Sunday 23 November 2014


आपले अस्तित्व आणि आपली दिशा... 

माणूस इतिहासापासून आपण काहीच शिकत नाही... वर्तमानात न डोकावता थेट शेखचिल्ली बनून भविष्याच्या स्वप्नात भान हरवून जातो... माणसाचा आयुष्यभराच्या  प्रवासातील कल सतत  स्वत:ला सिद्ध करण्याकडे असतो.. आणि या सिद्ध करण्याच्या महत्वाकांक्षा त्याला ठार आंधळे, बहिरे आणि मुके करून जातात… या वेड्या हट्टापायी मूळ पाच इंद्रीयातील वरील तीन गोष्टीनां तो पारखा होतो... त्यानंतर त्याच्या बधीर झालेल्या संवेदना त्याचं स्पर्शज्ञान हिरावून नेतात… नि शेवटी श्वास नुसताच नावाला चालू असतो... त्याच्यातला माणूस केव्हाच संपलेला असतो... मग मागे उरत फक्त कलेवर... या धरतीवर एक ओझं..  ना त्यात असते जान... प्राण.. नि शान...

आपण काहीतरी बनायचा ध्यास घेतो त्यामागे काही अभ्यास.. चिंतन... संवाद नसतो... वारसाहक्कानं पदरात पडलेलं सामाजिक, आर्थिक स्थैर्य  नि सुबत्ता कुरवाळत आयुष्याचा भोग घेणं चालूच राहते... तथाकथित सामाजिक बांधिलकीच्या चार-दोन ठिकाणी चर्चा करून, आपला दिनदुबळ्याबाबतचा कळवळा आठ कॉलम मथळा व्हावा नि त्याची वाहिन्यावर ब्रेकिंग न्यूज व्हावी.. एवढी खुजी काहीवेळा जगण्याच्या विचारांची उंची असते... आचाराबाबत न बोललेलेच बरं...

माणूस म्हणून माणुसकीच्या वागण्यासाठी कधी आपण कुठं मेणबत्ती लावत नसतो.. कि विझू पहाणाऱ्या  मेणबत्त्यांना हात जोडून आसरा देत असतो... तत्वज्ञानाच्या परिसंवादात आपलं अस्तित्व उजळून निघण्यासाठी, समोरच्याचं वैचारिक वस्त्रहरण नि त्याही पुढे जावून शब्दश: वस्त्रहरण करण्यात आपल्याला आसूरी आनंद असतो... आपली काही खास वेगळी राजेशाही सरबराई समाजात होत राहावी असं आपल्याला वाटतं... आपला हा न्यूनगंड समाजातील बांडगुळाकडून हमखास जाणीवपूर्वक जपला जातो... आपल्याला आपल्या भोवतीचे भाट आपल्या उदो उदोच्या नाऱ्यात कोंडून टाकतात...

समाजातील या दोन्ही प्रवृत्त्तीनां विरोध करण्याइतकं नैतिक धाडस आपल्या अंगी येण्यासाठी प्रथम आपल्याला राजहंसाप्रमाने दूध आणि पाणी यांना वेगळे करण्याचं ज्ञान मिळवायला हवं... नि नुसतं ज्ञान मिळवून थांबून चालणार नाही तर त्या ज्ञानाचा उपयोग विचारात आणि आचारात करून या मानवाच्या कल्याणाच्या यज्ञात आपल्या म्हणून काही समिधा टाकता आल्या पाहिजेत... त्या टाकताना आपल्याला कुणी पहात आहे का नाही यासाठी पळभरही थांबायचं नाही.. आपला सेवाभाव कुणाच्या पैशाला चार लिहून मिळणाऱ्या मानपत्रांना तारण ठेवायचा नाही... आपली किंमत न अजमावता आपला आत्मा अनमोल आहे याचा विसर पडू द्यायचा नाही... श्रीराम... 

Thursday 14 August 2014


तिरंगा आणि आपण... 

स्वातंत्र्य... खळाळणाऱ्या झऱ्यासारखे... उत्तुंग पर्वतशिखरांसारखे... थांग लागू न देणाऱ्या दर्यासारखे... काठांवरील जीवन संपन्न करत निघालेल्या सरितेसारखे... सुपीकतेचे वरदान लाभलेल्या या भारतभूच्या विविधतेमधून एकतेचा संदेश देत भेटणारे... स्वातंत्र्य... माणसाला माणूस म्हणून जगू देणारे... मदतीचा हात देण्याची वृत्ती जोपासणारे... प्रत्येक श्‍वास मोकळेपणाने घेऊ देणारे... तरुणाईच्या ऊर्जेला अनुभवाचे बळ देणारे... हे स्वातंत्र्य माझ्या देशाचे... तुमच्या-माझ्यामध्ये भिनलेले... नवोन्मेषाचे अंकुर रुजवत निघालेले... अशा या स्वातंत्र्याच्या सन्मानचिन्हांच्या प्रवासाची स्वातंत्र्यदिनानिमित्त थोडक्‍यात ओळख...

