Sunday 22 July 2012


आयुष्याचे ध्येय धोरण ठरवा.... आयुष्याला आकार द्या.....

आज विचार करावा.... आपल्या आयुष्यात ध्येय, काही उद्देश आहे कि नाही.... आपण ध्येय मार्गावर कसे चालत आहोत..... आपल्या ध्येय व उद्देश यांच्यासाठी प्रामाणिक असणार्‍यांना येणार्‍या अनंत अडथळे, अडचणीच त्या ध्येय-उद्देशाप्रती आणखी घट्ट बांधुन ठेवतात नाही का....  पण आज विचार केला ज्याच्याकडे ध्येय-उद्देशच नाही...... अशीच लोक मग येणार्‍या अडथळे, अडचणीतच गांगरून जातात.... स्वतःचे आयुष्य या अडचणीतुन कसे बाहेर येणे एवढेच मानतात… सारे जीवन यासाठीचा मार्ग शोधण्यात घालवतात..... आता या जगण्याला आयुष्याला काही उद्देश आहे का..? गोंधळात टाकणारा प्रश्नच नाही का.… 

पण जर आपण थोरा-मोठ्यांची चरीत्र बघितली तर हेच कळुन येईल... की ध्येय त्यामागचा उद्देशच माणसाला महान ठरवतो..... तिथे किती आयुष्य जगले याला महत्व नसते….. बघा ना, अवघ्या २३ व्या वर्षी फाशीवर जाणार्‍या भगतसिंगांचा ध्येय-उद्देश भारताचे स्वातंत्र्य’ होता व त्या उद्देशाप्रती ते शेवटच्या क्षणापर्यंत प्रामाणिक राहीले….. स्वामी विवेकानंद अवघ्या ३९ वर्षी जग सडून गेले.... पण आजही त्यांचे विचार ध्येय उद्देश सर्वाप्रती जागृत आहेतच.... तसेच  शिवाजी महाराजांचे..... आयुष्याची अवघी ५३ वर्षे जगले.... पण आज ४ शतकानंतरसुद्धा व येणार्‍या कित्येक शतकांमध्ये सुद्धा त्यांचे उद्देशाप्रती असणारे प्रेम व त्यांची किर्ती जागृत राहील….. 

मित्रहोआपल्या आयुष्याला ध्येय-उद्देश आहे का..तो असलाच पाहीजे हे  माझे ठाम मत आहे…..  फक्त काळाच्या लाटेवर आरूढ होण्यात काहीच उपयोग नाही… आपल्याकडे जगण्याचा उद्देश असलाच पाहीजे.... आपल्या अंगी तो रुजला पाहिजे....आज बर्‍याच जणांची विचारधारणा अशी असते की आपण सामान्य आहोत अन सामान्य माणसाप्रमाणेच आयुष्य जगायचंय उगीचच नको त्या मार्गी का लागावे..... पण विचार करावा, आपण खरेच सामान्य आहोत..आज जर आपण आपल्या व्यवसायीक जीवनामध्ये एवढी प्रगती करु शकलो तरी आपण असा विचार का करतो..?? मग एखाद्या खेडुताने काय म्हणावे...की सामान्य म्हणवुन घेऊन वास्तुस्थितीला दुर सारण्याचा प्रयत्न करीत असतो आपण….. आपलेच विचारमंथन झाले पाहीजे… 

आत्मपरीक्षनाने स्वःताला प्रश्न विचारण्याची हिम्मत अंगात आली पाहीजे… कोणत्याही वाईट बिकट परीस्थितीला मनासारखे वळवुन त्यातुन आपले हित साध्य करता आले पाहिजे.... सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घेणे जरुरी आहे…. ती म्हणजे कि आपल्याला ध्येय साध्य करण्यासाठी मेहनत घ्यावीच लागणार आहे……. आपले ध्येय सहजासहजी आपल्याला साध्य होणार नाही….. हि गोष्ट लक्षात ठेवणे जरुरी आहे तरच आपण आपले लक्ष्य गाठु शकता..... 

आता या ध्येय धारणेमध्ये संगत फार महत्वाची ठरते..... संगत चांगली नसेल तर ध्येय-उद्देश मागे पडतात.... म्हणून असंगाशी संग नको..... बघा ना, वाळवंटामधील प्रत्येक रेतीच्या कणाला अस्तित्व नसतेच.... पण बर्‍याच कणांपासुन तयार होणार्‍या रेतीच्या क्षणभंगुर डोंगरांनाही अस्तित्व नसतेच.... जर आपल्याकडे उद्देश नसेल आणि आपण इतर उद्देश नसलेल्यांबरोबर जगलो तर आपलेही या वाळवंटातील डोंगराप्रमाणेच होणार यात बिल्कुल शंकाच नाही... आपलेच अस्तिव राहणार नाही....

समर्थांनी याकरताच म्हंटले आहे.... सदा संगती सज्जनाची घडो.... म्हणुनच जर बाकी काहीही करता आले नाही.... तरी आपली सोबत वा संगत ही तरी आदर्श असावी….. उदाहरण द्यायचे झाले तर.....  मांडवाचे सगळेच बांबु डळमळीत असेल तर तो मांडव ढासळणारच हे नक्की..... पण तेच जर त्यातील एकच बांबु थोडा डळमळीत असेल.... तर मात्र तो मांडव इतर मजबुत वाश्यांच्या आधारे उत्तमस्थितीत राहतो….. आयुष्याचेही असेच आहे नाही का..... जर आपणही भरकटलेल्यांबरोबर राहू तर फक्त भरकटणेच हाती येईल…..  दुर्दैवाने बाकी काहीच नाही.... 

