Tuesday 23 October 2012

दुर्गे दुर्घट भारी....


सद्गुरु तुझे भाव रूप । देवी जैसें का स्वरूप । तैसें गीतातत्व अरूप । नित्यनूतन दाविसी ॥


हा ज्ञान वेदार्थसागरू । तो स्वयें सर्वेश्वरू । गुरु शंकरानंद कल्पतरू । प्रत्यक्ष बोधीतसे ॥


सद्गुरु चरणांना वंदन करून देवीची आरती यावर सद्गुरुंनी बोधलेले चिंतनात्मक विचार आणि इतर काही संदर्भ घेऊन चिंतन आपण संपादित करू या..


नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव आणि त्यां अनुषंगाने होणाऱ्या देवीच्या आरत्या.. आरती म्हणताना आपल्याला ती किती समजली आहे आणि का करत आहोत यावर चिंतनात्मक अभ्यास.. गणेश विसर्जन झालं की पितृपक्ष येतो.. तो संपला की लगेच प्रतिपदेला घटस्थापना होते नि आपण देवीची उपासना सुरु करतो..  देवीच्या उपासनेची सुरुवात कधी झाली, का झाली, कशी झाली ह्याबाबत थोडक्यात माहिती किंवा इतिहास असा.. पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणं महिषासुर नावाचा राक्षस प्रचंड मातला होता नि त्यानं सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली.. तेव्हा देवी नऊ दिवस अनुष्ठानाला बसली नि विजयादशमी दिवशी ह्या महिषासुराचा वध केला.. आता इथे जास्त प्रस्तावना न करता ह्या दुर्गोत्सवाच्या निमित्तानं मागे गणपती आरतीचा आपण विचार केला तसाच देवीच्या आरतीचा विचार करण्याचा प्रयत्न करुया.. सुखकर्ता दु:खहर्ता चिंतनात म्हटल्याप्रमाणंच आरती अंतःकरणपूर्वक, एकाग्र होऊन, आर्ततेनं आळवली जावी..


आज देवीच्या आरतीचा थोडक्यात अभ्यास करुया..


दुर्गे दुर्घट भारी तुज विण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी |


वारि वारि जन्ममरणाते वारि, हारि पडलो आता संकट निवारी ||१||


जयदेवी जयदेवी महिषा सुरमर्दिनी, सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी जयदेवी || धृ||


त्रिभुवनभुवनी पाहता तुज ऐसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही |


साहि विवाद करिता पडिले प्रवाही, ते तू भक्तालागि पावसी लवलाही ||२||     जयदेवी जयदेवी ......


प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा, क्लेषापासुनि सोडी, तोडी भवपाशा |


अंबे तुजवाचोनि कोण पुरविल आशा, नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा ||३||    जयदेवी जयदेवी ......


देवीची आरती कुणी रचली ह्याबाबत थोडा प्रवाद आहे.. नरहरी हे नाव आरतीत येतं.. नरहरी सोनार खरंतर शिवाचे भक्त.. विठठलाच्या कमरेचा हार बनवण्याचं निमित्त होऊन दोन दैवतामधलं अद्वैत उमजलं.. अशी कथा आपल्याला परिचित आहे.. कदाचित अशी अनुभूति आल्यानंतर त्यांना आरती स्फुरली असावी.. कुणी म्हणतं रामदासस्वामींनी रचलेली आरती आहे.. रचनाकार कुणीही असला तरी मुळातच दोघेही अत्यंत श्रेष्ठ प्रतीचे भक्त व तत्त्वज्ञ असल्यानं आपण उगाचच त्याबाबत जास्त विचार न करता आपला अभ्यास करुया..


आरती कोणी रचली ह्याबाबत विवाद न करता आरती शक्तीरूपी  दुर्गा देवीची आहे हे मात्र ढोबळपणे नक्की समजून येतं.. मात्र ह्याबाबत आपण थोडा सूक्ष्म विचार करण्याची गरज आहे.. म्हणजे नेमकी आरती कुणाची केली आहे..?


