Thursday, 15 November 2012


 सदगुरुक्रुपे आज समजते क्षण क्षण आहेत मोलाचे.… 
                               कर्तॄत्वाला नव दिशा देऊनी स्वागत करू नववर्षाचे.... श्रीराम....

किती उजळून निघतो सारा आसमंत...  अन होते लक्ष लक्ष दिव्यांची मोहक नक्षी.... साध्या मातीचीच पणती.... पण तिचे इवलेसे मांगल्यमय तेज दूर करते, पराकोटीचा अंधार.... अश्या अंध:कारातून सळसळत्या चैतन्याने घेतलेली एक तळपती झेपच जणू... एक झळकती ज्योती शलाका... एक मंद तेवणारी वात... तिमिर दूर सारून सत्याचा, चांगुलपणाचा उजेड देणारा एक महान मंगलस्त्रोत... चिमुकला पण नक्कीच आशादायी.... हा आतला अंधार, निराशेचे गडद तिमिर ओलांडून आशेची वात उजळण्यास कारणीभूत होऊ दे हीच इच्छा....  येणाऱ्या प्रत्येक अमावास्येत पुढच्या पौर्णिमेची आस मनात जागत राहू दे ही सदिच्छा....  अन ही दिवाळी तुम्हा सर्वांसाठी खूप खूप आनंद... सुख समृद्धी... अन आंतरिक समाधान घेऊन येवो या शुभेच्छासह.... श्रीराम....
      
             दिवाळी ज्योतीचा, उजेडाचा तेज उत्सव वाटे हवा हवा....
                                लावोनिया ज्ञानाचा दिवा उधळू प्रकाश नवा नवा.... श्रीराम....

        उजळली वात.... फाकला प्रकाश.... उटण्याचा गंध.... भारले आकाश.... 
                    मांगल्य घेउनी आली ही दिवाळी.... जीवनास लाभो सुवर्ण तेजाची झळाळी.... श्रीराम....  

         लक्ष लक्ष स्वप्नांना रंग नवे.... कल्पनांची रंगावली, लावुनी तेज दिवे....
                              नव उद्योगाची तोरणे... अन आखू नव धोरणे....
                                         दुख हरो... दैन्य सरो... याहुनी मग काय हवे... श्रीराम....

अमावास्येच्या अंधारात.... दिव्यांना आज प्रकाशित करा... तुम्हीही असेच तेजोमय व्हा... आणि संकटावर मात करा... विजयपताका तुमचीच असेल... फक्त थोडे प्रयत्न करा... श्रीराम....

रामनामाचे उटणे सर्वांगाला लावा.... सत्संगाचा साबण लावून, सत्सेवेच्या जलाने अभ्यंगस्नान करा.... व त्यात आपले स्वभावदोष आणि अहंम धुवून काढा..... त्यागाने सर्व अंग कोरडे करा.... समाधानी आनंदाची नवीन वस्त्रे परिधान करा.... स्नेह - प्रीतीचा फराळ करून वाणी मधाळ व सात्त्विक बनवा.... अष्टांगसाधनेची ज्योत पेटवून औक्षण करा... व स्वत: अष्टांग पाकळयांचे परिपूर्ण पुष्प बनून गुरु माउलीच्या चरणी रहा.... श्रीराम....

         गुलाबी थंडी... आश्विन मास... दिवाळीची चाहूल... प्रत्येक मनास....
                   पणत्यांचा नाजूक.. सात्विक प्रकाश.... सडा रांगोळी.. रंगीत आकाश....
                            ज्ञान प्रकाशाची नवी वाट.... सोन्याच्या पावलांनी समृद्धीची साथ.... श्रीराम....

                  उत्कर्षाचे सुगंधी अत्तर चोहिकडे शिंपावे....
                                 सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे.....
                  श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे....
                                 सुख समृद्धीने अवघे अंगण तुमचे भरावे..... श्रीराम.....

दिवाळी म्हणजे दीपोत्सव.... बाहेर तर दिवे पणत्या पेटवायचेच.... पण खरा दिवा तर हृदयात पेटला पाहिजे.... हृदयात जर अंधार असेल तर बाहेर पेटविलेल्या हजारो पणत्या निरर्थक आहेत.... दिवा हे ज्ञानाचे प्रतिक आहे.... हृदयात दिवा लावणे म्हणजे निश्चित प्रकारच्या जाणीवेने दिवाळीचा सण साजरा करणे होय... धनत्रयोदशीच्या, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वित्ताला अनर्थ न मानता जीवन सार्थक करण्याची शक्ती मानून महालक्ष्मीची पूजा करायची... नरक चतुर्दशीच्या दिवशी जीवनात नरक निर्माण करणारा आळस, प्रमाद, अस्वच्छता, अनिष्टता, वगैरे नरकासुरांना मारणे आपले कर्तव्य ठरते.... दिवाळीच्या दिवशी ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ मंत्राची साधना करता करता आपणच आपला जीवन पथ प्रकाशित करायचा.... आपल्या जीवनाच्या वहीचा आढावा घेते वेळी जमेच्या बाजूला ईशकृपा राहावी.... ह्यासाठी प्रभूकार्याच्या प्रकाशाने जीवन भरून काढायचे.... राग, द्वेष, मत्सर यांना दूर करून नवीन वर्षाच्या दिवशी प्रेम, श्रद्धा आणि उत्साह वाढविण्याचा प्रयत्न करावा.... नव्या वर्षाच्या दिवशी जुने वैर विष विसरून शत्रूचेही शुभचिंतन करायचे.... नवे वर्ष म्हणजे शुभ संकल्पाचा दिवस.... भाऊबीजेच्या दिवशी स्त्रीकडे पाहणाऱ्या निर्मळ दृष्टीची शिकवण घ्यायची आणी बंधूच्या निर्व्याज प्रेमाने संपूर्ण स्त्री-समाज बहिणीच्या रुपात स्वीकारायचा.... सुंदर ज्ञान देणारा ज्ञानदीप जर हृदयात प्रकाशित केला तर... आपले जीवन सदैव दिपोत्सवी महोत्सवासमान नक्कीच बनेल.... म्हणूनच.... एक विश्वास असावा पुरता... कर्ता हर्ता गुरु ऐसा.... श्रीराम....

चेतनकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या व नववर्षाच्या शुभेच्छा....

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Sunday, 11 November 2012

दिवाळी तेजोत्सव जीवन उजळी.... नवसंकल्प समाधानी आयुष्य घडवी.... 

आज दिवाळी आली म्हणजे ज्योतीचा, उजेडाचा आणि तेजाचा उत्सव आनंद घेऊन घरी आला..... दिवाळी म्हणजे मांगल्य.... दिवाळी म्हणजे माणसांच्या मनातील सुविचार- आचार येणारे उधाणच जणू.... दिवाळीचा आनंद.... दिवाळीचा उत्साह वर्षभर राहून.... वर्षभर पुरावा अशीच आपली अपेक्षा दिवाळी शुभेच्छांमधून दिली जात असते..... मंगलमय दिवाळीचा दिवस उजाडताना जणू नवा प्रकाश आपल्या जीवनी घेऊन येतो.... आपण नवे संकल्प करतो.... त्यावर मार्गक्रमणा करतो.... जुने अपयश विसरून नव्या उद्दिष्टांकडे यशस्वीपणे गरुडभरारी घेण्याचा प्रयत्न करतो..... 

आज दिवाळी सणाला थोडा नवीन विचार करून पहा.... विचार सामाजिक बांधिलकीचा आहे..... बघा पटला तर..... आपण खूपवेळा दुसऱ्या बाजूचा विचार करत नाही.... आपल्याला असे वाटते की राग फक्त आपल्यालाच येतो....पण त्याचवेळी विचार करा अनेकजण चुकी नसतानाही अत्यंत शांततेने वाद संपवतात.... आज तुम्ही तुमच्या मुलांना कित्येक वेळा झालेल्या चुकां समजाविण्या ऐवजी नुसते ओरडत असाल तर काय फायदा.... पण काही लोक दत्तक घेतलेल्या मुलाला सुद्धा आनंदाने चांगल्या सुसंस्काराने सांभाळत असतात.... आज आपल्याला नेहमी नवीन कपडे हवे असतात.... पण त्याचवेळी काही व्यक्तीना अंग झाकण्यासाठी सुद्धा कपडे मिळत नाही... आज आपल्यालाकडे पैसा असूनही आणखी पैसा हवा असतो.... पण काही लोक गरीबीत सुद्धा सुखाने जगत असतात.... 

म्हणूनच जे आहे त्यात समाधानी राहा.... फक्त आपला विचार न करता दुसऱ्याचा देखील विचार करायला शिका.... अमुक गोष्ट आपल्याकडे नाही यापेक्षा आपल्याकडे काय आहे.... यात आनंद उपभोगा... कारण आपल्यापेक्षा आणखी किती तरी अशी लोक आहेत..... जी खूपच गरीब आहेत ज्याना आपल्यापेक्षा जास्त त्या वस्तूची गरज आहे.... पण परिस्थितीने ते त्या वस्तू मिळवू शकत नाही आणि जे आहे त्यातच ते समाधान मानतात..... 

यंदाच्या दिवाळीत बोनस आल्यावर किंवा आपण किती पैसे खर्च करून किती नवीन कपडे घेणार.... हा विचार करण्याआधी ह्या गरीब मुलाचा हा फोटो जरूर आठवा..... आपण नक्कीच तीन ते चार नवीन वस्तू - कपडे अशा दुकानातून खरेदी करू शकू...... पण या अशा गरीब मुलांनी दुरून नेहमी स्वप्नेच पाहायची का..... नवीनच नाहीत... पण निदान तुम्ही किंवा तुमची मुले थोडे वापरून कंटाळले असाल..... असे कितीतरी कपडे बंद कपाटात पडून असतात..... त्यातील एखादे जरी या गरिबाला दिले.... तरी ह्या गरिबाचे स्वप्न थोडे तरी नक्कीच पूर्ण होईल.... असे मला वाटते.... बघा, इतरांचा विचार करावा ही आपली महान संस्कृती आहे.....  मदत भावना, सामाजिक बांधिलकी अशा गुणांचा पुरस्कार करणारी माणस ही खऱ्या अर्थाने संस्कृतीचा पाया असतात..... 

