Saturday, 16 November 2013

चैतन्यधारा : गुरुभक्ती आणि गुरुकृपा

चैतन्यधारा : गुरुभक्ती आणि गुरुकृपा                                               (ता. १०-०१-२००८)

   "हनुमंत आमुची कुळवल्ली, राम मंडपा वेला गेली ,श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोलिया नामे"

पहाटेच्या पवित्र वातावरणात समर्थ शिष्य कल्याणाची काकड आरती संपत आलेली असते.. समर्थांना जाग येते.. कल्याणाचा खणखणीत आवाज कानावर येतो.. 
"आमुचे कुळी हनुमंत, हनुमंत आमुचे कुलदैवत, तयावीण आमुचा परमार्थ सिद्धी ते न पावे"

समर्थ उठून बसतात , क्षणभर डोळे मिटून रामाच आणि हनुमंताच स्मरण करतात..

सज्जन गड कडाक्याच्या थंडीमुळे धुक्यात लपेटलेला असतो.. बाहेर राममंदिरात समईच्या प्रकाशात रामाची मूर्ती उजळून निघालेली असते.. दातखिळी बसेल अशी थंडी पण शिष्य कल्याण तशा थंडीतही ब्रह्म्मुहुर्ती पहाटे ३ ला उठून, गार पाण्याने आंघोळ करून रामाच्या पूजेत रमलेला असतो.. 

समर्थ कुटीबाहेर येतात , कल्याणाकडे कौतुकाने पाहतात.. परमशिष्य कल्याण सोडला तर बाकी गडाला अजून जाग यायची असते.. रातकिडे अजूनही ओरडत असतात , गार वारं सुसाट वेगाने गडाभोवती प्रदक्षिणा घालत असत..

"श्रीराम जयराम जय जय राम"  समर्थ बाहेरूनच रामरायाला हात जोडतात.. कल्याणाचे लक्ष जात, तो लगबगीने धावत येतो, नमस्कार करतो..

महाराज कशाला या थंडीत बाहेर पडलात, काल प्रचंड ज्वर चढलेला होता तुम्हाला..!  तुम्ही आतच विश्रांती घ्या मी पाणी गरम करायला ठेवून आंघोळीची व्यवस्था करतो .. समर्थ हसतात अरे या देहाची काळजी मी कशाला करू..?

तो रामराया आहे ना..!!

ते काही नाही, आज तुम्ही विश्राम केलाच पाहिजे , कल्याणही मागे हटणारा नसतो.. समर्थ परत मनमोकळेपणाने हसतात, पण त्यांना खोकल्याची प्रचंड उबळ येते, थांबता थांबत नाही.. कल्याण घाबरतो.. त्यांना पाणी प्यायला देतो आणि आत मध्ये परत झोपवतो, अंगावर भगवी शाल पांघरतो, आणि बाहेर येतो..

हळू हळू गडावरचे इतर शिष्यही जागे व्हायला लागतात .. दसऱ्याचा मोठा उत्सव गडावर होणार असतो , शिवाय शिवाजी राजेही नव्या मोहिमेवर निघण्याआधी दसऱ्याचा मुहूर्तावर गडावर येणार अशी माहिती मिळालेली असते.. आपोआप एक वेगळाच उत्साह गडावर संचारलेला असतो..

गडाची डागडुजी, साफ सफाई, धर्मशाळेची व्यवस्था, मंडपाची उभारणी, धान्य कोठाराची देखभाल, येणाऱ्या जाणाऱ्या  भक्तांची व्यवस्था, एक ना अनंत कामे.. सर्व शिष्य मनापासून कामाला लागलेले असतात, तरी बाहेर गावावरून उत्सवापुरत्या येणाऱ्या काही हंगामी शिष्यामध्ये "कल्याण"  मात्र समर्थांचा फारच लाडका हि भावना मात्र कुठेतरी बोचायचीच..

