Wednesday, 17 October 2012


आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे दुसरे रूप 'ब्रम्हचारिणी' 

          दधाना करपदमाभ्यामक्षमालाकमंडलू।
                             देवी प्रसिदतु मयि ब्रम्हाचारिण्यनुमत्तमा।।


नवशक्तीपैकी 'ब्रम्हचारिणी' हे दुर्गेच्या दुसरे रूप आहे..... येथे 'ब्रह्म' या शब्दाचा अर्थ तपस्या आहे..... ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी..... नवरात्राच्या दुसर्‍या दिवशी या मातेची पूजा केली जाते..... या‍ दिवशी साधकाचे मन 'स्वाधिष्ठान' चक्रात स्थिर होते... या चक्रात मन स्थिर करणार्‍याला तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होते... या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे.... 

तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असतो..... तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला... त्यावेळी नारदमुनींने तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा.... यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती.... या तपस्येमुळे या देवीला तपश्चा‍रिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात..... 

एक हजार वर्षापर्यंत तिने फळे खाऊन तपश्चर्या केली.... उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला होता..... या तपश्चर्येनंतर तीन हजार वर्षांपर्यंत केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले..... यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला 'अपर्णा' हे एक नाव पडले.... 

अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते.... तिची ही अवस्था पाहून तिची आई मेना खूप दु:खी झाली होती..... तिने तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी 'उमा' अगं! नको ग नको! अशी हाक दिली.... तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीच्या पूर्वजन्माचे 'उमा' हे एक नाव पडले..... तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडाला..... सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले....

शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले.... की 'हे देवी...! आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही.... तुझ्या तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे.... तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल.... भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील.... आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा.... लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील.... असा वर त्यांनी दिला....

ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे.... तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते.... देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते.... अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप आहे....

आदिशक्ती नमस्तुभ्यं...... 

Tuesday, 16 October 2012


आदिशक्तीच्या....  नवरात्र .... एक एक रुपाची ओळख --- दुर्गेचे पहिले रूप 'शैलपुत्री.....

नवरात्र साजरे करण्यामागचे कारण मार्कंडेय पुराणांतर्गत देवी महात्म्यात सांगितले आहे..... जगात तामसी व क्रूर लोकांची संख्या वाढून ते इतरांना त्रास देऊ लागतात.... तेव्हा सज्जनांना त्रासमुक्त करण्यासाठी, त्यांना त्यांचे स्थान पुन्हा मिळवून देण्यासाटी शक्तीदेवता या धरतीवर अवतीर्ण होते.... दुष्टांच्या निर्दालनासाठी देवीने अनेक अवतार घेतले....

सामान्यजनांना, विद्वानांना तिने पुन्हा सुख प्राप्त करून दिले.... तिच्या या कर्तृत्वाबद्दल तिचे स्तवन व स्मरण करण्यासाठी नवरात्र साजरे केले जाते....

एका प्रसंगात देवीनेच सांगून ठेवले आहे... ''मी तुमच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहीन. संकटकाळी अनन्यभावाने मला शरण येताच मी प्रकट होऊन तुम्हास दुःखमुक्त करीन मी तुमच्यावर सदा प्रसन्न असावे म्हणून प्रत्येक अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नऊ दिवस घटपूजा, होमहवन वगैरे प्रकारांनी माझे पूजन करावे.... माझ्यावर अचल निष्ठा ठेवून संकटसमयी जे माझी करूणा भाकतील त्यांच्या सुखासाठी मी सदैव जपत राहीन...'' यावरून नवरात्र पाळण्याची परंपरा निर्माण झाली असावी, असे म्हणण्यास वाव आहे.....

नवरात्रीतली प्रत्येक रात्र आदिशक्तीच्या पुढील नावावरुन प्रचलित आहे.....

पहिली रात्र - शैलपुत्री
दुसरी रात्र - ब्रह्मचारिणी
तिसरी रात्र - चंद्रघंटा
चौथी रात्र - कुश्‍मांदा
पाचवी रात्र - स्कंदमाता
सहावी रात्र - कात्यायनी
सातवी रात्र - कालरात्री
आठवी रात्र - चामुंडा
नववी रात्र - सिध्दीदात्री

या आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख आपण आजपासून रोज करून घेणार आहोत.... 
 

दुर्गेचे पहिले रूप 'शैलपुत्री' या नावाने ओळखले जाते.... ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे..... पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला 'शैलपुत्री' असे नाव पडले आहे.... नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते.... या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला 'मूलाधार' चक्रात स्थिर करतात.... या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरवात होते....

या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हाता कमळाचे फूल आहे.... आपल्या पूर्वजन्मात तीने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता.... त्यावेळी तिचे नाव 'सती' असे होते. तिचा विवाह शंकराशी झाला होता....

एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला.... या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते.... परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते.... आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली.... तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली.... तेव्हा शंकराने तिला सांगितले, की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत.... त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आहे....

परंतु, मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही.... अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही.... शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही.... वडीलांचा यज्ञ पाहणे, तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकूळ झाले होते.... तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली....

सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही.... तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही.... आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही.... सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते.... नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला.... तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले.... दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दह‍ी वापरले होते.... हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते, असे तिला वाटले....

आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे... याची जाणीव होऊन नवर्‍याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वत:ला योगाग्नीत जाळून घेतले.... याची माहीती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उध्वस्त केला.... सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला....

यावेळी ती 'शैलपुत्री' या नावाने प्रसिद्ध झाली.... पार्वती, हेमवती हे तिचेच नाव होते.... 'शैलपुत्री' देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला होता.... पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली.... म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे...

‘वंदे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्।वृषारूढ़ां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्।’

आदिशक्ती नमस्तुभ्यं.....
आदिमायेच्या आणि आदिशक्तिच्या या उत्सवासाठी तुम्हा सर्वांना व तुमच्या परिवाराला खास शुभेच्छा.... 

नवरात्रीचे महत्व नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गादेवीचे तत्व..... इतर दिवसांच्या तुलनेत सार्वाधिक प्रमाणात कार्यरत असते त्याचा लाभ मिळावा यासाठी....