मित्रांनो, मग या दिवाळीला करणार ना.... अशाच एखाच्या गरिबाचे स्वप्न पूर्ण ? तुम्ही करणार का ?...  हा नव संकल्प सामाजिक बांधिलकीचा.... बघा, कदाचित यालाच खरे जगणे आणि समाजकार्य म्हणतात..... पण त्याचवेळी या समाजकार्याला अभिमानानाचा, अहंकाराचा, उपकाराचा दर्प येणार नाही, याची काळजी मात्र नक्कीच घ्या.... ज्यात स्वार्थ नाही, उलट आपण काहीतरी चांगले कार्य केले याचा आत्मानंद मिळतो.... असे निर्मळ समाजकार्य केल्यास जे सुख समाधान मनाला लाभेल ते वर्षभर नव्हे... आयुष्यभर शाश्वत असेल.... 

मित्रांनो, ही दिवाळी तुम्हा साऱ्यांसाठी खूप खूप आनंद.... सुख समृद्धी.... अन आंतरिक समाधान घेऊन येवो.... याच सर्वाना मंगलमय शुभेच्छा.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त.....


Tuesday, 6 November 2012

खरी लोकशाही आपण केव्हा अनुभवणार..... 

आपल्या देशात प्रामाणिकपणे कष्ट करून भाजी-भाकरी खाणाऱ्या माणसापेक्षा जाणून-बुजून गुन्हा केलेल्या गुन्हेगाराला सुधारण्याकडे..... त्याच्या हक्कांकडे सरकार अधिक जागरूकपणे पाहते असेच चित्र आहे.... त्यात कसाब ते संजय दत्त, सलमान, रामलिंगम राजू सगळेच आले..... त्यामुळेच अलीकडे आपल्या देशात असल्या कुप्रसिद्ध गुन्हेगाराना शिक्षा झाल्याची बातमी ऐकायला मिळत नाही.... "गुन्हा तेथे ताबडतोब शिक्षा" हे धोरण कडकपणे, निर्दयपणे आणि निस्पृहपणे राबवल्याशिवाय अशा गुन्ह्यांना पायबंद बसणार नाही.... आता या गुन्हेगारांचे लाड खूपच झाले आहेत.... कुत्र्याचे वाकडे शेपूट आता सरळ करण्याचा प्रयत्न बास झाला असेच वाटते.... 

आज आपल्या देशात अपराध करणाऱ्या व्यक्ती मोकाट आह्रेत.... सलमान खान ह्याला अद्याप कसलीच शिक्षा झालेली नाही व होणार हि नाही.... कारण सध्या आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे कोठे.... जो तो आपली खुर्ची सांभाळण्यासाठी दिल्लीश्वरांची सेवा कशी करता येईल.... ह्याच विवंचनेत आहे.... असल्या शुल्लक गोष्टीकडे लक्ष्य देण्यास कोणाला रस आहे.... 

चंगळवादाच्या धुंदीत असणाऱ्या अनेकांच्या मोटारी भरधाव पळतात.... आणि त्यांच्या या मस्तीखोरीला बळी पडतात रस्त्यावरचे आयुष्य जगणारी गरीब माणसे किंवा कर्तव्य बजाविणारे पोलिस..... मद्याच्या नशेमुळे वेळ-काळाचे भान हरपलेली ही मंडळी आपल्या मोटारीखाली दुसऱ्यांचे प्राण घेतात..... पैशाच्या मस्तीतून, पैसे चारण्याच्या आणि खाबूगिरीच्या वृत्तीतून हे घडते.... अशी सामान्य नागरिकांची भावना आहे..... या पैशाच्या - सेलिब्रिटी मस्तीने माणूस आंधळाही बनतो.... मद्य पिऊन वाहन चालविण्याने स्वतःच्या जीवाला धोका उत्पन्न होतोच.... इतरांचा जीवही धोक्यात येतो.... या सामान्य ज्ञानाचाही विसर अनेकांना पडलेला असतो.... 

बघा, ज्या इनसायडर ट्रेडिंगसाठी रजत गुप्तांना दोन वर्षांची कैद आणि ५0 लाख डॉलर्सचा दंड झाला.... तसा प्रकार भारतातही नवा नाही..... फरक इतकाच, की त्यावरून अद्याप एकालाही कारावास झालेला नाही.... रजत गुप्ता हा भारतीय वंशाचा माणूस हे सगळं जर भारतात करता... तर काय झालं असतं.... असा विचार येतो आणि हजारो कोटी रुपयांचे घोटाळे वर्षानुवर्षे कोर्टात खितपत पडलेले दिसतात.... मी सात हजार कोटी रुपयांची अफरातफर केली... असे जाहीरपणे मान्य केलेला सत्यमचा रामलिंगम राजू जामिनावर बाहेर आलाय.... आणि त्या खटल्याचा अंतिम निकाल केव्हा लागेल हे कुणीही सांगू शकत नाही.... अद्याप कुणालाच कारावासाची शिक्षा झालेली नाही..... 

आज या प्रवृत्ती म्हणजे भारताच्या न्यायव्यवस्थेची शोकांतिका आहे.... इथे काहीही केलेले चालते... आणि काहीही होणार नाही... याची शाश्वती देणारी व्यवस्था म्हणजे आमची न्यायव्यवस्था..... इतक्या दारूण आणि करुण अवस्थेला जवळपास सर्वच व्यवस्था पोचलेल्या असताना आपल्या लोकशाही व्यवस्थेचे गोडवे गाणे हे वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण नाही का.... 

पोलिसांनी गुन्हा दाखल करतानाच आवश्यचक त्या कलमांचा समावेश न केल्यास खटला उभा करताना त्रुटी राहतात.... आणि या त्रुटींचा गैरफायदा कसा घ्यायचा.... हे धनिकांच्या बाळांना चांगले ठाऊक असते..... पोलिस दलातील आणि प्रशासनातील भ्रष्ट प्रवृत्तींना हाताशी धरून आपण कायदाही धाब्यावर बसवू शकतो.... अशी मानसिकता त्यातून वाढीस लागण्याचा धोका आहे.... पोलिसांना विकत घेण्याची किंवा राजकीय नेत्यांकडून दडपण आणून पोलिसांचे हात बांधण्याची क्षमता धनदांडगे आणि गुंडांच्या टोळ्यांशी संबंधित लोकांकडेच असते.... आता यावर एकाच उपाय..... जनमताचे पुरेसे दडपण आणून या मुजोरांना धडा शिकविण्यास सरकारी यंत्रणांना भाग पाडणे..... तरच असे प्रकार होणार नाहीत आणि असंख्य निरपराधांचे जीवही वाचतील.... 

गुन्हा हा कितीही उच्चपदस्थ, वजनदार आणि प्रतिष्ठित व्यक्तीने केलेला असो तो शिक्षेला पात्रच असतो आणि गुन्हय़ाला कोणत्याही परिस्थितीत क्षमा नसते.... हेच न्यायाचे तत्व असल्याचे अमेरिकन न्यायालयाने गोल्डमन सॅख्स या वित्तीय कंपनीचे माजी संचालक रजत गुप्ता यांना दोन वर्षे कारावास आणि ५0 लाख डॉलर्सचा दंड ठोठावून दाखवून दिले आहे..... रजत गुप्ता या नावाभोवती असलेले वलय, त्यांची बिल गेटस आणि कोफी अन्नान यांच्याशी असलेली मैत्री, ज्युरीची त्यांना लाभलेली सहानुभूती या कशाचाच विचार न्यायालयाने शिक्षा देताना केला नाही.... भारतातही तपास यंत्रणा अशाच पध्दतीने वागू लागल्या.... तरच उच्चपदस्थांच्या भ्रष्टाचाराला आळा बसू शकेल..... आणि खऱ्या अर्थाने लोकशाही आपण पाहू शकू..... 

ॐ श्री गुरुदेव दत्त....

Thursday, 1 November 2012

सार्थ साक्षरता भेटे.... ती विद्या मिळवू इथे.....

जर का एखाद्या विषयावर संवाद होत असेल तर तेथे अज्ञानी माणूस आपल्या ज्ञानाचा वापर वाद घालण्यासाठी करतो.... त्याच्या वाक्चातुर्याचा वापर... अहंकारयुक्त कृतीसाठी करतो.... आणि वाक् शक्तीचा प्रयोग.... दुसरयाचे मत चुकीचे.... आपलेच खरे करण्यासाठी करतो....ज्ञानी माणूस मात्र ह्या विरुद्ध आपले ज्ञानाचा, संपतीचा, आणि शक्तीचा वापर दुसऱ्याच्या भल्यासाठीच करतो.... तो ज्ञान देतो... दान करतो व दुर्बलास मदत करतो.... श्रीराम... 

आता खरे ज्ञानी होण्यासाठी मी पणा सोडणे महत्वाचे ठरते..... मीपणाचा त्याग म्हणजे अहं जीवपणाचा त्याग..... अहंपणा नाहीसा झाल्यावर अज्ञानही आपोआप नाहीसे होते.... मीपणा जर आपल्यापासून दूर गेला की.... प्रपंचच ब्रम्हरूप होतो..... महापुरात आपल्याला तारतात आपले सद्गुरू हा महापूर कोणता ? तर मायेचा आहे..... ' म ' म्हणजे आहे आणि ' या ' म्हणजे काहीं नाही..... श्रीराम..... 

जे काहीं नाही पण आहे.... असे वाटते ती माया.... या मायेच्या महापुरातून गुरु साधकाला तारून नेतात.... जे ' नाही ' त्याला आपण ' आहे ' समजतो..... आणि जे ' आहे ' त्याला आम्ही ' आहे ' मानायला तयार नसतो.... म्हणून सर्व ब्रम्ह घोटाळा झाला आहे.... या सर्वातून सुटायचे असेल तर आपल्या अंगी गुरुची तत्वे बाणली गेली पाहिजेत.... गुरुची शिकवण आपण पूर्णता अंगिकारली पाहिजेत.... श्रीराम.... 

आपल्याला विकास हा आतून बाहेर साधायचा आहे..... तुम्हास कोणीही शिकवू शकणार नाही…. कोणही तुम्हास अध्यात्मिक बनवू शकणार नाही..... तूमचा आत्मा हाच एकप्रकारे तुमचा गुरु आहे.... म्हणून स्वःताचे स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करा.... मात्र यासाठी मी पणा अहं सोडणे आवश्यक मगच आपल्याला स्वरूप जाणण्याची विद्या प्राप्त होईल.... श्रीराम.... 

