Tuesday 23 October 2012

पैसा प्रसिद्धी सर्वस्व अनर्थ.... तपमय यश जीवन सार्थ.... 

आजच्या एका सर्वेक्षणानुसार 2030 पर्यंत भारत हा तरुणांची सर्वाधिक संख्या असलेला जगातील एकमेव देश असेल..... म्हणजेच तरुणांच्या यशापयशावर आपल्या देशाच्या वाटचालीची मदार राहणार आहे.... त्यामुळे या युवकांच्या दृष्टिकोनातून त्यांच्यापुढील सर्वात मोठे आव्हान कुठले.... तर तरुणांना जीवनात काय हवे आहे.... 

तारुण्य म्हटले, की ऊर्जा आणि काहीतरी नवे करण्याची जिद्द या गोष्टी ओघाने आल्याच..... समाजातील विषमता आणि भेदभाव पाहून अशी ऊर्जा आणि संवेदनशीलता असणारे अनेक तरुण अस्वस्थ होतात..... आपण काहीतरी करायलाच हवे, असे त्यांना प्रकर्षाने वाटते.... पण नेमके काय करायचे.... याबाबत मात्र मुळातूनच गोंधळ असतो.... 

तुम्ही आयष्य एकदाच जगतात.... पण ते योग्य पद्धतीने जगलात.... तर एकदाच मिळालेले हे आयुष्यही पुरेसे असते..... फक्त पुरेसा पैसा आणि गरजा मोजण्यासाठी स्वतःचे योग्य माप वापरा.... दुसऱ्याच्या मापाने तुमचे आयुष्याचे गणित सोडवायाच प्रयत्न करू नका..... 

आजच्या तरुण पिढीने हे लवकरात लवकर जाणले पाहिजे..... फक्त पैसा, गाडी, बंगला अशा मोजता येणाऱ्या गोष्टी..... हे काही खऱ्या यशाचे परिमाण नसून.... दर दिवशी आपण थोडे शहाणे होत जाणे म्हणजे खरे यश.... 

संपत्ती व पैशापेक्षाही चारित्र्य महत्त्वाचे असते..... पण दुर्दैवाने आजच्या काळात चारित्र्य नसले.... तरी काही होत नाही.... पण पैसा नसला तर सर्वस्व नसते.... असा अनुचित समज रूढ होत आहे..... ज्यामुळे आपली तरुण पिढी उध्वस्त होऊ शकते.... यासाठी वेळीच सावध व्हा..... 

आपल्याकडे असे खुप आदर्श आहेत.... ज्यांनी दुर्बल परिस्थितीत स्वतःचे जीवन घडविले.... त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करा.... पैसा सर्वस्व नाही... तर तुमचा दृष्टिकोन आणि चारित्र्यच तुमचे जीवन घडवीत असते.... 

आज आपल्याकडे कुणालाच थांबायला वेळच नाही.... आज सारे कसे इन्स्टंट झटपट हवे असते..... कुणाला दहा दिवसांत एखाद्या विषयात तज्ज्ञ व्हायचे आहे..... महिन्याभरात उद्योजक म्हणून मिरवायचे असते.... सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका रात्रीत श्रीमंत व्हायचे स्वप्न असते..... बघा, हे सगळे असे झालेच तर आपण जीवनात यशस्वी झालो.... असे मानायला आपण मोकळे होतो.... आजच्या तरुण पिढीला या... सब कुछ फटाफटचा... घातक रोग फारच मोठय़ा प्रमाणावर लागण झाल्याप्रमाणे झाला आहे..... 

आता बघा..... यात सगळीच चूक आजच्या तरुण पिढीची आहे का... तर नाही.... त्यांच्या पालकांनीच लहान कोवळ्या वयातच या झटपट- इन्स्टंट शिकवणीकडे त्यांना ढकलले.... आपल्या मुलांना श्रमाची, मेहनतीची, तपाची, साधनेची शिकवण देत नाहीत.... आजकाल शाळेच्या सुटीच्या 10-15 दिवसांत झटपट संस्कार वर्गात पाठवून चांगल्या संस्कार सौंदर्याने आपले मुल खुलून निघावे..... असे वाटणार्‍या पालकांची मुले झटपट- इन्स्टंट रोगाची लागण झालेलीच असणार नाहि का.... 

खरे तर कोणत्याही यशासाठी कधीच शॉर्टकट नसतो.... हे समजून देणे हाच खरा शाश्वत संस्कार आहे..... तप करावे तसा अभ्यास करावा.... उत्तम प्रकारे परीक्षा द्यावी मगच चिरंतन यशाची प्राप्ती होते.... हे ठामपणे तरुण पिढीच्या मनावर बिंबवले पाहिजे..... पण एकमात्र आहे.... त्यासाठी पालकांची तसेच तरुण पिढीचीही..... पैसा, प्रसिद्धी म्हणजेच यश, सर्वस्व असते.... या अपूर्ण विचारातून बाहेर पडायची तयारी हवी.... 

बघा, आयुष्यात पैसा महत्त्वाचा आहेच.... पण पैसा सर्वस्व कधीच नाही.... प्रसिद्धीचा आनंद हा असतोच.... पण तेवढय़ानेच कुणी “ यशवंत “ होत नाही हेही तितकच खरे..... इथे आपल्याला समर्थ रामदासांचे अनमोल विचार फार तारून जातात..... समर्थांनी ‘सार’ निवडण्याचा फार मोलाचा सल्ला दिला आहे…. ‘सार’ म्हणजेच खरे यश…… ‘असार’ म्हणजे यशाचा भास होय..... 