1) महाकाली (शक्तिचे प्रतिक).... पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी पूजन करतात....

2) सत्वगुणी महालक्ष्मी (ऐश्वर्याचे प्रतिक)..... दुसरे तीन दिवस सत्वगुण वाढविण्यासाठी पूजन
करतात....

3)महासरस्वती (ज्ञानाचे प्रतिक)..... शेवटचे तीन दिवस साधना तीव्र करण्यासाठी पूजन करतात....

सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.... आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो..... आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो.... अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना.....

या देवी सर्व भुतेषू शक्तीरुपेण संस्थिता । नमतस्यै नमस्तस्यै नमो नम: । आदिशक्ती नमस्तुभ्यं....

स्‍मरण निरंतर खंड नको.... चरण कमल ते विसरु नको.....
अपार सुंदर प्रेमळ अंबा.... भक्‍तांकित झणि हो जगदंबा.....
पथ भक्तिचा परि अवलंबा.... कल्‍पतरुसम पद जगदंबा....

दुर्गे देवि नमोस्तुते.....






Monday, 15 October 2012


आदर्श ठेवावा उत्तम.... ध्येय असावे सर्वोत्तम.... व्हावे सर्वगुण संपन्न.... देश बलशाली परिपूर्ण....     
  मित्रांनो,  आज आपण २०११ चे रेमन मेगासेसे अवार्ड विजेत्या नीलिमा मिश्रा यांचे व्यक्तिमत्व जाणूया.... २०११ चे रेमन मेगासेसे अवार्ड विजेत्या नीलिमा मिश्राने रोख २६ लाखाचे पारितोषिक काय केले असेल..... ? तिने ती सारी रक्कम चक्क समाजालाच अर्पण केलीय..... पुढे कधी २ कोटी मिळाले.... तरी मिश्राबाई ती सर्व रक्कम समाजासाठीच अर्पण करतील यात शंकाच नाही..... बघा, एकीकडे हजारो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या राज्यकर्त्यांमुळे आपला देश बदनाम होतोय.... तर नीलिमा मिश्रा सारख्या असंख्य लोकांमुळे तो जगाच्या नजरेतही भरतोय..... 

   लहानपणापासून नीलिमा मिश्रा यांचे एकच ध्येय होते.... समाजासाठी काहीतरी करणे.... " मोठी झाल्यावर मी माझ्या गावाचा विकास करण्यासाठी धडपड करीन.... " असे शाळेत जाणारी जळगाव मधली एक १३ वर्षाची मुलगी.... जेव्हा आपल्या मैत्रीणीना सांगायची.... तेव्हा सर्वांनाच तिची खूप गम्मत वाटायची.... पण बघा, आज २५ वर्षानंतर नीलिमाने गावातीलच नव्हे.... तर शेजारच्या गावातीलही हजारो स्त्रियांना १८०० बचत गटाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं केलंय..... 

   तशी प्रत्येक महिलेमध्ये सुप्त शक्ती असते..... तिला जागृत करणे महत्त्वाचे असते.... महिला शिकलेल्या नसल्या तरी त्यांच्यात निसर्गाने शक्तीचा स्रोत भरलेला असतो..... त्या व्यवहार प्रामाणिकपणे करतात व प्रचंड मेहनत घेतात.... ग्रामीण भागातील महिलांबरोबर चर्चा करताना त्यांच्या कल्पना भन्नाट असल्याचा अनुभव तेथे काम करणाऱ्याना नेहमीच येतो.... बघा, परिश्रमाला जर नितीमत्तेची जोड असेल तर तुम्हाला यश जरुर मिळेल.... याचेच उदाहरण नीलिमा मिश्रा यांनी आपल्या समोर ठेवले आहे...... समाजातील उपेक्षितांना एका धाग्यात ओवले.... म्हणूनच त्यांच्या पदरी यश आले आहे..... त्यांचे हे यश भावी पिढीला प्रेरणादायी आहे..... 

   आज उपेक्षित असलेल्या वर्गासोबत काम करणे कठीण आहे..... आणि नीलिमा मिश्रा यांनी ते करून दाखवलं आहे..... त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून केलेले सामाजिक कार्य अतुलनीय आहे..... उपेक्षा आणि दारिद्रयातून स्त्री बाहेर आली तर ती जागतिकीकरण करू शकते.... नीलिमा मिश्रा यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न केले..... महिला शक्तीला व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले...... या बळावर जे काम उभे राहिले त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलेली आहे..... आता आपली जबाबदारी आहे हे असे काम करणाऱ्याना मदत करण्याची, प्रोत्साहन देण्याची, त्यांच्याबरोबर काम करण्याची..... समाजाला आपलेही काही योगदान देण्याची..... 

   मित्रांनो.... आपल्या भारताची शोकांतीका म्हणजे भ्रष्टाचार करणाऱ्यांची संख्या वाढते आहे..... समाज सेवा हि ईश्वर सेवा म्हणणारे कमीच आहेत..... हि संख्या वाढवावी लागेलच..... प्रत्येकाने सुट्टीतला १ तास जरी समाजाला द्यायचे ठरवले.... तरी सर्व समस्या सुटतील.... पैशाची व मार्गदर्शन करणारे लोकांची कमतरता नाही.... पण ग्राऊँड लेवलवर उतरुन काम करणाऱ्यांची कमतरता आहेच.... आज विचार प्रवर्तक लोकांची समाजाला आत्यंतिक गरज आहे.... माझी सर्व विचारवंतांना विनंती आहे..... कि तुमचा आठवड्याचा किमान १ तास तरी द्यावा.... हाच खऱ्या अर्थाने समाजसेवकांना त्रिवार सलाम असेल नाही का..... अशा असंख्य नीलिमा मिश्रा या भारतात आहेतच.... त्यामुळेच इतक्या भ्रष्टाचारामुळे सुध्दा देश लोकशाही प्रधान देश म्हणुन ओळख ठेऊन आहे..... 

