Monday, 30 December 2013





आयुष्य वेचताना.....
जीवन ही एक शाळा आहे…. आणि या जीवनाच्या शाळेत आपण रोज काहीतरी नवं शिकत असतो…. खरं तर आयुष्य म्हणजे काही कुठल्या कार्यक्रमाची रूपरेषा नसते….. जीवन म्हणजे उन-पावसाचा खेळ.... कोणाच्या वाट्याला काय येईल किंवा काय यायला हवं.... यापेक्षा वाट्याला आलेल्या गोष्टींची किती कदर केली जाते.... हे जास्त महत्त्वाचं ठरतं.... हे ज्याला कळतं, त्याला आयुष्य कळलेलं असतं.... नाहीतर ज्या व्यक्तीला आपण आपले मानले, तीच व्यक्ती अयोग्य वागते.... तेव्हा कळते तिला आपली कदरच नाही.... जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला, तर तो माणूस मूर्ख आहे  अस समजू नका.. त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता... असा त्याचा अर्थ आहे.... 
नुसती आपल्या इच्छेने मतं बनवली आणि केवळ वय वाढलं.... म्हणून माणूस "मोठा' झाला, असं कधीच नसतं.... जर आपण योग्य सुविचार, तत्व अंगिकारली.... तर वाढत्या वयाबरोबर मनबुद्धीही तितकीच प्रगल्भ, परिपक्व, समृद्ध होते.... तोच माणूस शरीरानं मोठा होण्याबरोबरच मनानंही मोठा होत जातो आणि शेवटी शरीर कृश होऊन छोटं झालं, तरी मन मात्र मोठंच राहतं..!..  हे सर्वांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला जाणून घ्या.... बघा, असे नको व्हायला....
ज्या कविता वाचल्या, त्या मला कळल्या नाहीत.... ज्या व्यक्ती भेटल्या, त्या मला कळल्या नाहीत... ज्या वाटेने मी गेलो, ती दिशा मला कळली नाही.... भविष्याची हस्तरेषा मला कधी कळली नाही.... कळले जेव्हा हे सारे, तेव्हा आयुष्य होते सरले नि साऱ्यांचेच अर्थ....  मला थोडे थोडे उमगले असू देत - ते रस्ते, त्या व्यक्ती, त्या कविता, ते लेख.... शेवटच्या पानावर, थोडे अधिक...थोडे उणे..!..  
बघा, जीवनात चालत चालत माणूस "इगो इंटिग्रिटी विरुद्ध डिस्पेअर' या पानावर येतो.... येथे पोचल्यावर माणूस थोडंसं मागे वळून बघतो आणि मागं वळून बघत तो पुन्हा सारी पानं पहिल्यापासून आठवायला लागतो.... सारी पानं आठवून जर त्याला वाटलं, की खरंच आयुष्य सुंदर होतं, तर त्या माणसाचं म्हातारपणदेखील अत्यंत सुखा-समाधानाचं असतं.... त्याचं मन हिमालयापेक्षाही मोठं झालेलं असतं..... आयुष्याचं सार्थक झाल्याच्या भावनेनं किंवा परिपूर्तीच्या आनंदानं त्याचं मन एका वेगळ्याच आध्यात्मिक आनंदाचा आस्वाद घेत असतं.... आणि मग मृत्यूदेखील तो मोठ्या मनानं स्वीकारतो.....
याउलट, ज्याला वाटतं, की माझ्या आयुष्याची बरीचशी पानं चुरगळलीत, रंगहीन झालीत, काही गिचमिड झालीत, काही फाटलीत.... मला पुन्हा आयुष्य मिळायला हवं, पहिल्या पानापासून माझं जीवन मला पुन्हा लिहायचंय.... योग्य पद्धतीनं लिहायचंय,  योग्य पद्धतीनं जगायचंय.... पण आता तर ते शक्‍य नसतं.... तर मग असा माणूस आतून उदास राहतो.... अस्वस्थ राहतो.... बेचैन राहतो.... घुसमटलेला राहतो.... मग त्याला जीवन अपूर्ण राहिल्याची भावना सतत आतून बोचत राहते.... हा माणूस म्हातारपण एंजॉय करू शकत नाही....
खरेतर आयुष्य विविध भूमिकांनी नटलेले असे असते... पण जो स्थिर बुद्धीचा असतो तोच त्याचा खरा अर्थ जाणतो.... बाकीचे मात्र आपले अनर्थ काढून आयुष्यात गोल गोल फिरत बसतात.... ज्या भ्रामक समजुती आहेत, त्या तशाच पुढे चालू ठेवणे काहींना आवडते... पण या आपल्या समजुतींवर कोणी चूक दाखवली, तर राग उफाळून येतो आणि मग पळवाटा शोधल्या जातात.... आपले मुद्दे पटवून देण्याचा प्रयत्न आणि वितंडवाद होतो.... पण आपला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न काही होत नाही....
          खरेतर....
भांडण तंटे हे तर तरंग होते | आपले नाते अभंग होते ||
एक दुज्यांची काटछाट करताना | शब्दशाप हे हळवे पतंग होते ||
प्रीत अंतरी उकळत होती तेंव्हा | रागाचे वरवरचे तवंग होते ||
कधी वाटले खोल गूढ हे नाते | कधी वाटले सारे सवंग होते ||
साखर नुसती? जरा फोडणी द्यावी | त्याचमुळे हे जगणे खमंग होते ||

ॐ श्री गुरुदेव दत्त....

No comments:

Post a Comment