                                 जाणल्याने ऐसे न करावे । सार तेचि शोधून घ्यावे । 
                                                           असार ते जाणोनि त्यागावे । वमन जैसे ।। 

बघा, यात यशप्राप्तीची मार्गदिशा अगदी स्पष्ट होते.... आपले आयुष्य यशस्वी बनवणे तसे सोपे नाही.... अविरत कष्ट, मेहनतीचे मोठे तप करूनच आपल्याला यशस्वी होता येते.... पण हे ‘तप’ म्हणजे तरी काय....? रोजच्या जगण्यातले कष्टमय मेहनतीने वागणेही कठीण तपच आहे..... एकवेळ सारे सोडून जंगलात जाऊन राहाणे सोपे आहे.... पण अशी प्रत्येक पावलावरची तपश्चर्या भारी अवघड आहे..... 

सर्मथ अशाच तपाची अपेक्षा व्यक्त करतात.... त्यांनी सांगितलेली चार सूत्रे अंगीकारली.... तर पैसा-प्रसिद्धी मिळेलच.... पण खर्‍या यशाचा मुकुट आपण शिरी धारण करू शकतो.... आज धीर सुटत चाललेल्या तरुण पिढीने या चतुसुत्रीचा नक्कीच शांतपणे विचार करायला हवा असे वाटते..... यशासाठी धीर धरायची तयारी ठेवावीच लागेल..... प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल.... त्याला पर्याय नाहीच.... पण एकदा का चांगले यश मिळाले.... की मग मागे वळून बघावेच लागणार नाही..... यशपथावर सतत पुढे पुढेच जाता येईल.... सर्मथांनी सांगितलेली खालील चार सूत्रे तरुण पिढीने आत्मसात करणे गरजेचे.... 

सूत्र पहिले 

                                जाणावे पराचे अंतर । उदासीनता निरंतर । 
                                                     नीतिन्यायासी अंतर । पडोचि नेदावे ।। 

आपल्याला इतरांचे मन नीट समजून घेता आले पाहिजे.... हे करताना जराही स्वार्थाचा विचार असता कामा नये..... इतरांशी वागताना नीती आणि न्याय याचा विसर पडू देऊ नये..... हे जमले तर आपल्यासोबतच अनेकजण उभे राहतात.... त्यांच्या सकारात्मकतेची शक्ती आपल्याला लाभते..... 

सूत्र दुसरे 

                                                 फड नासोचि नेदावा । 
                                                                 पडिला प्रसंग सावरावा ।। 

कोणत्याही चर्चेत... संवादात हे पथ्य पाळले की यश मिळते.... वादावादीचे, मतभेदाचे, विवादाचे प्रसंग येणारच.... अशा प्रसंगात ‘तेल’ ओतण्यापेक्षा आपल्या कुशलतेने तो प्रसंग आपल्याला सावरता आला पाहिजे..... इथे ‘फड’ म्हणजेच Team होय..... चांगली टीम जर का तुटली तर काय उपयोग.... हा फड सांभाळणे ‘ग्रुप डिस्कशन’साठी आवश्यक असते.... प्रत्येकाचा अहंकार manage करून कुशलतेने कमी करणे महत्वाचे.... 

सूत्र तिसरे 

                               दु:ख दुस-याचे जाणावे । ऐकून तरी वाटून घ्यावे । 
                                                                   बरे वाईट सोसावे । समुदायाचे ।। 

आपल्याला यशस्वी होण्यासाठी इतरांचे प्रश्न.... समस्या, अडचणी समजून घेता आल्या पाहिजेत.... प्रेमाने दुसर्‍याचे दु:ख जाणल्याने... त्यांचे बरे-वाईट सोसल्याने सार्‍यांची सद्भावना आपल्या पाठी उभी ठाकते.... सद्भावना म्हणजेच सदिच्छा.... चांगले आशीर्वाद.... यशासाठी त्याची खूप गरज असतेच..... 

सूत्र चौथे..... 

                                                       तऱ्हे भरोंच नये । 
                                                                     सुचावे नाना उपाये।। 

बघा, ज्याला यशस्वी व्हायचे आहे.... त्याने तर्‍हेवाईकपणा, स्वकल्लीपणा करता कामा नये.... म्हणजे आज मूड नाही... असे नको.... Multi Dimensional Approach ठेवावा..... कोणत्याही प्रसंगाला दोनच पर्याय नसतात.... There is always third Alternative..... तो शोधावा आणि सर्वात महत्त्वाचे ‘दीर्घ यत्ने’ करावे..... सोपे काम करण्यापेक्षा, प्रयत्नपूर्वक कठीण कार्य केल्यानेच खरे यश मिळते... हे विसरू नये.... Think Out of the Box Ideas if possibble.... 

बघा, अशी हि सर्मथप्रणीत ही चार सूत्रे आचरून मिळालेले यश शाश्वत यशच असेल..... तर शेवटी हेच जाणणे महत्वाचे.... यशाला कधीच ‘शॉर्टकट’ नसतोच नसतो.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

No comments:

Post a Comment