                                        दाविते ज्ञानभानुते | अज्ञान तम नाशिते | 
                                                    आनंदी लीन जी होते | ती विद्या मिळवू इथे || 

आता इथे काय अभिप्रेत तर माणसाने अहंकारी असू नये.... बघा, लीन होणे म्हणजे वाकणे.... पण तेच फार अवघड जाते.... कारण जरा काही शिकलो, काम केले, अनुभव आला... माणसाचा अहंकार जागृत होतो व वाकणे विरून जाते..... मग यामुळे आपला आनंद हि हरवतो.... म्हणून स्वामी येथे शेवटी स्पष्ट करतात कि जी माणसे..... अहंकार कमी करून सोडून जीवनात आनंद घेत जो लीन अर्थात वाकतो.... येथे वाकणे म्हणजे स्वःताचा मी पणा सोडणे होय..... त्यासच विद्या प्राप्त होते.... कारण कोणत्याही प्रकारचे ज्ञान मिळवायचे.... ग्रहण करायचे असेल तर आपल्याला गुरूला शरण जाऊन गुरुपदी लीन होऊन, मला सर्व समजते हा अहं सोडूनच ते ज्ञान प्राप्त करता येते..... श्रीराम.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त....

Wednesday, 24 October 2012


विचारांचे सीमोल्लंघन करु.... मनात सुविचार भरु.....

क्षात्रवृत्तीची जोपासना करण्यासाठी सीमोल्लंघन करण्याचा संदेश देणारा हा दसरा सण…. आजच्या विज्ञान युगात जुन्या, बुरसटलेल्या, अंधविश्वासी विचारांच्या सीमारेषांचे उल्लघन करण्याची खरी गरज आहे.... आज आपली नीतीमूल्य - संस्कार जपून बदलत्या जगातील ज्ञान प्राप्त करून वैज्ञानिक प्रगती साधण्यात खरा पुरुषार्थ सामावलेला आहे..... सतत उद्यमशील राहून, उद्योगाच्या नाना क्षेत्रांत धडाडीने प्रवेश करून स्वतःच्या व पर्यायाने देशाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी धडपडण्यातच क्षात्रतेजाचं खरं दर्शन घडणार आहे..... 

मानापनाच्या खोट्या कल्पना झुगारून देऊन हुंड्यासारख्या असुरी प्रथा.... व त्यासाठी स्त्रीचा होणारा अघोरी छळ यातून तिची सुटका करून.... तिच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटण्यातच पुरुष जातीचं खरं कल्याण आहे.... शक्तिदेवीच्या उपासनेचा हाच खरा अर्थ आहे.... मुलगी होणार म्हणून  केली जाणारी भ्रुणहत्या थांबविण्यानेच आदिशक्तीची खरी आराधना केल्याचे पुण्य पदरी पडणार आहे.... अज्ञान, दारिद्य्र, विषमता, जातीयता, फुटिरता आणि धर्मांधतेचे तट ओलांडून जीवनातील खऱ्या सुखाचं सोनं आपल्याला लुटायच आहे.... शमी-आपट्यांच्या पानांच्या प्रतीकातून आज आपल्याला हाच अर्थ अभिप्रेत असला पाहिजे.....

तसेच दुदैवाने आज भ्रष्टाचाराची समस्या सर्वव्यापी झालेली असली.... तरी तो समूळ नष्ट होईल.... अशी आशा ठेवली पाहिजे.... कारण आशा नसेल तर जीवनच व्यर्थ आहे.... मात्र भ्रष्टाचाराविरोधात ओरड करताना प्रत्येकाने आधी स्वत:ला तपासले पाहिजे, असे मी म्हणेन.... भ्रष्टाचाराची सवय सर्वांनाच लागली आहे ही वस्तुस्थिती आहे.... लाच घेणारा तसेच लाच देणारा हे दोघेही दोषी असतात.... म्हणूनच लाच देऊ करणारा रावण तुमच्यात लपला असेल.... तर आधी त्याला संपवा.... मी कोणत्याही परिस्थितीच कुणालाही लाच देणार नाही.... अशी प्रतिज्ञा प्रत्येकाने करावी आणि त्याचे पालन करावे.... तसे झाल्यास भ्रष्टाचाराचा नायनाट होण्याचा सुदिन नक्कीच उगवेल....

सकारात्मक...रचनात्मक विचार आणि कृती ही ख-या अर्थाने समाजाची चिरंतन प्रेरणा असते..... भारतीय पुराणात विजयादशमीच्या दिवसाचे महत्त्व सांगणार्‍या ज्या अनेक कथा प्रचलित आहेत... त्या सर्व कथांचे सार एकच आहे... ते म्हणजे, असत्यावर सत्याची मात आणि सुष्टांचा दुष्टांवर विजय.... सध्याच्या काळात अराजकाचे हे वारे रोखायचे असतील... तर विचार परिवर्तनाची गरज आहे.... हीच वेळ विचारांचे सीमोल्लंघन करण्याचीही आहे.... या सीमोल्लंघनाच्या संकल्पाचा दीप आजच मनात चेतवण्याची गरज आहे..... 

ॐ श्री गुरुदेव दत्त....

नको अवगुणी रावणाची साथ.... करूया वाईटावर सद्गुणांनी मात....

आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो…. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते…. खंडे नवमीला देव उठतात आणि मग येतो तो दसरा..... आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात येतो…..

दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे.... दसऱ्याला `दशहरा’ असे म्हणतात…. दश म्हणजे दहा व हरा म्हणजे हरल्या आहेत…. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीने दाही दिशांवर विजय मिळवलेला असल्याने दाही दिशा देवीच्या नियंत्रणात आलेल्या असतात… व शक्ती ने भारलेल्या असतात…. आसुरी शक्तीं वर दैवी शक्तींपनी मिळविलेल्या विजयाचा हा दिवस… म्हणून या दिवसाला `विजयादशमी’ असेही म्हणतात… या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करतात….

या दिवशी आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा आहे.... आपट्याची पाने हे आप आणि तेज ही तत्त्वे ग्रहण करू शकतात.... ही पाने एकमेकांना देतात... तेव्हा व्यक्तीच्या हातावरील देवतांची केंद्र असलेले बिंदु कार्यरत होतात... आणि त्या तत्त्वाचा लाभ त्या व्यक्तीला होतो.... सोने हे लहानांनी मोठ्यांना देण्याचा संकेत आहे.... हे सोने देवालाही वाहतात....

शमी व आपटा यांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व : दसर्या ला शमीची पाने घरी ठेवून आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची पद्धत आहे…. यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे….

१. दसऱ्याला रामतत्त्व व मारुतितत्त्व जास्त प्रमाणात कार्यरत असते….

२. आपल्यात क्षात्रभाव जागृत झाल्यास ही तत्त्वे ग्रहण होण्यास मदत होते….

३. शमीमध्ये तेजकण, तर आपट्यात आप व तेज कण अधिक असतात…. (पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश             ही पंचतत्त्वे आहेत….)

४. शमीकडून प्रक्षेपित होणार्याल तेजलहरी आपट्याकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपकणांच्या बळावर   प्रवाही बनवल्या जातात….

५. जेव्हा आपट्याची पाने सोने म्हणून देतात… तेव्हा तेजलहरी जिवामध्ये आपकणामुळे लगेच झिरपतात… व जिवाचा क्षात्रभाव जागृत होतो….

विजयादशमी - दसऱ्याच्या....शुभ दिनी अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा…. आंनद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची…. यश किर्ती प्राप्त करायची धनसंपदा लुटायची… आणि लुटवायची हा दिवस…. म्हणूनच मित्रानो...

                        नको अवगुणी रावणाची साथ.... करूया वाईटावर सद्गुणांनी मात....                                                               

                                         लुटुनी सुवर्णमयी विचार धन.... करू समृद्ध सुविचारी आपले मन....

विजयादशमी - दसऱ्याच्या.... आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा....

ॐ श्री गुरुदेव दत्त .....


Tuesday, 23 October 2012

पैसा प्रसिद्धी सर्वस्व अनर्थ.... तपमय यश जीवन सार्थ.... 

आजच्या एका सर्वेक्षणानुसार 2030 पर्यंत भारत हा तरुणांची सर्वाधिक संख्या असलेला जगातील एकमेव देश असेल..... म्हणजेच तरुणांच्या यशापयशावर आपल्या देशाच्या वाटचालीची मदार राहणार आहे.... त्यामुळे या युवकांच्या दृष्टिकोनातून त्यांच्यापुढील सर्वात मोठे आव्हान कुठले.... तर तरुणांना जीवनात काय हवे आहे.... 

तारुण्य म्हटले, की ऊर्जा आणि काहीतरी नवे करण्याची जिद्द या गोष्टी ओघाने आल्याच..... समाजातील विषमता आणि भेदभाव पाहून अशी ऊर्जा आणि संवेदनशीलता असणारे अनेक तरुण अस्वस्थ होतात..... आपण काहीतरी करायलाच हवे, असे त्यांना प्रकर्षाने वाटते.... पण नेमके काय करायचे.... याबाबत मात्र मुळातूनच गोंधळ असतो.... 

तुम्ही आयष्य एकदाच जगतात.... पण ते योग्य पद्धतीने जगलात.... तर एकदाच मिळालेले हे आयुष्यही पुरेसे असते..... फक्त पुरेसा पैसा आणि गरजा मोजण्यासाठी स्वतःचे योग्य माप वापरा.... दुसऱ्याच्या मापाने तुमचे आयुष्याचे गणित सोडवायाच प्रयत्न करू नका..... 

आजच्या तरुण पिढीने हे लवकरात लवकर जाणले पाहिजे..... फक्त पैसा, गाडी, बंगला अशा मोजता येणाऱ्या गोष्टी..... हे काही खऱ्या यशाचे परिमाण नसून.... दर दिवशी आपण थोडे शहाणे होत जाणे म्हणजे खरे यश.... 

संपत्ती व पैशापेक्षाही चारित्र्य महत्त्वाचे असते..... पण दुर्दैवाने आजच्या काळात चारित्र्य नसले.... तरी काही होत नाही.... पण पैसा नसला तर सर्वस्व नसते.... असा अनुचित समज रूढ होत आहे..... ज्यामुळे आपली तरुण पिढी उध्वस्त होऊ शकते.... यासाठी वेळीच सावध व्हा..... 

आपल्याकडे असे खुप आदर्श आहेत.... ज्यांनी दुर्बल परिस्थितीत स्वतःचे जीवन घडविले.... त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करा.... पैसा सर्वस्व नाही... तर तुमचा दृष्टिकोन आणि चारित्र्यच तुमचे जीवन घडवीत असते.... 