आज पालकांनाच जर वैचारीक बैठक नसेल.... तर मुलांचे संगोपन आदर्श होईल का ?  मुलांना योग्य ते संस्कार मिळतील का ? नाही, कदाचित त्या लहानग्याच्या भविष्याचा मांडव डळमळीत होण्याचा संभव..... इतिहास काय सांगतो... जिजाऊंनी शिवाजी घडवला… पण याहीआधी जिजाऊ घडलेल्या होत्या.... हे आपण विसरून कसे चालेल.... म्हणूनच भविष्यात जर सर्वांगीनदृष्ट्या विकसित नेतृत्व दिसायचे असेल.... तर पुढे येणार्‍या पिढ्यांना अध्यात्मिकशारीरीकमानसिकतांत्रिकशैक्षणिक असे सारे पर्याय  उपलब्ध  करुन दिलेच पाहीजेत.... ते सर्व उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे.... 


यासाठीच आजच आत्मपरीक्षनाने, आत्मनिरीक्षणाने स्वःतात आत्मसुधारना करा.... आपले स्वःताचे वेगळेपण ओळखा.... ते जपा त्याला फुलू द्या.... एक ध्येय, जीवनाचा उद्देश उराशी बाळगा.... एक ध्येय, प्रेरणा, विचार नसेल तर आपली प्रगती होत नाही.... ध्येय आणि संयम ठेवा.... बघा, यश तुमचेच असेल..... चला तर आपणही आपले ध्येय निश्चित करू या ..... उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.... एखादे ध्येय निश्चित केलेला मनुष्य शंभर चुका करीत असेल.... तर ध्येय नसलेला मनुष्य दहा हजार चुका करतो..... तात्पर्य असे की, ध्येयामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो.... परंतु असे असले, तरी ध्येयाची निवड देखील महत्त्वाची बाब असते.....योग्य तेच ध्येया निवडा.... एकदा ध्येय ठरले की, कार्य करण्याची दिशा आपोआप गवसून जाईल.....  

जसे management / corporate world , ध्येय वा Goal setting वर चालते ......आपल्याला थोड्याफार फरकाने व्यक्तिगत आयुष्यातही त्याच तत्त्वावर मार्गक्रमण करता येऊ शकतं..... असं मला वाटतं..... दुसरं म्हणजे ध्येय साध्य झाली नाहीत..... तरी नाउमेद न होता तितक्याच जोमाने आपला मार्ग शोधत राहणं आणि पर्यायाने एका विशिष्ठ दिशेने आयुष्याची वाटचाल होणं अधिक महत्त्वाच आहे असं वाटतं...... उदाहरण घ्यायचं म्हटलं तर..... जसे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं हे टिळकांच स्वप्न वा ध्येय होतं..... ते त्यांच्या हयातीत पूर्ण झालं का? नाही..... पण त्या ध्येयासाठी त्यांच्या हातून जे महत कार्य झालं ते महत्त्वाचं..... अर्थात मोठ्या माणसांच्या गोष्टीच वेगळ्या असे जरी मानले.... तरी पण सामान्य माणसाने स्वतःसाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना..... त्याच्या आयुष्यातली असाध्य गोष्ट साध्य करण्यासाठी धडपड केली तरी.... त्याच्या आयुष्याला अर्थ येउ शकेल असे नक्कीच वाटते.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त ......


Saturday 21 July 2012

अध्यात्म-स्वरूप...

माणसाचे सत्य स्वरूप देहाच्या माध्यमातून पूर्णपणे अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न करीत असते... त्याला मनुष्याचे अंतःस्थ दोष व बाह्य जग दडपण्याचा प्रयत्न करीत असतात... या संघर्षाचे नाव जीवन होय.!. या व्याख्येतील सत्य स्वरूप म्हणजेच प्रत्येक माणसाचे अध्यात्म होय...

ते कसे.?. तर सोन्याचे नाना अलंकार घडवावे व त्यांना अंगठी, हार, बांगड्या इ. नावे द्यावीत, त्याप्रमाणे एकाच परमात्मतत्त्वापासून सारे वस्तूमात्र व प्राणीमात्र आकारास आले आहेत... म्हणूनच सर्व चराचर मूलतः परब्रह्मस्वरूपच आहे... परब्रह्माचे जे स्वरूप, त्याचा जो भाव तोच सर्व भूतांसाठी अध्यात्म झाला... पण सोन्याच्या दागिन्यावर चांदीचा मुलामा दिल्यास त्याचे सोनेपण जसे झाकले जाते, अगदी तसेच जगाच्या सहवासात मूळ स्वरूपावर बाह्य विषयांची म्हणजेच चांगल्या व वाईट गुणांची रंगरंगोटी होऊन प्राणीमात्र आपले परब्रह्मपण हरवतात व जन्म-मृत्यूच्या बंधनात अडकतात...

मग धुळीने माखलेल्या आरशात दिसणारे प्रतिबिंब जसे मलिनच भासते, त्याप्रमाणे गुणांच्या प्रभावाखाली मनुष्यादि देहांच्या ठिकाणी असलेले मूळ स्वरूप गुणात्मक, बद्ध भासते... असे हे जीवाच्या ठिकाणी असलेले मूळ स्वरूपावरील बाह्य विषयांचे भासमात्र आच्छादन हाच जीवाचा बंध होय आणि निर्विषयी देह-जीवाच्या माध्यमातून होणारी स्वस्वरूपाची निर्दोष व यथार्थ अभिव्यक्ती म्हणजेच जीवासाठी मोक्षप्राप्ती होय..!..
अशा प्रकारे सत्य, शिव आणि सुंदर असे प्रत्येकाचे मूळ स्वरूप व देहादि माध्यमातून गुणांच्या पडद्यातून परावर्तित होणारे स्वरूप अनुक्रमे शिव व जीव म्हणून ओळखले जाते... पहा यात.!. जीवा-शिवाचे नाते किती घट्ट आहे.!. इतके की त्याला अद्वैताशिवाय दुसरे काय नाव देणार.?. हे अद्वैत जाणणे म्हणजे जीवाने आपले शिवपण जाणणे व स्वाधीन गुणांच्या पडद्याआडून ते साकारणे म्हणजेच अध्यात्म जाणणे होय.!. हेच प्रत्येकासाठी परम-प्राप्तव्य म्हणजे परमार्थ आहे.!.  ॐ श्री गुरुदेव दत्त...