शिष्यांच्या तर नाना तऱ्हा, कोणी किती साधना केली यावरून पैजा..! एक म्हणे मी दासबोधाची शत पारायणे केली आहेत, दुसरा त्यावर कुरघोडी करे, 'हा हा म्हणता माझी ५०० पारायणे या दास नवमीला पूर्ण होतील', तिसरा पण सामील व्हायचा, गंभीर चेहरा करून, आकाशाकडे लांब नजर लावून म्हणायचा, "रामरायाने या देहाकडून ५ कोटी रामनाम पूर्ण करून घेतलं आहे”, मग इतर साधक यांच्याकडे आदराने वेग्रे बघायला लागायचे.. 

हळूच विषय मग कल्याणाकडे घसरायचा, एक म्हणायचा, महाराज दयाळू आहेत, विद्याभ्यासात अजिबात गती नसल्याने त्याला आश्रय दिला आहे , "श्रीराम श्रीराम"!!!

दुसरे वयस्कर गृहस्थ म्हणायचे, शिसवी खांबासारखा सणसणीत वाढला आहे, नुसता पुक्खे झोडतो चार वेळेला, कधी जप करणे म्हणून नाही, कधी दासबोधाचे वाचन म्हणून नाही, कधी ध्यान म्हणून नाही , कधी आपल्याबरोबर चर्चेत भाग घेणे नाही, अहो आपलं तर सोडा, समर्थांचे प्रवचन सुरु असताना, हा खुशाल गडावरची इतर कामे करत बसतो हो, किती अपमान तो गुरूंचा नाही का..? अशा आणि अनेक चर्चा तिथे चालायच्या.. पण कल्याण समोर आला रे आला कि सर्वांची बोलती बंद..

त्याला सर्व काही कळायचे, आणि समर्थांना सुद्धा..  दोघांनाही फक्त मौज वाटायची..  कल्याणाच्या अंतरंगात वाहणारा रामनामाचा धबाबा फक्त समर्थांना जाणवायचा, त्याच्या हृदयात फुललेल्या हनुमंत नामाचा सुगंधाचा दरवळ समर्थांपर्यंत  पोहोचायचा.. 

ज्याने समर्थांसमोर बसून, त्यांच्या मुखातून निघणारा दासबोधरुपी आत्मरूपी खजिना आपल्या अप्रतिम हस्ताक्षराने कायमचा बंदिस्त केला, ज्याने तो लिहिता लिहिताच पाठ आणि आत्मसात सुद्धा करून टाकला, जो त्यातली एकूण एक ओळ जगतोय, अश्याला अजून पारायण करायची गरजच काय..? ज्याच्या श्वास श्वासातून रामनाम बाहेर पडतंय, तो किती जप मोजून ठेवणार..?  असो पण इतर सामान्य माणसांना या गुरु-शिष्याचं नात कधी कळलच नाही..!!

समर्थांना कालपासून कल्याणाची वेगळीच काळजी लागून राहिली होती , काल प्रत्यक्ष मारुती रायाने समर्थांना दर्शन देऊन सांगितल , कि कल्याणाची भक्ती पूर्ण पावली आहे , त्याची परीक्षा घ्यायला हवी आता..!
शिष्यापेक्षा गुरूलाच शिष्याची जास्त काळजी.. लहान मुलाला माहित नसत , तो आपला आईने काय शिकवलंय तेच जाऊन परीक्षेत, लिहून येतो, पण आईला केवढी चिंता, निकाल मिळे पर्यंत तिला काही चैन पडत नाही, तसंच होत इकडे, पण समर्थांना कल्याणावर पूर्ण विश्वास होता.. 

आणि कल्याण..? तो या सगळ्यापासून अलिप्त होता, समर्थ हनुमत आणि राम, बास विषय संपला, त्याला वेगळं जगच नव्हत.. दररोज सूर्यनमस्कार घालून कमावलेली प्रचंड शक्ती, आणि सद्गुरूंच पाठबळ यामुळे कामाचा झपाटा एवढा कि चार जणांची काम पट्ट्या एकटा उरकायचा..

समर्थांना कफाचा विकार जडल्याने त्यांना गडावरच्या विहिरीचे साठवलेलं पाणी चालायचं नाही..  म्हणून कल्याण दर दिवशी पहाटे २ मोठे पितळी हंडे घेऊन, खाली "उरमोडी” नदी वर जायचा.. नदी काही जवळ नव्हती, जवळपास जाऊन येऊन दोन अडीच तासांच अंतर होत.. पण कल्याण ते काम आनंदाने करायचा, तर सांगायची गोष्ट अशी कि आजचा दिवस कल्याणासाठी महत्वाचा होता..

