... मलाही त्यांच्या भेटीची उत्सुकता होतीच.... आम्ही भेटल्यावर त्यांनी आमचे स्वागत केले.... भाईनां भेटल्यावर-जाणल्यावर मनात भावना दाटून आल्या.... बघा, आयुष्यातले काही क्षण, अनुभव असे असतात कि मनात हळुवार जपून ठेवाव्या.... जसे अत्तराच्या कुपीत अत्तर असत... ती कुपी उघडताच ते अत्तर सर्वदूर पसरत.... तसच काही व्यक्तींचा सुगंध आपल्याला तर येतोच... पण इतरांना सुद्धा त्याची अनुभूती होते... अशा व्यक्ती आपल्या आयुष्याला वेगळी कलाटणी देतात... त्याचं निरंतर मनात वास्तव्य असत.... त्यातीलच एक व्यक्ती म्हणजे भाई..... 

मला जाणवलेले भाई म्हणजे.... एक मनस्वी व्यक्तिमत्व.... संवेदनशील कलामहर्षी कलाकार.... एक मुक्त... स्वैर... स्वछंदी जीवन.... आणि पारिजातकासारखी लयलुट करायची ती सुगंधाचीच.... एक प्रभावित करणारे व्यक्तिमत्व.... अत्यंत गुणी, प्रेमळ व उत्तुंग व्यक्तिमत्त्व.... 

भाईनी प्रतिकुल आयुष्य जगताना लहानसहान गोष्टींतून चांगले संस्कार ग्रहण केले..... पण विचारांनीही स्वःताला सुसंस्कारीतही केले..... भाईंचे आयुष्य म्हणजे त्रिस्थळी यात्राच जणू.... कारण जन्म कोकणातल्या बांदिवड्यात.... जन्म-बालपण कोकणात आणि शिक्षण मुंबईत झाले असले तरी त्यांची कर्मभूमी राहिली ती जपान.... तिथे धाग्यांद्वारे कापडी चित्रकृती साकारण्यात रममाण झाले.... या जीवन प्रवासाचे संचित म्हणजे आज जगाला त्यांनी दिलेली उत्कृष्ट चित्र कलाकृती.... 

संपूर्ण मानवजातीच्या उत्क्रांतीतून विकसित झालेली निसर्गाची एक अद्भुत किमया म्हणजे माणसाचे मन.... माझ्यामते भाईंनी याच मनाचा खोलवर जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न आपल्या चित्रकृतीतून केला आहे.... भाईंनी मनाच्या संकल्पना बदलल्या.... निरनिराळे पैलू उलगडले... अशा मनाचा इतिहास.... त्यावर झालेले संशोधन, निष्कर्ष आणि त्याचे वेगवेगळे रूप आपल्याला आज त्यांच्या कलाकृतीत बघता वाचता येईल.... 

आज मलातरी असे जाणवले.... निसर्गातल्या गुढांशी एकतानेनं चटकन रमणाऱ्या या कलावंताला आजूबाजूच्या मानवतेच्या सुख-दुःखांच्या, आशा-आकांक्षांच्या आणि हालअपेष्टांच्या वेदना आणि संवेदना जाणवल्या आहेत.... दरी, डोंगर, वृक्ष, नदी-नाले, निसर्ग, प्राणी, मंदिराचे तपशील यात रमणारा हा भावनाप्रधान कलाकार..... तसा कोणताही कलाकर विलक्षण मनस्वी असतो.... कलाकार जे पाहतो... ते सामान्य माणसाला जाणवणार नाही.... म्हणून सामान्य माणसाची दुनिया आणि कलाकाराच्या नजरेतील जग यात खूप फरक असतो.... निसर्गावर प्रेम करणाऱ्या भाईनी चित्रांतून त्यांच्या नजरेला दिसलेला निसर्गही रेखाटला आहे.... 

आज भाईंच्या आयुष्याचा जीवनपट उलगड्ल्यास जाणवते..... त्यांनी अत्यंत मेहनतीनं, सर्वस्व झोकून सर्वोत्तम टॅपेस्ट्री चित्रकार बनण्याच्या ध्यासातून सगळे बारकावे शिकून घेतले.... आणि नंतर देवदुर्लभ यश आणि लौकिक लाभूनही त्याच नशेत वाहवत न जाता आजही त्यांचे पाय जमिनीवर आहेत.... आज आपण सर्वजण आपुलकीने व प्रेमाने त्यांना भाई असे संबोधतो.... वाचनात गुंगणारा, निसर्गात रमणारा आणि आपल्या माणसात हरवणारा एक संवेदनशील माणूस.... 

भाईंच्या आयुष्यातील दुसरी बाजू म्हणजे जपानी पत्नी काझुको.... भाई आणि काझुको म्हणजे जन्म जन्माचा ऋणानुबंध जणूच.... स्वार्थाच्या पलीकडचे नाते.... काझूको खरेतर भाईंच्या सर्व कामातील यशातील अदृश्य शक्ती आहेत.... बुद्धिमान, निग्रही, जिद्दी आणि अत्यंत कष्टाळू कलावती असाच त्यांचा प्रवास आहे.... मलाही काझूकोच्या जीवनाचा साधेपणा खुपच भावला.... 