माझ्या तरुण मित्रांनो.... दीर्घकाळ गुलामगिरीत राहून अथक संघर्षानंतर मुक्त झालेल्या देशाचे ध्वज, त्याची बोधचिन्हे, त्याचे राष्ट्रगीत यांचा उत्क्रांतही गुंतागुंतीचा, रंजक आणि आशयपूर्ण असतो... 15 ऑगस्ट 1947 ला लाल किल्ल्यावर मोठ्या ऐटीत फडकणाऱ्या तिरंग्याच्या जन्मकळाही शंभर-सव्वाशे वर्षे मागे जाऊन आपल्याला पाहाव्या लागतात.... तेहतीस कोटींहून अधिक देव, अनेक पंथ, धर्म असलेल्या भारतात यापैकी प्रत्येकाचा झेंडा होता आणि आहे.. अगदी मरीआईपासून ते रामकृष्णापर्यंत प्रत्येकाचे झेंडे आहेत; पण देश म्हणून आपला झेंडा नव्हता... अनेक संस्थानांत विभागल्या गेलेल्या प्रत्येकाचे झेंडे होते... आपल्याला गुलाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे झेंडे होते; पण भारताचा नव्हता... असायचे कारण नव्हते, कारण गुलामाला मालकाचा झेंडा मिरवावा लागत होता.... केशरी, पांढरा आणि हिरवा असे तीन रंग आणि चोवीस आऱ्यांचे अशोकचक्र मिरवणारा तिरंगा तसा वेगवेगळ्या अवस्थांतून इथपर्यंत पोचला आहे....

असा हा थोडक्यात इतिहास... राजा राममोहन रॉय यांनी सर्वप्रथम देशासाठी ध्वज असावा, असे स्वप्न परदेश दौऱ्यावर जाताना पाहिले होते, असे म्हणतात.... त्यानंतर भारतातील अनेक संस्थानिक 1857 च्या बंडात आपापला ध्वज घेऊन लढले आणि त्यातून देशासाठी एक स्वतंत्र ध्वज असावा, अशी कल्पना पुढे येऊ लागली... स्वातंत्र्यचळवळीत अनेक गट होते.... प्रत्येकाच्या मनात आणि विविध व्यक्तींच्या मनातही ध्वजाची कल्पना आकार घेत होती.... स्वातंत्र्यचळवळीला जोर आला तशी ध्वजाची कल्पना आकार घेऊ लागली.... वेगवेगळ्या कल्पना लढवल्या जाऊ लागल्या... 1921 मध्ये पी. वेंकय्या यांनी हिरव्या, तांबड्या रंगाचा ध्वज तयार केला... मध्ये चरखा टाकला.... महात्मा गांधींच्या सूचनेनुसार पांढरा रंग वापरून आणखी एक पट्टा तयार केला... कॉंग्रेसच्या अधिवेशनात हा ध्वज वापरला जाऊ लागला... तिकडे सुभाषचंद्र बोस यांनी तीन रंगांवर झेप घेणारा चित्ता टाकून ध्वज बनवला होता... स्वराज्य या नावाने ओळखला जाणारा झेंडा घेऊन मिरवणूक काढणाऱ्या कार्यकर्त्यांना 13 एप्रिल 1923 ला नागपुरात पोलिसांनी अटक केली होती... सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या झेंडा चळवळीत देशभर अनेकांना अटक झाली होती... 1931 मध्ये कॉंग्रेसने स्वीकारलेला तीन रंगांचा (केशरी, पांढरा आणि हिरवा), तसेच चरखा चित्र असलेला ध्वज स्वराज्य ध्वज म्हणून ओळखला जात होता....

ब्रिटिश भारत सोडणार, हे निश्‍चित झाले आणि 23 जून 1947 ला डॉ. राजेंद्रप्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम, सरोजिनी नायडू आदींची समिती नेमण्यात आली... या समितीने तिरंग्याची शिफारस केली... चरख्याच्या जागी अशोकचक्र आले... चरखा बदलण्याची कल्पना महात्मा गांधींना फारशी रुचली नव्हती, असे म्हणतात... 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र देशाचा ध्वज म्हणून तिरंगा फडकला... तिरंग्याच्या वापरासंबंधी, त्याच्या आकारासंबंधी अतिशय कडक नियम आहेत... तिरंग्याचा अवमान झाल्यास दंड आणि तुरुंगवास, अशी शिक्षेची तरतूद आहे... पण आपल्याला ते पुर्णपणे माहीत नाहीत... आणि आपल्या काही प्रमाणात आपल्या राज्यकर्त्यांनाही...

देशाची शान असलेल्या या तिरंग्याचा वापर सर्वसामान्यांनाही करता यावा, यासाठी उद्योगपती जिंदाल यांनी न्यायालयात जाऊन लढाई केली... आणि तिरंगा सर्वांसाठी खुला झाला... पण काही अटी आणि नियमांनीच... या संहितेनुसार काही नियम...

1. राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा... जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे...
2. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये... कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये... इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये...
3. राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये... केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये... तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये...
4. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे... ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे...  त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये.. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही...
5. ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये... कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही... तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये...
6. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही... ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही...
7. केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो... राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत... शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील...
8. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल... सरकारी अधिकार्यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे... आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात...
9. ध्वजाचा आकार म्हणजे aspect ratio आणि रंग योग्य हवा...  
10. रंग उडालेला, फाटलेला राष्ट्रध्वज फडकावण्यास योग्य नसतो... असे करणे म्हणजे ध्वजाचा अपमान करणे आहे हे लक्षात ठेवा.... राष्ट्रध्वजाची अशी स्थिती झाल्यास गुप्तपणे त्याला अग्नीच्या स्वाधीन केले पाहिजे... किंवा वजन किंवा रेतीत बांधून पवित्र नदी किंवा जलसमाधी दिली पाहिजे... पार्थिव शरीरावरून उतरवलेल्या ध्वजाच्या बाबतीतही असे केले पाहिजे...
15 औगस्ट – 26 जानेवारीला तिरंगा फडकावण्याचे स्वातंत्र्य सर्वांनाच मिळाले आहे... विशिष्ट व्यक्तींना मोटारीवर तिरंगा लावण्याचा अधिकार आहे... विशिष्ट शासकीय इमारतींवरही तो फडकत असतो....