सकाळी ७ च्या सुमारास सूर्योदयाच्या वेळी एक वृद्ध गडावर येतो, सहा फुटाच्याही वर उंची, धारदार नाक, भेदक डोळे , संपूर्ण पांढरे केस, आणि अति तेजस्वी चेहरा, आल्या आल्या सरळ हा राममंदिरात जाऊन ठाण मांडतो.. 

समर्थ कुटीतूनच नमस्कार करतात.. इतर भक्तही क्षणभर त्या वृद्धाकडे बघतात, आणि आपापल्या कामाला लागतात.. नऊच्या सुमारास न्याहारीसाठी सगळ्यांना बोलावण जात.. समर्थ कल्याणाला सांगतात, "अरे कल्याणा, देवळात ते पाहुणे आलेले दिसतायेत त्यांनाही बोलाव बरं का..

समर्थांच्या आदेशानुसार कल्याण देवळात येतो, वृद्धाला नमस्कार करतो, आणि म्हणतो.. "महाराज न्याहारी तयार आहे, आपण खाऊन घेता का ?"

वृद्ध डोळे न उघडता उत्तर देतो , मी फक्त पाणी घेतो, मला २ मोठे हंडे भरून पाणी आण.. आणि हो मला हे विहीरीच पाणी चालत नाही, मी फक्त नदीचच पाणी घेतो.. कल्याण विचारात पडतो, ते बघून वृद्ध खेकसतो, पाणी नसेल तर नको,  मी राहीन उपाशी,  झटकन कल्याण उत्तरतो, नाही महाराज मी आलोच..

सकाळी भरून आणलेल्या हंड्यातले २-३ तांबे पाणी तो समर्थांच्या कुटीत ठेवतो.. समर्थ ध्यानस्थ झालेले असतात.. उरलेलं पाणी त्या वृद्धाला देतो.. वृद्ध एका घोटातच ते पाणी संपवून टाकतो.. आणि म्हणतो मला थोड्यावेळाने अजून लागेल.. 

कल्याण म्हणतो, काळजी नसावी मी आणतो भरून महाराज.. समर्थांना पण अजून पाणी लागेल, म्हणून हा तसंच तडक न्याहारी न करता, गड उतरायला लागतो.. मुखात रामनाम सुरूच असतं, नदीवर हंडे भरतो.. आणि नेहमीपेक्षा वेगाने जवळ जवळ धावतच हा परत गडावर येतो.. 

जवळपास ११ वाजलेले असतात, वृद्ध ते हि पाणी तत्काळ संपवतो.. आता गडावरचे सगळेच चाट पडतात, हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे, हे सर्वांना जाणवत.. अर्ध्या तासाने परत वृद्धाची हाक, तहान लागली आहे पाणी आहे का..? आता कल्याण यायच्या आत गडावरचे २-३ सेवेकरी धावतात, महाराज आम्ही व्यवस्था करतो पाण्याची.. 

तर वृद्ध त्याच्याच अंगावर खेकसतो तुला सांगितलाय का..?  हा आहे ना (कल्याणाकडे बघून) एवढा खाऊन माजलाय, काय झाल याला..? आणि तुला जमत नसेल, तर सांग मी चालला जातो.. हे ऐकून कल्याण गडबड्तोच, वृद्ध रागावून गेला तर समर्थांना काय वाटेल.. शिवाय आलेले भक्त हा परमेश्वराचाच अंश, परमेश्वर रागावून गेला तर कसं होईल..? तो हात जोडतो महाराज तुम्ही शांत व्हा, मी लगेचच निघतो,  तुम्ही चिंता करू नका..

