जीवन-क्षण अनुभव....
माणसाचे जीवन म्हणजे एक कोरी वही असते जिच्या प्रत्येक पानावर आठवणीच्या शाईने तो अनुभव लिहून ठेवतो…. बरेचदा खोडाखोडिच्या रूपात चुका कागदावर घर करून बसतात….. एकदा जे लिहिले ते परत मिटवता येत नाही आणि अर्ध्याहून जास्त भरल्यावर जेव्हा वही मागे पडताळून बघितली जाते…. तेव्हा या खाडाखोडी चुका दुरुस्त करण्याची तीव्र इच्छा होते…. आणि मग कधी सुंदर वाक्यांमध्ये लिहिलेले लेख वाचता वाचता मन त्याच पानांवर घुटमळते…. परत, तसाच एखादा नवीन लेख नवीन पानावर नवीन रीतीने लिहिण्यास मन आरंभ करते….. आणि ते वहीचे शेवटचे पान असू शकते....
आयुष्यात विविध अपघात होतच असतात.... चालताना ठेचा या लागणारच.... त्याच्या वेदना आठवण्यात सगळं आयुष्य खर्ची घालायचं नसत.... त्याचा काहि फायदाही नसतो.... जे वास्तव समोर आहे.... ते आणि तेव्हढंच खरं आहे.... आणि आज जे मिळतं त्यातच आनंद मानायचा.... जे मिळालं नाही त्याच दु:ख करत बसायच नाही.... यासाठीच महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भावना.... असूनही जी दिसत नाही, पण मनाला जाणवते, ती भावना.... आणि जे नजरेला दिसतं, तो व्यवहार.... आपल्याच भावना सांभाळत बसलो तर दुसऱ्यांच्या भावनांना न ओळखता, त्यास ठेच पोचते आणि आपला व्यवहारच दिसू लागतो....
बघा ना, प्रॉब्लेम्स कोणाला नसतात..?.. ते शेवटपर्यंत असतात.... पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतचं.... ते सोडवायला कधी वेळ हवा असतो.... कधी योग्य व्यवहार, तर कधी योग्य माणसं या पलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो.... प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही, कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच, पळवाटा कधीही मुक्कामाला पोहचवत नाहीत, मुक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच.... आणि ते दाखवितात आपलेच सद्गुरु विविधरुपाने....
आपला प्रत्येक क्षण बहुमोल असतो.... आपले आयुष्य अशाच क्षणांचे बनले आहे.... सांगता आयुष्याच्या शेवटी नसते.... आजच्या प्रत्येक क्षणाचीच अर्थपूर्ण भरीव सांगता केली तरच आयुष्य खऱ्या रीतीने उमजेलं, मोल कळेलं.... मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही..!.. त्याला भविष्याच्या गरूडपंखाच वरदानही लाभलं आहे, हे ओळखायला आले पाहिजे.... निश्चित निग्रहाने घरट्याच्या बाहेर पडल्याशिवाय पाखराला आभाळाचा खरा अर्थ कळत नाही....
ॐ श्री गुरुदेव दत्त....
No comments:
Post a Comment