आज तरुणाई इंटरनेट, मोबाइल यावर ध्वजाचे फोटो वापरते, पण त्यात रंग, आकार याचे काहीच भान नसते... आणि नुसता झेंड्याचा फोटोनेच त्यांचे बेगडी देशप्रेम उतू जाते... आजची पिढी सर्वच बाबतीत उतावीळ आहे... आणि ते विसरतात, भारतीय स्वातंत्र्य यज्ञात आपल्या जन्माच्या समिधा करून हुतात्म्यांनी आपणाला हे स्वातंत्र्य बहाल केले... आणि आज नव्या क्षितिजाला साद देत भारत देश जागतिक महासत्ता बनण्याची स्वप्न पाहू लागलाय..!.. आणि का पाहू नयेत ? पण या संक्रमण काळात स्वतःला भारतीय म्हणवून घेणारांनी क्षणभर थांबून स्वतःला आरशा पुढे उभे करून आत्मचिंतन करण्याची आवश्यक्ता आहे असे मला वाटते.. कारण आज खरोखरच आपणामध्ये किती राष्ट्रप्रेम शिल्लक आहे ते आज तपासण्याची गरज आहे... कारण मागच्या पिढीने किमान स्वातंत्र्याच्या गोष्टी तरी ऐकविल्या त्यामुळे आज राष्ट्रप्रेम या शब्दाचा तरी आपणास अर्थ समजत असावा..?.. फार आत्मकेंद्री आणि स्वार्थी जीवन जगत आहोत आपण, इतके कि नात्यातील मायेचा ओलावाही औपचारिक होत चाललाय..!..

देश कार्यासाठी घरावर तुळशी पत्र ठेवनाराची पिढी केंव्हाच इतिहास जमा झालीय.. छ. शिवरायांचे गोडवे गाताना शिवराय आपल्या घरी जन्मू नयेत ही प्रत्येकाची इच्छा म्हणजे गाव जाळला तरी आपल्या घराला धग लागू नये... दानधर्मही incom tax मधून वजावट मिळण्यासाठी करतो.. संसारात कोणाचीहि वर्दळ नकोशी वाटते, आणि प्रत्येक हितसंबंध फायदा बघून जोडले जातात... या सर्वात देश, समाज कसे असणार..?.. आणि आपल्यातली संपलेली राष्ट्रप्रेमाची भावना हेच उदया आपल्या सर्वनाशाचे कारण असेल... त्या मूळ घरभेद्याची निर्माण झालेली पैदास संपवण्यासाठी मनामनात राष्ट्रप्रेम जागलच पाहिजे..!!..

१५ ऑगस्ट आणि २६ जाने .ला जेंव्हा वातावरण राष्ट्रभक्तीने दरवळत असते... तेंव्हा तत्कालीन राष्ट्रप्रेम जागे होते, आणि ते एन्जॉय करताना प्रचंड प्रमाणात प्लास्टिकच्या तिरंगी झेन्ड्याची खरेदी भल्या उत्साहात केली जाते व जसजसा सूर्य माथ्यावर चढू लागतो... तसा हा कैफ उतरत जाते व खरेदी केलेले झेंडे निर्माल्य बनून रस्त्यावर पायदळी, गटारात पडतात... पण आता ती निरुपयोगी वस्तू बनते... सकाळी झेंड्यासाठी भांडणारी भावंडे दुपारी कोपऱ्यात पडलेल्या कचरा रुपी झेंड्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत... तिरंगा म्हणजे या देशाची अस्मिता, प्राण गेला तरी हातातला ध्वज न झुकू देणाऱ्याचे आपण वारसदार..!.. तिरंग्याचे हे प्रतिरूप पायदळी तुडवताना त्या हौतात्म्याच्या मनाला काय वेदना होत असतील..?..

एक विनंती... कृपया प्लास्टिक झेंडे अजिबात खरेदी करू नये... ध्वज वंदना नंतर हे झेंडे सन्मान पूर्वक व्यवस्थित ठेवावेत व नजरेला पडेल तो झेंडा उचलावा व त्याचा अवमान होणार नाही... याची काळजी घ्यावी...

उत्सव तीन रंगाचा... आभाळी आज सजला...
नतमस्तक मी या सर्वांसाठी... ज्यांनी भारत देश घडविला...
भारत देशाला मानाचा मुजरा...

ॐ श्री गुरुदेव दत्त...