अंधारातून उजेडाकडे नेणारा ज्ञान सूर्योदय..... 

          आज गौतम बुद्धांनी सांगितलेली गोष्ट  वाचनात आली.... गोष्ट अशी कि एक विद्वान होता.... त्याने खूप अध्ययन केले होते..... वेद- शास्त्रांतही तो पारंगत होता.... त्याला आपल्या बुद्धीच्या वैभवाचा त्याला अति गर्व होता..... तो नेहमीच आपल्या हातांत एक पेटती मशाल घेऊन फिरत असे.... त्याचे कारण विचारले तर तो सांगत असे की.... " प्रपंच अंधकारमय आहे.... माणसाना थोडासा तरी ' प्रकाश ' मिळावा म्हणून मी ही मशाल घेऊन जात असतो..... लोकांच्या अंधारलेल्या जीवनमार्गावर ह्या प्रकाशाखेरीज दुसरा प्रकाश आहे कुठे ? " 

        एक दिवस एका भिक्षूने त्याचे हे शब्द ऐकले.... ते ऐकून तो हसायला लागला आणि म्हणाला.... " मित्रा....  सर्वत्र ' प्रकाश ' देणारा सूर्य तुझ्या डोळ्यांना दिसूच शकत नाही..... म्हणून संसार अंधकारमय आहे.... असे म्हणू नकोस.... शिवाय तुझ्या हातातील ही जळती मशाल सूर्याच्या ' लौकिकात ' अशी कोणती भर घालणार आहे ? आणि ज्यांना सूर्यसुद्धा दिसत नाही... त्याना तुझी ही क्षुद्र मशाल तरी दिसेल असे तुला वाटते, हा तुझ्या अकलेचा ' भ्रम ' आहे.....

          आता आपण ह्या गोष्टीपासून काय बोध घेऊ..... आत्म बोध हाच कि : हल्ली तर सर्वचजण अयोग्य अश्या विचारांच्या, पंथाच्या आणि वादाच्या मशाली हातात घेऊन फिरताना दिसत आहेत.... ह्या सर्वांचाही असाच दावा आहे की, त्यांच्या प्रकाशाखेरीज अन्य कोणताही प्रकाश अस्तित्वात नाही..... आणि आपले तेच खरे असे ते मानतात आणि याला मी घडवेन, याचे करिअर मी करून देईन हा खोटा व व्यर्थ अभिमान बाळगतात.... आणि मनुष्यांचा अंधकारपूर्ण मार्ग प्रकाशित करण्याची अति उत्सुकता ह्या सर्वांनाच आहे..... पण खरी गोष्ठ अशी आहे की, त्यांच्या अहंकाराच्या मशालींच्या धुरांत माणसाच्या डोळ्यांत सूर्यच दिसेनासा झाला आहे आणि तेच स्वःताच्या मीपणात जळत असतात..... 

         यातून conclusion एकच : मनुष्याने निर्माण केलेल्या मशाली नव्हेत.... तर ईश्वराने निर्माण केलेला ' सूर्य ' हाच वास्तविक एकमात्र प्रकाश आहे..... सत्य हे सूर्य प्रकाश प्रमाणे असते..... त्याला कितीही लोकांनी मोडले तोडले.... तरी त्या सत्याचे तेज कमी होत नाही..... जे हातात मशाल घेऊन फिरत आहे.... त्यानाच प्रकाश काय आहे व सुर्य काय आहेत हेच माहीत नाही.... ते दुसऱ्‍याला काय प्रकाश दाखविणार.... आपले अज्ञान लपविण्याचे हे सोँग आहे..... मग आपण होतो मेढ्यांचे कळप.... पराचा कावळा करणारे खुप भेटतील.... आपण आपला योग्य मार्ग निवडायचा असतो.... अडचणीच्या वेळी ह्यांच्या मशाली विजतात, म्हणूनच सर्वात श्रेष्ठ धर्म फक्त व फक्त मानवता..... मानवाच्या (स्वयंघोषित त्राता) हातातल्या मशाली ह्या प्रकाश देणाऱ्‍या तर मुळीच नाहीत..... या मशाली तर नसते वाद विवाद उत्पन्न करवुन वणवा पेटविणाऱ्‍या आहेत..... खरा सूर्यप्रकाश म्हणजे गुरुतत्वाचे ज्ञान आणि पूर्ण समर्पण वृत्तीने त्याचे आचरण होय.... 

            बघा ना, आज आपण काय चित्र पाहतो तर.... अंधारातून उजेडाकडे जाताना माणूस भरकटच राहतो.... जीवनात मार्गदर्शन नक्कीच हवे नाहीतर बऱ्याच वेळा आपण चुकीचाच मार्ग चालणे सुरु करतो.... आणि योग्य मार्गावर येई पर्यंत बऱ्याच वेळा वेळ मात्र गेलेली असते.... मग काय होते सूर्योदय झाला खरा पण उशीर खूप झाला..... सत्य - असत्य जाणण्यासाठी माझा जन्मच वाया गेला.... प्रत्येकानं स्वयंप्रकाशित व्हावं, स्वयंप्रेरित व्हावं, असं म्हटलं जातं..... हे स्वयंप्रकाशित्व कुठलं...? ते कुठून येतं...? कशानं येतं...? आणि ते आलं नाही तर काय होतं...? जगाच्या पाठीवरची सगळीच माणसं अशी स्वयंप्रकाशित आहेत का...? या स्वयंप्रकाशानं उजळून निघणं कोणत्या अर्थाने असतं...? एका शब्दासाठी किती प्रश्नांची वलयं उठतात...? प्रश्नांची अशी वलयं उठणं आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात निघणं.... आपले चिंतन होणे हा आपल्या जगण्याचा एक अटळ परिपाक ठरतो.... या चिंतनानेच आपल्याला प्रकाश दिसतो.... प्रकाश नसेल तर आपल्या ज्ञानाच्या, विकासाच्या दिशाच खुंटतात.... त्यांना कुठलाही अर्थ उरत नाही.... 