आज आपल्याकडे कुणालाच थांबायला वेळच नाही.... आज सारे कसे इन्स्टंट झटपट हवे असते..... कुणाला दहा दिवसांत एखाद्या विषयात तज्ज्ञ व्हायचे आहे..... महिन्याभरात उद्योजक म्हणून मिरवायचे असते.... सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका रात्रीत श्रीमंत व्हायचे स्वप्न असते..... बघा, हे सगळे असे झालेच तर आपण जीवनात यशस्वी झालो.... असे मानायला आपण मोकळे होतो.... आजच्या तरुण पिढीला या... सब कुछ फटाफटचा... घातक रोग फारच मोठय़ा प्रमाणावर लागण झाल्याप्रमाणे झाला आहे..... 

आता बघा..... यात सगळीच चूक आजच्या तरुण पिढीची आहे का... तर नाही.... त्यांच्या पालकांनीच लहान कोवळ्या वयातच या झटपट- इन्स्टंट शिकवणीकडे त्यांना ढकलले.... आपल्या मुलांना श्रमाची, मेहनतीची, तपाची, साधनेची शिकवण देत नाहीत.... आजकाल शाळेच्या सुटीच्या 10-15 दिवसांत झटपट संस्कार वर्गात पाठवून चांगल्या संस्कार सौंदर्याने आपले मुल खुलून निघावे..... असे वाटणार्‍या पालकांची मुले झटपट- इन्स्टंट रोगाची लागण झालेलीच असणार नाहि का.... 

खरे तर कोणत्याही यशासाठी कधीच शॉर्टकट नसतो.... हे समजून देणे हाच खरा शाश्वत संस्कार आहे..... तप करावे तसा अभ्यास करावा.... उत्तम प्रकारे परीक्षा द्यावी मगच चिरंतन यशाची प्राप्ती होते.... हे ठामपणे तरुण पिढीच्या मनावर बिंबवले पाहिजे..... पण एकमात्र आहे.... त्यासाठी पालकांची तसेच तरुण पिढीचीही..... पैसा, प्रसिद्धी म्हणजेच यश, सर्वस्व असते.... या अपूर्ण विचारातून बाहेर पडायची तयारी हवी.... 

बघा, आयुष्यात पैसा महत्त्वाचा आहेच.... पण पैसा सर्वस्व कधीच नाही.... प्रसिद्धीचा आनंद हा असतोच.... पण तेवढय़ानेच कुणी “ यशवंत “ होत नाही हेही तितकच खरे..... इथे आपल्याला समर्थ रामदासांचे अनमोल विचार फार तारून जातात..... समर्थांनी ‘सार’ निवडण्याचा फार मोलाचा सल्ला दिला आहे…. ‘सार’ म्हणजेच खरे यश…… ‘असार’ म्हणजे यशाचा भास होय..... 

                                 जाणल्याने ऐसे न करावे । सार तेचि शोधून घ्यावे । 
                                                           असार ते जाणोनि त्यागावे । वमन जैसे ।। 

बघा, यात यशप्राप्तीची मार्गदिशा अगदी स्पष्ट होते.... आपले आयुष्य यशस्वी बनवणे तसे सोपे नाही.... अविरत कष्ट, मेहनतीचे मोठे तप करूनच आपल्याला यशस्वी होता येते.... पण हे ‘तप’ म्हणजे तरी काय....? रोजच्या जगण्यातले कष्टमय मेहनतीने वागणेही कठीण तपच आहे..... एकवेळ सारे सोडून जंगलात जाऊन राहाणे सोपे आहे.... पण अशी प्रत्येक पावलावरची तपश्चर्या भारी अवघड आहे..... 

सर्मथ अशाच तपाची अपेक्षा व्यक्त करतात.... त्यांनी सांगितलेली चार सूत्रे अंगीकारली.... तर पैसा-प्रसिद्धी मिळेलच.... पण खर्‍या यशाचा मुकुट आपण शिरी धारण करू शकतो.... आज धीर सुटत चाललेल्या तरुण पिढीने या चतुसुत्रीचा नक्कीच शांतपणे विचार करायला हवा असे वाटते..... यशासाठी धीर धरायची तयारी ठेवावीच लागेल..... प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल.... त्याला पर्याय नाहीच.... पण एकदा का चांगले यश मिळाले.... की मग मागे वळून बघावेच लागणार नाही..... यशपथावर सतत पुढे पुढेच जाता येईल.... सर्मथांनी सांगितलेली खालील चार सूत्रे तरुण पिढीने आत्मसात करणे गरजेचे.... 

सूत्र पहिले 

                                जाणावे पराचे अंतर । उदासीनता निरंतर । 
                                                     नीतिन्यायासी अंतर । पडोचि नेदावे ।। 

आपल्याला इतरांचे मन नीट समजून घेता आले पाहिजे.... हे करताना जराही स्वार्थाचा विचार असता कामा नये..... इतरांशी वागताना नीती आणि न्याय याचा विसर पडू देऊ नये..... हे जमले तर आपल्यासोबतच अनेकजण उभे राहतात.... त्यांच्या सकारात्मकतेची शक्ती आपल्याला लाभते..... 

सूत्र दुसरे 

                                                 फड नासोचि नेदावा । 
                                                                 पडिला प्रसंग सावरावा ।। 

कोणत्याही चर्चेत... संवादात हे पथ्य पाळले की यश मिळते.... वादावादीचे, मतभेदाचे, विवादाचे प्रसंग येणारच.... अशा प्रसंगात ‘तेल’ ओतण्यापेक्षा आपल्या कुशलतेने तो प्रसंग आपल्याला सावरता आला पाहिजे..... इथे ‘फड’ म्हणजेच Team होय..... चांगली टीम जर का तुटली तर काय उपयोग.... हा फड सांभाळणे ‘ग्रुप डिस्कशन’साठी आवश्यक असते.... प्रत्येकाचा अहंकार manage करून कुशलतेने कमी करणे महत्वाचे.... 

सूत्र तिसरे 

                               दु:ख दुस-याचे जाणावे । ऐकून तरी वाटून घ्यावे । 
                                                                   बरे वाईट सोसावे । समुदायाचे ।। 

आपल्याला यशस्वी होण्यासाठी इतरांचे प्रश्न.... समस्या, अडचणी समजून घेता आल्या पाहिजेत.... प्रेमाने दुसर्‍याचे दु:ख जाणल्याने... त्यांचे बरे-वाईट सोसल्याने सार्‍यांची सद्भावना आपल्या पाठी उभी ठाकते.... सद्भावना म्हणजेच सदिच्छा.... चांगले आशीर्वाद.... यशासाठी त्याची खूप गरज असतेच..... 

सूत्र चौथे..... 

                                                       तऱ्हे भरोंच नये । 
                                                                     सुचावे नाना उपाये।। 

बघा, ज्याला यशस्वी व्हायचे आहे.... त्याने तर्‍हेवाईकपणा, स्वकल्लीपणा करता कामा नये.... म्हणजे आज मूड नाही... असे नको.... Multi Dimensional Approach ठेवावा..... कोणत्याही प्रसंगाला दोनच पर्याय नसतात.... There is always third Alternative..... तो शोधावा आणि सर्वात महत्त्वाचे ‘दीर्घ यत्ने’ करावे..... सोपे काम करण्यापेक्षा, प्रयत्नपूर्वक कठीण कार्य केल्यानेच खरे यश मिळते... हे विसरू नये.... Think Out of the Box Ideas if possibble.... 

बघा, अशी हि सर्मथप्रणीत ही चार सूत्रे आचरून मिळालेले यश शाश्वत यशच असेल..... तर शेवटी हेच जाणणे महत्वाचे.... यशाला कधीच ‘शॉर्टकट’ नसतोच नसतो.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त .....
विनम्रते यशवंत सर्वगुणे.... साकार स्वप्न पूर्णपणे..... 

आजकालच्या तरुणांना, सत्ताधा-यांना, श्रीमंताना तर नम्रता अगदीच नकोशी झाली आहे... मुख्यत्वे आज तरुण पिढी उन्मादी उद्धट होताना दिसते.... त्यांच्या बोलण्यातली मग्रुरी, मस्ती प्रत्येक वाक्यात जाणवते.... याला attitude असे गोंडस नामकरण सुद्धा झाले आहे..... 

मित्रांनो, विनयशीलता म्हणजे अहंकारावर नियंत्रण.... विनय म्हणजे लाचारी नाही…. विनय म्हणजे ओतप्रोत भरलेपण…. संपन्नता ज्ञानाची – विद्धवत्तेची असो…. धनाची असो वा सत्तेची असो…. ती विनयातून अधिक नेमकी लक्षात येते…. पण आजकाल याचा विसर पडत चालला आहे…. आणि पालकही याला मुलांचे.... वाक् चातुर्य, स्पष्टवक्तेपण, good attitude, बोलण्याची हुशारी, बिनधास्तपणा अशी गोंडस नावे देऊन त्यांचे या गुणाबद्दल कौतुकच करताना दिसतात.... यामुळे मुलांना त्यांच्या दोषांची जाणीव होत नाही.... उलट आपण वागतो ते योग्य.... असे वाटून अश्या वागण्याला प्रोत्साहन मिळाल्यासारखेच होते.... पण याचे परिणाम त्यांना उर्वरित पूर्ण आयुष्यात भोगावे लागतात.... यामुळे वेळीच सावध झालेले चांगले..... 

आजकाल, अनेकांना हे विनयाचे तंत्र दुबळेपणाचे वाटते…. मोडेन पण वाकणार नाही.... असे म्हणण्यात त्यांना भूषण वाटते…. मर्दुमकी म्हणजे उद्धटपणा असेच काहीसे सूत्र त्यांच्या डोक्यात असते…. इथे संत तुकारामांचा एक अभंग सांगतो..... महापुरे झाडे जाती । तेथे लव्हाळे वाचती ।। बघा, या सूत्राने संत तुकारामांनी दुबळेपणा, लाचारीला थारा दिलेला नाही..... उलट “ काल जयी “ होण्याचा मंत्रच दिला आहे.... 

आता याचा अर्थ काय तर.... बघा, महापूर आला की मोठे वृक्ष उन्मळून पडतात…. पण लहान ‘लव्हाळे’ मात्र वाचतात…. का तर महापुराचा माराच असा असतो…. की भक्कम पाय रोवून उभी असलेली झाडे मुळापासून उखडली जातात…. पण “लव्हाळे” मात्र पुराचा तडाखा विनम्रतेने स्वीकारतात.... स्वत:ला वाचवतात…. मोठे होतात.... विनम्रता हा मोठेपणाला पूरक गुण आहे…. सामर्थ्य जेवढे अधिक, विनय तेवढा अधिक असतो.... सामर्थ्य हवेच.... पण विनयामुळेच ते शोभून दिसते.... 