दहा दिवस उत्सव मंडळात येणार्‍या आठभुजा असलेल्या, देखण्या, प्रमाणबद्ध मूर्तीची.. विविध शक्तीपीठ आणि देवळात असलेल्या सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेल्या मूर्तीची की आणखी कशाची..?.. कधीकधी शब्द थोडे पुढंमागं करुन बघितले की आपल्याला नेमकं विषयाचा गाभा काय ते कळतं.. 'जयदेवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी' असं म्हटलेलं आढळतं..


इथं एक संबधार्थक विशेषण दिसतं.. सुरवरईश्वरवरदा.. सुरवरांनाच  म्हणजे देवतांनाच नाहीतर ईश्वरालाही वर देणारी, शक्ती प्रदान करणारी अशी जी कुणी ती ही शक्ती आहे.. तिची ही आरती आहे..


पण असं काही असतं का..?.. थोडं मागं जाऊ.. कुठंच काहीच्च नव्हतं तेव्हा..! कधीतरी काहीतरी हालचाल झाली नि सृष्टी निर्माण झाली.. चराचराची व्यवस्था अत्यंत पारदर्शकपणं चालवली जाणारी व्यवस्था म्हणजे ईश्वरी परमतत्व.. तत्वरूपी तो सृष्टीबरोबर उत्पन्न होतो नि तिच्याबरोबरच लय देखील पावतो..


मानवी आयुष्याच्या तुलनेत अत्यंत प्रचंड मोठ्या scale वर हे सगळं सुरु असतं.. त्यामुळं मानवी मनाला त्याचा विचार तेवढ्या मोठ्या पातळीवर करताना तसाच व्यापक पण सूक्ष्म विचार करावा लागतो.. अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये काहीच नाही म्हणताना देखील, त्या नाहीमध्ये असणारं अस्तित्व (काहीच नाही म्हणजे निर्वात पोकळी-vacuum of space तरी 'आहे' ना..?)


त्रिभुवन- पृथ्वी, अवकाश आणि स्वर्ग ही तिन्ही जगे, (भुवन-लोक).. म्हणजे ब्रह्म तत्त्व नि त्या खालोखाल वर म्हटलेली हालचाल ती मूळमाया (स्त्रोत).. तिच्यातून उत्पन्न गुणमाया मग जडमाया नंतर त्रिविधा प्रकृती, पंचमहाभूते असा क्रम आहे.. खरंच थोडा विचार केला तर विज्ञानाला समांतर असा हा विचार आहे..


या अनंत कोटी ब्रह्माण्डची निर्मिती, संचलन, संहार व पुन्हा निर्मिती हे ज्या मुळे होते, तिला आपण देवी किंवा मुळ प्रकृती म्हणतो.. ज्या शक्तीमुळे ईश्वराला कार्य करण्याचं बळ मिळतं, त्या त्या अनुरुप कार्य करणार्‍या देवतांना (कार्यानुसार नाव ब्रह्मा, विष्णू, महेश नि इतर) ताकद मिळते (उत्पत्ती- निर्माण करणं, स्थिती- सांभाळणं नि लय- संहार करणं).. त्या सगळ्याचा विचार आपल्याला एका 'सुरवरईश्वरवरदा' ह्या शब्दातून करता येतो..


तिला आपण मानवानंच, देवीरूप, माऊलीरुप, मातारुप मानून तिची पूजा करता यावी, म्हणून सगुणात आणली.. इतकं सगळं कार्य दोन हातातून करता येणं शक्य थोडीच आहे.. असा विचार करुन तिला अष्टभुजा बनवली नि तिच्या प्रत्येक हातात एक एक वस्तू दिली.. पाकिटात असलेला कागदाचा फोटो जसा आपल्या गुरूंची आठवण करुन देतो.. तसंच ही मूर्ती भगवद्शक्तीची आठवण करुन देणारी असली पाहिजे..


आणखी एक शब्द आहे महिषासुरमर्दिनी.. वर म्हटल्याप्रमाणं पुराणात कधीतरी एक महिषासुर नावाचा राक्षस सगळ्यांना त्रास देत होता नि त्याला देवीनं मारलं.. अस आहे का..? आपण देवीचा जयजयकार म्हणून गप्प बसावं का.? की ह्या महिषासुराचा नि माझा काही संबंध आहे का..?  


