Saturday 21 July 2012

अध्यात्म-स्वरूप...

माणसाचे सत्य स्वरूप देहाच्या माध्यमातून पूर्णपणे अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न करीत असते... त्याला मनुष्याचे अंतःस्थ दोष व बाह्य जग दडपण्याचा प्रयत्न करीत असतात... या संघर्षाचे नाव जीवन होय.!. या व्याख्येतील सत्य स्वरूप म्हणजेच प्रत्येक माणसाचे अध्यात्म होय...

ते कसे.?. तर सोन्याचे नाना अलंकार घडवावे व त्यांना अंगठी, हार, बांगड्या इ. नावे द्यावीत, त्याप्रमाणे एकाच परमात्मतत्त्वापासून सारे वस्तूमात्र व प्राणीमात्र आकारास आले आहेत... म्हणूनच सर्व चराचर मूलतः परब्रह्मस्वरूपच आहे... परब्रह्माचे जे स्वरूप, त्याचा जो भाव तोच सर्व भूतांसाठी अध्यात्म झाला... पण सोन्याच्या दागिन्यावर चांदीचा मुलामा दिल्यास त्याचे सोनेपण जसे झाकले जाते, अगदी तसेच जगाच्या सहवासात मूळ स्वरूपावर बाह्य विषयांची म्हणजेच चांगल्या व वाईट गुणांची रंगरंगोटी होऊन प्राणीमात्र आपले परब्रह्मपण हरवतात व जन्म-मृत्यूच्या बंधनात अडकतात...

मग धुळीने माखलेल्या आरशात दिसणारे प्रतिबिंब जसे मलिनच भासते, त्याप्रमाणे गुणांच्या प्रभावाखाली मनुष्यादि देहांच्या ठिकाणी असलेले मूळ स्वरूप गुणात्मक, बद्ध भासते... असे हे जीवाच्या ठिकाणी असलेले मूळ स्वरूपावरील बाह्य विषयांचे भासमात्र आच्छादन हाच जीवाचा बंध होय आणि निर्विषयी देह-जीवाच्या माध्यमातून होणारी स्वस्वरूपाची निर्दोष व यथार्थ अभिव्यक्ती म्हणजेच जीवासाठी मोक्षप्राप्ती होय..!..
अशा प्रकारे सत्य, शिव आणि सुंदर असे प्रत्येकाचे मूळ स्वरूप व देहादि माध्यमातून गुणांच्या पडद्यातून परावर्तित होणारे स्वरूप अनुक्रमे शिव व जीव म्हणून ओळखले जाते... पहा यात.!. जीवा-शिवाचे नाते किती घट्ट आहे.!. इतके की त्याला अद्वैताशिवाय दुसरे काय नाव देणार.?. हे अद्वैत जाणणे म्हणजे जीवाने आपले शिवपण जाणणे व स्वाधीन गुणांच्या पडद्याआडून ते साकारणे म्हणजेच अध्यात्म जाणणे होय.!. हेच प्रत्येकासाठी परम-प्राप्तव्य म्हणजे परमार्थ आहे.!.  ॐ श्री गुरुदेव दत्त...





अंधारातून उजेडाकडे नेणारा ज्ञान सूर्योदय..... 

          आज गौतम बुद्धांनी सांगितलेली गोष्ट  वाचनात आली.... गोष्ट अशी कि एक विद्वान होता.... त्याने खूप अध्ययन केले होते..... वेद- शास्त्रांतही तो पारंगत होता.... त्याला आपल्या बुद्धीच्या वैभवाचा त्याला अति गर्व होता..... तो नेहमीच आपल्या हातांत एक पेटती मशाल घेऊन फिरत असे.... त्याचे कारण विचारले तर तो सांगत असे की.... " प्रपंच अंधकारमय आहे.... माणसाना थोडासा तरी ' प्रकाश ' मिळावा म्हणून मी ही मशाल घेऊन जात असतो..... लोकांच्या अंधारलेल्या जीवनमार्गावर ह्या प्रकाशाखेरीज दुसरा प्रकाश आहे कुठे ? " 

        एक दिवस एका भिक्षूने त्याचे हे शब्द ऐकले.... ते ऐकून तो हसायला लागला आणि म्हणाला.... " मित्रा....  सर्वत्र ' प्रकाश ' देणारा सूर्य तुझ्या डोळ्यांना दिसूच शकत नाही..... म्हणून संसार अंधकारमय आहे.... असे म्हणू नकोस.... शिवाय तुझ्या हातातील ही जळती मशाल सूर्याच्या ' लौकिकात ' अशी कोणती भर घालणार आहे ? आणि ज्यांना सूर्यसुद्धा दिसत नाही... त्याना तुझी ही क्षुद्र मशाल तरी दिसेल असे तुला वाटते, हा तुझ्या अकलेचा ' भ्रम ' आहे.....