Saturday 3 May 2014

उत्तम विचार संस्कार रुजवावे.... संयमी आत्मविश्वासे यशोशिखर गाठावे.... 
कोणतीच भाषा, विचार, व्यक्तिमत्व गोष्टी घेऊन माणूस जन्माला येत नाही.... त्यामुळे स्वतःला घडवणे हे ज्याच्या त्याच्या हातात असते.... या जगात तशी सर्वाना समान संधी असते....  बघा, जन्मतःच भरपूर कष्ट मेहनत करणे आणि जिद्दीने आपल्याला हवे ते काम करणे.... अश्या कोणत्याही गोष्टी व्यक्तीला मिळत नाहीत.... तर त्या त्याला स्वतःहूनच विकसित कराव्या लागतात, रुजवाव्या लागतात.... आणी मग त्यातूनच घडते उत्तम विचारशील व्यक्तिमत्व व यशोशिखरावर गरुडभरारी....
आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे.... अनेकांना अवघड बाब वाटते.... परंतु आपण एक विसरतो.... आपल्या रोजच्या जीवनात आपण जसे वागतो... विचार करतो.... तसेच आपले व्यक्तिमत्त्व घडते.... बघा, रोजच्या घटनांचाही आपल्या जीवनावर सकारात्मक / नकारात्मक परिणाम होतो.... कधी कधी आपण याकडे दुर्लक्ष करतो.... तर कधी त्यातून नैराश्य येते.... शेवटी आपला  आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे....
आपण जेव्हा तुम्ही एखादी क्रिया करतो त्यावेळी एक वेगळी ऊर्जा उत्पन्न होत असते.... ही ऊर्जा तुमच्यातील आत्मविश्वासाची असते.... पण हा आत्मविश्वास सहजासहजी मिळत नाही..... त्यासाठी तुम्हाला कष्ट मेहनत करावीच लागते.... तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगही जिंकू शकता..... परंतु तो आत्मविश्वास टिकवावा लागतो.... आणि यासाठीच तुमच्याकडे संयम असणे गरजेचे आहे....
आत्मविश्वासाने नवी आव्हाने स्वीकारणे.... हेच आपले आयुष्याचे ध्येय असले पाहिजे.... तर ती व्यक्ती कधीच एका जागी थांबून- साचून राहणार नाही..... आणि यशाचे एक शिखर सर केल्यावर स्वतःकडे कौतुकाने पाहत बसण्याऐवजी अशा व्यक्तीला पुढचे आव्हान खुणावेल.... एका आव्हानातून दुसऱ्या आव्हानाला यशस्वीपणे भिडणारा नेहमीच यशोशिखरावर राहू शकतो....
चांगल्या वेगळ्या वाटेने जाणारी माणसे स्वतःच्या मनाची हाक ऐकून चालू लागतात….. तेव्हा अपयशाची काळजी नसते….. तर यशाची खात्री असते..... आपल्याला जे वाटते ते जीव ओतून केले, की आपोआप समाधानाची वेगळी वाट तयार होते.... साध्या माणसांत किती ताकद असते आणि योग्य दिशा दिली गेली, तर ती काय करू शकतात याचीही मग उदाहरण दिसून येतात....
चला तर मित्रांनो, जिद्दीने मेहनतीने आपले काम करुया, आत्मविश्वासाने येणाऱ्या अडथळ्यांवर मात करुया... आपल्या ध्येय शिखरावर यशस्वीपणे गरुडभरारी घेऊया.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Thursday 3 April 2014

प्रपंच - परमार्थ....

मानव म्हणजे देह आणि आत्मा ह्यांचा संयोग आहे…. आणि त्याचे व्यक्तरूप या संसाररूपी मायेत कार्यरत होते.... साधकाला देहासाठी प्रपंच तर आत्म्यासाठी परमार्थ करावा लागतो…. दोहोंची यथायोग्य सांगड आवश्यक आहे…. प्रपंच म्हणजे सर्वस्व असे न मानता आत्म्याकडे लक्ष ठेवण्यास परमार्थाची गरज आहे…. प्रपंच करतानाच योग्य त्या पद्धतीने परमार्थ केला तर प्रपंच आणि परमार्थ ह्यांचा संगम होवू शकतो…. मानसिक शांतीसाठी तर परमार्थ अतिशय निकडीचा आहे…. आपले विचार नको तेथे भरकटत असतात…. नको ते विचार आपल्या मनावर हुकुमत गाजवितात, हे कशाचे लक्षण आहे..?.. भौतिक साधनांनी मनाला शांती लाभत नाहीं…. परमार्थाने नको ते विषय दूर झाले की मन स्थिर होते…. मन निर्विषय होणे हेच मनाच्या शांतीचे कारण आहे…. आत्म प्राप्तीसाठी लागणारे साधन आपल्याच देहात आहे…. 

प्रपंच हे ना सर्वस्व |
करावा आपण नित्य परमार्थ ||
मनःशांतीचे कारण गुरु |
पाठीराखा "तो" एक समर्थ ||

आज अज्ञानाने दृश्य विश्वात माणूस रमतो.... तसा तो अतिंद्रिय अदृश्य विश्वातही रमतो.... त्याचे इंद्रिय गोचर दृश्य विश्वात रमणे म्हणजे प्रपंच.... आणि अतिंद्रिय अदृश्य विश्वात रमणे... म्हणजे परमार्थ... असे श्री के. वि. बेलसरे म्हणत.... कारण अतिंद्रिय अदृश्य जग हे ईशतत्व संकल्पनांचे बनलेले असते.... ह्या संकल्पनाचे जगत माणसाच्या विवेक शक्तीतून निर्माण होते.... म्हणूनच विवेक शक्ती व वैराग्य या दोन्ही गोष्टींवर समर्थ रामदास जोर देतात.... 