बिचारा परत दोन हंडे घेऊन, गड उतरायला लागतो, ते दोन प्रचंड पितळी हंडे पाण्याने भरून वर आणता आणता कल्याणाला आता धाप लागायला लागते.. अंगावरच्या शिरा तटतटून फुगायला लागतात.. सर्वांग घामाने भिजून जातं, पण आलेला प्रत्येक भक्त हा परमेश्वरच, हि भावना मनात समर्थांमुळे मनात एवढी रुजलेली असते कि जे करतोय ते रामरायासाठी बास, मनात दुसरा विचारच नाही, विकल्पच नाही..

कल्याण गडावर कसाबसा येतो, जेवणाची वेळ कधीच उलटून गेलेली असते .. कल्याणाला टोचून बोलणारे सुद्धा आता हळहळत असतात.. कितीही असूया असली तरी प्रत्येकाला त्याची दया येते.. वृद्ध मात्र देवळात तसाच मांडी घालून आणि डोळे मिटून बसलेला असतो..

गडा वरील इतर शिष्य आल्या आल्या कल्याणाला हाक मारून जेवायलाच बसवतात.. ३ वाजून गेलेले असतात.. कल्याण अन्नाला नमस्कार करतो, रामाचे नाव घेतो आणि पहिला घास तोंडात टाकणार, तेवढ्यात जोरदार हाक कानावर ऐकू येते, " पाणी !!!!!!! "

कल्याण हसतो, भरल्या ताटाला नमस्कार करतो आणि उठतो.. समर्थांसाठी आलेल पाणी तो वृद्धासमोर ठेवतो आणि म्हणतो महाराज मी येईपर्यंत हे सेवन करावं, मी आलोच..

आता दोनच्या जागी ३ हंडे घेऊन कल्याणाची आकृती दूर दूर जात दिसेनाशी होते.. इतर भक्त चुळबुळायला लागतात, समर्थांना सांगायला जावं तर ते सकाळ पासून ध्यानात, कुटीचं दार बंद , करायचं काय..!!

कल्याण परत खाली येतो.. आता वेग फारच मंदावलेला असतो..  पण यावेळी त्याला लवकरात लवकर वर पोचायचं असतं कारण, समर्थांसाठीच पाणी पण त्याने त्या वृद्धाला दिलेलं असत.. आता आपल्या गुरूंना तहान लागली तर, डोक्यावरच्या हंड्याच्या ओझ्यापेक्षा हे ओझं फार मोठ असत, काहीही करून समर्थांच ध्यान संपायच्या आत गड गाठायला हवाच, माझी गुरु माउली तहानलेली राहता कामा नये.. किती ते गुरुप्रेम.. .... धन्य ते समर्थ , धन्य तो कल्याण !!!

डोक्यावर एक आणि दोन हातात दोन असे घेऊन कल्याण एक एक पाऊल निश्चयाने टाकायला लागतो.. दिवसभराचा उपाशी असा तो धपापत्या छातीने त्याही परिस्थिती शक्य तेवढ्या वेगाने वर येतो.. पण वेळ तर लागतोच.. उन्ह कललेली असतात.. बेशुद्ध पडायची वेळ आलेली असते, हृदय प्रचंड वेगाने धड धडत असतं, पावल लटपटत असतात.. इथे वृद्ध आल्या आल्या सर्व पाणी पिऊन ढेकर देतो.. संध्याकाळच्या आरतीची वेळ झालेली असते.. सर्व मंदिरात जमतात..

पण कोणी कोणाशी बोलत नसतं सर्वांच लक्ष मात्र त्या वृद्धावर खिळलेल असतं.. तेवढ्यात वृद्ध कल्याणाला बोलावून सांगतो.. माझा आज रात्रीचा मुक्काम इथेच आहे बाळा, तेवढी पाण्याची सोय करून ठेव म्हणजे झाले, कल्याण हात जोडतो आणि पुन्हा उठतो , दोघ तिघ पुढे सरसावतात, पण हा नजरेनेच त्यांना थांबायला सांगतो..

गड उतरायला सुरुवात होते, आणि काय आश्चर्य, शरीर पिसागत हलक होऊन प्रचंड वेग पकडतं, कल्याणाला काही कळायच्या आत उरमोडी नदीच पात्र दिसायला लागतं, हा घाबरतो.. मागे वळून बघतो तर तोच वृद्ध समोर उभा असतो.. 