   समाजसेवेसाठी काहिच कष्ट लागत नाहीत.... हे मत आहे समाज सेवा करणाऱ्यांचे आणि ते खरेही आहे..... पण.... पण.... ज्यांना समाजाशी काही देणे घेणे नाही.... त्याच्यासाठी समाजसेवा हे खुप अवघड काम आहे अगदी त्यांचे कामच नाही.... अशातले ते काम आहे.... आणि खेदाने असे म्हणावेसे वाटते..... त्यांनी त्यासाठी प्रयत्नही करु नये..... कारण त्यासाठी किंमत चुकवावी लागते..... आणि ती किंमक फक्त 26 लाख किंवा त्यापेक्षा जास्त किंवा कमीही असु शकते.... 

   बघा, सामाजिक सेवा आणि राजकारण हे दोन्ही वेगवेगळे प्रांत आहेत..... ज्याला राजकारण जमेल त्याला समाजकारण जमेलच असं नाही..... तसंच ज्याला समाजकारण जमेल.. त्याला राजकारण जमेल... असंही नाही.... त्यामुळे ज्याचे काम त्याने करावे हेच उत्तम..... लहानपणी चांगले संस्कार घडले... तर एक दिवस आपले राजकारणीही बदलू शकतील.... आणि देशाची चांगली सेवा करतील..... पण तसे चांगले संस्कार आजचे आई वडील करीत नाहीत.... असं खेदाने म्हणावसं वाटतं.... 

  भावी / तरुण पिढीवर उत्तम संस्कार हे आज तुमच्या हातात आहे.... तरुण पिढीवर अनैतिक मार्गाने पैसे कसे मिळवाल (हेच खरे धंदा कौशल्य असे शिकवून) असे संस्कार होऊ नयेत..... आज प्रत्येक भारतीयाने फुल ना फुलाची पाकळी प्रमाणे समाजकार्यास हातभार लावला.... तर नक्कीच आजची रोजगारा अभावी होणारी उपासमार टाळता येईल.... आणि पर्यायाने देशाला उन्नत करता येईल.... बघा, काट्या-कुटयात फुल उमलू शकत... तसच समाजकार्य करणाऱ्या लोकांबाबत म्हणावं लागेल..... आज भ्रष्टाचार माजत असताना, पैश्यासाठी माणूस क्रूर होत असताना असे लोक चांगला आदर्श निर्माण करतात... स्वःताचा आदर्श ठेवतात.... 

   चला, आपणही त्यांचा आदर्श ठेऊ.....आपणा सर्वांची ही जबाबदारी आहे..... आपल्या पैकी बरेच वयाने तरुण आहेत आणि बरेच मनाने.... आपण सगळ्यांनीच आज हा संकल्प करुया...... भारताला बलशाली बनवूया.... स्वामी विवेकानंदानी आपल्याला दिलेल्या सुंदर, संपन्न आणि सुयोग्य भारताच्या स्वप्नाची स्वतःला आठवण करून द्या.... ते स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करुया.... सदाचार आणि प्रामाणीकपणाची एक अशी लाट येऊ दे.... जी संपूर्ण देशभर पसरेल..... 

   अत्यंत जागरुकपणे आणि तळमळीने आपण देशाला पुढे नेऊ या.... स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील गौरवशाली भारत बनवण्यासाठी आपण प्रयत्न करुया....

ॐ श्री गुरुदेव दत्त......

