उद्धरेत् आत्मना आत्मानम्.....
आपल्या विचारांचे, आशा-आकांक्षाचे, वर्तनाचे परिणाम वर्तमानात घडतात…. तसेच भविष्यातही ते अविभाज्य रूपाने आपल्या बरोबर येतात…. हा कर्मनियमांचा अबाधित सिद्धांत आहे… हे परिणाम मनुष्याला भोगावेच लागतात…. त्यातून कोणाचीही सुटका नाही…. म्हणून प्रत्येक कृती, विचार करताना 'आत्मशोधन' करणे अत्यावश्यक असते.... यासाठीच जो स्वःताला साधक मानतो त्याने नेहमीच आत्मपरीक्षण करणे गरजेचे ठरते.... त्यानेच तो आत्मविकास साधू शकतो.... नमतेपणा, अहंकाररहित आचार-विचार-संवाद असेल तरच योग्य प्रकारे मार्गक्रमणा होते नाहीतर वृत्ती तशी कृती मग भरकटणे ठरलेलेच..!!..
स्वभाव- स्वभाव म्हणजे काय..?.. थोडेसे स्वभावाविषयी आज जाणवते ते पाहुया.... आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, हट्टी, एकांगी विचारांची जी मंडळी असतात त्यांना खूप भव्य अशा स्वरूपाचे यश मिळू शकत नाही.... आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वतःला काही काळासाठी तरी का होईना पण बदलता येणार नाही का..?.. याचा विचारच करत नाही.... मग होते असे की आपण स्वतःच्या स्वभावाचे इतके कौतुक करीत राहतो की त्या स्वभावामुळे आपले जीवनाचे करिअर करण्यात आपल्याला खूप अडचणी येत आहेत, हे आपल्या लक्षात येत नाही.... मग स्वतःचे लाड करीत, म्हणजे आपल्याच स्वभावाचे, आपण आयुष्य घालवतो.... मग योग्य करिअर दूर राहते.... जे कोणी आपल्यावर अवलंबून असतील तेही यात भरडले जातात.... त्यांचेही आयुष्य फुकटच जाते....
आज आपण असे का म्हणतो, माझा स्वभावाच असा आहे तो काही मी बदलू शकणार नाही..!!.. खरेतर याचे खरे कारण आपल्याच देहबुद्धीच्या अहंकारात दडलेले असते.... कारण यां देह्बुद्धीला आपली कम्फर्ट level सोडायची नसते.... कारण काही बदलायचे म्हटले तर आपल्याला आपला "कम्फर्ट झोन' सोडावा लागतो.... आता आहे त्या विचारांच्या स्थितीतच आपल्याला सुरक्षित वाटत असतं.... बदल झाल्यामुळे निर्माण होणारा त्रास सहन करण्याची आपली मानसिकता नसते.... "मला कोणताच त्रास नको आहे,' ही देहमनाची धारणा असते.... मुळात कोणातही बदल म्हटलं, की ताणतणाव येतातच.... त्यामुळेच बदलांना सामोरं जायचं असेल, तर शरीराची आणि मनाची तयारी करावी लागते.... "मला बदल हवा; पण तो विनासायास हवा,' असं काही शक्या होत नसतं.... दुसरं म्हणजे बदल हवा; पण तो आपल्या मनासारखाच हवा, असंही अनेकांना वाटतं.... मग मन म्हणते स्वभाव नाही मी बदलू शकणार..!!.. पण आपला खरा स्व-भाव काय हेच मुळी देहबुद्धी मन आपल्याला कळू देत नाही....
खरंच हा "स्वभाव' म्हणजे काय हो सद्गुरू..?.. कुतूहलाने या प्रश्नाने माझ्या मनात अनेक विचारांचे तरंग उमटले आणि मग मी या "स्व-भावाच्या' शोधात निघालो.... त्याची अनेक "रुपं' मला दिसायला लागली, अनुभवाची प्रचिती यायला लागली.... साधारणपणे स्व+भाव = स्वभाव अशी या शब्दाची फोड आपल्याला करता येईल.... म्हणजेच आपल्या मनात जे भाव उमटतील, त्याचे "प्रतिबिंब' आपल्या कृतीमध्ये जसं जसं उमटेल, तसं-तसा माणसाचा "स्वभाव' प्रकट होतो, व्यक्त होतो.... मग आपण म्हणतो हा कपटी आहे, हा श्रद्धाळू आहे, हा दयाळू आहे, हा संवेदनशील आहे, हा प्रेमळ आहे... अशी त्याची अनेक "रुपं' प्रत्येकजण अनुभवत असतो....
परिस्थितीने माणसाचा" स्वभाव 'निश्चितपणे चांगला किंवा वाईट होऊ शकतो यात वादच नाही.... पण... मी कपटी, अहंकारी, रागीट, स्वार्थी, बेपर्वा, बेफिकीर अशा "स्वभावाचा' बनलेला मला तरी चालेल का..?.. मग इतरांचं काय..?.. निश्चितच अशा स्वभावाचा माणूस कोणालाही आवडणार नाही, हवाहवासा वाटणार नाही.... मग जरा माझा "स्वभाव' परिस्थितीमुळे बनलेला असेल तर तो मी बदलू शकेन का..?..