समर्थ म्हणतात... आधी प्रपंच करावा नेटका .... आधी प्रपंच नीट करायला सांगतात म्हणजे संसार म्हणजे काय ते खरे सत्य जाणा.... ती जाणीव झाली कि मग परमार्थाकड़े वळायला सांगतात... कारण ते म्हणतात... की प्रपंच सोडून परमार्थ केला तर तुम्ही कष्टी व्हाल... कारण तुमच लक्ष सगळ प्रपंचाकड़े राहणार आहे.... प्रपंचापासून दूर जाऊन ही परमार्थ साधणार नाही.... आणि परमार्थ सोडून प्रपंच केलास तरी तू दु:खी होशील.... यमयातना भोगशील... म्हणून भगवंताची भक्ती करावी... परमार्थाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा.... कारण संसारामध्ये राहून जो मुक्त दशा अनुभवतो.... तो खरा योगी असतो... कारण योग्य काय आणि अयोग्य काय याचा सारासार विचार त्याच्या मनात अखंड जागा असतो..... म्हणून समर्थ सांगतात.... 

झाडाच्या पानावरील अळी सुध्दा आधार बघून पाय उचलते.... क्षुद्र कीटक ही आधार बघून पाय उचलतो.... विचार पूर्वक कर्मे करतो.... मग बुध्दीमान असलेला माणूस अविवेकाने भलतेच का करतो.... म्हणून समर्थ अखंड चाळणा करायला सांगतात.... समर्थ दूरदृष्टी विकसित करायला सांगतात... त्यामुळे सर्व बाजूंनी सावधपणा राखता येतो... साधकाला थोरपण मिळते... आणि स्वत:चे व दुस-याचे समाधान टिकवता येते.... 

मग श्री गोंदवलेकर महाराज म्हणत तसे.... ज्याच्या प्रपंचात पाठीराखा सद्गुरू-भगवंत आहे... जो योग्य-अयोग्य काय हे यथार्थपणे जाणतो... तत्व-नीती पूर्णार्थाने जपतो, त्याचा प्रपंचच परमार्थ होतो.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त....

Wednesday 2 April 2014


कर्तव्याने घडतो माणूस....

कोणतेही कर्तव्य कर्म करीत असताना मन पूर्ण अलिप्त आणि समतोल असायला पाहिजे.... कारण श्रेष्ठ कार्ये पूर्ण सिद्धीस जाईपर्यंत यश आणि अपयश ह्यांचे धक्के आणि लाभहानी-मानहानीचे हेलकावे सहन करावे लागतात.... 'स्थितप्रज्ञ' व्यक्तीच अहंकार विसरून मान-अपमान, माझे, माझे न करता तत्वनिष्ठ राहून नीतीपूर्णतेने जीवनातील / प्रपंचातील अनेक लढाया हरते, पण शेवट गोड होतो, युद्ध जिंकून..!.. 

बघा, कृष्ण गीतेत अर्जुनाला हेच सांगत असतो ते आपण काव्यरूपाने पाहू....

मोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होईजे पार्था |
कर्तव्याने घडतो माणूस जाणूनिया पुरुषार्था ||

कर्तव्याच्या पुण्य पथावर मोहांच्या फूलबागा |
मोही फसता मुकशील वीरा मुक्‍तीच्या या मार्गा ||

क्षणभंगुर हे मान-अपमान खेळ ईशतत्वाचा |
भाग्य चालते कर्मपदांनी जाण खर्‍या वेदार्था ||

म्हणोनी कर्मफलाते अर्पून सोड अहंता वृथा |
सर्व धर्म परि त्यजुनी येई शरण मला सर्वार्था ||

आज काय होते खूपवेळा वेदांत नुसता लोकांना सांगितला जातो, पण स्थितप्रज्ञ तो स्वतः आचरणात आणतात.... त्यांच्यावर कठीण प्रसंग आला तरी ते डगमगत नाहीत.... नीतीमत्ता, तत्वनिष्ठता ते सोडत नाहीत वा त्यात तडजोड करीत नाहीत.... त्यामुळे त्यांना खरे समाधान मिळते, तर इतरांच्या पदरात असमाधान पडते.... तेव्हा, सद्गुरू जो बोध सांगतात.... त्याचे आपण थोडेतरी आचरण करायलाच पाहिजे, तरच आपण काहीतरी योग्य ते साधू शकतो..!.. 

श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे... माझ्या गुरूला हे आवडेल का..?.. अशा भावनेनें जगांत वागणें हाच सगुणोपासनेचा निर्गुण हेतू आहे.... गुरु अनुसंधानात राहून कर्तव्य केल्याने अशी भावना जागृत होतें..!..

गुरू चरणी ठेविता भाव | आपोआप भेटे देव |
गुरू भजनी असता ठाव | स्व ध्यानासी मिळे वाव ||

ईश्वराने माणसाला हा जो जन्म दिला आहे, त्याबरोबरच मानवी जीवनातील कर्तव्येही दिली आहेत.... ती कर्तव्ये कर्म केल्याशिवाय पुरी होत नाहीत.... एखाद्याला कुठलाही अधिकार प्राप्त होतो, त्याचबरोबर त्याच्यावर कर्तव्ये करण्याची जबाबदारी असते....  आजकाल माणूस लोभाच्या आकर्षणाने कर्म करण्यास प्रवृत्त होतो, एखादे कर्म केल्यावर मला काय मिळणार याचा तो प्रथम विचार करतो....  आणि तेथेच मोह्मायेने फासत जातो....