Thursday, 4 October 2012


गणपत्ती बाप्पा मोरया.... 
लोकमान्य टिळकानी समाज प्रबोधन व समाज जागृतीसाठी गणेश उत्सवाची परंपरा सुरु केली होती…. पण आजच्या गणेश उत्सवातुन काय प्रबोधन होत आहे हे तो गणपती बाप्पाच जाणो...  खरे म्हणजे लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव कशाकरता सुरु केले.... तर मरगळलेल्या समाजात चैतन्य आणण्यासाठी आणि प्रत्येक मनात स्वातंत्र्याची उर्मी जागवण्यासाठी.... पण आजकाल आपण या उत्सवाचे जे बीभत्स रूप पाहतो आहे.... आणि  ते पुन्हा एकदा हा समाज जागा होऊन परत झोपी गेल्याचेच द्योतक आहे.... खरे म्हणजे गणराय शीघ्रकोपी दैवत आहे.... मा दुर्गेपेक्षा हि भयंकर कोपिष्ट.... अशा या दैवताला जणू आपापली दुकाने चालवण्याच्या दृष्टीने या लोकांनी उभे केले आहे..... आणि या मुळेच आपल्याला देशाची अशी अवनती झालेली दिसते....
देवा वर कितपत श्रद्धा ठेवावी... हे प्रत्येकाच्या दृष्टीकोनाचा भाग आहे.... पण, बरेच असे लोक आहे ते अंधश्रधेत वावरतात.... आणि देवाच्या नावाखाली लुबडणारे लोक अंधश्रधेच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांना चांगलेच  लुबडतात.... देवावर श्रध्दा असावी... अफाट श्रध्दा असावी... पण अंधश्रध्दा कधीच  नसावी..... भक्त देवाच्या दर्शनासाठी दुरून दुरून येतात.... पण अशा देवस्थानाच्या आजुबाजुला असणारी दुकाने, स्टॉल, वैगेरे.... हे मात्र जणु काही भक्तांना लुबडण्यासाठीच बसलेले असतात..... श्रध्देपोटी भक्त ही या गोष्टींचा विचार नाही करत.... आणि देवावरच्या श्रध्देपोटी स्वत:ला लुबाडुन घेतात.... मग या प्रकारात शिक्षित, अशिक्षित लोक सुद्धा असतात.... कळतय पण वळत नाही अशी अवस्था झाली आहे.... देव हा प्रत्येकाच्या मनात असतो.... मानल तर आहेच अन नाही मानल तर नाही....
आज, अशी बरीच गणेश मंडळ आहेत की ते या गणेश उत्सवात सत्कार्य करतात.... जेणे करून आपल्या समाजातील लोकांमध्ये काहीतरी संदेश पोहचावा..... पण त्याचबरोबर बरीच अशी सुध्दा मंडळे आहेत..... कि जे आधी चांगले काम करणारी मंडळे नंतर फायदा तोटा पाहू लागतात.... देवाच्या नावा खाली आपला काय फायदा होईल.... याचा विचार करणारी, आज प्रत्येकाने विचार करायला हवा खरच हे योग्य आहे का ?....  आपण खरच सुशिक्षित असुन ही आशा भोंदु माणसांच्या जाळ्यात अडकतो ते का?
आज, बाप्पाच्या दर्शनासाठी ९-१० तास रांगेत उभं राहून ताटात अगरबत्तीचा पुडा, भला मोठा हार, नारळ आणि मिठाईचा पुडा हे सारं देवाच्या चरणी अर्पण केलं.... कि आपले सारे मनोरथ पूर्ण होतील..... अशी भाबडी आशा बाळगणारे मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत....आपल्या मंडपातील उंचच उंच वैभवी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी दहाही दिवस दर्शन घेणाऱ्यांच्या  लांबच लांब रांगा लागतात..... हे दृश्य संयोजकांना खूप अभिमानास्पद वाटते....  या 'दर्शन गर्दीला' रोखण्यासाठी.... त्यांच्या व्यवस्थेसाठी पोलिसांचा ताफा मुद्दाम बोलवावा लागतो.... हि घटना आजच्या आयोजकांना गौरवशाली वाटते....
बघा, राज्यात विजेची टंचाई असतानाही लाखोंची विद्युत रोषणाई, प्रदूषणाने आधीच कहर केलेला असूनही कानठल्या बसवणारा वाद्यांचा गोंगाट याची खरच गरज आहे का हा वादग्रस्त मुद्दा.... खर्चाचे डोंगर खर्चून दहा दिवस गर्दी खेचून आयोजकांना होणारा आनंद हा कोणत्या कोटीचा समजावा हे अजून आपल्याला समजले नाही....  नवसाला पावणारा गणपती... म्हणून दहाही दिवस, दिवस रात्र हातात नारळ, हार, पेढे घेऊन दर्शनासाठी तिष्ठत राहून गर्दीत सामील होणे.... हि माणसाच्या आयुष्यातील इति कर्तव्यात समजावी काय हा सर्वात मोठा प्रश्न ? 
प्रचंड उंचच उंच मूर्ती, उदंड खर्च आणि अखंड गर्दी जमविणारे असे हे गणेशोत्सव आयोजित करता येणे.... हे या एकविसाव्या शतकातील सुशिक्षित-अशिक्षित भारतीयांचे आयुष्यातील सर्वोत्तम व सर्वश्रेष्ठ असे एकमेव उदिष्ट असेल तर हि दुर्दैवाची गोष्ट आहे.... हसणे, गाणे, नाचणे, ओरडणे आणि गुलाल उधळून जयजयकार करणे..... एवढेच माणसाच्या आयुष्याचे फलित असते काय ? बघा विचार करा.....
शिवपुत्र गणेश बाप्पाला अशी हि संकट परीहारार्थी व आशाळभूतांची रांग बघून खरेच आनंद होत असेल काय ? तो तुंदिलतनु मोरया या गर्दीच्या मनोकामना पूर्ण करीत असेल काय ?  तो या सर्व सामान्य गणेशभक्तांचे कल्याण करण्यासाठी आपल्या सिंहासनावरून खाली उतरून कार्यरत होत असेल काय ? या सर्व संबंधित गणेशभक्तांना तो दीनांचा कैवारी बाप्पा खरच संकटमुक्त करीत असेल काय ? कसली साधना , उपासना , आराधना , तपस्या व टोकाची समर्पणशील भक्ती न करताच तो कृपासागर बाप्पा या दीनजनांवर कृपेचा वर्षाव करीत असेल काय ? तो तुंदिलतनू मोरया या गर्दीच्या मनोकामना मोदक-पेढे आणि सुवर्ण मुकुट आणि रत्नहारांच्या मोबदल्यात , पूर्ण करीत असेल काय ? या सर्व प्रश्नांचे उत्तर ' नाही ' असे आहे.... हे लवकरात लवकर लक्षात घ्या आणि पराधीन, परवश, परतंत्र न होता.... तुम्ही प्रथम स्वयंपूर्ण, स्वतंत्र व आत्मनिष्ठ व्हा.... त्यातच तुमचा विकास व प्रगती आहे याची नोंद ठेवा..... 
तुम्हीच तुम्हाला एकदा असा प्रश्न विचारा की , ' मी असंख्य वेळा , अनेक वर्षे मंदिरात देवाच्या दर्शनासाठी गेलो... पण त्याने कधी आपल्याला बोलावले होते का....  तो कधी आपणहून आपल्या घरी आला होता का....  आपण पुंडलिक , नामदेव , एकनाथ , रामदास की तुकाराम आहोत.... ?  थोडा विचार करून अंतर्मुख झालात तर विकास तुमचाच होईल....  आणि मग तो मंगलमूर्ती तुमचाच सेवक होईल,  अशी खात्री बाळगा....
तुम्हाला खरच देवासाठी काही करायचे असेल तर.... देवाच्या नावाने अनाथ आश्रमाला मदत करा.... गोरगरिबांना मदत करा.... नक्कीच मनाला समाधान लाभेल तुम्हाला.... अन तुमचा पैसा, मदत कुठेतरी कारणी लागल्याच सुख मिळेल.... कारण या गोष्टींसाठी प्रत्यकाला मेहनत ,कष्ट घ्यावे लागते.... अन आपली मेहनतीचे, कष्टाचे माती मोल होऊ नये.... याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल....
माझ्यामते, बुद्धी गहाण टाकून कर्मकांडाच्या व दैववादाच्या मागे धावणारा आजचा समाज आहे..... म्हणूनच आजच्या समाजाला विचारप्रवर्तक माणसांची खूप गरज आहे.... म्हणूनच प्रथम स्वयंपूर्ण, स्वतंत्र व आत्मनिष्ठ व्हा.... त्यातच तुमचा विकास व प्रगती आहे याची नोंद ठेवा..... ज्यांच्याकडे अफाट परिश्रम करायची तयारी आहे.... ज्यांच्याकडे प्रचंड जिद्द आहे.... आणि ज्यांच्याकडे आयुष्यात काहीतरी करायची महत्वाकांक्षा आहे.... आणि ज्यांची ईश्वरावर अपार श्रद्धा आहे अशा भक्तांवरच परमेश्वराची अखंड कृपा राहते..... 
कल्याणमस्तु!
ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Sunday, 16 September 2012


सरकार खाते तुपाशी.... महागाईने जनता उपाशी....

