Tuesday 23 October 2012

विनम्रते यशवंत सर्वगुणे.... साकार स्वप्न पूर्णपणे..... 

आजकालच्या तरुणांना, सत्ताधा-यांना, श्रीमंताना तर नम्रता अगदीच नकोशी झाली आहे... मुख्यत्वे आज तरुण पिढी उन्मादी उद्धट होताना दिसते.... त्यांच्या बोलण्यातली मग्रुरी, मस्ती प्रत्येक वाक्यात जाणवते.... याला attitude असे गोंडस नामकरण सुद्धा झाले आहे..... 

मित्रांनो, विनयशीलता म्हणजे अहंकारावर नियंत्रण.... विनय म्हणजे लाचारी नाही…. विनय म्हणजे ओतप्रोत भरलेपण…. संपन्नता ज्ञानाची – विद्धवत्तेची असो…. धनाची असो वा सत्तेची असो…. ती विनयातून अधिक नेमकी लक्षात येते…. पण आजकाल याचा विसर पडत चालला आहे…. आणि पालकही याला मुलांचे.... वाक् चातुर्य, स्पष्टवक्तेपण, good attitude, बोलण्याची हुशारी, बिनधास्तपणा अशी गोंडस नावे देऊन त्यांचे या गुणाबद्दल कौतुकच करताना दिसतात.... यामुळे मुलांना त्यांच्या दोषांची जाणीव होत नाही.... उलट आपण वागतो ते योग्य.... असे वाटून अश्या वागण्याला प्रोत्साहन मिळाल्यासारखेच होते.... पण याचे परिणाम त्यांना उर्वरित पूर्ण आयुष्यात भोगावे लागतात.... यामुळे वेळीच सावध झालेले चांगले..... 

आजकाल, अनेकांना हे विनयाचे तंत्र दुबळेपणाचे वाटते…. मोडेन पण वाकणार नाही.... असे म्हणण्यात त्यांना भूषण वाटते…. मर्दुमकी म्हणजे उद्धटपणा असेच काहीसे सूत्र त्यांच्या डोक्यात असते…. इथे संत तुकारामांचा एक अभंग सांगतो..... महापुरे झाडे जाती । तेथे लव्हाळे वाचती ।। बघा, या सूत्राने संत तुकारामांनी दुबळेपणा, लाचारीला थारा दिलेला नाही..... उलट “ काल जयी “ होण्याचा मंत्रच दिला आहे.... 

आता याचा अर्थ काय तर.... बघा, महापूर आला की मोठे वृक्ष उन्मळून पडतात…. पण लहान ‘लव्हाळे’ मात्र वाचतात…. का तर महापुराचा माराच असा असतो…. की भक्कम पाय रोवून उभी असलेली झाडे मुळापासून उखडली जातात…. पण “लव्हाळे” मात्र पुराचा तडाखा विनम्रतेने स्वीकारतात.... स्वत:ला वाचवतात…. मोठे होतात.... विनम्रता हा मोठेपणाला पूरक गुण आहे…. सामर्थ्य जेवढे अधिक, विनय तेवढा अधिक असतो.... सामर्थ्य हवेच.... पण विनयामुळेच ते शोभून दिसते.... 

माणूस जसा जसा विचारांनी प्रगल्भ होतो.... तसा त्याचा विनय वाढतो…. प्रख्यात चिनी तत्त्ववेत्ता कन्फ्युशिअसचे एक वाक्य खूप नेमकेपणाने विनयाचे महत्त्व सांगते..... Humility is the solid foundation of all the virtues.... म्हणजेच आपल्या साऱ्या मूल्यांचा भक्कम पाया आहे आपला विनय..... बघा ना, आपला सारा मोठेपणा विनयाशिवाय वांझोटा होऊन जातो.... 

इथे एक उदाहरण देतो.... बघा संत कबीर असे म्हणतात.... 

                                     बड़ा हुआ तो क्या हुआ.... जैसे पेड़ खजूर.... 
                                                         पंथी को छाया नहीं... फल लागे अति दूर.... 

म्हणजेच ताड-खजुरांच्या झाडांना फळे लागत असतातच.... पण त्या फळांचा लाभ सहजा-सहजी भुकेल्या वाटसरूला होऊ शकत नाही.... फळेतर दूरच... त्याची सावली देखील मिळत नाही.... मग सांगा.... इतरांना ऐनवेळी कसलाच लाभ नसलेल्या मोठेपणाला काय अर्थ आहे का ?.... याउलट आंब्याचे झाड फळांनी डवरते.... आणि सहजतेने आपली फळे सर्वांना देते.... अगदी दगड मारणा-यालाही फळाचाच लाभ होतो.... सावलीचा लाभ तर बारा महिने देते.... म्हणूनच म्हणतो.... ‘बड़ा हुआ तो क्या हुआ... जैसे पेड़ खजूर.... पंथी को छाया नहीं.... फल लागे अति दूर।’ हे आपल्याला एकदा का समजले की विनयाचे महत्त्व पटते..... 

