Wednesday 24 October 2012


विचारांचे सीमोल्लंघन करु.... मनात सुविचार भरु.....

क्षात्रवृत्तीची जोपासना करण्यासाठी सीमोल्लंघन करण्याचा संदेश देणारा हा दसरा सण…. आजच्या विज्ञान युगात जुन्या, बुरसटलेल्या, अंधविश्वासी विचारांच्या सीमारेषांचे उल्लघन करण्याची खरी गरज आहे.... आज आपली नीतीमूल्य - संस्कार जपून बदलत्या जगातील ज्ञान प्राप्त करून वैज्ञानिक प्रगती साधण्यात खरा पुरुषार्थ सामावलेला आहे..... सतत उद्यमशील राहून, उद्योगाच्या नाना क्षेत्रांत धडाडीने प्रवेश करून स्वतःच्या व पर्यायाने देशाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी धडपडण्यातच क्षात्रतेजाचं खरं दर्शन घडणार आहे..... 

मानापनाच्या खोट्या कल्पना झुगारून देऊन हुंड्यासारख्या असुरी प्रथा.... व त्यासाठी स्त्रीचा होणारा अघोरी छळ यातून तिची सुटका करून.... तिच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटण्यातच पुरुष जातीचं खरं कल्याण आहे.... शक्तिदेवीच्या उपासनेचा हाच खरा अर्थ आहे.... मुलगी होणार म्हणून  केली जाणारी भ्रुणहत्या थांबविण्यानेच आदिशक्तीची खरी आराधना केल्याचे पुण्य पदरी पडणार आहे.... अज्ञान, दारिद्य्र, विषमता, जातीयता, फुटिरता आणि धर्मांधतेचे तट ओलांडून जीवनातील खऱ्या सुखाचं सोनं आपल्याला लुटायच आहे.... शमी-आपट्यांच्या पानांच्या प्रतीकातून आज आपल्याला हाच अर्थ अभिप्रेत असला पाहिजे.....

तसेच दुदैवाने आज भ्रष्टाचाराची समस्या सर्वव्यापी झालेली असली.... तरी तो समूळ नष्ट होईल.... अशी आशा ठेवली पाहिजे.... कारण आशा नसेल तर जीवनच व्यर्थ आहे.... मात्र भ्रष्टाचाराविरोधात ओरड करताना प्रत्येकाने आधी स्वत:ला तपासले पाहिजे, असे मी म्हणेन.... भ्रष्टाचाराची सवय सर्वांनाच लागली आहे ही वस्तुस्थिती आहे.... लाच घेणारा तसेच लाच देणारा हे दोघेही दोषी असतात.... म्हणूनच लाच देऊ करणारा रावण तुमच्यात लपला असेल.... तर आधी त्याला संपवा.... मी कोणत्याही परिस्थितीच कुणालाही लाच देणार नाही.... अशी प्रतिज्ञा प्रत्येकाने करावी आणि त्याचे पालन करावे.... तसे झाल्यास भ्रष्टाचाराचा नायनाट होण्याचा सुदिन नक्कीच उगवेल....

सकारात्मक...रचनात्मक विचार आणि कृती ही ख-या अर्थाने समाजाची चिरंतन प्रेरणा असते..... भारतीय पुराणात विजयादशमीच्या दिवसाचे महत्त्व सांगणार्‍या ज्या अनेक कथा प्रचलित आहेत... त्या सर्व कथांचे सार एकच आहे... ते म्हणजे, असत्यावर सत्याची मात आणि सुष्टांचा दुष्टांवर विजय.... सध्याच्या काळात अराजकाचे हे वारे रोखायचे असतील... तर विचार परिवर्तनाची गरज आहे.... हीच वेळ विचारांचे सीमोल्लंघन करण्याचीही आहे.... या सीमोल्लंघनाच्या संकल्पाचा दीप आजच मनात चेतवण्याची गरज आहे..... 

ॐ श्री गुरुदेव दत्त....

No comments:

Post a Comment