          कुठल्या प्रकाशानं आपण स्वयंप्रकाशित व्हायचं...? तर हा प्रकाश ज्ञानाचा, अनुभवाचा.... जीवनात आलेल्या बऱ्यावाईट अनुभवांनी माणूस शहाणा बनतो आणि ते शहाणपण तो इतरांना आपल्या कृती-उक्तीतून सांगत असतो.... त्याच्या अनुभवांचे बोल त्याचं मोठेपण, सच्चेपण प्रतीत करीत असतं.... या सच्चेपणाचा, अनुभवीपणाचा दुसरा अर्थ म्हणजे त्याला त्याच्या मर्यादित कक्षेत होणारी ज्ञानाची प्राप्ती.... अनुभव ही या ज्ञानसाधनेतली पहिली पायरी.... तो अनुभव ज्या ताकदीचा, ऊजेर्चा, सत्त्वाचा असेल, त्यावरून त्याच्या ज्ञानाचीही कक्षा ठरते.... या ज्ञानाच्या अनुभूतीनेही आपण उन्नत होत जातो.... अंधारातून अंधाराकडे चाललेला हा प्रवास आपण मधल्या टप्प्यात प्रकाशमान करण्यासाठी धडपडतो.... ही धडपड ज्याची त्याची आपापल्या परीने असते.... या प्रवासात प्रत्येकालाच तर उजळून निघायचं असतं.... आपलं उजळणं दुसऱ्याच्या जीवनातला अंधार नाहीसा करण्यासाठी असेल, तर त्याचं मोल खूप मोठं ठरतं.... आणि हे उजळणं स्वत:पुरतंच असेल तर त्याचं मोल थिटं ठरतं.... 

          माझ्यामते खूपदा असं उजळून निघणंही कृतक ठरते...... ते आपल्यापुरतं खरंही असतं.... पण तो प्रकाश नीटपणे आपल्याच जीवनातला अंधार बाजूला सारू शकत नाही, एवढं कृतकपण त्यात येतं..... या निमित्तानं एक गोष्ट आठवते......  एका गावात एका साधू महाराजांचा काही दिवसांसाठी मुक्काम असतो..... एकदा ते आपल्या आप्ताला पत्र लिहितात आणि लिहिलेलं पत्र हातात घेऊन पोस्टाच्या डब्यात टाकायला निघतात..... गावात खूप शोध घेतल्यावरही त्यांना पोस्टाचा डबा दिसत नाही...., तेव्हा ते रस्त्याने जाणाऱ्या तरुणाला 'पोस्टाचा डबा कुठे आहे' म्हणून विचारतात.... तरुण त्यांना काही वेळातच तो दाखवून देतो..... साधू महाराजांचा प्रश्न सुटतो.... 

      तरुण त्यांना विचारतो..... 'महाराज आपण कुठे असता...?' त्यावर महाराज सांगतात..... 'मी पलीकडच्याच देवळात मुक्कामाला आहे..... तिथे सर्वसामान्यांना मोक्षाचा मार्ग दाखवीत असतो..... तूही तिथे ये.... तुलाही मी मोक्षाचा मार्ग दाखवेन....' त्यावर तरुण त्यांना उत्तर देतो..... 'महाराज, तुम्हाला गावातला पोस्टाचा साधा डबा ठाऊक नाही.... तेव्हा तुम्ही मला कोणता मोक्षाचा मार्ग दाखवू शकाल...?' मुलाच्या त्या उत्तरानं साधू महाराज निरुत्तर होतात.... आत्मपरीक्षण करायला लागतात.... ही गोष्ट ऐकून आपण एखादेवेळी म्हणू, या कथेतला मुलगा उद्धट आहे.... प्रथमदर्शनी तसे जाणवतेही.... पण त्याहीपलीकडे जाऊन विचार केला तर या प्रक्रियेतलं कृतकपण, तकलादूपणही अभिव्यक्त होतं..... 

         गुरु आपल्याला प्रपंचातून मार्ग काढून संसार म्हणजे काय हे अभ्यासून आध्यत्मिक दिशा - मोक्ष मार्ग दाखवतो..... त्यावर चालणे आपलेच काम असते.... प्रपंचात आपल्या वाटा, लक्ष्य, ध्येय प्रकाशमान करण्यासाठी आपणच गुरुतत्वाकरवी आपली दिशा शोधायची असते.... अशी दिशा कुणी आपल्याला दाखविली तर ती केवळ आपलीच असेल असेही नाही..... त्यामुळे ती कोण दाखवतो हे महत्वाचे ठरते..... कोणाशी संग हे उदायाकडे कि अस्ताकडे हे ठरवते.....  आपल्यामुळे आपला अवतीभवतीचा परिसर उजळून निघेल, असं स्वयंप्रकाशित आपल्याला व्हायचं असेल तर त्यासाठी आपलं स्वयंप्रकाशित होणं अस्सल हवं..... ते तकलादू किंवा फडफडत्या पणतीसारखं नसावं, तर नैष्ठिकपणे तेवत राहणाऱ्या एखाद्या ज्योतीसारखं असावं.... जोवर आपण व्यक्तिगत पातळीवर पूर्णत्वास पोहोचू शकत नाही, तोवर आपण आपल्या प्रभेनं इतरांना उजळविण्याचा वृथा अहंकार मनात बाळगणं, याच्यासारखं आपल्या व्यक्तित्वाचं कच्चेपण दुसरं कुठलं नसतं.... 

        अध्यात्मिक-प्रापंचिक जीवनात मार्गदर्शन नक्कीच हवे.... नाहीतर बऱ्याच वेळा आपण चुकीचाच मार्गक्रमण सुरु करतो.... आणि योग्य मार्गावर येई पर्यंत बऱ्याच वेळा वेळ मात्र गेलेली असते.... अर्थात सत्संगत सर्व संत महात्म्यांनी ह्याकरीताच महत्वाची सांगितली आहेत.... शांती, विवेक विचार, समाधान आणि सत्संगती हे मानवी जीवनाचे चार द्वारपाल आहेत..... एकाच जीवनात चारही पायऱ्या एकदम चढणे काही जणांना अजिबात शक्य होत नाही.... कारण मायेचा प्रभाव सामान्य माणसाला लवकर स्थिरता लाभू देत नाही... कारण मन हे हळू हळू आटोक्यात आणायचे असते.... मनाला संयमात ठेवणे अतिशय कठीण आणि दुष्कर कार्य आहे.... पण हळू हळू आपणच ह्या मनाची समजूत काढून सत्याचा बोध त्याला करुन द्यावयाचा असतो.... 