आज एकंदर परिस्थिती पाहता जीवनशैलीत खुपच फरक आलाय.... आजच्या पिढीला अनुकरण करायला आवडते.... गर्दीतल्या सगळ्यांसारखे वाहायला आवडते.... माध्यमाच्या टीव्ही चैनेलासाराख्या माध्यमाच्या रिच मुळे असेल... पण नकळत आपण सगळी एका मास हिप्नोटीक स्पेल मध्ये वावरतोय.... उदाहरण क्रिकेटचे घ्या... जे दाखवले जाते ते पाहतो.... दुस-याच्या नजरेने पाहतो.... आणि प्रतिसाद त्यांना आपेक्षित आहे असाच देतो..... 

"ये ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट है बॉस,..... ना तमीजसे खेला जाता है... ना तमीज से देखा जाता है..... याला आजची पिढी Attitude बोलते... ते तिला आवडते.... त्याचे अनुकरण होते..... मग विनयशीलता, नम्रता राहते बाजूला.... आता वास्तविक तथाकथित जंटल मन गेमला म्हणजेच क्रिकेटला त्यांनी.... म्हणजेच केवळ ध्यानाकर्षण ध्येय असलेल्यांनी कधी बदलून कधी टाकले..... निदान पाहणा-याला तरी समजले नाही..... मग आता लक्षवेधक कामगिरी आता केवळ द्रविडची न होता..... श्रीसंतने मथ्यू हेडनला कशी खुन्नस दिली ते वारंवार बघितली जाते..... यावर हिरीरीने चर्चा होतात...... छात्या फुगतात..... त्याचे अनुकरण केले जाते... माझ्यामते करायचे तर तेंडूलकरचे अनुकरण करा.... विनम्रतेने खुनन्स कशी देतात ते शिका.... 

म्हणूनच म्हणतो, या मास हिप्नोटीक गर्दीत वाहू नका.... स्वत:च्या जागृतीने जगा..... आपण गर्दीतलेच एक असतो तेव्हा असेच होते.... एकाने दगड उचलला कि लगेच अनेक जन सरसावतात.... जसे चुकून एकाने सिग्नल मोडला... कि बाकीच्यांचे तंत्र सुटतेच... सिग्नलची शहानिशा न करता आपण त्यांच्या मागे जातोच.... यासाठीच स्वत:च्या जागृतीने जगायचे.... तुम्ही ठरवाल तसेच होणार हे मात्र नक्की.... 

मित्रांनो, तारुण्यात जोश नक्कीच हवाच असतो..... पण तो जोश... तो जोम परीक्षेत गुणसंपदा मिळवताना हवा.... ते ज्ञानाचे, विद्वत्तेचे ऐश्वर्य मिळाले.... की यश हे लाभतेच.... मग विनम्र होता येणे हेही महत्त्वाचे असते.... असे संतुलित व्यक्तित्व विनम्रतेच्या प्राप्तीने निर्माण होते.... म्हणून वेळीच सावध होऊन विनयाला दुर्बलतेशी जोडून आपण जीवनाचा पाया खिळखिळा करून टाकू नका.... 

आता इथे पालकांचेहि कर्तव्य आहे.... आपल्या मुलांवर योग्य संस्कार करणे.... जर योग्य संस्कार झाले तर त्यांच्याच मुलाचे भवितव्य व पर्यायाने समाजचे, देशाचे भवितव्य उज्वल होईल.... बघा, लहानपणी मनावर झालेले संस्कार इतके खोलवर रुजलेले असतात.... की ते त्या माणसाच्या व्यक्तीमत्वाचा भाग बनून जन्मभर त्याच्या सोबत राहतात… ते पुसायचे असल्यास त्यासाठी त्याला नंतर खूप प्रयत्न करावे लागतात... 

चांगल्या संस्कारांनी..... सहनशक्ती, संयम, चिकाटी, अंगमेहनत, कष्ट यासारखे गुण वाढीला लागतात.,,, स्वच्छता आणि नियमित व्यायाम व आहार यामुळे आरोग्य चांगले राहते.... दुस-या व्यक्तीचा अपमान करू नये.... असे वागणे, बोलणे अयोग्य.... असे संस्कार बालपणीच झाले.... तर असंगाशी संग होत नाही.... पुढे आपसात संघर्ष होत नाहीत.... समाज सुसंघटित आणि बलवान होण्यास मदत होत जाते.... विनयशीलता बाळगल्यामुळेही चांगले संबंध राहतात.... तसेच आत्मवंचना होत नाही.... अशा अनेक प्रकारे संस्कारांचा लाभ व्यक्ती आणि समाजाला मिळतो.... 

आपल्यातील अहंकाराला खतपाणी न घालता.... आपल्याला पुष्कळच प्रगती करायची आहे..... याची मनाशी खूणगाठ बांधून विनम्रता हा गुण अंगी बाणवायचा.... माझ्यापेक्षा हुशार बोलण्यात वागण्यात कोणी दिसतच नाही.... असे वाटायला लागणे हाच तर.... सर्वात मोठा धोका आहे..... तसे होऊ नये म्हणून विनम्रता अंगी बाणवा.... असे केले नाही तर.... समर्थांनी सांगितलेच आहे..... 

                                      मना सांग पा रावणा काय जाले। 
                                                              अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले ।। 

शेवटी काय तर, कोणतेही कार्य, कृती करताना.... दुस-यांचा विचार करणे... अशा काही मूलभूत गोष्टी अंगी बाणवणे.... हे माझ्या मते एकाद्या माणसाला सुसंस्कृत विनम्र होण्यासाठी पुरेशा असाव्यात.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

No comments:

Post a Comment