आज महागाई कुणालाच सोडत नाही..... बघा, आपल्या भारतीय राजकारणामध्ये सामान्यांच्या हिताच्या गप्पा केल्या जातात..... मात्र सर्वसमान्यांचेच अहित कसे केले जाईल याचा विचार केला जातो असे दिसते..... आजच्या गॅस - डिझेल दरवाढीने नेमके हेच साध्य केले आहे..... मालवाहतूक महागली की सर्वच वस्तु महाग होतील अन् सामान्यांना फटका बसेल.... 

महागाईमुळे बेहाल अगोदरच सुरू आहे..... आज अन्नधान्याच्या किमती वाढल्या आहेतच..... मात्र, त्याचा फायदा शेतकऱ्याना मिळत नाही हे देखील एक कटू वास्तव.....पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, महाग झाले की त्याचा जीवनावश्यक वस्तुच्या किमतीवर फरक पडतो..... आधीच पावसामुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाले असतानाच दुष्काळात महागाईचा तेरावा महिना, अशी स्थिती सर्व सामान्यांची झाली आहे.....

आज परिस्थिती खूपच तणावपूर्ण..... एका बाजूला डिझेलच्या दरवाढीने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ होण्याची धास्ती आणि दुसरीकडे वर्षातून सहाच गॅससिलिंडर नियमित दराने देण्याच्या निर्णयाने सर्वसामान्यांचे जगणेच कठीण झालंय..... वाढत्या महागाईने आधीच सर्वसामान्य हैरान आहेत..... सर्वच जनतेला प्रश्नच प्रश्न डोळ्यासमोर दिसू लागले आहेत.....

सर्वच क्षेत्रात महागाई वाढल्याने सर्व सामान्यांनी जगायचे तरी कसे ....? इंधनाच्या किमतीत भाववाढ झाल्याने आता सगळ्याच किमती वाढणार.... गॅस सिलेंडर तर न परवडणारे झाले आहे.... सर्व सामान्यांनी काही खरेदी करायचे की नाही...? आज अशा या महागाईत हातावर पोट भरणार्यांवनी करायचं काय...? मजुरीतून पोरांचं शिक्षण करायचं की पोटाला पोटभर खायचं...? मजुरी वाढत नाही, पण जीवनावश्यक वस्तूंचे भाव मात्र दररोज वाढत आहेत..... अशावेळी सरकारनं मदत करायचं सोडून महागाईचे चटके द्यायचा मात्र सपाटा लावलाय....

आज दुर्दैवीपणे असे चित्र आहे.... कोणत्याही सत्ताधारी सरकारला निवडणुकांनंतर आपलेच सरकार यावे..... याव्यतिरिक्त जनतेच्या त्रासाशी काहीही घेणे नाही.... जेव्हा हवे तेव्हा भाव कमी..... नाहीतर वाढवुन.... जेव्हा निवडणुका असतात.... तेव्हा जागतिक बाजारपेठेतील वाढलेल्या भावाबद्दल या तेल कंपन्या काही बोलत नाहीत..... म्हणजे सत्तेवर असणारे ते कोणीही असो.... भाववाढ स्वपक्षाचे हित व निवडणुका पाहून केली जाते..... 

सरकार दरवाढीला नेहमीच जागतिक बाजारपेठ, रुपयाचे अवमूल्यन, विकासदर अशी अर्थशास्त्रीय कारणे देते..... भारतातील सर्वासामान्य माणसाचा यामध्ये विचार केला जात नाही.... महागाई कमी का होऊ शकत नाही.... याची प्रमुख कारणे म्हणजे सदोष करपद्धती.... कमोडिटी मार्केटमधील सट्टेबाजी आणि ‘इझीमनी’मध्ये गेल्या काही वर्षांत झालेली वाढ (भ्रष्टाचार)..... उलट आपला विकासदर, रुपयाचे अवमुल्यन टाळण्याचे कीतीतरी उपाय चांगल्या सकारात्मक कल्पकतेने केल्यास भारताचा कायापालट होऊ शकतो.... हवी फक्त मानसिकता, देशाभिमान, त्यागी वृत्ती, जिद्द..... यासाठीच आजच्या तरुण पिढीने विवेक विचार आत्मसात करणे गरजेचे ठरते.....

बघा, सरकार डीझेल - पेट्रोलच्या किंमती कितीही वाढू देत.... शेवटी प्रश्न आहे तो परवडण्याचा..... आणि दोनच प्रकारच्या व्यक्तींना कोणतीही किंमत परवडू शकते.... आणि त्या प्रकारच्या व्यक्ती म्हणजे राजकिय पक्षात / सरकारी नोकरीत एखादी महत्त्वाची जागा धरून ठेवणारा आणि सरकार मध्ये मंत्रिपद भोगणारा दोघांनाही स्वतःची गाडी वापरण्याचीच काय विकत घेण्याची सुद्धा गरज नाही.... आता जनतेकडे या सर्व बाबींवर जन आंदोलनाशिवाय पर्याय दिसत नाही....

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Friday, 14 September 2012

New Presentation of Thoughts By Chetan K....    

Never give up, hope is aways there whatever hapened….. Magic of hope is believing in yourself…. If I start something, I will finish it and do it well… Nothing is out of your reachas long as you believe…. Know that our greatest glory is not in never failing, but in rising up every time we fail…. seize every moment…. Stop… look…. & listen…. And never give up….. ॐ श्री गुरुदेव दत्त .....

जग जिंकायचं असेल तर प्रथम स्वःताच मन जिंका.... मन पूर्णपणे निस्वार्थी असणे हेच प्रमुख ध्येय राहू द्या.... शरीराची, बुध्दीची आणि मनाची हीच खरी श्रीमंती असते.... जर ती आपल्याकडे असेल तर विश्वास आपोआप निर्माण होऊन खरा आनंद निर्माण करते.... ॐ श्री गुरुदेव दत्त ..... 

आज आपला हाच संकल्प..... स्वतःच्या परिश्रमाने स्वतःला जागृत करणे..... स्वतःचे आत्मनिरीक्षण करा.... आत्मसुधारणा करा.... आनंदात जीवन व्यतीत करा..... तुम्ही स्वःताच स्वतःचे शिल्पकार बना....  ॐ श्री गुरुदेव दत्त ..... 