          आता आपण ह्या गोष्टीपासून काय बोध घेऊ..... आत्म बोध हाच कि : हल्ली तर सर्वचजण अयोग्य अश्या विचारांच्या, पंथाच्या आणि वादाच्या मशाली हातात घेऊन फिरताना दिसत आहेत.... ह्या सर्वांचाही असाच दावा आहे की, त्यांच्या प्रकाशाखेरीज अन्य कोणताही प्रकाश अस्तित्वात नाही..... आणि आपले तेच खरे असे ते मानतात आणि याला मी घडवेन, याचे करिअर मी करून देईन हा खोटा व व्यर्थ अभिमान बाळगतात.... आणि मनुष्यांचा अंधकारपूर्ण मार्ग प्रकाशित करण्याची अति उत्सुकता ह्या सर्वांनाच आहे..... पण खरी गोष्ठ अशी आहे की, त्यांच्या अहंकाराच्या मशालींच्या धुरांत माणसाच्या डोळ्यांत सूर्यच दिसेनासा झाला आहे आणि तेच स्वःताच्या मीपणात जळत असतात..... 

         यातून conclusion एकच : मनुष्याने निर्माण केलेल्या मशाली नव्हेत.... तर ईश्वराने निर्माण केलेला ' सूर्य ' हाच वास्तविक एकमात्र प्रकाश आहे..... सत्य हे सूर्य प्रकाश प्रमाणे असते..... त्याला कितीही लोकांनी मोडले तोडले.... तरी त्या सत्याचे तेज कमी होत नाही..... जे हातात मशाल घेऊन फिरत आहे.... त्यानाच प्रकाश काय आहे व सुर्य काय आहेत हेच माहीत नाही.... ते दुसऱ्‍याला काय प्रकाश दाखविणार.... आपले अज्ञान लपविण्याचे हे सोँग आहे..... मग आपण होतो मेढ्यांचे कळप.... पराचा कावळा करणारे खुप भेटतील.... आपण आपला योग्य मार्ग निवडायचा असतो.... अडचणीच्या वेळी ह्यांच्या मशाली विजतात, म्हणूनच सर्वात श्रेष्ठ धर्म फक्त व फक्त मानवता..... मानवाच्या (स्वयंघोषित त्राता) हातातल्या मशाली ह्या प्रकाश देणाऱ्‍या तर मुळीच नाहीत..... या मशाली तर नसते वाद विवाद उत्पन्न करवुन वणवा पेटविणाऱ्‍या आहेत..... खरा सूर्यप्रकाश म्हणजे गुरुतत्वाचे ज्ञान आणि पूर्ण समर्पण वृत्तीने त्याचे आचरण होय.... 

            बघा ना, आज आपण काय चित्र पाहतो तर.... अंधारातून उजेडाकडे जाताना माणूस भरकटच राहतो.... जीवनात मार्गदर्शन नक्कीच हवे नाहीतर बऱ्याच वेळा आपण चुकीचाच मार्ग चालणे सुरु करतो.... आणि योग्य मार्गावर येई पर्यंत बऱ्याच वेळा वेळ मात्र गेलेली असते.... मग काय होते सूर्योदय झाला खरा पण उशीर खूप झाला..... सत्य - असत्य जाणण्यासाठी माझा जन्मच वाया गेला.... प्रत्येकानं स्वयंप्रकाशित व्हावं, स्वयंप्रेरित व्हावं, असं म्हटलं जातं..... हे स्वयंप्रकाशित्व कुठलं...? ते कुठून येतं...? कशानं येतं...? आणि ते आलं नाही तर काय होतं...? जगाच्या पाठीवरची सगळीच माणसं अशी स्वयंप्रकाशित आहेत का...? या स्वयंप्रकाशानं उजळून निघणं कोणत्या अर्थाने असतं...? एका शब्दासाठी किती प्रश्नांची वलयं उठतात...? प्रश्नांची अशी वलयं उठणं आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात निघणं.... आपले चिंतन होणे हा आपल्या जगण्याचा एक अटळ परिपाक ठरतो.... या चिंतनानेच आपल्याला प्रकाश दिसतो.... प्रकाश नसेल तर आपल्या ज्ञानाच्या, विकासाच्या दिशाच खुंटतात.... त्यांना कुठलाही अर्थ उरत नाही.... 

