Thursday 4 October 2012


गणपत्ती बाप्पा मोरया...
लोकमान्य टिळकानी समाज प्रबोधन व समाज जागृतीसाठी गणेश उत्सवाची परंपरा सुरु केली होती…. पण आजच्या गणेश उत्सवातुन काय प्रबोधन होत आहे हे तो गणपती बाप्पाजाणो...  खरे म्हणजे लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव कशाकरता सुरु केले.... तर मरगळलेल्या समाजात चैतन्य आणण्यासाठी आणि प्रत्येक मनात स्वातंत्र्याची उर्मी जागवण्यासाठी.... पण आजकाल आपण या उत्सवाचे जे बीभत्स रूप पाहतो आहे.... आणि  ते पुन्हा एकदा हा समाज जागा होऊन परत झोपी गेल्याचेच द्योतक आहे.... खरे म्हणजे गणराय शीघ्रकोपी दैवत आहे.... मा दुर्गेपेक्षा हि भयंकर कोपिष्ट.... अशा या दैवताला जणू आपापली दुकाने चालवण्याच्या दृष्टीने या लोकांनी उभे केले आहे..... आणि या मुळेच आपल्याला देशाची अशी अवनती झालेली दिसते....
देवा वर कितपत श्रद्धा ठेवावी... हे प्रत्येकाच्या दृष्टीकोनाचा भाग आहे.... पण, बरेच असे लोक आहे ते अंधश्रधेत वावरतात.... आणि देवाच्या नावाखाली लुबडणारे लोक अंधश्रधेच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांना चांगलेच  लुबडतात.... देवावर श्रध्दा असावी... अफाट श्रध्दा असावी... पण अंधश्रध्दा कधीच  नसावी..... भक्त देवाच्या दर्शनासाठी दुरून दुरून येतात.... पण शा देवस्थानाच्या जुबाजुला असणारी दुकाने, स्टॉल, वैगेरे.... हे मात्र जणु काही भक्तांना लुबडण्यासाठीच बसलेले असतात..... श्रध्देपोटी भक्त ही या गोष्टींचा विचार नाही करत.... आणि देवावरच्या श्रध्देपोटी स्वत:ला लुबाडुन घेतात.... मग या प्रकारात शिक्षित, अशिक्षित लोक सुद्धा असतात.... कळतय पण वळत नाही अशी अवस्था झाली आहे.... देव हा प्रत्येकाच्या मनात असतो.... मानल तर आहेच अन नाही मानल तर नाही....
आज, अशी बरीच गणेश मंडळ आहेत की ते या गणेश उत्सवात सत्कार्य करतात.... जेणे करून आपल्या समाजातील लोकांमध्ये काहीतरी संदेश पोहचावा..... पण त्याचबरोबर बरीच अशी सुध्दा मंडळे आहेत..... कि जे आधी चांगले काम करणारी मंडळे नंतर फायदा तोटा पाहू लागतात.... देवाच्या नावा खाली आपला काय फायदा होईल.... याचा विचार करणारी, आज प्रत्येकाने विचार करायला हवा खरच हे योग्य आहे का ?....  आपण खरच सुशिक्षित असुन ही आशा भोंदु मासांच्या जाळ्यात अडकतो ते का?
आज, बाप्पाच्या दर्शनासाठी ९-१० तास रांगेत उभं राहून ताटात अगरबत्तीचा पुडा, भला मोठा हार, नारळ आणि मिठाईचा पुडा हे सारं देवाच्या चरणी अर्पण केलं.... कि आपले सारे मनोरथ पूर्ण होतील..... अशी भाबडी आशा बाळगणारे मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत....आपल्या मंडपातील उंचच उंच वैभवी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी दहाही दिवस दर्शन घेणाऱ्यांच्या  लांबच लांब रांगा लागतात..... हे दृश्य संयोजकांना खूप अभिमानास्पद वाटते....  या 'दर्शन गर्दीला' रोखण्यासाठी.... त्यांच्या व्यवस्थेसाठी पोलिसांचा ताफा मुद्दाम बोलवावा लागतो.... हि घटना आजच्या आयोजकांना गौरवशाली वाटते....