होय..!.. कारण या स्वभावाची जाणीव हीच पहिली "परिवर्तनाची' सुरूवात आहे.... अत्यंत विश्वासू, श्रद्धाळू, संवेदनशील, आनंदी, समजूतदार अशा स्वभावाची व्यक्ती कोणाला आवडणार नाही..?.. होय..!.. नक्कीच ती सर्वांनाच हवीशी वाटेल, तिचा सहवास घडण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील राहील.... मग हा बदल जर माझी कुटुंबातील, समाजातील प्रतिमा बदलण्यास कारणीभूत असेल, तर प्रयत्नांनी मी त्यात बदल करू शकेन.... हे "सूर्यप्रकाशा' इतके स्वच्छ आहे.....
मग मूळ प्रश्न येतो "स्वभावाला' औषध असते काय..?.. त्याचं उत्तर निश्चितपणे आपल्या जवळच आहे, ते बाहेर कुठेही विकत नाही, शोधून सापडत नाही, ते आपल्यातच सामावलेलं आहे.... फक्त त्याची जाणीवपूर्वक दखल घेणे आणि स्वत: बदल करणे, हे आपल्या हातात आहे....
आपण आपल्या स्वभावात प्रयत्नपूर्वक चांगला आमुलाग्र बदल घडवला तर निश्चितपणे आपण स्वत:ला आणि इतरांनाही आपल्या सहवासाच्या माध्यमातून आनंद देऊ शकतो.... भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाच्या माथी देऊ काठी ।।.... हे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी "स्वभाव' कसा असावा आणि कसा बदलावा हे आपल्या अभंगातून पटवून दिले आहे.... प्रसंगी, मेणाहुनी मऊ आम्ही विष्णूदास, पण वेळ पडली तर वज्रास सुद्धा भेदण्याची क्षमता आमच्या "स्वभावात' आम्ही धारण करू शकतो....
फक्त आहे तसे असणे आणि स्वभावात राहणे म्हणजेच ज्ञानी होऊन जगणे असे वाटणे, हेच अज्ञानाचे लक्षण नाही का..?.. तसे बघायला गेलो तर जगातील प्रत्येक प्राणी हा स्व-भावात रहात असतो, जगत असतो.... मग हे सर्वच प्राणी ज्ञानी आहेत असे म्हणायचे काय..?.. आणि तसे असेल तर मग मानव म्हणून आपण स्वत:ला श्रेष्ठ कसे म्हणायचे..?.. मग मानवाच्या बुद्धीचा उपयोग तो काय..?..
यासाठी आपला खरा 'स्व भाव' काय आहे.... 'स्व भाव' म्हणजे नक्की काय हे माणूस जाणून घेऊ शकतो... प्राणी नाही.... प्राण्यांचे कर्म पाप पुण्याचे नसते, पण माणसाचे असते, कारण त्याची 'बुद्धी' कर्म करते.... आणि ते कर्म कोणती बुद्धी करते, म्हणजे देहबुद्धी की आत्मबुद्धी ते फार महत्वाचे.... मग आत्ममन म्हणते....
प्रत्यक्षदर्शी अनुभवासि येशी हे तव रूप सरिते |
समदर्शी नित्य ऋतुक्रमे फलही वृक्षा असते ||
ऊर्जा प्रकाश प्रत्यक्षहि तू देणारी सविते |
स्व-भावि राहुन बा मनुजा तू काय देशी इतराते..? ||
आपण आपल्या खऱ्या आत्म स्व-भावात राहिले कि सारेच ऋण आपोआप फिटत रहातात.... कर्मे घडत जातात आणि कार्य होत जाते.... अशी आपली माझी श्रद्धा आहे.... वरील सर्वनिरीक्षणाचा मूळ उद्देश म्हणजे आपल्या आंतरिक भावनेवरती नियंत्रण ठेऊन परिस्थितीनुसार आपल्या "स्वभावात' बदल करणे आणि आपलं व्यक्तिमत्व आपल्या कृतीतून आदर्श बनवणे हे आपल्या हाती आहे....
"उद्धरेत् आत्मना आत्मानम्' असे भगवद्गीतेत म्हटले आहे.... याचा अर्थ आपणच आपला उद्धार करावा असा आहे.... गीतेच्या या वचनाचा नीट विचार केला तर... असे लक्षात येईल की जीवनातील सुख दु:खावर आपलेच नियंत्रण असते.... माणसाने स्वभावात बदल केला आणि तो करणे कठीण असले तरी शक्य असते.... तर जगात सर्वत्र आनंदच सापडेल....
ॐ सर्वेत्र: सुखिन सन्तु सर्वे सन्तु निरामया |. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुखमाप्नुयात् ||.
|| ॐ शान्ति शान्ति शान्ति ||.
ॐ श्री गुरुदेव दत्त....
No comments:
Post a Comment