आपण ह्याचा असा विचार करू.. महिष म्हणजे रेडा.. रेडा हे घोर अज्ञानाचं प्रतिक आहे.. अज्ञान म्हणजे अशिक्षितपण, अक्षरओळख नसणे.. शालेय अभ्यास नसणं ह्या अर्थानं अज्ञान नाही..  तर मी कोण..?.. माझं जन्माचं प्रयोजन काय..?.. ध्येय काय..? ते समजण्यासाठी काय करावं लागतं..? ह्या सगळ्याबद्दलची जाणीव नसणे म्हणजे अज्ञान..


इथं आपण त्रागा करु शकण्याची दाट शक्यता आहे.. मात्र ही वस्तुस्थिती आहे.. जगण्याची उद्दिष्टं अनेक असू शकतात, ती वेळेनुसार, कालानुरुप बदलू शकतात, बदलावीत.. मात्र ध्येय एकच असावं ते म्हणजे आत्मशोध.. मी नक्की कोण आहे नि काय मिळवायचंय ह्याचा विचार करुन त्याचा पाठपुरावा करणं हे साधकाच्या आयुष्याचं ध्येय आहे..


तर अशा ह्या अज्ञानरुपी रेड्याला मारुन, साधक अंतरी स्थित शक्तिरूप दुर्गामातेला प्रसन्न करू शकतो.. त्या दृष्टीनं 'महिषासुरमर्दिनी' ह्या नावाचा विचार करण्याची गरज आहे..


वरच्या शब्दांचा पुरेपूर अर्थ समजला की पुढची आरती समजायला मदत होते.. देवीला दुर्गा म्हणताना ह्या प्रपंचाला, संसाराला दुर्घट असं म्हटलेलं आहे.. दुर्ग म्हणजे किल्ला नि दुर्गा म्हणजे त्याची किल्लेदार अशा अर्थानंही एक विचार होऊ शकतो.. ज्याप्रमाणं एखाद्या कारागृहाचा प्रमुख असतो तशी जणू ही दुर्गा आहे नि हा जो संसार रगाडा आहे तो म्हणजे कारागृह आहे.. यातून बाहेर पडायचं तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे किल्लेदारालाच पटवणे, त्याच्या मर्जीतलं बनणे.. म्ह्णून म्हणतात, दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी.. तुझ्या कृपेशिवाय हा संसाराचा भार खूप अवघड आहे..


अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी.. इथं पुन्हा थांबायची गरज आहे.. काय आहेत हे शब्द..? अनाथनाथ अंबा म्हणजे कुणी अनाथाश्रम उघडलेली NGO नाही..! खरंतर, कोण अनाथ आहे..? करुणा म्हणजे काय..? विस्तारी म्हणजे..? आहे का मुळात करुणा..? विस्तारी म्हणजे विस्तार कर, वाढव म्हणजे काय..?


इथं थोडा पारमार्थिक विचार आहे.. 'तुझिया वियोगे जीवित्व आले' असं समर्थ रामदास म्हणतात.. अत्यंत आनंदाचा, सुखाचा अनुभव हेच ज्याचं स्वरुप आहे असा 'मी', मूळस्वरुपाला विसरलो नि जीवभाव घेऊन जन्म पावलो.. एखाद्या अत्यंत श्रीमंत, यशस्वी माणसाचा मुलगा अपघातात स्मृती घालवून बसल्यानं भीक मागू लागतो, तसा मी खरा आतमध्ये आनंदरुपच असताना.. सुखासाठी बाहेरच्या सुखांच्या मागं लागतो नि 'अनाथ' बनतो..


बघा, धोनी-सचिन रिटायर झाले.. क्रिकेट तेच, खेळ तोच, नियम तेच पण आता काहींना आनंद वाटेना.. म्हणजे सुख खेळात आहे की बघण्यात..?  मी रानावनात अडकून बसलोय, मला प्रचंड भूक लागलीये नि समोर खूप सुंदर हिरे आणि सोने दिसतेय.. सुख वाटेल..?  तीच गोष्ट दुसरीकडून.. एका अत्यंत गरीब नि ओबड्धोबड दिसणार्‍या झोपडीत मला शिळी भाकरी नि चटणी मिळाली तर मला ती अत्यंत चांगली वाटेल..