माणूस जसा जसा विचारांनी प्रगल्भ होतो.... तसा त्याचा विनय वाढतो…. प्रख्यात चिनी तत्त्ववेत्ता कन्फ्युशिअसचे एक वाक्य खूप नेमकेपणाने विनयाचे महत्त्व सांगते..... Humility is the solid foundation of all the virtues.... म्हणजेच आपल्या साऱ्या मूल्यांचा भक्कम पाया आहे आपला विनय..... बघा ना, आपला सारा मोठेपणा विनयाशिवाय वांझोटा होऊन जातो.... 

इथे एक उदाहरण देतो.... बघा संत कबीर असे म्हणतात.... 

                                     बड़ा हुआ तो क्या हुआ.... जैसे पेड़ खजूर.... 
                                                         पंथी को छाया नहीं... फल लागे अति दूर.... 

म्हणजेच ताड-खजुरांच्या झाडांना फळे लागत असतातच.... पण त्या फळांचा लाभ सहजा-सहजी भुकेल्या वाटसरूला होऊ शकत नाही.... फळेतर दूरच... त्याची सावली देखील मिळत नाही.... मग सांगा.... इतरांना ऐनवेळी कसलाच लाभ नसलेल्या मोठेपणाला काय अर्थ आहे का ?.... याउलट आंब्याचे झाड फळांनी डवरते.... आणि सहजतेने आपली फळे सर्वांना देते.... अगदी दगड मारणा-यालाही फळाचाच लाभ होतो.... सावलीचा लाभ तर बारा महिने देते.... म्हणूनच म्हणतो.... ‘बड़ा हुआ तो क्या हुआ... जैसे पेड़ खजूर.... पंथी को छाया नहीं.... फल लागे अति दूर।’ हे आपल्याला एकदा का समजले की विनयाचे महत्त्व पटते..... 

आज एकंदर परिस्थिती पाहता जीवनशैलीत खुपच फरक आलाय.... आजच्या पिढीला अनुकरण करायला आवडते.... गर्दीतल्या सगळ्यांसारखे वाहायला आवडते.... माध्यमाच्या टीव्ही चैनेलासाराख्या माध्यमाच्या रिच मुळे असेल... पण नकळत आपण सगळी एका मास हिप्नोटीक स्पेल मध्ये वावरतोय.... उदाहरण क्रिकेटचे घ्या... जे दाखवले जाते ते पाहतो.... दुस-याच्या नजरेने पाहतो.... आणि प्रतिसाद त्यांना आपेक्षित आहे असाच देतो..... 

"ये ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट है बॉस,..... ना तमीजसे खेला जाता है... ना तमीज से देखा जाता है..... याला आजची पिढी Attitude बोलते... ते तिला आवडते.... त्याचे अनुकरण होते..... मग विनयशीलता, नम्रता राहते बाजूला.... आता वास्तविक तथाकथित जंटल मन गेमला म्हणजेच क्रिकेटला त्यांनी.... म्हणजेच केवळ ध्यानाकर्षण ध्येय असलेल्यांनी कधी बदलून कधी टाकले..... निदान पाहणा-याला तरी समजले नाही..... मग आता लक्षवेधक कामगिरी आता केवळ द्रविडची न होता..... श्रीसंतने मथ्यू हेडनला कशी खुन्नस दिली ते वारंवार बघितली जाते..... यावर हिरीरीने चर्चा होतात...... छात्या फुगतात..... त्याचे अनुकरण केले जाते... माझ्यामते करायचे तर तेंडूलकरचे अनुकरण करा.... विनम्रतेने खुनन्स कशी देतात ते शिका.... 

म्हणूनच म्हणतो, या मास हिप्नोटीक गर्दीत वाहू नका.... स्वत:च्या जागृतीने जगा..... आपण गर्दीतलेच एक असतो तेव्हा असेच होते.... एकाने दगड उचलला कि लगेच अनेक जन सरसावतात.... जसे चुकून एकाने सिग्नल मोडला... कि बाकीच्यांचे तंत्र सुटतेच... सिग्नलची शहानिशा न करता आपण त्यांच्या मागे जातोच.... यासाठीच स्वत:च्या जागृतीने जगायचे.... तुम्ही ठरवाल तसेच होणार हे मात्र नक्की.... 

मित्रांनो, तारुण्यात जोश नक्कीच हवाच असतो..... पण तो जोश... तो जोम परीक्षेत गुणसंपदा मिळवताना हवा.... ते ज्ञानाचे, विद्वत्तेचे ऐश्वर्य मिळाले.... की यश हे लाभतेच.... मग विनम्र होता येणे हेही महत्त्वाचे असते.... असे संतुलित व्यक्तित्व विनम्रतेच्या प्राप्तीने निर्माण होते.... म्हणून वेळीच सावध होऊन विनयाला दुर्बलतेशी जोडून आपण जीवनाचा पाया खिळखिळा करून टाकू नका.... 

आता इथे पालकांचेहि कर्तव्य आहे.... आपल्या मुलांवर योग्य संस्कार करणे.... जर योग्य संस्कार झाले तर त्यांच्याच मुलाचे भवितव्य व पर्यायाने समाजचे, देशाचे भवितव्य उज्वल होईल.... बघा, लहानपणी मनावर झालेले संस्कार इतके खोलवर रुजलेले असतात.... की ते त्या माणसाच्या व्यक्तीमत्वाचा भाग बनून जन्मभर त्याच्या सोबत राहतात… ते पुसायचे असल्यास त्यासाठी त्याला नंतर खूप प्रयत्न करावे लागतात... 

चांगल्या संस्कारांनी..... सहनशक्ती, संयम, चिकाटी, अंगमेहनत, कष्ट यासारखे गुण वाढीला लागतात.,,, स्वच्छता आणि नियमित व्यायाम व आहार यामुळे आरोग्य चांगले राहते.... दुस-या व्यक्तीचा अपमान करू नये.... असे वागणे, बोलणे अयोग्य.... असे संस्कार बालपणीच झाले.... तर असंगाशी संग होत नाही.... पुढे आपसात संघर्ष होत नाहीत.... समाज सुसंघटित आणि बलवान होण्यास मदत होत जाते.... विनयशीलता बाळगल्यामुळेही चांगले संबंध राहतात.... तसेच आत्मवंचना होत नाही.... अशा अनेक प्रकारे संस्कारांचा लाभ व्यक्ती आणि समाजाला मिळतो.... 

आपल्यातील अहंकाराला खतपाणी न घालता.... आपल्याला पुष्कळच प्रगती करायची आहे..... याची मनाशी खूणगाठ बांधून विनम्रता हा गुण अंगी बाणवायचा.... माझ्यापेक्षा हुशार बोलण्यात वागण्यात कोणी दिसतच नाही.... असे वाटायला लागणे हाच तर.... सर्वात मोठा धोका आहे..... तसे होऊ नये म्हणून विनम्रता अंगी बाणवा.... असे केले नाही तर.... समर्थांनी सांगितलेच आहे..... 

                                      मना सांग पा रावणा काय जाले। 
                                                              अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले ।। 

शेवटी काय तर, कोणतेही कार्य, कृती करताना.... दुस-यांचा विचार करणे... अशा काही मूलभूत गोष्टी अंगी बाणवणे.... हे माझ्या मते एकाद्या माणसाला सुसंस्कृत विनम्र होण्यासाठी पुरेशा असाव्यात.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त .....