          कुठल्या प्रकाशानं आपण स्वयंप्रकाशित व्हायचं...? तर हा प्रकाश ज्ञानाचा, अनुभवाचा.... जीवनात आलेल्या बऱ्यावाईट अनुभवांनी माणूस शहाणा बनतो आणि ते शहाणपण तो इतरांना आपल्या कृती-उक्तीतून सांगत असतो.... त्याच्या अनुभवांचे बोल त्याचं मोठेपण, सच्चेपण प्रतीत करीत असतं.... या सच्चेपणाचा, अनुभवीपणाचा दुसरा अर्थ म्हणजे त्याला त्याच्या मर्यादित कक्षेत होणारी ज्ञानाची प्राप्ती.... अनुभव ही या ज्ञानसाधनेतली पहिली पायरी.... तो अनुभव ज्या ताकदीचा, ऊजेर्चा, सत्त्वाचा असेल, त्यावरून त्याच्या ज्ञानाचीही कक्षा ठरते.... या ज्ञानाच्या अनुभूतीनेही आपण उन्नत होत जातो.... अंधारातून अंधाराकडे चाललेला हा प्रवास आपण मधल्या टप्प्यात प्रकाशमान करण्यासाठी धडपडतो.... ही धडपड ज्याची त्याची आपापल्या परीने असते.... या प्रवासात प्रत्येकालाच तर उजळून निघायचं असतं.... आपलं उजळणं दुसऱ्याच्या जीवनातला अंधार नाहीसा करण्यासाठी असेल, तर त्याचं मोल खूप मोठं ठरतं.... आणि हे उजळणं स्वत:पुरतंच असेल तर त्याचं मोल थिटं ठरतं.... 

          माझ्यामते खूपदा असं उजळून निघणंही कृतक ठरते...... ते आपल्यापुरतं खरंही असतं.... पण तो प्रकाश नीटपणे आपल्याच जीवनातला अंधार बाजूला सारू शकत नाही, एवढं कृतकपण त्यात येतं..... या निमित्तानं एक गोष्ट आठवते......  एका गावात एका साधू महाराजांचा काही दिवसांसाठी मुक्काम असतो..... एकदा ते आपल्या आप्ताला पत्र लिहितात आणि लिहिलेलं पत्र हातात घेऊन पोस्टाच्या डब्यात टाकायला निघतात..... गावात खूप शोध घेतल्यावरही त्यांना पोस्टाचा डबा दिसत नाही...., तेव्हा ते रस्त्याने जाणाऱ्या तरुणाला 'पोस्टाचा डबा कुठे आहे' म्हणून विचारतात.... तरुण त्यांना काही वेळातच तो दाखवून देतो..... साधू महाराजांचा प्रश्न सुटतो.... 

      तरुण त्यांना विचारतो..... 'महाराज आपण कुठे असता...?' त्यावर महाराज सांगतात..... 'मी पलीकडच्याच देवळात मुक्कामाला आहे..... तिथे सर्वसामान्यांना मोक्षाचा मार्ग दाखवीत असतो..... तूही तिथे ये.... तुलाही मी मोक्षाचा मार्ग दाखवेन....' त्यावर तरुण त्यांना उत्तर देतो..... 'महाराज, तुम्हाला गावातला पोस्टाचा साधा डबा ठाऊक नाही.... तेव्हा तुम्ही मला कोणता मोक्षाचा मार्ग दाखवू शकाल...?' मुलाच्या त्या उत्तरानं साधू महाराज निरुत्तर होतात.... आत्मपरीक्षण करायला लागतात.... ही गोष्ट ऐकून आपण एखादेवेळी म्हणू, या कथेतला मुलगा उद्धट आहे.... प्रथमदर्शनी तसे जाणवतेही.... पण त्याहीपलीकडे जाऊन विचार केला तर या प्रक्रियेतलं कृतकपण, तकलादूपणही अभिव्यक्त होतं..... 