सुख नक्की कुठं आहे नि ते कसं मिळेल हे न समजल्यानं मी अनाथ, पोरका, दीनवाणा झालो आहे..!! अशा अनाथांची नाथ अशी ही अंबा आपली करुणा विस्तारुन मला पदरात घेऊ दे.. इथे करुणा उत्पन्न करुन का नाही म्हटले आहें..? कारण देवीची करुणा आधीपासूनच आहे हे आपल्या लक्षात येत नाहीये..


'एकोऽहम बहुस्याम' - एका बीजापोटी उत्पन्न होणारी अनेक कणसं माणसाच्या आवाक्यातलं काम नाही आहे ना..? हीच ती करुणा.. माते, तुझी करुणा पसरव.. (माते अंबा, आज मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु मी जिथे आहे तिथे, तू तुझी करुणा वाढवू शकतेस.. आमचे अज्ञान दूर करू शकतेस)  ह्या 'एकोऽहम बहुस्याम' च्या प्रक्रियेमागं नक्की काय दडलंय हे रुक्षपणे जाणून घेण्यातून साध्य काय होणार आहे..? त्यापेक्षा त्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली तर आपला अहंकार काही प्रमाणात कमी होत जातो..


पुढं जाऊन 'वारि वारि जन्ममरणाते वारि, हारि पडलो आता संकट निवारी' असं म्हणतात.. पुन्हा तेच आहे.. वारि वारि म्हणजे हे माते तू ह्याचं निवारण कर.. हारि पडलोय- कंटाळलोय.. या संकटाचं निवारण कर..


जन्माला आल्यापासून आपण काय किंमत देऊन काय कमावतो.. ह्याचा विचार करता 'सुख कमी नि दु:ख जास्त' असाच विचार पक्का होतो.. मिळणार्‍या सुखामागे देखील किती कष्ट असतात ह्याचा विचार करता हे कधीतरी संपावं हा 'वास्तववादी' विचार डोकावल्यावाचून राहत नाही..


त्यामुळंच ह्या जन्ममरणाच्या फेर्‍यातून सोडव ही विनंती करावी लागते.. मात्र जेव्हा विनंतीच्या मागे; काय विनंती, कुठं करायची, नि कशी करायची हा नेमका विचार असेल, तेव्हा त्या विनंतीचा निश्चितच पाठपुरावा होतो नि जे मिळवायचं ते मिळवलं जातं.. गणपतीच्या आरतीत म्हटल्याप्रमाणं अशी परमतत्वाची, शक्तीच्या निश्चित रुपाची मांडणी समोर आली की माणूस निर्भय बनतो नि त्याला संकट हे संकट ह्या स्वरुपात न वाटल्यानं ते आपोआप निवारलं जातं.. दृष्टीकोनच बदलून जातो..


पुढच्या कडव्यांमध्ये बरीचशी वस्तुस्थिती, थोडासा अर्थवाद नि स्तुती आहे.. 'त्रिभुवनी पाहता तुज ऐसी नाही, चारी (वेद) श्रमले परंतु (त्यांना तुझ्याबद्दल) न बोलवे काही, साही (शास्त्रं) साही- सहा (वेद, वेदांत, सांख्य, योग, न्याय आणि मीमांसा या सहा तत्त्वज्ञानाचे अनुयायी), विचार करुन करुन (जणू प्रवाह) पतित झाले, (अशी) ते तू भक्तालागि पावसी लवलाही..


आज देखील 'विज्ञान' (तंत्रज्ञान नव्हे) सृष्टीच्या उत्पत्तीचा, त्या मूळ शक्तीचा मूलगामी विचार करत आहे.. पण थांगपत्ता लागायला अजूनही तयार नाही.. त्याच अनुषंगानं चारी वेद, साही शास्त्रे तुझ्या स्वरूपाचे-शक्तीचे वर्णन करु शकत नाहीत असं मानलं गेलं आहे.. मात्र अशी तू भक्तासाठी मात्र तातडीनं धावून येतेस.. इथे अट 'भक्त' असण्याची आहे..!


