Sunday 13 October 2013


विजयादशमीच्या शुभदिनी वृक्षसंवर्धनाचा आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करुया....

दसऱ्याला शमीच्या झाडाचे महत्व आहेच.... याबाबत विविध कथा आहेत.... पण आज इथे एक वेगळी गोष्ट वृक्षसंवर्धनासाठी जाणून घेऊ.... शमी जपणारे खेजरली गाव....

वृक्षसंवर्धनासाठी कोणे एके काळी या गावातील लोकांनी केलेल्या बलिदानाची गोष्ट सांगितल्यावर वृक्षसंवधर्ननाचे महत्त्व कोणालाही सहज पटावे.... शमीच्या अनेक झाडांचे प्राणपणाने संवर्धन केल्यामुळे जोधपूरजवळील एका गावाला खेजरली असे नाव पडले आहे.... राजस्थानमध्ये शमी वृक्षास खेजडी या नावाने संबोधले जाते.... दसऱ्याच्या दिवशी तेथे शमी वृक्षाची पूजा करतात....

जोधपूरपासून 25 किलोमीटर दूर अंतरावर खेजरली गाव आहे.... गावात मोठ्या आकाराचे व अतिशय प्राचीन (200 वर्षांपेक्षाही जुने) असे खेजडी वृक्ष आढळून येतात.... खेजडी अर्थात शमी या वृक्षाचे शास्त्रीय नाव Prosopis cineraria असे आहे.... खेजरली गावात प्रामुख्याने विश्नोई समाजाचे लोक राहतात व त्यांचे गुरू श्री जांभेश्वमरजी यांनी घालून दिलेल्या 29 नियमांचे कडक पालन करतात.... या नियमांपैकी एक प्रमुख नियम वृक्ष व वन्यजीव संरक्षणाचा आहे....

खेजडी वृक्षांबाबतचा खेजरली गावातील इतिहास अत्यंत महत्त्वाचा व स्फूर्तिदायक असा आहे.... सन 1730मध्ये जोधपूरचे तत्कालीन महाराज श्री. अभयसिंहजी यांनी.... त्यांच्या सैन्यास त्यांचा राजवाडा बांधण्यासाठी चुना तयार करता यावा.... यासाठी खेजरली गावातून झाडे तोडून आणण्याचे फर्माविले.... या वृक्षतोडीस स्थानिक विश्नोईंनी विरोध दर्शविला.... 84 गावांतील अनेक विश्नोनईंनी या महत्त्वाच्या कार्यास सामूहिक पाठिंबा दर्शविला.... सैनिक मात्र खेजडीची झाडे तोडण्याबाबत आग्रह धरू लागले..... तेव्हा विश्नोई पुरुष व महिलांनी झाडांना चक्क मिठ्या मारल्या व पाहता पाहता 363 विश्नो ई वृक्षसंवर्धनार्थ धारातीर्थी पडले.... त्यानंतर मात्र वृक्षतोड थांबविण्यात आली....

वृक्षसंरक्षणाचे जगातील असे आगळेवेगळे उदाहरण खेजरली या गावामध्ये पाहावयास मिळते.... खेजरली येथे "राष्ट्रीय पर्यावरण शहीद स्मारक' आहे.... या तीन ते चार एकर क्षेत्रामध्ये भरपूर पक्षी व झाडे आहेत.... येथील शमी वृक्ष वाचविण्याच्या लढ्यात धारातीर्थी पडलेल्या अमृताबाईंचे स्मारक पर्यावरण रक्षणाची आणि वृक्षसंवर्धनाची स्फूर्ती देत राहते.... आपणही या गावकऱ्यांकडून वृक्षसंवर्धनाची प्रेरणा घ्यायला पाहिजे....

चला तर आपणही या दसरा - विजयादशमीच्या शुभदिनी वृक्षसंवर्धनाचा आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करुया....          ॐ श्री गुरुदेव दत्त....

No comments:

Post a Comment