Sunday 11 November 2012

दिवाळी तेजोत्सव जीवन उजळी.... नवसंकल्प समाधानी आयुष्य घडवी.... 

आज दिवाळी आली म्हणजे ज्योतीचा, उजेडाचा आणि तेजाचा उत्सव आनंद घेऊन घरी आला..... दिवाळी म्हणजे मांगल्य.... दिवाळी म्हणजे माणसांच्या मनातील सुविचार- आचार येणारे उधाणच जणू.... दिवाळीचा आनंद.... दिवाळीचा उत्साह वर्षभर राहून.... वर्षभर पुरावा अशीच आपली अपेक्षा दिवाळी शुभेच्छांमधून दिली जात असते..... मंगलमय दिवाळीचा दिवस उजाडताना जणू नवा प्रकाश आपल्या जीवनी घेऊन येतो.... आपण नवे संकल्प करतो.... त्यावर मार्गक्रमणा करतो.... जुने अपयश विसरून नव्या उद्दिष्टांकडे यशस्वीपणे गरुडभरारी घेण्याचा प्रयत्न करतो..... 

आज दिवाळी सणाला थोडा नवीन विचार करून पहा.... विचार सामाजिक बांधिलकीचा आहे..... बघा पटला तर..... आपण खूपवेळा दुसऱ्या बाजूचा विचार करत नाही.... आपल्याला असे वाटते की राग फक्त आपल्यालाच येतो....पण त्याचवेळी विचार करा अनेकजण चुकी नसतानाही अत्यंत शांततेने वाद संपवतात.... आज तुम्ही तुमच्या मुलांना कित्येक वेळा झालेल्या चुकां समजाविण्या ऐवजी नुसते ओरडत असाल तर काय फायदा.... पण काही लोक दत्तक घेतलेल्या मुलाला सुद्धा आनंदाने चांगल्या सुसंस्काराने सांभाळत असतात.... आज आपल्याला नेहमी नवीन कपडे हवे असतात.... पण त्याचवेळी काही व्यक्तीना अंग झाकण्यासाठी सुद्धा कपडे मिळत नाही... आज आपल्यालाकडे पैसा असूनही आणखी पैसा हवा असतो.... पण काही लोक गरीबीत सुद्धा सुखाने जगत असतात.... 

म्हणूनच जे आहे त्यात समाधानी राहा.... फक्त आपला विचार न करता दुसऱ्याचा देखील विचार करायला शिका.... अमुक गोष्ट आपल्याकडे नाही यापेक्षा आपल्याकडे काय आहे.... यात आनंद उपभोगा... कारण आपल्यापेक्षा आणखी किती तरी अशी लोक आहेत..... जी खूपच गरीब आहेत ज्याना आपल्यापेक्षा जास्त त्या वस्तूची गरज आहे.... पण परिस्थितीने ते त्या वस्तू मिळवू शकत नाही आणि जे आहे त्यातच ते समाधान मानतात..... 

यंदाच्या दिवाळीत बोनस आल्यावर किंवा आपण किती पैसे खर्च करून किती नवीन कपडे घेणार.... हा विचार करण्याआधी ह्या गरीब मुलाचा हा फोटो जरूर आठवा..... आपण नक्कीच तीन ते चार नवीन वस्तू - कपडे अशा दुकानातून खरेदी करू शकू...... पण या अशा गरीब मुलांनी दुरून नेहमी स्वप्नेच पाहायची का..... नवीनच नाहीत... पण निदान तुम्ही किंवा तुमची मुले थोडे वापरून कंटाळले असाल..... असे कितीतरी कपडे बंद कपाटात पडून असतात..... त्यातील एखादे जरी या गरिबाला दिले.... तरी ह्या गरिबाचे स्वप्न थोडे तरी नक्कीच पूर्ण होईल.... असे मला वाटते.... बघा, इतरांचा विचार करावा ही आपली महान संस्कृती आहे.....  मदत भावना, सामाजिक बांधिलकी अशा गुणांचा पुरस्कार करणारी माणस ही खऱ्या अर्थाने संस्कृतीचा पाया असतात..... 

मित्रांनो, मग या दिवाळीला करणार ना.... अशाच एखाच्या गरिबाचे स्वप्न पूर्ण ? तुम्ही करणार का ?...  हा नव संकल्प सामाजिक बांधिलकीचा.... बघा, कदाचित यालाच खरे जगणे आणि समाजकार्य म्हणतात..... पण त्याचवेळी या समाजकार्याला अभिमानानाचा, अहंकाराचा, उपकाराचा दर्प येणार नाही, याची काळजी मात्र नक्कीच घ्या.... ज्यात स्वार्थ नाही, उलट आपण काहीतरी चांगले कार्य केले याचा आत्मानंद मिळतो.... असे निर्मळ समाजकार्य केल्यास जे सुख समाधान मनाला लाभेल ते वर्षभर नव्हे... आयुष्यभर शाश्वत असेल.... 

मित्रांनो, ही दिवाळी तुम्हा साऱ्यांसाठी खूप खूप आनंद.... सुख समृद्धी.... अन आंतरिक समाधान घेऊन येवो.... याच सर्वाना मंगलमय शुभेच्छा.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त.....


No comments:

Post a Comment