प्रसन्न वदन.. अशा हे देवी तू आम्हाला प्रसन्न हो.. संसारक्लेषापासून सोडवून, भवपाश तोड.. इथं परत थांबावं लागतं.. इथे त्रागा करुन सोडव म्हणणं आहे की मोकळं कर..?  भवपाश तोड म्हणजे एखादा दोर कुऱ्हाडीने तोडल्यासारखं तोड, असं आहे का..?   नाही, तर ह्या भवपाशाचं स्वरुप जेव्हा समजेल, तेव्हा त्याचक्षणी गळून पडणारा अशा स्वरुपाचा अर्थ आहे..


समजायला थोडं अवघड वाटतं मात्र उदाहरणानं समजेल.. एखाद्या बैलाला अथवा गाढवाला लहानपणापासून एखाद्या खुंटीला दोरीनं बांधलं तर तो सुटून जाण्याचा प्रयत्न सुरुवातीला करत करत नंतर दोरी नि खुंटी दिसली की शांत उभं राहून प्रयत्न टाळतो.. तसं सातत्यानं 'माझेपणा' नि 'मी' पणाच्या दोरांनी माणूस इतका अडकला जातो की ते बंधन, तो पाश सुटता सुटत नाही..


एक घर आगीत भस्म झाल्याची बातमी येते, आपण शांत असतो, शहराचं नाव ऐकलं की कान टवकारतात, विभाग ऐकला की चौकशी सुरु होते नि माझाच पत्ता ऐकला की धक्का बसतो, अन्नपाणी सुटतं.. माझेपणा आला की प्रतिक्रिया येते नि ती तशी आली की बंधन आलंच.. बातमी तीच, मात्र प्रतिक्रिया बदलली.. प्रतिकूल संवेदनात दुखःम.. पश्चातबुद्धीनं परिस्थिती नियंत्रणाबाहेर जायला आपण जास्तच कारणीभूत ठरतो..


मात्र देवी-मातेच्या भक्त म्हणवणारानं असं असून चालत नाही.. सगळ्या सृष्टीच्या निर्मात्याला निर्माण करणारी अंबा, दुर्गा, भवानी माता ही जर माझं आराध्य दैवत असेल तर काहिही, जाण्यानं का हळहळ करायची..? ते तसं माझ्याच बाबतीत का होतं ह्याचा विचार, (प्रारब्ध भोग) कर्माचा सिद्धांत ह्या एका assumption  ने सुटतो..


इथं लक्षात घ्यावं की दुसर्‍याच्या नावानं खडे फोडण्यात आपला मनस्ताप वाढतो, तसं न करता' योग्य निर्णय घेऊन आपल्यावर आलेला कुठलाही प्रसंग आपल्या कर्माच्या फळाच्या स्वरुपात आला असं मानणं व्यावहारिक शहाणपणाचं ठरतं..


मात्र इथं कुठलाही निराशावाद नाही.. कर्माचा विचार नि बरोबरच मी आनंदरुप असल्याचा विचार हे 'गणितं' सोडवण्यापुरते वापरावेत नि नंतर अलगद बाजूला सारावेत.. असं हळूहळू करत गेलं की आपोआप पाश सुटतात.. भव म्हणजे संसार.. नि अशा प्रकारे भवपाश सोडवायला अंबा मदत करते.. अशा ह्या जगद्जननी अंबेच्या चरणी तद-लीन, तल्लीन होण्यामध्ये खरं भूषण आहे..


पण इथे प्रश्न पडतो.. माझेपण नसेल तर अत्मियता कशी वाटेल..?  या एका भावनेपोटीच तर सारं जग वाढतय, जे काही चांगल वाईट घडतय ते ही याच भावनेपोटी..  माझेपण / देहबुद्धी आत्मीयता ही भावना विसर्जित करणे हेच खरे अध्यात्म आहे..! मी आणि "तो" कोणी वेगळा आहे ही भावना नष्ट करणे हीच शेवट्ची पायरी, तिथे द्वैत सरले..!


