Monday 21 May 2012

जगाला उपदेश करणारे..... लोका सांगे ब्रम्हज्ञान.....

समुद्राकाठी एक टुमदार शहर होते..... तेथे पौर्णिमेचा चंद्र उदयास आला..... त्याचे सौन्दर्य काय वर्णावे ...? उगवला चंद्र पुनवेचा..... पण त्याच्याकडे पाहून त्या शहरातील कुत्र्यांना काहीं चैन पडेना....

चंद्राकडे पाहून सर्व कुत्रे भुंकायला लागले.... अर्थात त्यामुळे शहरातील शांतता भंग पावली.... कुत्र्यांमध्ये एक शहाणा कुत्रा होता.... तो मात्र आता पर्यंत शांत होता.....

इतर कुत्रे जेव्हा भुंकणे थांबवत नाही हे बघून.... तेव्हां तो त्यांना म्हणाला.... अरे कशाला भुंकता.... तुमचे भुंकणे काहीं चंद्रापर्यंत पोचणार नाही..... आणि उगीच पृथ्वीवरील शांतता मात्र भंग पावत आहे.... 

म्हणून गप्प बसा..... हे त्याचे बोलणे ऐकून सर्व कुत्रे भुंकण्याचे थांबले.... पण आता भुंकू नका.... म्हणणारा कुत्रा मात्र शांतता नांदावी..... म्हणून रात्रभर भुंकत राहिला....

आज आपण बघतो..... स्वतःला भाषाप्रभू म्हणवून घेणारे, पंडित समजणारे अनेक लोक आपण आपल्या अवतीभोवती पाहात असतो..... प्रत्यक्षात ते किती आणि कसे पोकळ आहेत... याचं दर्शनही आपल्याला अधूनमधून घडत असतं... अशा विद्वानांचा आणि त्यांच्या लटक्या पांडित्याचा समाजाला कवडीइतकाही उपयोग नसतो.....

संत रामदास स्वामींचा मनाच्या श्लोकामधील एक मर्मभेदी श्लोक कायम स्मरणात ठेवण्यासारखा आहे..... रामदास स्वामी सांगतात..... 
जनीं हीत पंडीत सांडीत गेले । अहंतागुणें ब्रह्मराक्षस जाले ॥ 
तयाहूनि व्यत्पन्न तो कोण आहे । मना सर्व जाणीव सांडूनि राहें॥

अर्थ :  हे मना, शब्द पांडित्य असणार्‍यांना खरे सत्य व हित गवसत नाही.... असे विद्वान अहंकारामुळे मृत्यूनंतर ब्रम्हराक्षस होतात..... भगवंताहून अधिक विद्वान असा कोण आहे...? याची जाणीव धरून नम्रतेने वागायला हवे.... 

शास्त्र, पुराणे, उपनिषेदे आदींचा अभ्यास करणार्‍या विद्वानांना त्यातील हितकारक गोष्टी माहिती असतात..... ते त्यावर वाद चर्चा करतात, व्याख्याने देतात, सभा गाजवतात..... तथापि वैयक्तिक आयुष्यात त्याविरूध्द आचरण करीत असतात.... शांततेचा उपदेश करणारे लोक स्वतः मात्र शीघ्रकोपी असू शकतात.... बालमुहूर्तावर उठावे... असे सांगणारे सकाळ उजाडल्यावरच उठणारे असले... तर हे म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान’ असेच ठरत नाही काय....

विद्वत्ता वाईट नव्हे... पण तिच्यासोबत नम्रता हवी..... मनुष्याकडे विद्वत्ता, चातुर्य, वक्तृत्त्व, बुध्दिमत्ता हवी हे सर्व गुण प्रयत्नपूर्वक मिळवावे.... पण त्यांचा अहंकार होऊ देऊ नये.... मुळात हे कठीण आहे... पण अशक्य नाही.... 

आज सरकारी विद्वान, सरकारी इतिहास संशोधक अशा नवीन जमाती उदयाला आल्या आहेत.... काहीही करून सरकारी पुरस्कार पदरी पडले आणि चार-दोन महामंडळांवर आपली नियुक्ती करून घेतली की, त्या पुण्याईवर उभा जन्म आनंदात जातो.... 

समाजातही अशाच विद्वान म्हणवणार्‍यांची चलती असल्याने त्यांना आकाश ठेंगणे वाटू लागते.... सर्व गोष्टींवर ते अधिकारवाणीने मत नोंदवतात.... कधीतरी हा फुगा फुटतो.... पण तोवर त्यांचा क्षुद्र स्वार्थ साधलेला असतो.... अशांनी ब्रम्हराक्षस होण्याची तयारी करून ठेवावी.... तेव्हा अशा पंडितांचा विचार करण्याचं कारण नाही.....

ॐ श्री गुरुदेव दत्त ......

No comments:

Post a Comment