Tuesday 6 November 2012

खरी लोकशाही आपण केव्हा अनुभवणार..... 

आपल्या देशात प्रामाणिकपणे कष्ट करून भाजी-भाकरी खाणाऱ्या माणसापेक्षा जाणून-बुजून गुन्हा केलेल्या गुन्हेगाराला सुधारण्याकडे..... त्याच्या हक्कांकडे सरकार अधिक जागरूकपणे पाहते असेच चित्र आहे.... त्यात कसाब ते संजय दत्त, सलमान, रामलिंगम राजू सगळेच आले..... त्यामुळेच अलीकडे आपल्या देशात असल्या कुप्रसिद्ध गुन्हेगाराना शिक्षा झाल्याची बातमी ऐकायला मिळत नाही.... "गुन्हा तेथे ताबडतोब शिक्षा" हे धोरण कडकपणे, निर्दयपणे आणि निस्पृहपणे राबवल्याशिवाय अशा गुन्ह्यांना पायबंद बसणार नाही.... आता या गुन्हेगारांचे लाड खूपच झाले आहेत.... कुत्र्याचे वाकडे शेपूट आता सरळ करण्याचा प्रयत्न बास झाला असेच वाटते.... 

आज आपल्या देशात अपराध करणाऱ्या व्यक्ती मोकाट आह्रेत.... सलमान खान ह्याला अद्याप कसलीच शिक्षा झालेली नाही व होणार हि नाही.... कारण सध्या आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे कोठे.... जो तो आपली खुर्ची सांभाळण्यासाठी दिल्लीश्वरांची सेवा कशी करता येईल.... ह्याच विवंचनेत आहे.... असल्या शुल्लक गोष्टीकडे लक्ष्य देण्यास कोणाला रस आहे.... 

चंगळवादाच्या धुंदीत असणाऱ्या अनेकांच्या मोटारी भरधाव पळतात.... आणि त्यांच्या या मस्तीखोरीला बळी पडतात रस्त्यावरचे आयुष्य जगणारी गरीब माणसे किंवा कर्तव्य बजाविणारे पोलिस..... मद्याच्या नशेमुळे वेळ-काळाचे भान हरपलेली ही मंडळी आपल्या मोटारीखाली दुसऱ्यांचे प्राण घेतात..... पैशाच्या मस्तीतून, पैसे चारण्याच्या आणि खाबूगिरीच्या वृत्तीतून हे घडते.... अशी सामान्य नागरिकांची भावना आहे..... या पैशाच्या - सेलिब्रिटी मस्तीने माणूस आंधळाही बनतो.... मद्य पिऊन वाहन चालविण्याने स्वतःच्या जीवाला धोका उत्पन्न होतोच.... इतरांचा जीवही धोक्यात येतो.... या सामान्य ज्ञानाचाही विसर अनेकांना पडलेला असतो.... 

बघा, ज्या इनसायडर ट्रेडिंगसाठी रजत गुप्तांना दोन वर्षांची कैद आणि ५0 लाख डॉलर्सचा दंड झाला.... तसा प्रकार भारतातही नवा नाही..... फरक इतकाच, की त्यावरून अद्याप एकालाही कारावास झालेला नाही.... रजत गुप्ता हा भारतीय वंशाचा माणूस हे सगळं जर भारतात करता... तर काय झालं असतं.... असा विचार येतो आणि हजारो कोटी रुपयांचे घोटाळे वर्षानुवर्षे कोर्टात खितपत पडलेले दिसतात.... मी सात हजार कोटी रुपयांची अफरातफर केली... असे जाहीरपणे मान्य केलेला सत्यमचा रामलिंगम राजू जामिनावर बाहेर आलाय.... आणि त्या खटल्याचा अंतिम निकाल केव्हा लागेल हे कुणीही सांगू शकत नाही.... अद्याप कुणालाच कारावासाची शिक्षा झालेली नाही..... 

आज या प्रवृत्ती म्हणजे भारताच्या न्यायव्यवस्थेची शोकांतिका आहे.... इथे काहीही केलेले चालते... आणि काहीही होणार नाही... याची शाश्वती देणारी व्यवस्था म्हणजे आमची न्यायव्यवस्था..... इतक्या दारूण आणि करुण अवस्थेला जवळपास सर्वच व्यवस्था पोचलेल्या असताना आपल्या लोकशाही व्यवस्थेचे गोडवे गाणे हे वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण नाही का.... 

पोलिसांनी गुन्हा दाखल करतानाच आवश्यचक त्या कलमांचा समावेश न केल्यास खटला उभा करताना त्रुटी राहतात.... आणि या त्रुटींचा गैरफायदा कसा घ्यायचा.... हे धनिकांच्या बाळांना चांगले ठाऊक असते..... पोलिस दलातील आणि प्रशासनातील भ्रष्ट प्रवृत्तींना हाताशी धरून आपण कायदाही धाब्यावर बसवू शकतो.... अशी मानसिकता त्यातून वाढीस लागण्याचा धोका आहे.... पोलिसांना विकत घेण्याची किंवा राजकीय नेत्यांकडून दडपण आणून पोलिसांचे हात बांधण्याची क्षमता धनदांडगे आणि गुंडांच्या टोळ्यांशी संबंधित लोकांकडेच असते.... आता यावर एकाच उपाय..... जनमताचे पुरेसे दडपण आणून या मुजोरांना धडा शिकविण्यास सरकारी यंत्रणांना भाग पाडणे..... तरच असे प्रकार होणार नाहीत आणि असंख्य निरपराधांचे जीवही वाचतील.... 

गुन्हा हा कितीही उच्चपदस्थ, वजनदार आणि प्रतिष्ठित व्यक्तीने केलेला असो तो शिक्षेला पात्रच असतो आणि गुन्हय़ाला कोणत्याही परिस्थितीत क्षमा नसते.... हेच न्यायाचे तत्व असल्याचे अमेरिकन न्यायालयाने गोल्डमन सॅख्स या वित्तीय कंपनीचे माजी संचालक रजत गुप्ता यांना दोन वर्षे कारावास आणि ५0 लाख डॉलर्सचा दंड ठोठावून दाखवून दिले आहे..... रजत गुप्ता या नावाभोवती असलेले वलय, त्यांची बिल गेटस आणि कोफी अन्नान यांच्याशी असलेली मैत्री, ज्युरीची त्यांना लाभलेली सहानुभूती या कशाचाच विचार न्यायालयाने शिक्षा देताना केला नाही.... भारतातही तपास यंत्रणा अशाच पध्दतीने वागू लागल्या.... तरच उच्चपदस्थांच्या भ्रष्टाचाराला आळा बसू शकेल..... आणि खऱ्या अर्थाने लोकशाही आपण पाहू शकू..... 

ॐ श्री गुरुदेव दत्त....

No comments:

Post a Comment