मग कर्म कसे करायचे..?  कार्य घड्णार कसे..?  कर्ताच नसेल तर गोष्टी घडतीलच कशा..?  ज्याच्याबद्दल माझेपण-आत्मियता नाही ते होणार कसे..?.. असाच काहीसा प्रश्न पडतो..!!..    आता हे असं नेमकं कसं आहे..!.. काय आहे..!.. काय होतं हे पूर्ण सत्य जाणायचे असेल, तर त्यासाठी गुरुप्रदित  साधना आणि अभ्यास हवाच आणि तो करताना लीनतेने गुरुचरणी साक्षित्वाने असावे.. जर आपल्याला ज्ञान हव तर सद्गुरूपुढे पूर्ण शरणागती शिवाय पर्याय नाही..


माझे माझे लोप पावू दे.. तुझे तुझे उगवू दे..  यथार्थपणे कर्म अकर्माचा विचार करताना ज्ञान्यानाही भ्रम होतो, कारण कर्माचे योग्य असणे हे कर्त्याचा श्रद्धाभाव, वृत्ती, परिस्थिती, काळवेळ यावर अवलंबून आहे.. काय योग्य आणि काय अयोग्य हे खरे सत्य कळण्यासाठी सद्गुरूला नम्रपणे शरण जाण्याशिवाय पर्याय नाहीच..


गीतेतील कर्म हे साध्य नाही, तर ते ईश्वराची.. कर्म कुसुमानि पूजा करून त्यास प्रसन्न करून घेण्याचे साधन आहे.. ज्ञान-ईश्वरी गीतेत, जी साधना सांगितली तिचा कर्मयोग हा पाया तर ज्ञानयोग हे शिखर आहे.. कर्मयोग हा अंतकरणशुद्धी द्वारा ज्ञानयोगास साधनभूत आहे, आणि ज्ञानयोग मोक्ष दायक आहे..!


 आज आपण या गुरुरूपी दुर्गामातेला पूर्णपणे शरण जाऊन सांगुया..


         आदिशक्ती तू आदिमाया तू..     तू जगज्जननी लयकारी तू..

                              कर्म साधन्या कार्यकारी तू..     सर्व चराचरी शक्तिरूप तू..

         या कलियुगी संकट समयी..    षड असुर घोर विनाश घडवी.. 

                             नाश करण्या असुर प्रवृत्ती..     दे मज बळ आदिशक्ती.. आदिशक्ती.. 

         अपराध क्षमा कर जगदंबे..     पदरी बालका घे तू अंबे.. 

                              धाव संकटी भ्रांती नाशिके..  शरण तुझला  पाव अंबिके.. पाव अंबिके..  


ॐ श्री गुरुदेव दत्त...





सत्संग म्हणजे काय.? (चिंतनकथा)

एकदा नारद मुनींनी श्रीकृष्णांना सहज विचारले... "देवा सत्संग सत्संग म्हणतात, त्याचा एवढा काय हो महिमा"? यावर देवांनी त्यांना काही एक उत्तर न देता एका किटकाचा निर्देश करून सांगितले... कि तो कीटक तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल... नारद मुनी त्या किटकाला शोधत नरकापर्यंत गेले आणि त्यांनी त्या किटकाला विचारले "सत्संगाचे काय फळ आहे तुला माहित आहे का?".. कीटकाने त्यांचेकडे एक कटाक्ष टाकला आणि तो मृत झाला... प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने ते पुन्हा श्रीकृष्णाकडे आले म्हणाले.. देवा तो कीटक तर काही बोलल्याविनाच मृत झाला आहे, आता तुम्हीच उत्तर सांगा... 

देवांनी नारदांचे म्हणणे ऐकून घेतले आणि ते म्हणाले... "तेथे पहा त्या समोरच्या झाडावर घरट्यात एक नुकतेच जन्मलेले पोपटाचे पिलू आहे ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल..." नारदमुनी त्या पोपटाचे पिलाजवळ गेले आणि त्यांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला... पोपटाचे पिलाने एकदा डोळे उघडून त्यांचेकडे पहिले आणि त्याने डोळे मिटले ते कायमचेच... नारदमुनी मनाशीच विचार करू लागले, काय सत्संग करण्याचे फळ मृत्यू आहे... कारण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न केला ते मृत्यू पावले आहेत... 