बघा, कॉपोरेट क्षेत्रातील कामामुळे तसेच पर्यटनामुळे थोडेफार जागतिकीकरण मी अनुभवले आहे.... या बाबतीत मी स्वतःला भाग्यवान समजतो..... गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये जगातल्या अनेक देशांतील लोकांशी मी संवाद केला आहे.... खरेच त्यातून आयुष्यात न कळलेल्या अनेक नव्या गोष्टी शिकता आल्या.... कदाचित सुरुवातीपासूनच माझ्या मनात मानवी मनासंबंधी कुतुहल असल्यामुळे असेल.... मला वेगवेगळ्या देशातल्या लोकांच्या मानसिकतेचं निरीक्षण करण्याचा छंद लागला.... त्यातून माझा संवाद कोरियन, स्विस, रशियन, जपान, अमेरिका आणि जर्मनी अशा वेगवेगळ्या देशांच्या लोकांशी झाला.... आज काझुकोना भेटल्यावर वेगवेगळ्या देशांच्या लोकांच्या मानसिकतेची मी एकमेकांशी तुलना करू लागलो.... 

शेवटी मानवी मन हे जगभर सगळीकडे सारखंच असणार.... असं आपण मानतो.... त्यात तथ्य हे आहेच पण तरीसुद्धा प्रत्येक देशाची म्हणून एक मानसिकता असते... त्या देशाचा इतिहास, तिथं झालेली आक्रमणं, तिथला निसर्ग, तिथली संस्कृती या सगळ्याचं प्रतिबिंब तिथे जन्मलेल्या आणि राहणा-या माणसांच्या वागण्यात दिसतं.... ज्या देशोदेशीच्या निवडक लोकांशी माझा संपर्क आला.... त्यातून तरी हेच जाणवले.... 

आजपर्यंत मलातरी त्यात सगळ्यात जपानी माणूस हा अत्यंत शांत आणि सुसंस्कृत असा दिसला.... तो अत्यंत मृदुभाषी असतो.... तो फारसं बोलत नाही.... याचं एक कारण इंग्रजी येत नाही, हेहि असतंच.... पण एरवीसुद्धा जपानी लोकांत तो जेवढा मोकळा असेल तेवढा तो बाहेर कधीच नसतो.... त्याच्या बोलण्यात तो ज्ञानाचं प्रदर्शन कधी करत नाही.... एखादा प्रश्न त्याला विचारला तर तो त्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर माहिती असेल तरच ते देतो.... बहुतेक जपानी लोकांना ते करत असलेल्या कामाचं सखोल ज्ञान असतं..... पण समोरच्याला तसं न भासवणं हे त्यांच्या संस्कृतीत चांगलं लक्षण मानलं जातं.... जपानी माणसं, त्यांची पारंपरिक, कणखर मानसिकता, दीर्घद्योगी वृत्ती, आधुनिक जपानच्या घडणीतली त्यांची समर्पितता, तिथली प्राचीन संस्कृती, अनवट प्रथा-परंपरा 

शिस्त आणि नीटनेटकेपणा याबाबतीत जपानी लोक खूपच काटेकोर असतात.... असे अनुभवले एखादी मिटिंग झाली की, जपानी माणूस असेल तर लगेच एक व्यवस्थित कागद घेऊन अतिशय सुंदर अक्षरात ते लिहून काढतो.... त्यामध्ये मिटिंगचे शक्य तेवढे तपशील भरतो.... आवश्यकता असेल तर आकृत्या, नकाशे आणि तक्ते यांचासुद्धा वापर करतो.... तो कागद नंतर वाचावा असा असतोच पण जपूनही ठेवावा इतका सुंदर असतो.... 

हेच जपानी व्यक्तिमत्व विशेष.... आज काझुको यांना भेटल्यावर जाणवले.... त्यांचा चेहरा अगदी शांत होता..... भाषा येत नव्हती, भाषेची अडचण होती.... उडालेला मानसिक गोंधळ.... त्यात त्यांचे हळुवार बोलणं.... ते न बोलता नजरेतून सारं सारं सांगणं.... अतिशय शिस्त-प्रिय अस व्यक्तिमत्व.... शांत, संयमी, सुशिल, निरागस, निर्मळ शांत आयुष्य आज मी पाहिले... अनुभवले.... आम्ही बोलत असताना त्या बसून शांतपणे ऐकत होत्या.... आमच्या बोलण्यातून असं काय त्यांना जाणवत होतं ते त्याचं तेच जाणोत.... 

आज भाईना भेटल्यावर.... एक विचारांनी, कलेने पूर्णत्वास गेलेल्या व्यक्तिमत्व दर्शनाने अनामिक असे मानसिक समाधान लाभले.... त्यांचा संवाद सहवास खरेच सुखावून गेला.... आज जे काही थोडेफार त्यांची माहिती त्यांनी दिली त्यातून जाणलेले-जाणवलेले भाई मला असे दिसले.... पुढेही त्यांच्याशी संवादाची संधी मला मिळेल अशी आशा आहे.... त्यांचे अनुभव – जीवनपट यातून खूप काही शिकायलाही मिळेल.... अशा ऋषीतुल्य व्यक्तीमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल मी बापुकाकांचा खरेच खूप आभारी आहे.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

No comments:

Post a Comment