*नवरात्र चिंतन*

एकनाथ महाराजांनी पांडुरंगाला देवीच्या स्वरुपात आणुन भक्तीची शिकवण जोगव्याच्या रुपाने आणुन भक्तीची शिकवण जोगव्याच्या रुपाने आपणास दिली आहे.
  अनादी निर्गुण प्रगटली भवानी
   मोह महिषा सुरमर्दाना लागोनी
    त्रिविध तापाची करावया झाडणी
    भक्ता लागोनी पावसी निर्वाणी
 आईचा जोगवा जोगवा मागेन
जिला आदी अंत नाही. जिला गुण व आकार नाही अशी ही जगदंबा मोहरुपी महिषासुर मारण्याकरिता प्रगट सगुण रुपात आली आहे. तिला आपण मोहाची मागणी करीत आहेत. मोहाने सर्वनाश होतो हे माहीत असुनही आपणास मोह सुटत नाही मोहमाया हीच एकनिष्ठ भक्तीशिवाय तिला दया येणार नाही. सर्वस्व तिला अर्पण करुन तिचे होउन रहावे म्हणजेच मोहाचा व त्रिविध तापांचा नाश होईल.
   आईचा जोगवा जोगवा मागेन
   द्वैत सारोनी माळ मी घालीन
   हाती बोधाचा झेंडा मी धरीन
  भेदरहित वारिसी जाईल
  आईचा जोगवा जोगवा मागेन
या कडव्यात द्वैतांचा विचार नाथांनी आपल्यापुढे मांडला आहे. कुठल्याही भक्तीत द्वैत नको. सर्व भक्ती एकरुप आहे. त्यात द्वेष मत्सर नको. अशी अद्वैत भक्तीची माळ हृदयात घालुन बोधरुपी झेंडा हातात घेउन तुझ्या वारीस येईल. तुझा अभिमान गलीत जोगवा मागेन. जोगवा याचा अर्थच असा की जे आहे ते तुझेच आहे. आपण सगळे माझे म्हणत एक दिवस सगळे सोडुन काळाच्या हातात जातो. मी आणि माझे पणा उडवण्य़ासाठी.
   आईचा जोगवा जोगवा मागेन
   नवविधा भक्तीच्या करोनी नवरात्रा
   करोनि निराकारण पोटी मागेन ज्ञानपुत्रा
  दंभसासरा मांडीन कुपात्रा
   करीन आंतरी सद्‌भावे मुद्रा
भक्ती नवविधा आहे. श्रवण कीर्तन विष्णोस्मरण अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन ह्याच नवविधा भक्तीचे नवरात्र उपोषण करील तेणे करुन ज्ञानरुपी पुत्राची मागणी करील. दंभ म्हणजे अहंकार सासरा सोडील. तो कुपात्र आहे. तुझ्या भक्तीत विघ्न करणारा आहे. आंतरात भावनेनं तुझ्या मुद्रा करील. त्या मुद्रा म्हणजे भुचरी खेचरी चाचरी आगोचरी ह्या चार मुद्रा योगशास्त्रात आहेत आलक्ष मुद्रा पाचवी तुझे निरंतर स्वरुप आंतरात न्याहळील नवविधा भक्ती मी करीन म्हणजे ज्ञानपुत्र जन्मेल. अशापैकी ज्ञानपुत्राचा जन्म झाला की ज्ञानाच्या साठ्याला अहंकार शिवु देणार नाही. अज्ञानी माणसापेक्षा ज्ञानी साधकाला अहंकाराची फार भिती आहे अशा तयारीने.
   आईचा जोगवा जोगवा मागेन
   पुर्ण बोधाची भरीन मी परडी
   आशा मनशांच्या पाडीन दरडी
    मन विकार करीन कुरवंडी
   अमृत रसाची भरीन मी दुरडी
   आईचा जोगवा जोगवा मागेन
अशा रितीने ज्ञान रुप बोधाची परडी भरेन. आशामनशा इच्छा तृष्णा यांना या देहरुप घरातुन घालवुन देईन. मनात उठणारे विकल्प विकार यांना सोडुन एकाग्रता निर्माण करुन अमृतरुपी अद्‌भुत रसाची दुरडी भरुन तुझ्या सगुण स्वरुपाकडे धाव घेईन. आणि तुझा जोगवा मागेन.
   आईचा जोगवा जोगवा मागेन
    आता साजनी झाले मी निसंग
    विकल्प नवऱ्याचा सोडियला संग
    काम क्रोध हे झोडियेले मांग
   केला मोकळा मार्ग सुरंग
  आईचा जोगवा जोगवा मागेन
एकनाथ्म महाराज आपले उपास्य दैवत पांडुरंग राजा देवी समजुन म्हणतात की मी ह्या षड्‌रिपुंचा संग सोडला आहे. विकल्परुपी नवऱ्याचा संग सोडला आहे. मातंगरुपी कामक्रोधाला तर झाडुन मोकळे केले आहे. भक्तीचा मार्ग मोकळा केला आहे. सर्व संग त्याग करुन तुझ्या भक्तीरुप जोगवा मागण्यास तयार झाले आहे. विकल्पाने मानवाला भोवऱ्यात टाकले आहे व कामक्रोधाने तर भक्तीभावनेवर मात केली आहे. एवढ्यासाठी नामचिंतन करावे.
     आईचा जोगवा जोगवा मागेन
     ऐसा जोगवा मागोनी ठेवीला
   जाउनी महाद्वारी नवस मी फेडिला
  एका जनार्दनी एकपणे देखिला
  जन्ममरणाचा फेरा मी चुकविला
आईचा जोगवा जोगवा मागेन
असा भक्तीचा जोगवा सर्व साहित्यानिशी मागुन ठेवला. तुझ्या दारात नवस फेडुन मोकळा झालो. झाले जनार्दन कृपेने एक रुपात मी तुला पाहिले. तुझ्याशिवाय माझ्या नेत्राला दुसरे काही दिसत नाही. तुझ्या भक्तीत आनंद आहे. तो कुठेही सापडणार नाही. बाकीचे आनंद क्षुद्र आहेत. भक्तांनी नेहमी आनंदी रहावे. सुखशांतीचा लाभ घ्यावा म्हणजे समाधान लाभेल. .! जय मातादी..🙏

दुर्गे दुर्घट भारी....


सद्गुरु तुझे भाव रूप । देवी जैसें का स्वरूप । तैसें गीतातत्व अरूप । नित्यनूतन दाविसी ॥


हा ज्ञान वेदार्थसागरू । तो स्वयें सर्वेश्वरू । गुरु शंकरानंद कल्पतरू । प्रत्यक्ष बोधीतसे ॥


सद्गुरु चरणांना वंदन करून देवीची आरती यावर सद्गुरुंनी बोधलेले चिंतनात्मक विचार आणि इतर काही संदर्भ घेऊन चिंतन आपण संपादित करू या..


नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव आणि त्यां अनुषंगाने होणाऱ्या देवीच्या आरत्या.. आरती म्हणताना आपल्याला ती किती समजली आहे आणि का करत आहोत यावर चिंतनात्मक अभ्यास.. गणेश विसर्जन झालं की पितृपक्ष येतो.. तो संपला की लगेच प्रतिपदेला घटस्थापना होते नि आपण देवीची उपासना सुरु करतो..  देवीच्या उपासनेची सुरुवात कधी झाली, का झाली, कशी झाली ह्याबाबत थोडक्यात माहिती किंवा इतिहास असा.. पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणं महिषासुर नावाचा राक्षस प्रचंड मातला होता नि त्यानं सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली.. तेव्हा देवी नऊ दिवस अनुष्ठानाला बसली नि विजयादशमी दिवशी ह्या महिषासुराचा वध केला.. आता इथे जास्त प्रस्तावना न करता ह्या दुर्गोत्सवाच्या निमित्तानं मागे गणपती आरतीचा आपण विचार केला तसाच देवीच्या आरतीचा विचार करण्याचा प्रयत्न करुया.. सुखकर्ता दु:खहर्ता चिंतनात म्हटल्याप्रमाणंच आरती अंतःकरणपूर्वक, एकाग्र होऊन, आर्ततेनं आळवली जावी..


आज देवीच्या आरतीचा थोडक्यात अभ्यास करुया..


दुर्गे दुर्घट भारी तुज विण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी |


वारि वारि जन्ममरणाते वारि, हारि पडलो आता संकट निवारी ||१||


जयदेवी जयदेवी महिषा सुरमर्दिनी, सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी जयदेवी || धृ||


त्रिभुवनभुवनी पाहता तुज ऐसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही |


साहि विवाद करिता पडिले प्रवाही, ते तू भक्तालागि पावसी लवलाही ||२||     जयदेवी जयदेवी ......


प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा, क्लेषापासुनि सोडी, तोडी भवपाशा |


अंबे तुजवाचोनि कोण पुरविल आशा, नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा ||३||    जयदेवी जयदेवी ......


देवीची आरती कुणी रचली ह्याबाबत थोडा प्रवाद आहे.. नरहरी हे नाव आरतीत येतं.. नरहरी सोनार खरंतर शिवाचे भक्त.. विठठलाच्या कमरेचा हार बनवण्याचं निमित्त होऊन दोन दैवतामधलं अद्वैत उमजलं.. अशी कथा आपल्याला परिचित आहे.. कदाचित अशी अनुभूति आल्यानंतर त्यांना आरती स्फुरली असावी.. कुणी म्हणतं रामदासस्वामींनी रचलेली आरती आहे.. रचनाकार कुणीही असला तरी मुळातच दोघेही अत्यंत श्रेष्ठ प्रतीचे भक्त व तत्त्वज्ञ असल्यानं आपण उगाचच त्याबाबत जास्त विचार न करता आपला अभ्यास करुया..


आरती कोणी रचली ह्याबाबत विवाद न करता आरती शक्तीरूपी  दुर्गा देवीची आहे हे मात्र ढोबळपणे नक्की समजून येतं.. मात्र ह्याबाबत आपण थोडा सूक्ष्म विचार करण्याची गरज आहे.. म्हणजे नेमकी आरती कुणाची केली आहे..?


दहा दिवस उत्सव मंडळात येणार्‍या आठभुजा असलेल्या, देखण्या, प्रमाणबद्ध मूर्तीची.. विविध शक्तीपीठ आणि देवळात असलेल्या सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेल्या मूर्तीची की आणखी कशाची..?.. कधीकधी शब्द थोडे पुढंमागं करुन बघितले की आपल्याला नेमकं विषयाचा गाभा काय ते कळतं.. 'जयदेवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी' असं म्हटलेलं आढळतं..


इथं एक संबधार्थक विशेषण दिसतं.. सुरवरईश्वरवरदा.. सुरवरांनाच  म्हणजे देवतांनाच नाहीतर ईश्वरालाही वर देणारी, शक्ती प्रदान करणारी अशी जी कुणी ती ही शक्ती आहे.. तिची ही आरती आहे..


पण असं काही असतं का..?.. थोडं मागं जाऊ.. कुठंच काहीच्च नव्हतं तेव्हा..! कधीतरी काहीतरी हालचाल झाली नि सृष्टी निर्माण झाली.. चराचराची व्यवस्था अत्यंत पारदर्शकपणं चालवली जाणारी व्यवस्था म्हणजे ईश्वरी परमतत्व.. तत्वरूपी तो सृष्टीबरोबर उत्पन्न होतो नि तिच्याबरोबरच लय देखील पावतो..


मानवी आयुष्याच्या तुलनेत अत्यंत प्रचंड मोठ्या scale वर हे सगळं सुरु असतं.. त्यामुळं मानवी मनाला त्याचा विचार तेवढ्या मोठ्या पातळीवर करताना तसाच व्यापक पण सूक्ष्म विचार करावा लागतो.. अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये काहीच नाही म्हणताना देखील, त्या नाहीमध्ये असणारं अस्तित्व (काहीच नाही म्हणजे निर्वात पोकळी-vacuum of space तरी 'आहे' ना..?)


त्रिभुवन- पृथ्वी, अवकाश आणि स्वर्ग ही तिन्ही जगे, (भुवन-लोक).. म्हणजे ब्रह्म तत्त्व नि त्या खालोखाल वर म्हटलेली हालचाल ती मूळमाया (स्त्रोत).. तिच्यातून उत्पन्न गुणमाया मग जडमाया नंतर त्रिविधा प्रकृती, पंचमहाभूते असा क्रम आहे.. खरंच थोडा विचार केला तर विज्ञानाला समांतर असा हा विचार आहे..


या अनंत कोटी ब्रह्माण्डची निर्मिती, संचलन, संहार व पुन्हा निर्मिती हे ज्या मुळे होते, तिला आपण देवी किंवा मुळ प्रकृती म्हणतो.. ज्या शक्तीमुळे ईश्वराला कार्य करण्याचं बळ मिळतं, त्या त्या अनुरुप कार्य करणार्‍या देवतांना (कार्यानुसार नाव ब्रह्मा, विष्णू, महेश नि इतर) ताकद मिळते (उत्पत्ती- निर्माण करणं, स्थिती- सांभाळणं नि लय- संहार करणं).. त्या सगळ्याचा विचार आपल्याला एका 'सुरवरईश्वरवरदा' ह्या शब्दातून करता येतो..