गीतेतील कर्म हे साध्य नाही तर ते ईश्वराची कर्म कुसुमानि पूजा करून त्यास प्रसन्न करून घेण्याचे साधन आहे.... गीतेने जी साधना सांगितली तिचा कर्मयोग हा पाया तर ज्ञानयोग हे शिखर आहे.... कर्मयोग हा अंतकरणशुद्धी द्वारा ज्ञानयोगास साधनभूत आहे, आणि ज्ञानयोग मोक्ष दायक आहे.... यथार्थपणे कर्म अकर्माचा विचार करताना ज्ञान्यानाही भ्रम होतो, कारण कर्माचे योग्य असणे हे कर्त्याचा श्रद्धाभाव, वृत्ती, परिस्थिती, काळवेळ यावर अवलंबून आहे.... काय योग्य आणि काय अयोग्य हे खरे सत्य कळण्यासाठी सद्गुरूला नम्रपणे शरण जाण्याशिवाय पर्याय नाहीच.... वृथा अहंकाराने मी असे करेन, तसे करेन अशा वल्गना करून काळ-वेळेचे गणित बिघडवू नयेच.... जे सत्य कळतेय ते योग्यतेकडे वळवण्याचा निश्चित निग्रहाने प्रयत्न म्हणजेच खरेतर कर्तव्य कर्म आणि साधकाचे कर्तुत्व होय....  ॐ श्री गुरुदेव दत्त....

Sunday 16 March 2014


WISH ALL OF YOU A HAPPY & SAFE HOLI ..... 

Our happiness depends on the habit of mind we cultivate..... So practice happy thinking every day..... Cultivate the merry heart, develop the happiness habit, and life will become a continual feast.....also know that The dominant idea behind Holi festival is that we should live more in harmony with nature instead of trying to destroy her and make her our slave.... Enjoy nature friendly Holi With happiness..... Happy Holi..... 

ॐ श्री गुरुदेव दत्त....



होळी महात्म – होळी म्हणजे वाईट विचारांचे दहन......

होळी हा देशभर रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी महाराष्ट्रात त्याचे महत्त्व वेगळे आहे..... ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखला जाणार्‍या सणामागे काही आख्यायिका आहेत...

लहान मुलांना पीडा देणार्‍या होलिका, ढुंढा, पुतना ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात.......

एका पौराणिक कथेनुसार विष्णूभक्त प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवीचा श्रीविष्णू देवाने वध केला होता...... होलिकेला वर होता की तिला अग्नि जाळू शकणार नाही..... परंतु प्रल्हादाला जाळ्ण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्नीकुडांत प्रवेश केला व प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले..... तसेच मदनदहना च्या कथेत ह्या उत्सवाची परंपराही काही लोक सांगतात......

हा उत्सव प्राचीन अग्निपूजनपरंपरेचा आविष्कार आहे..... हा सण मुळात लौकिक पालळीवरचा असावा.... त्यात कालांतराने उच्च संस्कृतीच्या लोकांकडून धार्मिक/सांस्कृतिक विधिविधानांची भर पडली असावी......

आजच्या लोकोत्सवात होळी, धूळवड आणि रंगपंचमी हे तीन मुख्य प्रकार दिसतात..... जडवाद आणि भोगवाद ह्यांना जाळून..... त्यांची धूळवड करून आयुष्यातल्या आनंदाचा रंगोत्सव साजरा करायचा किंवा समाजातल्या असद्वृत्ती भस्मसात करून त्यांच्या नावाने "शिमगा" करत सदवृत्तींचा जयघोष करायचा हा उत्सव आहे.......

वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना.... होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी..... हाच होळी साजरे करण्यामागचा उद्देश आहे..... या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा... जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख-समाधानाचे जाईल......

अशी हि होळी सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो ..... सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा .....

ॐ श्री गुरुदेव दत्त....

Saturday 8 March 2014


संवर्धिनी...   आदिशक्ती...      

स्त्री चे प्रत्येक नाते आजी, आई, बहिण, मैत्रीण, बायको, मुलगी आणि प्रेयसी अनुभवायची असेल तर आपणही स्त्री च्या ह्या प्रत्येक नात्याला जपण्याचा १०० % प्रयत्न नक्कीच केला पाहिजे... नात्यामधील सन्मानच नात्यात स्थिरता आणि जवळीक निर्माण करतो... स्त्री अश्या कित्येक भूमिका सहज रित्या पार पडते.... ती शिक्षित असली तरी वा अशिक्षित असली तरी.... संसारातले असो वा व्यवहारातले प्रश्न किती चूटकीनिशी सोडवते.... घरात रुचकर जेवण बनवणारी अन्नपुर्णा, मुलांना संस्काराचे बाळकडू पाजणारी संस्कारलक्षमी, शिक्षणाचे धडे देणारी सरस्वती ,चालायला बोलायला शिकवणारी माता, पतीने दिलेल्या सुखसोयींवर न जगता त्याच्या खांद्याला खांदा लावुन घर नोकरी सांभाळून घराला हातभार लावणारी अर्धांगिनी, घरातील आजारी व्यक्तींची काळजी  घेणारी आया, घरावरील प्रत्येक संकटांना सामर्थ्याने पेलणारी रक्षिका.... ह्या प्रत्येक भूमिका ती प्रामाणिकपणाने निस्वार्थ मनाने पार पाडते....
         मित्रांनो... स्त्री म्हणजे कुटुंबाचा पाया.... आदिमाया ,आदिशक्ती.. ह्या सगळ्या विशेषणांनी तीला गौरविल जात.... आणि ते उचितच आहे... स्त्रीमुळे कुटुंब बनत, घडत, साकारल जात आणि आकार ही घेत.... प्रत्येक नात्याला घडविण्याचा त्यांना एकसंध ठेवण्याचे काम हे त्या घरातील स्त्रीच करीत असते.... आणि अस असूनही आज मुलगी नको... का तर ती परक्याच धन, दुसऱ्याची वंशवेल वाढवणारी, कुटुंबाचा आधार न बनू शकणारी असा समज आहे.... आणि ह्या गैरसमजातूनच स्त्रीभृण हत्येसारखी महापातक घडत आहेत....
          जो पर्यंत समाजाची ही विकृत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत स्त्रीला तिचा स्वतःचा असा एकही दिवस गवसणार नाही... आणि स्त्री सबलीकरण होत नाही, तोवर एका पित्याला आपल्या लेकीचा, एका पतीला आपल्या पत्नीचा, एका भावाला आपल्या बहिणीचा दिवस घालायची वेळ येईल... हे सगळ जेंव्हा थांबेल तेंव्हाच स्त्री खऱ्या अर्थाने मुक्त श्वास घेवू शकेल आणि खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल.... ॐ श्री गुरुदेव दत्त....