कल्याण विचारतो आपण खाली कधी आणि का उतरलात, माझ्या हातून काही चूक घडली का..?

वृद्ध हसतो आणि कल्याणाच्या डोक्यावर हात ठेवतो, क्षणार्धात समोर साक्षात हनुमंत प्रकट होतात..

"अणुपासोनी ब्रह्मांडा, एवढा होत जातसे" त्याचं प्रचंड रूप बघून, कल्याणाच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात.. तो मारुतीरायाच्या पायावर लोटांगण घालतो.. 

हनुमंत म्हणतात, 'बाळा तुझ्या भक्तीने आणि सद्गुरू प्रेमाने मी प्रसन्न झालो.. अशीच सद्गुरूंची सेवा करत राहा, आज तू पूर्ण झालास'..  आणि पुढे काही कळायच्या आत, तेजाचा एक प्रचंड लोळ आकाशात विलीन होतो.. 

कल्याण डोळे उघडतो, बघतो तर काय समोर गडाचे दरवाजे दिसत असतात.. आरती सुरु झालेली असते, हा धावत आत शिरतो.. कुटीत डोकावतो तर समर्थ तिथे नसतात , देवळातही नसतात .. हा तसाच धावत मागच्या पठारावर जातो, लांबवर 'धाब्याच्या मारुती' शेजारी, एका रुंद दगडावर समर्थ बसलेले असतात.. 

समोरच सूर्य मावळतीला आलेला असतो.. सारं आकाश लालेलाल झालेलं असतं, उरमोडीच खोर, केशरी रंगाने चमचमत असत.. समर्थांच्या डोळ्यात पाणी दाटलेलं असतं.. कल्याण त्यांना लोटांगण घालतो, डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात..

काहीच न बोलता एकमेकांना सर्वच समजलेले असते.. समर्थ कल्याणाच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि त्यांच्या खणखणीत आवाजात, मनाच्या श्लोकांमध्ये अजून एका काव्य पुष्पाची भर पडते..

" नसे गर्व आंगी सदा वीतरागी*
क्षमा शांती भोगी दयादक्ष* योगी
नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा
इंही लक्षणी जाणिजे योगिराणा"
।।जय जय रघुवीर समर्थ।।
ॐ श्री गुरुदेव दत्त...

















स्वप्न आणि वास्तव                                                    (ता. १२-०२-२००७)  




       स्वप्न बघणे आणि ते पूर्ण करणे यासाठी एक ठराविक वय असते, असा विचार करणाऱ्या मित्रांनी त्यांच्या मनातील हा गैरसमज पहिला दूर करावा.... कारण स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचे वय महत्वाचे नाही, तर त्यासाठी तुमच्यातील आत्मविश्वास आणि तुमची महत्त्वाकांक्षा, तुमच्यातील जिद्द महत्त्वाची.... आलेल्या अपयशाला कारणीभूत दोष-दुर्गुणांना तुम्ही आत्मपरीक्षणाने स्वःतामध्ये किती लवकर बदल घडवून घालवता त्यावर तुमचे यशापयश अवलंबून असते.....

        उंच भरारीची अपेक्षा करणारी लोक भरपूर असतील.... पण जो खरच मनापासून अन् आत्मविश्वासाने त्या दिशेने जायचे ठरवतो..... त्याला त्यासाठी वेळ काढणे अशक्य नसते.... अन् अशा प्रकारे सकारात्मक दृष्टिकोनातून जीवनाकडे बघणारी लोक यशस्वी तर होताच आणि हजारो लाखो लोकांसमोर एक उदाहरण, एक आदर्श बनून राहतात..... त्यामुळे सकारात्मक विचारांनी जीवनाची वाटचाल सुखद अन् आनंदीच होते.... यात शंकाच नाही.... मनुष्य जन्म किती मिळतात.... हे मला माहिती नाही.... पण हा जन्म मिळाला आहे तर तो योग्यरित्या मार्गी कसा लावणे, हे आपले आपल्यावरच अवलंबून असते....
ॐ श्री गुरुदेव दत्त....



No comments:

Post a Comment