सध्याच्या ताणतणावपूर्ण जीवनात जास्तीत जास्त आनंदी, आरोग्यपूर्ण राहण्यासाठी, मनाची चांगली मशागत करणारी स्वामी विवेकानंद यांचे विवेक विचार ही गुरुकिल्ली आहे..... समर्थ रामदासांनी दासबोधात म्हटलेच आहे.... धकाधकीचा मामला। कैसा घडे अशक्ताला।.... नाना युक्ती शक्ताला। म्हणोनि सिकवाव्या।।..... श्रीराम....

All truths are easy to understand once they are discovered... Real Truth is... we make them cry who really care for us.... We cry for those who never care for us.... And we care for those who never cry for us.... know this is the truth of life, Its strange but true.... and Once we realize it.... Remember that.. Its never too late to change.... ॐ श्री गुरुदेव दत्त .....

If you wait to do everything until you're sure it's right,….. you'll probably never do much of anything...... The key to change... is to let go of fear.... ॐ श्री गुरुदेव दत्त .....


Education is the most powerful weapon which you can use to change the world.... know that Education is a progressive discovery of our own ignorance.... Remember that Intelligence plus character.... that is the goal of true education.... ॐ श्री गुरुदेव दत्त .....


आपण काही जन.... एकत्र काही क्षण.....
शोधुया आपापले मन.... मिळवू अमूल्य विचारधन..... ॐ श्री गुरुदेव दत्त ..... 

नको धन्यवाद.... घडो सुसंवाद.... वाढवूनी मनशक्ती.... पेटवूया ज्ञानज्योती....  ॐ श्री गुरुदेव दत्त .....


आपली पृथ्वी असे अनमोल.... राखावा पर्यावरण सृष्टी तोल.... 
जाणुया काळाची गरज.... करुया उर्जा संवर्धन..... 
अक्षय उर्जा वारा सूर्य.... पर्यावरण उर्जा नवे पर्व..... ॐ श्री गुरुदेव दत्त .....

नको नको धन्यवाद.... घडो नित्य सुसंवाद.... घालू अंतरी साद... ऐकू चला अंतर्नाद.... ॐ श्री गुरुदेव दत्त ....


Believe in yourself.... If you don't believe in yourself then who else will believe in you.... Don't just think that you're the best.... prove it to yourself....Whenever you find yourself doubting how far you will go.... just remember how far you have come.... Remember everything you've faced.... All the battles you have won.... All the fears you've overcome....Remember the moments that came before, when you had this same doubt and overcame it.... You can go as far as you let yourself go.... but in this journey... always keep in mind that man should never neglect his family for business.....  ॐ श्री गुरुदेव दत्त....

I know I am Wise, Fearless and Strong..... Because I know myself.... and I was put here for a reason.... We all were... We've all been given a gift, the gift of life..... What we do with our lives is our gift back..... ॐ श्री गुरुदेव दत्त....