Saturday 1 March 2014


जीवन मार्गदर्शक तत्वे....
जेव्हा मनुष्याकडील धन नष्ट होते, तेव्हा वास्तविक त्याचे काहीच नष्ट होत नाही….. जेव्हा मनुष्याचे आरोग्य बिघडते, तेव्हा त्याचे थोडेफार काहीतरी नष्ट होते…. परंतु जेव्हा मनुष्याचे चारित्र्य बदनाम होते, तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ट होते.... लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते..... तोंडावर ओढुन घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात.... अशाप्रकारे जे घाईघाईने वर चढू पाहतात ते खूपवेळा कोसळतात हा जगाचा नियम आहे.... म्हणूनच स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.... चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो हे लवकरात लवकर जाणा….. जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.... आयुष्यात काय गमावलंत आणि काय कमावलंत ह्याचा विचार करा..... बघा, बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का..?..
शेवटी सार एकच... तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार..!.. आत्मउद्धार हा ज्याचा त्याने करायचा.... मार्गदर्शक फक्त मार्ग दाखवू शकतो..!!.. आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात.... फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते यासाठी मार्गदर्शक मदत करतो..... बघा, आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको..... कारण जे नंतर चांगले वाटते, तेच कृत्य नैतिक व जे नंतर दुःखकारक ठरते, ते अनैतिक असते..!... म्हणूनच आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही, सुविचार असावे लागतात....
सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. ज्या माणसांकडे योग्य विचारांचा भक्कम पाया नाही, त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही.... आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही....  जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात.... पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे योग्यतेने उभी राहतात.... आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवूनध्येयपूर्तीसाठी धडपडणं योग्य आहे.... एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद योग्य विचारांमध्ये असते.... कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी आपणच असतो....  आधी योग्य विचार करा मगच कृती करा आणि ओठी एक पोटी दुजे.... असे वागणे आपलाच ऱ्हास करते....  
स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका, चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून व्यवहार खोटे न बोलता सत्याने आणि सन्मानाने करा.... सत्याने मिळतं तेच टिकतं असे गीता सांगतेच, अयोग्य पद्धतीने केलेले काम विविध प्रकारे त्रासदायक होते.... मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते.... नेहमी तत्पर रहा, बेसावध आयुष्य जगू नका..... बघा, यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा कधीच होत नाही.... प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो..... गरज असते ती फक्त आपण शिकण्याची, त्या क्षणातील बोध जाणण्याची....
मित्रांनो, मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवावेत कारण  ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.... तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.... म्हणूनच आपल्यातील दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो, हे तत्व जीवनात पाळा.... स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता.... आयुष्यात असं ज्ञान मिळवा जे तुम्हाला आदर्श बनवेल.... एक माणूस म्हणूश यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायला हवं नव्हे, अगदी १००% आचरणात आणायला हवं..!..

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Friday 28 February 2014

New Presentation of Thoughts By Chetan K....     


Just walk along the road of life…. No matter how many times you try to move forward, but always staring at your past…. Know that past is a rear view mirror…. And remember, objects in mirror may be closer than they appear…. Too many times we overlook at our mistakes and not brood on them…. Once we self examined our self we saw things so much clearer with correct meaning in REARVIEWMIRROR…. Just live life based on true principles of…. If you always tell the truth, you don't have to remember anything…. ॐ श्री गुरुदेव दत्त .....









