अभंग सरिता
|| ॐ श्री गुरुदेव दत्त ||
भक्तीमार्ग कैंचा । नेणों आम्हां जाण । गुरुचे स्मरण
। अखंडित ॥१॥
गुरु नामजप । आम्हांसी पैं ठावा । भक्तीचा
पुरावा । नसें पाशीं ॥२॥
परमार्थामृत । वर्णियेलें श्रेष्ठ । तयाहूनी
मिष्ट । गुरुनाम ॥३॥
शंकर आनंद । उत्तुंग शिखर । आम्ही हो
पामर । पायथ्यासि ॥४॥
|| ॐ श्री गुरुदेव दत्त ||
गा दीनदयाळा । सख्या गुरुराया । आता भेट
द्याया । धांव बापा ॥१॥
स्थिरचर सारे । खिन्नसे भासती | निस्तेज
दिसती । चंद्र सूर्य ॥२॥
नको पांहूं अंत । जीव कासावीस । व्याकुळ
भेटीस । पंचप्राण ॥३॥
शंकर आनंदा । तुझपाशी आस । चित्ती
हाचि ध्यास । दर्शनाचा ॥४॥
|| ॐ श्री गुरुदेव दत्त ||
नारायणनामें । वर्षाव सुखाचा । उद्धार
जिवाचा । तेणें होय ॥१॥
नाम विठोबाचें । द्रव्य जयांगाठीं । परमार्थहाटीं
। सोहुंकार ॥२॥
पांडुरंगनाम । आयुध अजोड । समूळ
बीमोड । पातकांचा ॥३॥
इहलोकीं हेचि । साधन साचार । भवसिंधू पार
। करावयां ॥४॥
शंकर आनंदे । दिला गुरुमंत्र । आठवावां
धनी । वैकुंठीचा ॥५॥
|| ॐ श्री गुरुदेव दत्त ||
विठ्ठल विठ्ठल । नाम हेचि मुखीं । अवघाचि
सुखी । भवताल ॥
नामाचा महिमा । काय म्यां वर्णावा । अगाध
जाणावा । सकळांनी ॥
शंकर आनंद । सखा विठुराय । उद्धरीं या दासा । सदोदित ॥
No comments:
Post a Comment