यशस्वी नात्याचे आधारस्तंभ...
मन बुद्धीसह अहंकाराचे स्फुरण | श्वासांचा उगम जेथोनि रे ||
चित्तवृत्ती होवू दे, सरळ निर्मळ | परपीडा गरळ, टाकी वेगी ||
जाईन मी प्रेमे, तिथे माय माझी | भक्तजन वत्सल सद्गुरु राय ||
जिव्हेचे रमण रामरंगी होवो | स्मरण सोहम् भावे सर्वकाळ ||
जगातला प्रत्येक जीव एकमेकाशी एका अदृश्य धाग्याने जोडला गेला आहे.. असं अध्यात्म सांगतं.... यातील मैत्री नातेसंबंध म्हणजे माणसाच्या अस्तित्वाचा पाया.... नात्याची अंत:प्रेरणा ही माणसाला मिळालेली अद‍्भुत भेट आहे.... जगातले सगळे जीव या सूत्रात बांधले गेले आहेत..... जे. कृष्णमूर्ती म्हणतात, “To be is to be related and to be related is to be in conflict....”.... दोन माणसं एकत्र आली की त्यांच्यात विसंवादाचं का होईना, पण एक नातं निर्माण होतंच..... मात्र माणसा-माणसामधलं नातं क्वचितच निकोप आणि सहज असतं.... कारण खूपवेळा ते निरपेक्ष नसतं.....
कधी कधी एखादी अनपेक्षित घटना व्यक्तीला अंतरबाह्य बदलून टाकते.... अनेक वेळा आपण आपल्या एखाद्या नात्याचा आणि व्यक्तीचा जो विचार करत असतो... त्याला धक्का बसून आपला दृष्टीकोन पूर्णतः बदलून जातो.... आपल्याच काही भावना एक मोठ प्रश्न चिन्ह घेऊन समोर येतात मग त्याची उत्तर शोधताना मनाची प्रचंड दमछाक होते.... खरच खर प्रेम म्हणतात ते असत का ह्या जगात..?.. की अनेकवेळा भावनिक गरजांच्या खेळाला प्रेमाच गोंडस रूप देऊन आपण मोकळे होतो..?.. असा प्रश्न सामोरा येतो....
व्यवहाराच वर्गीकरण आपण करू शकतो... पण प्रेमाच तस करता येत नाही.... विशिष्ट संवेदना म्हणजे प्रेम अस... आपण नाही म्हणू शकत.... प्रेमाची अनेक रूप अनेक भावनिक पदर ते उलगडणे खूप कठीण.... प्रेमात जस आधी मी म्हटलं, की सगळ्यात महत्वाचा असतो तो आपल्या प्रेमाविषयी आणि व्यक्तीविषयी आदर.... हा आदर असतो त्या व्यक्तीच्या भावनांचा, त्याच्या आपल्याविषयी असलेल्या संवेदनेचा.... आपल्याच व्यक्तीचा अपमान जेव्हा आपण सहज करून मोकळे होतो... तेव्हा त्याला लागणारी भावनिक ठेच आपण कल्पना करू शकत नाही.... व्यक्ती जवळ असो की दूर कुणीतरी आपल्याशी आणि आपण त्याच्याशी प्रेमाच्या नात्याने निगडीत आहोत.... अस जेव्हा माहित असत, तेव्हा आपल्या मनावर संयम असण... ही तर अतिशय महत्वाची गोष्ट.... चंचलता नात्याला लौकर ग्रहण लावते....
पर्याय म्हणून आपल्या व्यक्तीचा विचार करण... हा त्यांच्यावर नकळत केलेला अन्याय असतो आणि सगळ्यात महत्वाच आपल्या व्यक्तीची मनापासून घेतलेली काळजी.... प्रेम हे भावनिक दृष्ट्या कुणावरतरी आणि कुणीतरी आपल्यावर अवलंबून रहाण आहे आणि जेव्हा हे माहित असत... तेव्हा होता होई तो त्या व्यक्तीची आणि त्याच्या हिताची काळजी हा आपल्या कर्तव्याचाच एक अविभाज्य भाग असतो.... वरील पैकी एका जरी गोष्टीला तिलांजली दिली गेली तर प्रेम कोमेजून जात.... परिस्थिती आणि वेळ कशीही असली... तरी आपल्या व्यक्तीच्या आत्मसन्मानाला ठेच पोचणार नाही... ह्याची काळजी घेण खूप गरजेच.... पण शेवटी आत्मसन्मान हा देखील अहंकारच त्याला मैत्रीच्या नात्यापेक्षा किती महत्व दयायचे हे व्यक्तीच्या विचार प्रगल्भतेवर अवलंबून असते....    
तुझ्यावाचून माझ काहीही अडत नाही... ह्या शब्दांपेक्षा तू आहेस म्हणून मी आहे... हे शब्द त्या व्यक्तीची तुम्हाला असलेली गरज अधोरेखित करत.... एकमेकांना एकमेकाची गरज ही असतेच....  हे सगळ पुस्तकी वाटत, पण पण खऱ्या अर्थाने तीच नाती बहरतात... ज्यात ह्या गोष्टी अंतर्भूत असतात.... शब्द आणि आपली वागणूक ह्याचा ताळमेळ असायला हवा.... अर्थात ज्यांना आपल प्रेम आणि व्यक्ती हवी असते तिथेच हे घडू शकत.... अन्यथा बोलायचे एक आणि करायचे एक.. अशी वृत्ती असेल तर.... काळाच्या ओघात वाहून जाणाऱ्या अनेक नात्यांपैकी एक नात... म्हणून प्रेम आयुष्यात आठवण म्हणूनच रहात….
त्याचप्रमाणे आपल्या जवळच्या व्यक्तीच्या एखाद्या कृत्याचा काहीवेळा काहीजण चुकीचा अर्थ घेऊन.... त्या कृत्यामुळे त्याच्याबद्दलचे मत काहीजण चुकीचा घेत असतील... तेव्हा त्याच्या त्या कृत्याबदलची दुसरी बाजू त्याला दाखवणे.... म्हणजे त्या व्यक्तीकरता आपल्या मनात असणारी आदराची भावनाच दर्शवते असे मला वाटते.... कारण ती बाजू दाखवण्यामागे हेतू एवढाच असतो कि त्याचा तो आदर सर्वांनी करावा....
काहीवेळा त्यात त्या व्यक्तीचा अपमान व्हावा असा केव्हाही हेतू नसतो.... पण काळजीपोटी, आपलेपणामुळे ती व्यक्ती चुकत असेल, तर योग्य भान येण्यासाठी प्रेमापोटी ती केलेली कृती असू शकते.... इथे प्रेम अतुच्च्य दर्जाचे असते.... कारण आपल्या निर्मळ प्रेमापोटी ती व्यक्ती अयोग्य मार्गी वळू नये.... यासाठी आपण केलेले आपल्या नात्याचे बलिदान असू शकते.... माझ्याबद्दल काही का वाटेना, माझे काही होवो, पण तू चुकू नकोस.... हाच समर्पण भाव या निर्मळ वैश्विक प्रेमात असतो....  अशा व्यक्ती या दुसऱ्याचा आधी विचार करणाऱ्या, प्रेमळ, संवेदनशील, हळव्या आणि खुपश्या दैवीदृष्ट्या द्रष्ट्या असतात.... आणि मग अशा व्यक्तीबाबत खूपवेळा गैरसमज लवकर होतात.... कारण त्यांचा खरेपणा या जगाला मान्य नसतो.... एवढे निस्वार्थ कोणी असेल का..?.. असा प्रश्न स्वार्थी जगाला पडतो.... आणि ती व्यक्ती नाकारली जाते.... खोटारडी म्हणून अवहेलना तिची होते.... अहंकारी-मोठा आव आणणारी म्हणून निंदा केली जाते.... अशावेळी ती व्यक्ती काही बोलली तरी ते मान्य होत नाही... मग ती एवढेच बोलू शकते....                             खर सांगू का..?.. माझ्याजवळ फक्त खरेपणा आहे....
कुणाला काही वाटेल, पण असं.... जगणं फार कठीण आहे...
      माझ्या दृष्टीने जीवनाचा प्रवास पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या सद्गुरूंच्या शिकवणीनुसार वागायला हवे.... आयुष्यात दोनच गोष्टी जपायच्या... सत्व आणि तत्व हेच खरे.... मग आपण कधीच भरकटत नाही वा घाबरत नाही.... चराचरात परमेश्वर आहे हे जाणायला हवे.... एखाद्या व्यक्तीचे गुण आणि स्वभाव... यामुळे त्यांच्यातील अंतर्यामीकडे पाहतांना मनाला विचलित होऊ देऊ नये.... आपला सभोवताल हा केवळ आपल्या स्वतःच्याच विचारांचे आणि कृतींचे प्रतिबिंब असते.... जर आपण चांगले असलो तर जग चांगले दिसते.... आणि जर आपण वाईट असलो तर सर्व वाईट भासते.... जर आपण आपले मन शुद्ध केले तर सर्व जगही निर्मळ सुंदर असे बनते....
बहुतेक वेळा आपण समोरच्या व्यक्तीकडे सोयीच्या दृष्टिकोनातूनच पाहतो.... नातं जुळलंच तरी ते व्यक्तीसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष असतं.... सगळं अनुकूल असेल, तरच ते टिकून राहतं.... अशा नात्याने व्यक्ती म्हणून आपण समृद्ध होऊ शकत नाही.... ज्या नात्याने आपण झळाळून उठतो, जे नातं जोडणं किंवा तोडणं आपल्या हातात नसतं ते नातं एकच.... माणसाचं आणि ईश्वरी तत्त्वाचं.... गुरुचे आणि शिष्याचे.... गुरुतत्वाचे आणि साधकाचे.... त्वमेव माता च पिता त्वमेव... त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव....
ईश्वर, सद्गुरू मानणारे त्याची रूपं आयुष्यात आलेल्या प्रत्येक घटकाच्या माध्यमातून अनुभवतात.... जर हे नाते खरोखरीचे असेल तर ते निरपेक्ष असतं.... कदाचित म्हणूनच या नात्याची कसोशी टिकून राहते, मैत्रभाव उधळून दिला जातो.... या नात्यात ऋजुता असते, अहंकार नसतो.... या नात्याला अनेक विविध पदर असू शकतात.... या नात्यांतलं सौंदर्य कायम राहतं.... कारण यामागे अपार श्रद्धा असते.... श्रद्धा हाच यां नात्याचा मूळ गाभा असतो..... या साऱ्या नात्यांत फक्त देणं असतं, घेणं नसतं.....      
आपण नेहमीच योग्य विचार करतो असा काहीसा गैरसमज प्रत्येकाच्या मनात असतो.... परंतु कधीतरी असही घडत की समोर घडलेली घटना आपण किती चुकीचे होतो हे दाखवून देते.... अशा वेळी गरज पडते ती आपल्याच विचारांचे ऑडीट करण्याची.... टाळी कधीच एका हाताने वाजत नाही आणि ह्या दोन हातात एक हात आपलाही असतोच.... खूप वेळा एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवून आपण मोकळे होतो, परंतु ह्या सगळ्यात आपण कुठे चुकलो त्याची शहानिशा करायची गरज आपल्याला कधीच वाटत नाही.... आपला स्वाभिमान, आपल्या अपेक्षा ह्यांना ठेच पोचली... की दुसऱ्या व्यक्तीच्या भावनांची कदर आपणही करायला हवी होती हे लक्षात येत.... बघा, पण खूपवेळा असे होते... काहीजण लगेच सावरून घ्यायला तयार होतात, कारण चूक झाली, मान्य केली, झाल गेल विसरून जाउया... या मताचे ते असतात.... आणि खूपवेळा समोरचा भानावर येण्यासाठी किंवा अयोग्य चुकीच्या मार्गात अडकू नये म्हणाच ती कृती असते.... पण जे वारंवार चुका करतात, ती व्यक्ती मुळात अहंकारी, हट्टी, दुराग्रही, माझे तेच खरे अशी असू शकते.... अशी माणसे चूक, दोष मान्य न करता.... माझे काही होवो मी माझे तेच खरे करणार अशी टोकाची भूमिका घेऊन नाते तोडतात.... अशी माणसे जीवनात यशस्वी होत नाहीत.... खरे यश त्यांनी कधीच पाहिलेले नसते... कारण काम करताना, समाजात राहताना ते टीम वर्कने काम करू शकत नाहीत.... 
        