         एक बघा, शांती असेल तर आपले विचार कायम चांगले असतात.... विचार चांगले असतील.... तर माणूस समाधानी असतो.... आणि चांगले विचार आणि समाधानी वृत्ती आपल्याला कायम चांगल्या लोकांपर्यंत पोहोचवते.... आणि हळू हळू दुषवृत्ती असलेले लोक लांब लांब जाऊ लागतात.....   जीवनात सत्संगती फार महत्वाची भूमिका पार पाडते कारण आपले विचार संगतीमुळे बदलतात.... विचारांनीच क्रांती येते पण हे विचार सतविचार असणे फार गरजेचे असते.... नाहीतर यादवी माजते... आणि त्यातच आजपर्यंत मानवाचा अंत झालेला दिसून आलेला आहे.... मग वेळ येते ती.... 
                              सूर्योदय झाला खरा....  पण उशीर खूप झाला..... 
                                              सत्य - असत्य जाणण्यासाठी.....  माझा जन्मच वाया गेला.... 
म्हणूनच म्हणतो अशी वेळ आपल्यावर येऊ देऊ नका.... आजच जागे व्हा.... हा प्रवास तसा अनवट आहे...... प्रचंड नैष्ठिकही आहे..... पण त्या प्रवासाचा एक घटक होणंही तेवढंच आनंददायी आणि ऊर्जस्वल - उदयाकडे जाणारे आहे..... या ऊर्जस्वल, अनवट प्रवासाला लवकरात लवकर जाणे- निघणे हेच केवळ आपल्या हाती असतं नाही का..... 

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Monday 9 July 2012


वासनांचे संगे जन्म हा झाला..... सद्गुरू संगे मोक्ष हा मिळाला.....

आज आपल्याला वासनांची व अविचाराची इतकी सवय होत जाते की..... इच्छा असूनही मांगल्याचा आणि सौंदर्याचा जन्म मूळी अशक्यच होऊन बसतो.... आपल्याच हातानी आपल्याला जखडून ठेवतो..... आणि जसे जसे जखडले जातो, तसे तसे ' सत्य ' आपल्या पासून अधिकच दूर जाते....

आज माणसाने केवळ परिस्थितीचा गुलाम होणे फार वाईट..... हि झाली निराशाजनक विचारधारा जी आपल्या संस्कृतीला मान्य नाही...... योगायोगाने वाईट वातावरणात/ परिस्थितीत जन्म झाला असला.... तरी पण मानुस स्वतःचे ध्येय उच्च आणि दृष्टी उन्नत ठेवील तर तो मांगल्याकडे जाऊ शकतो.... अशीच भारतीय संस्कृतीची धारणा आहे....

यासाठी उदाहरण म्हणजे..... चिखलात राहूनही ऊर्ध्व दृष्टी राखून सूर्योपासना करणारे कमळ ही गोष्ट किती सरळपणे समजावते आहे.... कमळाला चिखलात निर्माण करून देवाने आपल्याला आहे त्या परिस्थितीत निरपेक्ष जीवन जगण्याच्या प्रेरणेचे आगळे दर्शन घडविले आहे नाही का..?..... तसेच कमळ हे सौंदर्याचेही प्रतीक आहे..... कवींनी मानवाच्या प्रत्येक अंगाला कमळाची उपमा दिलेली आहे..... भगवंताच्या अवयवांनाही कमळाची उपमा देऊन ऋषीमुनींनी त्याचे पूजन केले आहे....

सारांश, कमळ म्हणजे अनासक्तीचा आदर्श, मांगल्याचा महिमा, प्रकाशाचे पूजन, सौंदर्याची निर्मिती आणि जीवनाचे दर्शनच होय.....  आता आपल्याला आपले जीवन सुधारायचे.... मग यावेळी आपल्याला उपयोगी पडते ते नामस्मरण आणि आपले गुरुदेव.....

आपले गढूळ जीवन अशा सद्गरुच्या सहवासात निर्मळ होऊ लागते..... आपल्या जीवनी प्रकाश येतो.....  बघा ना, आईबाप देह देतात, जन्म देतात..... परंतु या मातीच्या देहाचे सोने कसे करावे, हे सद्गुरू शिकवितो..... जसे भौतिक शास्त्रांतील गुरू मातीची माणके बनवितील.... तसेच आपले सद्गुरू आपल्या जीवनाच्या मातीची माणिक-मोती बनवितो, पशूचा मनुष्य करतो..... आपल्याला वैचारिक जन्म देतो, सत्यसृष्टीत आणतो.....

सद्गुरूला शरण जा... त्याची आळवणी करा....
उदारा जगदाधारा देई मज असा वर | स्व-स्वरुपानुसंधानी रमो चित्त निरंतर.....
काम-क्रोधादिका थारा मिळो नच मदन्तरी | अखंडित वसो मूर्ति तुझी श्रीहरी साजिरी.....

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Sunday 8 July 2012




स्वामी प्रभुपाद…… एक अव्यक्त व्यक्तिमत्व…… 

बघा ना, आज आपण काय चित्र पाहतो… यशाचे धनी सगळेच असतात…. पण अपयशाचा धनी मात्र एकच असतो…. जेव्हा तुमच्या जीवनात अपयश तुमची पाठ सोडत नाही… तेव्हा तुमचे सगे सोयरे आणि मित्रच नव्हे तर तुमची पत्नी आणि मुले देखील तुमच्याकडे पाठ फिरवतात हे एक कटू सत्य आहे…..