बघा, राज्यात विजेची टंचाई असतानाही लाखोंची विद्युत रोषणाई, प्रदूषणाने आधीच कहर केलेला असूनही कानठल्या बसवणारा वाद्यांचा गोंगाट याची खरच गरज आहे का हा वादग्रस्त मुद्दा.... खर्चाचे डोंगर खर्चून दहा दिवस गर्दी खेचून आयोजकांना होणारा आनंद हा कोणत्या कोटीचा समजावा हे अजून आपल्याला समजले नाही....  नवसाला पावणारा गणपती... म्हणून दहाही दिवस, दिवस रात्र हातात नारळ, हार, पेढे घेऊन दर्शनासाठी तिष्ठत राहून गर्दीत सामील होणे.... हि माणसाच्या आयुष्यातील इति कर्तव्यात समजावी काय हा सर्वात मोठा प्रश्न
प्रचंड उंचच उंच मूर्ती, उदंड खर्च आणि अखंड गर्दी जमविणारे असे हे गणेशोत्सव आयोजित करता येणे.... हे या एकविसाव्या शतकातील सुशिक्षित-अशिक्षित भारतीयांचे आयुष्यातील सर्वोत्तम व सर्वश्रेष्ठ असे एकमेव उदिष्ट असेल तर हि दुर्दैवाची गोष्ट आहे.... हसणे, गाणे, नाचणे, ओरडणे आणि गुलाल उधळून जयजयकार करणे..... एवढेच माणसाच्या आयुष्याचे फलित असते काय ? बघा विचार करा.....
शिवपुत्र गणेश बाप्पाला अशी हि संकट परीहारार्थी व आशाभूतांची रांग बघून खरेच आनंद होत असेल काय ? तो तुंदिलतनु मोरया या गर्दीच्या मनोकामना पूर्ण करीत असेल काय ?  तो या सर्व सामान्य गणेशभक्तांचे कल्याण करण्यासाठी आपल्या सिंहासनावरून खाली उतरून कार्यरत होत असेल काय ? या सर्व संबंधित गणेशभक्तांना तो दीनांचा कैवारी बाप्पा खरच संकटमुक्त करीत असेल काय ? कसली साधना , उपासना , आराधना , तपस्या व टोकाची समर्पणशील भक्ती न करताच तो कृपासागर बाप्पा या दीनजनांवर कृपेचा वर्षाव करीत असेल काय ? तो तुंदिलतनू मोरया या गर्दीच्या मनोकामना मोदक-पेढे आणि सुवर्ण मुकुट आणि रत्नहारांच्या मोबदल्यात , पूर्ण करीत असेल काय ? या सर्व प्रश्नांचे उत्तर ' नाही ' असे आहे.... हे लवकरात लवकर लक्षात घ्या आणि पराधीन, परवश, परतंत्र न होता.... तुम्ही प्रथम स्वयंपूर्ण, स्वतंत्र व आत्मनिष्ठ व्हा.... त्यातच तुमचा विकास व प्रगती आहे याची नोंद ठेवा..... 
तुम्हीच तुम्हाला एकदा असा प्रश्न विचारा की , ' मी असंख्य वेळा , अनेक वर्षे मंदिरात देवाच्या दर्शनासाठी गेलो... पण त्याने कधी आपल्याला बोलावले होते का....  तो कधी आपणहून आपल्या घरी आला होता का....  आपण पुंडलिक , नामदेव , एकनाथ , रामदास की तुकाराम आहोत.... ?  थोडा विचार करून अंतर्मुख झालात तर विकास तुमचाच होईल....  आणि मग तो मंगलमूर्ती तुमचाच सेवक होई अशी खात्री बाळगा....
तुम्हाला खरच देवासाठी काही करायचे असेल तर.... देवाच्या नावाने अनाथ आश्रमाला मदत करा.... गोरगरिबांना मदत करा.... नक्कीच मनाला समाधान लाभेल तुम्हाला.... अन तुमचा पैसा, मदत कुठेतरी कारणी लागल्याच सुख मिळेल.... कारण या गोष्टींसाठी प्रत्यकाला मेहनत ,कष्ट घ्यावे लागते.... अन आपली मेहनतीचे, कष्टाचे माती मोल होऊ नये.... याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल....
माझ्यामते, बुद्धी गहाण टाकून कर्मकांडाच्या व दैववादाच्या मागे धावणारा आजचा समाज आहे..... म्हणूनच आजच्या समाजाला विचारप्रवर्तक माणसांची खूप गरज आहे.... म्हणूनच प्रथम स्वयंपूर्ण, स्वतंत्र व आत्मनिष्ठ व्हा.... त्यातच तुमचा विकास व प्रगती आहे याची नोंद ठेवा..... ज्यांच्याकडे अफाट परिश्रम करायची तयारी आहे.... ज्यांच्याकडे प्रचंड जिद्द आहे.... आणि ज्यांच्याकडे आयुष्यात काहीतरी करायची महत्वाकांक्षा आहे.... आणि ज्यांची ईश्वरावर अपार श्रद्धा आहे अशा भक्तांवरच परमेश्वराची अखंड कृपा राहते..... 
कल्याणमस्तु!
ॐ श्री गुरुदेव दत्त .....

No comments:

Post a Comment