Saturday 12 October 2013


विजयादशमी आणि दस-याच्या हार्दिक शुभेच्छा....

आज आपण विजयादशमीचा नवा अर्थ जाणून घेऊ या.... अग्नीच्या दोन भार्या प्रसिद्ध आहेत - एक स्वाहा, दुसरी स्वधा... म्हणजेच अग्नीत झालेलें हवन स्वाहा ही देवतांना पोहोंचविते व स्वधा पितरांना पोहोंचविते....

उज्ज्वल मानवी देहाच्या ठिकाणीं ज्या इंद्रिय-शक्ति आहेत त्या देवताच होत.... आणि जे आनुवंशिक संस्कार आहेत ते पितर होत...  आता हे कसे ते अभ्यासू....

आपल्या उदरांत अग्नि आहे व अन्नाचें त्यांत हवन होत असतें....  हृदयांत अग्नि आहे, त्याला उत्कट-उज्वल भावना सारख्या समर्पण कराव्या लागतात....  आपल्याला लाभलेल्या बुध्दीचें अग्नि-तेज नवोनव, उच्च्-उदात्त विचारांच्या समिधांनीं उद्दीपित ठेवावें लागतें.... आणि इच्छाशक्तीच्या अग्निवेदींत धगधगीत ध्येयांचा हविर्भाग द्यावा लागतो....  म्हणजेच आपला जन्म आणि जीवन हा एक महायज्ञ आहे....

आपला जन्म सफल आणि सत्कारणी लावायचा असेल तर.... दैनिक आचरणाची यज्ञ-ज्वाला, उत्कट भावना, उच्च्-उदात्त विचार व श्रेष्ठतम ध्येयें यांनी प्रज्वलित ठेवली पाहिजे....   'संयम' अग्नीत सर्व उपभोगांची आहुति प्रथम देऊन नंतर यज्ञ-शिष्ट असा सुखाचा अनुभव घेतल्यानेंच जीवन सर्वांगाने प्रदीप्त होतें व रहातें....

आपल्या प्राप्त झालेल्या जन्माचे सार ध्येय कर्तव्य हेच.... सर्वांगानें दहाही इंद्रियांचा संयम साधणें व त्यांच्यावर विजय मिळविणें ही जीवनांतली खरी विजयादशमी होय....

अशा या विजयादशमी - दसऱ्याच्या.... आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.... दस-याच्या या  शुभ दिनी, सुख-सम्रुद्धी नांदो आपल्या जीवनी.... आजचा दिवस आपणां सर्वांना खूप सुंदर जाओ.... एक - एक सुंदर विचार एक सुंदर आयुष्य बनविणारा ठरो.... असेच सुंदर सुंदर विचार माझे आणि तुमचे जीवन समृद्ध करो...  या विजयादशमीच्या दिवशी आपण सर्वांनी अपयशाचं सीमोल्लंघन करून यशाकडे वाटचाल करावी हीच माझी सद्गुरुंकडे मनोकामना....  


ॐ श्री गुरुदेव दत्त....

No comments:

Post a Comment