         गुरु आपल्याला प्रपंचातून मार्ग काढून संसार म्हणजे काय हे अभ्यासून आध्यत्मिक दिशा - मोक्ष मार्ग दाखवतो..... त्यावर चालणे आपलेच काम असते.... प्रपंचात आपल्या वाटा, लक्ष्य, ध्येय प्रकाशमान करण्यासाठी आपणच गुरुतत्वाकरवी आपली दिशा शोधायची असते.... अशी दिशा कुणी आपल्याला दाखविली तर ती केवळ आपलीच असेल असेही नाही..... त्यामुळे ती कोण दाखवतो हे महत्वाचे ठरते..... कोणाशी संग हे उदायाकडे कि अस्ताकडे हे ठरवते.....  आपल्यामुळे आपला अवतीभवतीचा परिसर उजळून निघेल, असं स्वयंप्रकाशित आपल्याला व्हायचं असेल तर त्यासाठी आपलं स्वयंप्रकाशित होणं अस्सल हवं..... ते तकलादू किंवा फडफडत्या पणतीसारखं नसावं, तर नैष्ठिकपणे तेवत राहणाऱ्या एखाद्या ज्योतीसारखं असावं.... जोवर आपण व्यक्तिगत पातळीवर पूर्णत्वास पोहोचू शकत नाही, तोवर आपण आपल्या प्रभेनं इतरांना उजळविण्याचा वृथा अहंकार मनात बाळगणं, याच्यासारखं आपल्या व्यक्तित्वाचं कच्चेपण दुसरं कुठलं नसतं.... 

        अध्यात्मिक-प्रापंचिक जीवनात मार्गदर्शन नक्कीच हवे.... नाहीतर बऱ्याच वेळा आपण चुकीचाच मार्गक्रमण सुरु करतो.... आणि योग्य मार्गावर येई पर्यंत बऱ्याच वेळा वेळ मात्र गेलेली असते.... अर्थात सत्संगत सर्व संत महात्म्यांनी ह्याकरीताच महत्वाची सांगितली आहेत.... शांती, विवेक विचार, समाधान आणि सत्संगती हे मानवी जीवनाचे चार द्वारपाल आहेत..... एकाच जीवनात चारही पायऱ्या एकदम चढणे काही जणांना अजिबात शक्य होत नाही.... कारण मायेचा प्रभाव सामान्य माणसाला लवकर स्थिरता लाभू देत नाही... कारण मन हे हळू हळू आटोक्यात आणायचे असते.... मनाला संयमात ठेवणे अतिशय कठीण आणि दुष्कर कार्य आहे.... पण हळू हळू आपणच ह्या मनाची समजूत काढून सत्याचा बोध त्याला करुन द्यावयाचा असतो.... 

         एक बघा, शांती असेल तर आपले विचार कायम चांगले असतात.... विचार चांगले असतील.... तर माणूस समाधानी असतो.... आणि चांगले विचार आणि समाधानी वृत्ती आपल्याला कायम चांगल्या लोकांपर्यंत पोहोचवते.... आणि हळू हळू दुषवृत्ती असलेले लोक लांब लांब जाऊ लागतात.....   जीवनात सत्संगती फार महत्वाची भूमिका पार पाडते कारण आपले विचार संगतीमुळे बदलतात.... विचारांनीच क्रांती येते पण हे विचार सतविचार असणे फार गरजेचे असते.... नाहीतर यादवी माजते... आणि त्यातच आजपर्यंत मानवाचा अंत झालेला दिसून आलेला आहे.... मग वेळ येते ती.... 
                              सूर्योदय झाला खरा....  पण उशीर खूप झाला..... 
                                              सत्य - असत्य जाणण्यासाठी.....  माझा जन्मच वाया गेला.... 
म्हणूनच म्हणतो अशी वेळ आपल्यावर येऊ देऊ नका.... आजच जागे व्हा.... हा प्रवास तसा अनवट आहे...... प्रचंड नैष्ठिकही आहे..... पण त्या प्रवासाचा एक घटक होणंही तेवढंच आनंददायी आणि ऊर्जस्वल - उदयाकडे जाणारे आहे..... या ऊर्जस्वल, अनवट प्रवासाला लवकरात लवकर जाणे- निघणे हेच केवळ आपल्या हाती असतं नाही का..... 

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

No comments:

Post a Comment