अत्यंत दुखी होहून ते पुन्हा श्रीकृष्णापाशी आले... म्हणाले "देवा आपल्याला सांगायचे नसेल तर नका सांगू पण... अहो मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारतोय ते मृत होत आहेत... अजून किती जणांच्या हत्येच्या पापाचे धनी मला करणार आहात" तेंव्हा देव त्यांना म्हणाले... "त्याची चिंता तू करू नकोस तुला खरेच जर या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर ते पहा नुकत्याच तिथे एका गाईने बछड्याला जन्म दिलाय तो बछडा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल..." दुखी अन्त:करणाने नारदांनी तेथे जावून त्या बछड्याच्या कानाशी लागून त्यालाही तोच प्रश्न केला... त्यानेही नजर वळवून त्यांचेकडे पहिले आणि ते तेथेच लुडकले... 

नारदमुनी घाबरून देवांकडे परत आले... तथापि त्यांना पुन्हा एकदा आश्वासित करून श्रीकृष्ण म्हणाले "राज्यात नुकताच एक राजपुत्र जन्माला आहे... त्याचेकडून तुम्हाला निश्चित या प्रश्नाचे उत्तर मिळेल... नारदांनी विचार केला आतापर्यंत कीटक, पोपट व बछड्याचे मृत्यूने माझ्यावर काही आपत्ती आली नाही... पण राजकुमाराचे जर काही बरेवाईट झाले तर माझे प्राणही संकटात येवू शकतात... तथापि देवाचे भरवश्यावर ते राजकुमाराकडे गेले आणि त्यांनी धाडस करून राजकुमाराला मांडीवर घेतले आणि पापा घेण्याचे निमित्त करून हळूच त्याचे कानात विचारले... सत्संगतीत राहिल्याने काय लाभ होतो..?.. प्रश्न ऐकून राजकुमार हसू लागला आणि म्हणाला मुनिश्रेष्ठ अजून आपण नाही समजलात... 

अहो, आपण पहिल्यांदा मला भेटला... तेंव्हा मी कीटक होतो.. आपण मला हा प्रश्न विचारला आणि मी मेलो आणि पोपट झालो... नंतर आपल्या दर्शनाने मी घरट्यातच मेलो आणि मला बछड्याचा देह प्राप्त झाला... पुन्हा आपले दर्शन घडले आणि बछड्याचा देह पडून सर्व देहामद्धे श्रेष्ठ असा हा मनुष्य देह प्राप्त झाला... आणि पुन्हा आत्ताच्या दर्शनाने मला पूर्णत्व हि प्राप्त झाले... हे सर्व आपल्या सारख्या संतांचे दर्शनाचेच फळ आहे... ज्यांना आपल्या सारख्या संतांचा सहवास मिळतो ते धन्य आहेत... 

नारदांना त्यांचे प्रश्नाचे उत्तर मिळाले व सत्संगाचा महिमाहि कळला... "नारायण नारायण" म्हणत ते देवांकडे आले आणि म्हणाले "देवा जशी आपली लीला आघाद तशीच आपली समजावून देण्याची पद्धतहि दिव्यच आहे"...

म्हणूनच, मित्रांनो जीवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे... बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले, तर बाभळीच्या काट्याने त्याची संपुर्ण पाने फाटून जातात... या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो... ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला... श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वोश्रेष्ठ योद्धा झाला... याउलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म, कर्ण सर्वोश्रेष्ठ असुनही त्यांचा नाश झाला... आपण ज्यासोबत रहातो.. त्याच्या विचारांचा, रहाणीचा, वागणीचा, अंमल हा आपल्यावर होत असतो... संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दुषित होतात, तेंव्हा पहा संगत कशी निवडायची ते... ॐ श्री गुरुदेव दत्त...


No comments:

Post a Comment