Thursday 27 February 2014

महाशिवरात्री म्हणजे परिवर्तनाचा काळ.....
परमपिता शिव परमात्माबरोबर जोडली गेलेली `रात्रीआध्यात्मिक रहस्याकडे संकेत करते…. आता शिवरात्री म्हणजे काय..?..  तर रात्री या शब्दाचा अर्थ अज्ञानाशी संबंधित आहे.... अज्ञाननिद्रेत झोपलेल्या, बुद्धी तमोगुणांनी व्यापलेल्या आत्म्यामध्ये विकाररुपी चोर, लुटारु माणसांच्या सुखाला लुटून त्याला नष्ट भ्रष्ट करीत असतात आणि त्यांनाच तो मित्र समजून उशाला घेऊन झोपत असतो.... अशावेळी परमपिता, परमात्मा शिव विश्‍वाच्या कल्याणाकरिता अवतारित होतात.... जेव्हा सर्व मनुष्यात्मे `माया म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार ह्या पाच विकारांमुळे दुःखी, अशांत, पापी, भ्रष्टाचारी होऊन जातात. तेव्हा त्यांना पुन्हा पावन व संपूर्ण ज्ञानी बनवण्याचे कल्याणकारी कर्तव्य करतात आणि म्हणूनच त्यांचे `शिवहे नाव सार्थक आहे….
शिव ह्या शब्दाचा अर्थ कल्याणकारी आहे…. शिव स्वयंभू आहेत.... सदा निराकारी स्थितीमध्ये, प्रकाशरुप, बिंदूरुप स्थितीमध्ये सहाव्या तत्त्वामध्ये किंवा अग्नितत्त्वामध्ये राहतात.... शिवतत्व मनुष्य सृष्टीचे चैतन्य बीजरूप आहेत आणि जन्ममरण, कर्म बंधनापासून मुक्त आहेत.... जेव्हा व्यक्ती जागृतीत येते तेव्हा ह्यालाच परमात्म्याचा दिव्य जन्म वा दिव्य अवतरण असे म्हटले जाते.... कारण ज्या शरीराचा परमात्मा आधार घेतात तो देखील एक जन्म-मरण-कर्म-बंधनाच्या चक्रामध्ये येणारा मनुष्य आत्मा आहे.... तो जो आहे, जसा आहे त्याला त्याच रुपामध्ये ओळखून त्यांच्या आठवणीत राहून आपल्याला आपल्या मूळ आत्मा स्वरुपाला ओळखून, आपल्या मूळ गुणांना धारण केले जाते.... आत्मस्थित शिवतत्त्व ज्ञानरुपी अमृत आणि योगरुपी प्रकाशाद्वारे मनुष्यमात्रास सतोप्रधान बनवितात....
मात्र या 'शिवशक्ती'ची आयुधे मात्र सर्वस्वी वैशिष्टपूर्ण आहेत..... डमरू, त्रिशूळ आणि शंख या तिहेरी आयुधांच्या वापरातून हा त्रिनेत्री देव आपले सातत्याने रक्षण करतो असे वाटते.... डमरू नादातून तो आपणास जागरूक करतो, त्रिशुळाच्या खणखणाटातून तो आपणास सजग ठेवतो तर शंखध्वनीतून तो आपणास भानावर आणतो....
म्हणजेच या रुद्रावतारी देवाचा या आयुधांचा प्रथम वापर हा नादब्रम्हातून आहे... गरज आहे... आपण आपले कान जागृतीने उघडे ठेवून ते ऐकण्याची.... डमरू' च्या आवाजातून जागरूक हो हे त्याचे सांगणे म्हणजे जगताना बरे वाईट, मोहमयी काय ते समजून घे....
या डमरूच्या आवाजातील संदेश जर आपल्यापर्यंत पोचलाच नाही.... तर 'त्रिशुळा' चा खणखणाट आपणास बजावतो.... अरे तुझे कान उघडे आहेत.. पण तू नाद ब्रह्मातील आवाज काय ध्वनित करतोय हेच ऐकत नाही आहेस.... आवाज कानावर पडला... पण तो आत पोचलाच नाही तर त्याचा उपयोग नाही, हे विसरू नकोस....
जर डमरू आणि त्रिशुळ यांच्या आवाजातील ध्वनित अर्थ भक्तासाठी अपुरे ठरले तर हा भैरव 'शंखा' च्या नाद लहरी अश्याप्रकारे उमटवतो.... कि त्या वाद-संवादी लहरीच्या नादमय लाटा भक्त शिष्यास वास्तवता दाखवून जागृत करून जगाच्या परिघाच्या पलीकडे नेवून जाणीवेतून नेणीवेत नेनच भानावर आणतात....
म्हणूनच आपण देखील रुद्राच्या अभिषेकातून स्वतःस शुचिर्भूत करून घेण्याचे भाग्य आपल्या पदरी पडून घेवू या... ओंकार रुपी शिवाचे नुभूतीच्या पलीकडील अशा त्यास शरण जाऊ, यातच आपले परम भाग्य दडलेले आहे.... आजच्या ह्या शिवरात्रीच्या महान पर्वाच्या दिवशी आपण सर्वानी दृढ संकल्प करूया की, देहअभिमानाचा त्याग करून आत्मिक स्थितीमध्ये स्थित होऊन आत्म्यांच्या मूळ गुणांना धारण करून आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न करू....
कदाचित या महारुद्राच्या निमित्ताने चराचरात दडून राहिलेले माझ्यातील विश्व अथवा विश्वातील मी यांचे परस्परातील नाते उलगडले जाईल.... आणि थोड्या काळात माझ्यात कालातीत बदल घडेल.... कदाचित मला अग्नीची होरपळ, पाण्याची तहान, विश्वाची व्याप्ती आणि श्रद्धेची अनुभूती यांची अल्पशी जाणीव होईल... आणि माझ्या ओठी नेहमीच राहिल ते शब्द ब्रम्ह असेल....
अहं निर्विकल्पो निराकार रूपो
विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वन्द्रियाणि ।
सदा मी समत्वं न मुक्तिर्न बन्धः
चिदानन्दरुपः शिवोSहं शिवो S हम ।।

ॐ श्री गुरुदेव दत्त....