स्वामी प्रभुपाद वयाच्या 57 व्या वर्षापर्यंत नुसता संघर्षच करत राहिले…… तेव्हा या सर्वानीच त्यांच्याकडे पाठ फिरवली…. वयाच्या 69 व्या वर्षापर्यंत हा संघर्ष संपलाच नाही…. परंतु पुढल्या 12 वर्षात त्यांनी जो इतिहास घडवला, त्यामुळेच आज जगभरातील शाळातील 10-12 लाख गरीब मुलांना दररोज दुपारचे जेवण मोफत दिले जाते….. दर वर्षी हि संख्या एक लाखाने वाढतच जाणार आहे…. कारण प्रभुपाद स्वामिना गरिबान विषयी अपार स्नेहभाव होता, हे त्यांच्या लाखो अनुयायांना माहित आहे…..

कलकत्त्याचे एक व्यापारी व्यापारात अपयशी ठरले….. कारण त्यांचे सारे लक्ष कृष्ण भक्तीकडेच लागलेले असायचे….. त्यामुळे समाजात नेहमीच ते चेष्टेचा विषय ठरायचे….. कृष्णभक्तीचा प्रसार पुस्तक लिहून जगभर करायचा आणि कृष्णाची मंदिर जगभर बांधायची असं स्वप्नं ते जागेपणीच बघायचे…. त्यामुळे शेवटी शेवटी तर त्यांना घरातल्यानीही वाळीत टाकले….. तेव्हा खिशात दिडकी नसताना वयाच्या 69 व्या वर्षी ते कोणीतरी दिलेल्या बोटीच्या तिकिटाने महिनाभर प्रवास करून अमेरिकेला गेले…..

आपल्या अमोघ वाणीने आणि अथक परिश्रम घेऊन लिहिलेल्या पुस्तकांनी त्यांनी अशी काय जादू केली कि….. सुरुवातीला हजारो आणि नंतर लाखो परदेशी युवक कृष्ण भक्ती मध्ये तल्लीन झाले….. हृदय विकाराने ते त्रस्त होते…..  तरीही त्यांच्याकडे प्रचंड इच्छा शक्ती आणि आत्मविश्वास होता… त्यामुळे पुढेही अपार संघर्ष करून त्यांनी पुढल्या 12 वर्षात कृष्ण भक्तीचा प्रसार करून जग भरात 110 एकाहून एक सुंदर कृष्ण मंदिर बांधली…. आणि आपलं स्वप्नं खरं करून दाखवलं….. आज जगभर इस्कोनने बांधलेली ३५० हून अधिक कृष्ण मंदिर आहेत….. त्यांनी स्वतःला कधी भगवान न मानता कृष्ण भक्तच मानले……

जगातील 6 खंडामद्धे जाऊन कृष्ण भक्तीचा प्रसार करणारे स्वामी प्रभुपाद इस्कॉन म्हणजेच हरे कृष्ण आंदोलनाचे संस्थापक आहेत…. 1977 मध्ये वयाच्या 81 व्या वर्षी त्यांचे निधन झाले….. त्यांनी लिहिलेल्या भगवत गीतेवर हल्लीच रशिया मद्धे बंदी घातली जाणार ह्या बातमीने ते चर्चेत आले….. भागवत गीतेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या 70 हून अधिक पुस्तकांचे भाषांतर जगभरातील 76 भाषांमध्ये झालेले आहे….. 1996 मध्ये टपाल तिकीट काढून सरकारने त्यांच्या 100 व्या जयंतीला त्यांच्या कार्याला श्रद्धांजली वाहिली…..

त्यांच्या निधनाला 34 वर्ष झाली…. तरी आजही उच्च शिक्षण घेतलेले आणि महिना 4-5 लाखापर्यंत पगार घेणारे….. असंख्य युवक आज नोकरीला लाथ मारून प्रभुपद स्वामींचे कार्य नेटाने पुढे नेत आहेत….. आणि भगवत गीतेचा प्रचार जोमाने करीत आहेत….. त्या सर्वांनाच आपण शुभेच्छा देऊया….. आणि त्या लाखो मुलापैकी मुंबईतील महापालिका शाळामधील  किंवा इतर गरीब मुलांना आपणही कधीतरी भोजन घालू…. असा नवीन संकल्प करूया….

 ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Saturday 7 July 2012

मॅनेजमेंट गुरू : ओम नमोजी गणनायका ......

बघा ना, आज आयुष्याच्या प्रत्येक टप्यात मॅनेजमेंट आवश्यक असते..... शिक्षण असो वा करियर, घर असो वा कार्यालय प्रत्येक गोष्ट ही नियोजनावर आधारित असते..... नियोजन नसेल तर काम यशस्वी होणे शक्य नाही.... प्रत्येक क्षेत्रातील मॅनेजमेंट गुरु हा आपल्या सहकार्‍यांना 'फंडे' देत असतात..... आज आपण पाहुया चक्क वि‍घ्‍नहर्त्या श्रीगणेशाचे मॅनेजमेंट फंडे ....

आराध्य दैवत विघ्नहर्ता श्री गजाननाशी संबंधित प्रत्येक गोष्‍ट व वि‍चार आपल्याला कोणता ना कोणता मॅनेजमेंट फंडा देत असते.... हे आपण देखील अनुभवले असेल, मात्र ते ओळखण्‍याचे कौशल्य असणे गरजेचे आहे..... भारत जगदगुरू आहे.... आपल्या धर्मात प्रत्येक गोष्टीला जीवनाशी जोडून विचार करायला सांगितले आहे..... मॅनेजमेंट गुरू गणपतीबाप्पाच्या काही खास वैशिष्ट्यांचा आपण येथे विचार करणार आहोत....

मोठे डोके :- मोठे डोके बुद्धी दर्शविते..... मॅनेजमेंटमधील पहिले सूत्र आहे की विचार करण्यासाठी तल्लख बुद्धी आवश्यक आहे.... सदैव मोठ्या मनाने सर्वांगीण विचार करा....

डोळे :- आपला दृष्टीकोन कसा असावा... हे गणपतीच्या डोळ्यांवरून ध्यानात येते.... प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर असते....