तिला आपण मानवानंच, देवीरूप, माऊलीरुप, मातारुप मानून तिची पूजा करता यावी, म्हणून सगुणात आणली.. इतकं सगळं कार्य दोन हातातून करता येणं शक्य थोडीच आहे.. असा विचार करुन तिला अष्टभुजा बनवली नि तिच्या प्रत्येक हातात एक एक वस्तू दिली.. पाकिटात असलेला कागदाचा फोटो जसा आपल्या गुरूंची आठवण करुन देतो.. तसंच ही मूर्ती भगवद्शक्तीची आठवण करुन देणारी असली पाहिजे..


आणखी एक शब्द आहे महिषासुरमर्दिनी.. वर म्हटल्याप्रमाणं पुराणात कधीतरी एक महिषासुर नावाचा राक्षस सगळ्यांना त्रास देत होता नि त्याला देवीनं मारलं.. अस आहे का..? आपण देवीचा जयजयकार म्हणून गप्प बसावं का.? की ह्या महिषासुराचा नि माझा काही संबंध आहे का..?  


आपण ह्याचा असा विचार करू.. महिष म्हणजे रेडा.. रेडा हे घोर अज्ञानाचं प्रतिक आहे.. अज्ञान म्हणजे अशिक्षितपण, अक्षरओळख नसणे.. शालेय अभ्यास नसणं ह्या अर्थानं अज्ञान नाही..  तर मी कोण..?.. माझं जन्माचं प्रयोजन काय..?.. ध्येय काय..? ते समजण्यासाठी काय करावं लागतं..? ह्या सगळ्याबद्दलची जाणीव नसणे म्हणजे अज्ञान..


इथं आपण त्रागा करु शकण्याची दाट शक्यता आहे.. मात्र ही वस्तुस्थिती आहे.. जगण्याची उद्दिष्टं अनेक असू शकतात, ती वेळेनुसार, कालानुरुप बदलू शकतात, बदलावीत.. मात्र ध्येय एकच असावं ते म्हणजे आत्मशोध.. मी नक्की कोण आहे नि काय मिळवायचंय ह्याचा विचार करुन त्याचा पाठपुरावा करणं हे साधकाच्या आयुष्याचं ध्येय आहे..


तर अशा ह्या अज्ञानरुपी रेड्याला मारुन, साधक अंतरी स्थित शक्तिरूप दुर्गामातेला प्रसन्न करू शकतो.. त्या दृष्टीनं 'महिषासुरमर्दिनी' ह्या नावाचा विचार करण्याची गरज आहे..


वरच्या शब्दांचा पुरेपूर अर्थ समजला की पुढची आरती समजायला मदत होते.. देवीला दुर्गा म्हणताना ह्या प्रपंचाला, संसाराला दुर्घट असं म्हटलेलं आहे.. दुर्ग म्हणजे किल्ला नि दुर्गा म्हणजे त्याची किल्लेदार अशा अर्थानंही एक विचार होऊ शकतो.. ज्याप्रमाणं एखाद्या कारागृहाचा प्रमुख असतो तशी जणू ही दुर्गा आहे नि हा जो संसार रगाडा आहे तो म्हणजे कारागृह आहे.. यातून बाहेर पडायचं तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे किल्लेदारालाच पटवणे, त्याच्या मर्जीतलं बनणे.. म्ह्णून म्हणतात, दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी.. तुझ्या कृपेशिवाय हा संसाराचा भार खूप अवघड आहे..


अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी.. इथं पुन्हा थांबायची गरज आहे.. काय आहेत हे शब्द..? अनाथनाथ अंबा म्हणजे कुणी अनाथाश्रम उघडलेली NGO नाही..! खरंतर, कोण अनाथ आहे..? करुणा म्हणजे काय..? विस्तारी म्हणजे..? आहे का मुळात करुणा..? विस्तारी म्हणजे विस्तार कर, वाढव म्हणजे काय..?


इथं थोडा पारमार्थिक विचार आहे.. 'तुझिया वियोगे जीवित्व आले' असं समर्थ रामदास म्हणतात.. अत्यंत आनंदाचा, सुखाचा अनुभव हेच ज्याचं स्वरुप आहे असा 'मी', मूळस्वरुपाला विसरलो नि जीवभाव घेऊन जन्म पावलो.. एखाद्या अत्यंत श्रीमंत, यशस्वी माणसाचा मुलगा अपघातात स्मृती घालवून बसल्यानं भीक मागू लागतो, तसा मी खरा आतमध्ये आनंदरुपच असताना.. सुखासाठी बाहेरच्या सुखांच्या मागं लागतो नि 'अनाथ' बनतो..


बघा, धोनी-सचिन रिटायर झाले.. क्रिकेट तेच, खेळ तोच, नियम तेच पण आता काहींना आनंद वाटेना.. म्हणजे सुख खेळात आहे की बघण्यात..?  मी रानावनात अडकून बसलोय, मला प्रचंड भूक लागलीये नि समोर खूप सुंदर हिरे आणि सोने दिसतेय.. सुख वाटेल..?  तीच गोष्ट दुसरीकडून.. एका अत्यंत गरीब नि ओबड्धोबड दिसणार्‍या झोपडीत मला शिळी भाकरी नि चटणी मिळाली तर मला ती अत्यंत चांगली वाटेल..


सुख नक्की कुठं आहे नि ते कसं मिळेल हे न समजल्यानं मी अनाथ, पोरका, दीनवाणा झालो आहे..!! अशा अनाथांची नाथ अशी ही अंबा आपली करुणा विस्तारुन मला पदरात घेऊ दे.. इथे करुणा उत्पन्न करुन का नाही म्हटले आहें..? कारण देवीची करुणा आधीपासूनच आहे हे आपल्या लक्षात येत नाहीये..


'एकोऽहम बहुस्याम' - एका बीजापोटी उत्पन्न होणारी अनेक कणसं माणसाच्या आवाक्यातलं काम नाही आहे ना..? हीच ती करुणा.. माते, तुझी करुणा पसरव.. (माते अंबा, आज मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु मी जिथे आहे तिथे, तू तुझी करुणा वाढवू शकतेस.. आमचे अज्ञान दूर करू शकतेस)  ह्या 'एकोऽहम बहुस्याम' च्या प्रक्रियेमागं नक्की काय दडलंय हे रुक्षपणे जाणून घेण्यातून साध्य काय होणार आहे..? त्यापेक्षा त्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली तर आपला अहंकार काही प्रमाणात कमी होत जातो..


पुढं जाऊन 'वारि वारि जन्ममरणाते वारि, हारि पडलो आता संकट निवारी' असं म्हणतात.. पुन्हा तेच आहे.. वारि वारि म्हणजे हे माते तू ह्याचं निवारण कर.. हारि पडलोय- कंटाळलोय.. या संकटाचं निवारण कर..


जन्माला आल्यापासून आपण काय किंमत देऊन काय कमावतो.. ह्याचा विचार करता 'सुख कमी नि दु:ख जास्त' असाच विचार पक्का होतो.. मिळणार्‍या सुखामागे देखील किती कष्ट असतात ह्याचा विचार करता हे कधीतरी संपावं हा 'वास्तववादी' विचार डोकावल्यावाचून राहत नाही..


त्यामुळंच ह्या जन्ममरणाच्या फेर्‍यातून सोडव ही विनंती करावी लागते.. मात्र जेव्हा विनंतीच्या मागे; काय विनंती, कुठं करायची, नि कशी करायची हा नेमका विचार असेल, तेव्हा त्या विनंतीचा निश्चितच पाठपुरावा होतो नि जे मिळवायचं ते मिळवलं जातं.. गणपतीच्या आरतीत म्हटल्याप्रमाणं अशी परमतत्वाची, शक्तीच्या निश्चित रुपाची मांडणी समोर आली की माणूस निर्भय बनतो नि त्याला संकट हे संकट ह्या स्वरुपात न वाटल्यानं ते आपोआप निवारलं जातं.. दृष्टीकोनच बदलून जातो..


पुढच्या कडव्यांमध्ये बरीचशी वस्तुस्थिती, थोडासा अर्थवाद नि स्तुती आहे.. 'त्रिभुवनी पाहता तुज ऐसी नाही, चारी (वेद) श्रमले परंतु (त्यांना तुझ्याबद्दल) न बोलवे काही, साही (शास्त्रं) साही- सहा (वेद, वेदांत, सांख्य, योग, न्याय आणि मीमांसा या सहा तत्त्वज्ञानाचे अनुयायी), विचार करुन करुन (जणू प्रवाह) पतित झाले, (अशी) ते तू भक्तालागि पावसी लवलाही..


आज देखील 'विज्ञान' (तंत्रज्ञान नव्हे) सृष्टीच्या उत्पत्तीचा, त्या मूळ शक्तीचा मूलगामी विचार करत आहे.. पण थांगपत्ता लागायला अजूनही तयार नाही.. त्याच अनुषंगानं चारी वेद, साही शास्त्रे तुझ्या स्वरूपाचे-शक्तीचे वर्णन करु शकत नाहीत असं मानलं गेलं आहे.. मात्र अशी तू भक्तासाठी मात्र तातडीनं धावून येतेस.. इथे अट 'भक्त' असण्याची आहे..!


प्रसन्न वदन.. अशा हे देवी तू आम्हाला प्रसन्न हो.. संसारक्लेषापासून सोडवून, भवपाश तोड.. इथं परत थांबावं लागतं.. इथे त्रागा करुन सोडव म्हणणं आहे की मोकळं कर..?  भवपाश तोड म्हणजे एखादा दोर कुऱ्हाडीने तोडल्यासारखं तोड, असं आहे का..?   नाही, तर ह्या भवपाशाचं स्वरुप जेव्हा समजेल, तेव्हा त्याचक्षणी गळून पडणारा अशा स्वरुपाचा अर्थ आहे..


समजायला थोडं अवघड वाटतं मात्र उदाहरणानं समजेल.. एखाद्या बैलाला अथवा गाढवाला लहानपणापासून एखाद्या खुंटीला दोरीनं बांधलं तर तो सुटून जाण्याचा प्रयत्न सुरुवातीला करत करत नंतर दोरी नि खुंटी दिसली की शांत उभं राहून प्रयत्न टाळतो.. तसं सातत्यानं 'माझेपणा' नि 'मी' पणाच्या दोरांनी माणूस इतका अडकला जातो की ते बंधन, तो पाश सुटता सुटत नाही..