    नाती का तुटतात..?.. ह्याच अनेकदा बीज ह्यातच असत.... जी व्यक्ती मनापासून तुमच्यावर प्रेम करते तिला सतत गृहीत धरून चालण, ती एखाद्या गोष्टीने दुखावते ते माहित असूनही तीच गोष्ट करून... त्यांची आपल्या आयुष्यात काहीच किंमत नाही.... हे अप्रत्यक्षपणे त्याला दाखवून देण आणि सगळ्यात महत्वाच त्यांना सतत दुर्लक्षित करून इतरांना महत्व देण.... टीम वर्कला काहीच महत्व न देणे.... खर तर कुणीतरी आपलंच आपल्यासाठी थांबलेलं असत, आपल्या सहवासासाठी, शब्दांसाठी आसुसलेल असत.... ते आपल्यावर भावनिकदृष्ट्या अवलंबून आहेत.... हे माहित असूनही आपण आपल्याच व्यक्तीच्या ह्या सगळ्या गरजांना दुर्लक्षित करतो.... पण ह्या सगळ्यात आपण अतिशय अमुल्य अशी गोष्ट गमावतो ते म्हणजे खऱ्या अर्थाने "आपल माणूस"….एकदा तरी ह्या गोष्टीचा विचार करावा.... एकदा तरी ह्या चुकीच्या विचारांचं ऑडीट कराव आणि शिलकीचा जमाखर्च होईल अस आयुष्याच अकाऊट बनवावं….
माणसांचं आपसातलं नातं इतकं सहजसोपं व्हायला हवं असेल, तर एकमेकांचा गुण-दोषासकट स्वीकार करता यायला हवा.... फक्त एकाने तो स्वीकार करून उपयोग नाही ते दोघांकडून झाले पाहिजे.... एकमेकांना दिलेला वेळ, शब्द, शुध्द-निर्मळ व्यवहार, एकमेकांवरील विश्वास, श्रद्धा, आश्वासकपणा आणि एकमेकांपासून काही न लपवणे.... हे कोणत्याही यशस्वी नात्याचे आधारस्तंभ असतात..... नातेसंबंधाच्या बाबतीत हे समजून घ्यायला हवं की आपल्याला जे हवं आहे ते आपण कधी दुसऱ्याला दिलं का..?.. (आपुलकी, जिव्हाळा, आदर) हे उमजलं तर तो खरा मैत्रभाव.... तो जपला तर आपसूक माणूस निर्वैर होऊ लागतो.... वात्सल्य, क्षमाशीलता, करुणा, कळकळ हा त्याचा स्वभावधर्म होतो.... मनातला मैत्रभाव बाह्य व्यक्तिमत्त्वात दिसतो....  अवघं जगणं सुंदर होऊन दडलेला नात्याचा खरा अर्थ गवसतो.... अशी पांखरून छाया, लावोनिया माया | आनंदाचे आसू लावी कोण ओघळाया ||....

ॐ श्री गुरुदेव दत्त....