सोंड :- दूरदृष्टी ध्यानात येते.... लांब नाक म्हणजे दूरूनच वास घेऊन धोरण निश्चित करणे व त्यानुसार आपली योजना तयार करणे.....

मोठे कान :- मोठे कान सांगतात की आपल्याशी संबंधित प्रत्येकाचे म्हणणे ऐका.... एखादा सामान्य माणूसही तुम्हाला महत्त्वाचा सल्ला देऊ शकतो.... सर्वांचे ऐका....

मोठे पोट :- मोठे पोट म्हणजे आपल्या गोष्टी, योजना, महत्त्वाच्या गोष्टी, गुप्त गोष्टी पचवता आल्या पाहिजेत.... काही लोकांच्या पोटात काहीही थांबत नाही.... गणपतीचे म्हणणे आहे की तुम्हाला यशस्वी टीम लीडर बनायचे असेल तर आपल्या काही गोष्टी नको त्या माणसांपासून गुप्तही ठेवता आल्या पाहिजेत....

उंदीर :- गणपतीचे वाहन आहे.... तुम्ही कितीही बुद्धीमान असले तरी तुमच्याकडे तर्कशक्ती पाहिजे.... उंदीर तर्कशक्तीचे प्रतिक आहे.... ज्ञानाला तर्काची जोड असेल तर विजय आपलाच आहे....

पत्नी रिद्धी सिद्धी :- गणतीला दोन पत्त्नी आहेत रिद्धी आणि सिद्धी.... रिद्धी म्हणजे कार्यकुशलतेत सहजता.... सिद्धी म्हणजे कार्यकुशलता.... तुमच्याजवळ बुद्धी असेल तर कार्यकुशलताही येईल आणि ती टिकूनही राहील.....

पुत्र योग आणि क्षेम :- योग आणि क्षेम हे गणपतीचे दोन पुत्र आहेत..... योग म्हणजे जोडणे.... ही बाब आर्थिक लाभाशी जोडून पाहतात.... बुद्धी असेल तर कार्यकुशलता आणि कार्यकुशलता असेल तर आर्थिक लाभ होतो.... क्षेत्र म्हणजे आर्थिक लाभ सुरक्षित राहणे....

ॐ गं गणपतये नमो नमः ......

Wednesday 4 July 2012

तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला..... महारुद्र... बाजीप्रभू देशपांडे.....
पन्हाळगडची लढाई.....

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडावर सुखरूपपणे पोचणे..... हा एक रोमहर्षक आणि धाडसी प्रसंग....... या प्रसंगी आपल्या महाराजांसाठी जीव ओवाळून टाकणारे लाखमोलाचे बाजी प्रभू देशपांडे एक साक्षात हौतात्म्यच......

इ.स.२ मार्च १६६० रोजी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता..... यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते...... मुसळधार पावसात सुध्दा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता.... या कठीण प्रसंगी महाराजांनी सिध्दीस तहाचा निरोप धाडला..... त्यामुळे सिध्दी गाफील राहिला..... शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिध्दी जोहर यास तहाची बोलणी करण्यात गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला..... शिवा काशीद चे खरे रूप कळल्यावर सिध्दीने त्यांस ठार केले..... तोवर छत्रपती विशाळगडाच्या वाटेवर होते......

छत्रपती शिवरायांनी पन्हाळ्यावरून,विशाळगडाकडे पलायन केल्याचे समजल्यानंतर.... सिद्दीने,सिद्दी मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवले..... व त्यांचा पाठलाग चालू झाला..... मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठले..... अशावेळी बाजीप्रभूंनी छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत..... तोवर ही खिंड लढवली जाईल असे सांगितले......

हे सार इतक सोप्प नव्हतच.... केवळ ३०० मावळे घेउन सिद्धीच्या फौजेशी लढने सोप्प नव्हत.... पण बाजी लढले..... कळी काळाच्या हि उरात धडकी बसेल.... अशा आवेशात लढले..... साक्षात मृत्यूने त्या घोड खिंडीत तांडव घातले..... घोडखिंडीतील अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली..... शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू, फ़ुलाजी, संभाजी जाधव, बांदल यांनी मोठा पराक्रम गाजविला......

सिद्धीला बाजीला थोपवण भारी जात होत.... आणि काळान डाव साधला बंदुकीची गोळी वर्मी लागली...... आधीच जखमांनी बाजींच्या देहाची चाळण उडाली होती..... परंतु विशाल गडावरून काही ईशारति होत नव्हत्या..... आणि बाजींचा देह काही केल्या खाली पडत नव्हता...... पराक्रमान हि लाजून तोंडात बोट घालावी असा पराक्रम बाजी गाजवत होता..... आणि महाराज गडावर पोहचले..... ईशारति झाली तोफांचे आवाज झाले......

महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा गजर झाला..... इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूने तोफांचा आवाज ऎकल्यानंतरच समाधानाने आपला जीव सोडला......आणि बाजींनी देह ठेवला.... घोडखिंड पावन खिंड झाली बाजींच्या रक्ताने पावन झाली.... बाजींच्या निष्ठेने पावन झाली..... या युध्दात मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० मावळे कामी आले..... तर मसूदचे जवळपास ३००० सैनिक मारले गेले..... बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून इतिहासात अमर झाली.....

साक्षात मृत्यूलाही जरा थांब...... माझा धनी गडावर पोहचला नाही तोपर्यंत...... मी हि मरणार नाही असे सांगणारे बाजी प्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाला वंदन......

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Tuesday 3 July 2012

ग्रंथ हेच गुरू......

आज विचार केला तर.... प्राचीनकाळी आपल्या येथील शिक्षण संस्था प्रामुख्याने मौखिक परंपरेला मानणारी होती.... विद्याभ्यासही मौखिक परंपरेने चालत आलेला..... आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारा होता...... पुढे काळाच्या ओघात छपाईची कला अवगत झाली..... आणि पूर्वासुरींचे हे मौखिक विचारधन छापील स्वरूपात कायमस्वरूपी बंदिस्त झालं...... 