एक घर आगीत भस्म झाल्याची बातमी येते, आपण शांत असतो, शहराचं नाव ऐकलं की कान टवकारतात, विभाग ऐकला की चौकशी सुरु होते नि माझाच पत्ता ऐकला की धक्का बसतो, अन्नपाणी सुटतं.. माझेपणा आला की प्रतिक्रिया येते नि ती तशी आली की बंधन आलंच.. बातमी तीच, मात्र प्रतिक्रिया बदलली.. प्रतिकूल संवेदनात दुखःम.. पश्चातबुद्धीनं परिस्थिती नियंत्रणाबाहेर जायला आपण जास्तच कारणीभूत ठरतो..


मात्र देवी-मातेच्या भक्त म्हणवणारानं असं असून चालत नाही.. सगळ्या सृष्टीच्या निर्मात्याला निर्माण करणारी अंबा, दुर्गा, भवानी माता ही जर माझं आराध्य दैवत असेल तर काहिही, जाण्यानं का हळहळ करायची..? ते तसं माझ्याच बाबतीत का होतं ह्याचा विचार, (प्रारब्ध भोग) कर्माचा सिद्धांत ह्या एका assumption  ने सुटतो..


इथं लक्षात घ्यावं की दुसर्‍याच्या नावानं खडे फोडण्यात आपला मनस्ताप वाढतो, तसं न करता' योग्य निर्णय घेऊन आपल्यावर आलेला कुठलाही प्रसंग आपल्या कर्माच्या फळाच्या स्वरुपात आला असं मानणं व्यावहारिक शहाणपणाचं ठरतं..


मात्र इथं कुठलाही निराशावाद नाही.. कर्माचा विचार नि बरोबरच मी आनंदरुप असल्याचा विचार हे 'गणितं' सोडवण्यापुरते वापरावेत नि नंतर अलगद बाजूला सारावेत.. असं हळूहळू करत गेलं की आपोआप पाश सुटतात.. भव म्हणजे संसार.. नि अशा प्रकारे भवपाश सोडवायला अंबा मदत करते.. अशा ह्या जगद्जननी अंबेच्या चरणी तद-लीन, तल्लीन होण्यामध्ये खरं भूषण आहे..


पण इथे प्रश्न पडतो.. माझेपण नसेल तर अत्मियता कशी वाटेल..?  या एका भावनेपोटीच तर सारं जग वाढतय, जे काही चांगल वाईट घडतय ते ही याच भावनेपोटी..  माझेपण / देहबुद्धी आत्मीयता ही भावना विसर्जित करणे हेच खरे अध्यात्म आहे..! मी आणि "तो" कोणी वेगळा आहे ही भावना नष्ट करणे हीच शेवट्ची पायरी, तिथे द्वैत सरले..!


मग कर्म कसे करायचे..?  कार्य घड्णार कसे..?  कर्ताच नसेल तर गोष्टी घडतीलच कशा..?  ज्याच्याबद्दल माझेपण-आत्मियता नाही ते होणार कसे..?.. असाच काहीसा प्रश्न पडतो..!!..    आता हे असं नेमकं कसं आहे..!.. काय आहे..!.. काय होतं हे पूर्ण सत्य जाणायचे असेल, तर त्यासाठी गुरुप्रदित  साधना आणि अभ्यास हवाच आणि तो करताना लीनतेने गुरुचरणी साक्षित्वाने असावे.. जर आपल्याला ज्ञान हव तर सद्गुरूपुढे पूर्ण शरणागती शिवाय पर्याय नाही..


माझे माझे लोप पावू दे.. तुझे तुझे उगवू दे..  यथार्थपणे कर्म अकर्माचा विचार करताना ज्ञान्यानाही भ्रम होतो, कारण कर्माचे योग्य असणे हे कर्त्याचा श्रद्धाभाव, वृत्ती, परिस्थिती, काळवेळ यावर अवलंबून आहे.. काय योग्य आणि काय अयोग्य हे खरे सत्य कळण्यासाठी सद्गुरूला नम्रपणे शरण जाण्याशिवाय पर्याय नाहीच..


गीतेतील कर्म हे साध्य नाही, तर ते ईश्वराची.. कर्म कुसुमानि पूजा करून त्यास प्रसन्न करून घेण्याचे साधन आहे.. ज्ञान-ईश्वरी गीतेत, जी साधना सांगितली तिचा कर्मयोग हा पाया तर ज्ञानयोग हे शिखर आहे.. कर्मयोग हा अंतकरणशुद्धी द्वारा ज्ञानयोगास साधनभूत आहे, आणि ज्ञानयोग मोक्ष दायक आहे..!


 आज आपण या गुरुरूपी दुर्गामातेला पूर्णपणे शरण जाऊन सांगुया..


         आदिशक्ती तू आदिमाया तू..     तू जगज्जननी लयकारी तू..

                              कर्म साधन्या कार्यकारी तू..     सर्व चराचरी शक्तिरूप तू..

         या कलियुगी संकट समयी..    षड असुर घोर विनाश घडवी.. 

                             नाश करण्या असुर प्रवृत्ती..     दे मज बळ आदिशक्ती.. आदिशक्ती.. 

         अपराध क्षमा कर जगदंबे..     पदरी बालका घे तू अंबे.. 

                              धाव संकटी भ्रांती नाशिके..  शरण तुझला  पाव अंबिके.. पाव अंबिके..  


ॐ श्री गुरुदेव दत्त...





सत्संग म्हणजे काय.? (चिंतनकथा)

एकदा नारद मुनींनी श्रीकृष्णांना सहज विचारले... "देवा सत्संग सत्संग म्हणतात, त्याचा एवढा काय हो महिमा"? यावर देवांनी त्यांना काही एक उत्तर न देता एका किटकाचा निर्देश करून सांगितले... कि तो कीटक तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल... नारद मुनी त्या किटकाला शोधत नरकापर्यंत गेले आणि त्यांनी त्या किटकाला विचारले "सत्संगाचे काय फळ आहे तुला माहित आहे का?".. कीटकाने त्यांचेकडे एक कटाक्ष टाकला आणि तो मृत झाला... प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने ते पुन्हा श्रीकृष्णाकडे आले म्हणाले.. देवा तो कीटक तर काही बोलल्याविनाच मृत झाला आहे, आता तुम्हीच उत्तर सांगा... 

देवांनी नारदांचे म्हणणे ऐकून घेतले आणि ते म्हणाले... "तेथे पहा त्या समोरच्या झाडावर घरट्यात एक नुकतेच जन्मलेले पोपटाचे पिलू आहे ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल..." नारदमुनी त्या पोपटाचे पिलाजवळ गेले आणि त्यांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला... पोपटाचे पिलाने एकदा डोळे उघडून त्यांचेकडे पहिले आणि त्याने डोळे मिटले ते कायमचेच... नारदमुनी मनाशीच विचार करू लागले, काय सत्संग करण्याचे फळ मृत्यू आहे... कारण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न केला ते मृत्यू पावले आहेत... 

अत्यंत दुखी होहून ते पुन्हा श्रीकृष्णापाशी आले... म्हणाले "देवा आपल्याला सांगायचे नसेल तर नका सांगू पण... अहो मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारतोय ते मृत होत आहेत... अजून किती जणांच्या हत्येच्या पापाचे धनी मला करणार आहात" तेंव्हा देव त्यांना म्हणाले... "त्याची चिंता तू करू नकोस तुला खरेच जर या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर ते पहा नुकत्याच तिथे एका गाईने बछड्याला जन्म दिलाय तो बछडा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल..." दुखी अन्त:करणाने नारदांनी तेथे जावून त्या बछड्याच्या कानाशी लागून त्यालाही तोच प्रश्न केला... त्यानेही नजर वळवून त्यांचेकडे पहिले आणि ते तेथेच लुडकले... 

नारदमुनी घाबरून देवांकडे परत आले... तथापि त्यांना पुन्हा एकदा आश्वासित करून श्रीकृष्ण म्हणाले "राज्यात नुकताच एक राजपुत्र जन्माला आहे... त्याचेकडून तुम्हाला निश्चित या प्रश्नाचे उत्तर मिळेल... नारदांनी विचार केला आतापर्यंत कीटक, पोपट व बछड्याचे मृत्यूने माझ्यावर काही आपत्ती आली नाही... पण राजकुमाराचे जर काही बरेवाईट झाले तर माझे प्राणही संकटात येवू शकतात... तथापि देवाचे भरवश्यावर ते राजकुमाराकडे गेले आणि त्यांनी धाडस करून राजकुमाराला मांडीवर घेतले आणि पापा घेण्याचे निमित्त करून हळूच त्याचे कानात विचारले... सत्संगतीत राहिल्याने काय लाभ होतो..?.. प्रश्न ऐकून राजकुमार हसू लागला आणि म्हणाला मुनिश्रेष्ठ अजून आपण नाही समजलात... 

अहो, आपण पहिल्यांदा मला भेटला... तेंव्हा मी कीटक होतो.. आपण मला हा प्रश्न विचारला आणि मी मेलो आणि पोपट झालो... नंतर आपल्या दर्शनाने मी घरट्यातच मेलो आणि मला बछड्याचा देह प्राप्त झाला... पुन्हा आपले दर्शन घडले आणि बछड्याचा देह पडून सर्व देहामद्धे श्रेष्ठ असा हा मनुष्य देह प्राप्त झाला... आणि पुन्हा आत्ताच्या दर्शनाने मला पूर्णत्व हि प्राप्त झाले... हे सर्व आपल्या सारख्या संतांचे दर्शनाचेच फळ आहे... ज्यांना आपल्या सारख्या संतांचा सहवास मिळतो ते धन्य आहेत... 

नारदांना त्यांचे प्रश्नाचे उत्तर मिळाले व सत्संगाचा महिमाहि कळला... "नारायण नारायण" म्हणत ते देवांकडे आले आणि म्हणाले "देवा जशी आपली लीला आघाद तशीच आपली समजावून देण्याची पद्धतहि दिव्यच आहे"...

म्हणूनच, मित्रांनो जीवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे... बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले, तर बाभळीच्या काट्याने त्याची संपुर्ण पाने फाटून जातात... या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो... ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला... श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वोश्रेष्ठ योद्धा झाला... याउलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म, कर्ण सर्वोश्रेष्ठ असुनही त्यांचा नाश झाला... आपण ज्यासोबत रहातो.. त्याच्या विचारांचा, रहाणीचा, वागणीचा, अंमल हा आपल्यावर होत असतो... संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दुषित होतात, तेंव्हा पहा संगत कशी निवडायची ते... ॐ श्री गुरुदेव दत्त...