बघा, आपल्या आयुष्यातील शैक्षणिक कालखंडात आपल्याला गुरूचा सहवास लौकिक अर्थाने फक्त विद्यादानाच्या रूपानेच लाभतो.... आणि तोही ठराविक कालावधीसाठी..... मात्र त्यापुढील उर्वरित आयुष्यात आपल्याला भासणारी गुरूची उणीव ग्रंथरूपाने दूर होते नाही का..... 

विविध विषयांवरचे हे ग्रंथ / पुस्तके आपल्याला गुरूरूपाने मार्गदर्शन करतात..... दिशादर्शक म्हणून कार्य करतात..... या ग्रंथांचे महत्त्व पूर्वीच्या काळीही होते आणि आजही तितकेच अबाधित आहे..... जगभर तंत्रज्ञानाचा प्रसार झाला असला.... आणि हे जग संगणकाच्या व्याप्तीमध्ये सामावणारं असलं.... तरीही ग्रंथांचे महत्त्व कमी होणार नाही....

वाचाल तर वाचाल.... हे वाक्य काही उगाच नाही.... तर ग्रंथ / पुस्तकासारखा मित्र नाही...... प्रतिकूल परिस्थितीतही चांगले जीवन घडवण्याचे काम ग्रंथ / पुस्तके करतात....... विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वाचन करुन ज्ञान ग्रहण करायला हवे.,,,,, साहित्याकडे डोळसपणे पाहिल्यास उत्तम भवितव्य घडते....

पुस्तके समाजाला घडवतात..... ग्रंथ / पुस्तकांचा वास जगण्याचा आनंद देतात...... आपला पुस्तकसंग्रह वाढवा व स्वत:चं असं एक लघुग्रंथालय विकसित करा..... एखाद्या ग्रंथसंग्रालयाचे सभासद व्हा आणि आवडती पुस्तके वाचून काढा..... देशोदेशी फिरल्याने माणूस समृध्द होतो त्याचप्रमाणे.... वाचनाने माणूस समृध्द होतो....... 

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Monday 2 July 2012


गुरु बोध मधील एका जेष्ठ साधकांनी खालील प्रश्न विचारलेला.... त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे.....

प्रश्न :-अनुग्रह घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचे असते  तो घेतल्यावर काही बंधने असतात का ? हे कृपया सविस्तर सांगावे……. 

अनुग्रह घ्यायचा म्हणजे आपण ध्येय (मोक्ष - भगवंत प्राप्ती) ठरवायचे व ते प्राप्त करण्यासाठी गुरूच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करायचे..... अनुग्रह घ्यायचा म्हणजे आपण आपला प्रवास कसा करायचा ते गुरु कडून माहित करून घेणे....... अनुग्रह म्हणजे जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र म्हणजे संकल्प , प्रयत्न , अनुग्रह म्हणजेच यश होय...... ध्येयाशिवाय जीवन जगणे.... कोठे जायचे माहित नसतांना प्रवास करणे होय...... ध्येयच तुम्हाला तिथपर्यत पोहचण्याची क्षमता देतो...... आणि आनंदाने जगण्याची शक्तिही देतो....... 

आपल्याला ध्येय प्राप्त करण्याकरीता केवळ संकल्पच घेऊन चालत नाहि...... तर ते साध्य करण्याकरीता इष्ट प्रयत्न करणेही आवश्यक आहे........या संकल्प व प्रयत्ना सोबतच गुरुचा अनुग्रहही आवश्यक आहे....... 

गुरुंनी अनुग्रहानी आपणास त्यांच्या परंपरेत सामावून घेताना त्यांनी एक कुठला तरी मंत्र दिला असेल....... तो मंत्र म्हणजे स्वतःच्या साधनेने सिध्द केलेले जिवंत शब्द असतात...... गुरुंनी असा सामर्थ्यवान मंत्र आपल्याला देऊन परमकृपा केलेली असते...... गुरुनी आपल्याला अनुग्रह देऊन व आपला अंगीकार करण्यात...... म्हणजे आपल्यात `स्वतःमध्ये स्वरुप ओळखायची क्षमता आहे’ हा विश्वास दाखविला आहे........ सद्‍गुरूंचा अनुग्रह मिळणे हा एक योग आहे...... 

परमार्थाची सुरुवात गुरूच्या अनुग्रहाने..... सद्‍गुरूच्या कृपेने होते...... परमार्थात अनुभव येण्यास सद्‍गुरूंची कृपा व्हावी लागतो..... कारण गुरु अनुभवी असल्याने ते आपल्याला तो अनुभव देऊ शकतात...... 

तसेच अनुग्रह घेतल्यावर काही बंधने येणारच....ती पाळावीत...... नाहीतर ध्येयप्राप्ती कशी होईल.......यात सद्‍गुरूंनी सांगितलेल्या साधनाचा अभ्यास करणे हे अत्यंत आवश्यक आहे...... त्यावरच सर्व काही अवलंबून आहे...... 

गुरूमंत्राच्या नियमित जपाने...... साधनेने आध्यात्मिक प्रगती होते...... "गुरूविन कोण दाखवील वाट'....... ते यासाठीच...... गुरुंच्याकृपेने हे सहज साध्य होते...... यासाठी वणवण भटकावे लागत नाही..... अनुग्रह ही आत्मज्ञान प्राप्तीसाठीची पहिली पायरी आहे...... सद्‌गुरूंच्या कृपेने शिष्य या पायऱ्या सहज पार करतो...... शेवटी मोक्ष - भगवंत प्राप्ती ......

मी 'राम राम' म्हणतो, वाईट मार्गाने जात नाही, मग गुरू कशाला हवा…. असे काहीजण म्हणतात….. 'मी' केले ही जाणीव आड येते…. म्हणून सद्गुरूची, अनुग्रहाची आवश्यकता आहे….. अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार….. देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला….. म्हणून भगवंतांनी त्याला 'गुरू कर' म्हणून सांगितले…… 

ॐ श्री गुरुदेव दत्त.......