Thursday, 5 April 2012

चैतन्य धारा : चिंतामणी - अध्यात्माचा पत्ता...

'अहंकाराच्या' धुंदीत 'जगण्याच्या' वाटेवरुन चालताना 'सुखदुःखाचे' घाट उतरून मी जेव्हां 'सन्मार्गावरुन' आलो तेव्हा 'ग्रंथांच्या' झाड़ातुन वाळलेल्या रसांचे दोन ओघळ मी पाहिले... हे कसले ओहळ..!.

शेवटी पाने म्हणाली 'शांतिरस' आणि 'भक्तिरसाचे' आहेत ते म्हणून... 'स्वानुभवाच्या' चौकात उभ्या असलेल्या 'सिद्धाला' मी विचारलं हा 'शांतिरस' कुठे मिळतो हो.?.

तेव्हा तो म्हणाला.. समोर 'संयमाच्या' मार्गावरुन जाताना तुला 'प्रलोभनांची' दुकाने लागतील.. पुढे 'मायेचे' सर्कल लागेल, तिथेच 'मूर्खांचा' बाजार म्हणून एक मोठा मॉल आहे...
त्याच्या आधी 'शहाणपणाची' एक गल्ली लागते ती ओलांडून जा, पुढे 'वैराग्याचा' आडवा रस्ता लागेल तो ही क्रॉस कर... डाव्या हाताला 'ज्ञानाचे मंदिर' लागेल...

समोरच 'अध्यात्माचे कॉम्पलेक्स' आहे... ठेकेदारांचे वॉचमन तुला अड़वतील.. "नामाचा पास" दाखवून आत जा, समोरच तुला चार बिल्डिंग दिसतील... 'वैखरी', 'मध्यमा', 'पश्यन्ति', 'परा'...
त्यातल्या 'परा' बिल्डिंग मध्ये 'तिस-या' मजल्यावर 'स्वानंदाचा' फ्लॅट आहे... 'शरणागतीची' बेल वाजव...
'कृपेचे' दार उघडले जाईल... समोर 'ध्यानाचा' कोच असेल, त्यावर जरा निवांत बैस 'मुक्ती' उभी असेल... 'समाधानाच्या' ट्रे मधे 'शांतिरसाचा' कुंभ घेऊन... ॐ श्री गुरुदेव दत्त...



जीवन कर्म....

एका माणसाचं निधन होतं… हे त्याच्या लक्षात येतं जेव्हा साक्षात भगवंत हातात एक गाठोड़ घेऊन त्याच्या समोर प्रगटतात… भगवंत आणि त्या माणसामधील संवाद…

भगवंत - वत्स, चल आधीच उशिर झालाय..!..

माणूस - पण देवा मला तर तुम्ही फार लवकर आणलंत… मला आणखी खुप काही करण्याची इच्छा आहे…

भगवंत - माफ कर, अगोदरच फार उशीर झाला आहे…

माणूस - पण भगवंता, ह्या गाठोडयात काय आहे..?..

भगवंत - जे आहे ते तुझंच आहे..!..

माणूस - माझं म्हणजे माझ्या वस्तू, कपडे पैसे..???

भगवंत - ते काही नाही, कारण त्या सर्व भुतलाशी संबंधित आहेत…

माणूस - माझ्या आठवणी..?..

भगवंत - त्या काळाशी संबंधित आहेत…

माणूस - माझं कर्तृत्व..?..

भगवंत - नाही ते परिस्थितीशी संबंधित आहे…

माणूस - माझे मित्र आणि परिवार..?..

भगवंत - नाही वत्सा ते तर तुझ्या प्रवासातील सोबती होते…

माणूस - माझी पत्नी व मुलं..?..

भगवंत - ते तर तुझ्या ह्रुद्यात आहेत…

माणूस - मग माझं शरीर आहे का त्या गाठोडया मधे…???

भगवंत - नाही, नाही ते तर राख झाले...

माणूस - मग नक्की माझा आत्मा असेल...

भगवंत - वत्सा तु परत चुकलास, तुझा आत्मा तर माझ्याशी संबंधित आहे...

माणसाच्या डोळ्यातून आता तर अश्रु ओघळतात... त्याने भगवंताच्या हातातून ते गाठोडं घेतलं आणि मोठ्या
आशेने उघडून बघितलं तर काय... रिकाम होतं ते..!.. 

निराश होऊन डोळ्यातील अश्रु पुसत माणूस म्हणाला.. म्हणजे माझं स्वता:चं असं काहीच नाही..?..

भगवंत - अगदी बरोबर, तुझ्या मालकीच कधीच काही नव्हतंच...

माणूस - मग त्या सगळ्याचा अर्थ काय..??..

"जीवन हे क्षणभंगुर आहे... फक्त योग्यप्रकारे जगा... आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच घमेंड करू नये, कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात... त्या नक्कीच संपत असतात..." मृत्यु नंतरचं हेच कडव सत्य"...

1:- "पत्नी" दरवाजा पर्यंत...

2:- "समाज" स्मशाना पर्यंत...

3:- "पुत्र" अग्निदाना पर्यंत...

फक्त आणी फक्त "कर्म" ईश्वरा पर्यंत...

जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती... यातील वेलांटीचा फरक म्हणजेच माणसाचे जीवन..!!.. योग्य जीवन पाहिजे तर ज्ञान हवे... पण ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे. भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे.!. 

संसारी जीवन म्हणजे आंधळ्यासारखे पैसासाठी स्वःताला विसरणे... ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; ज्ञान तुमचेच रक्षण करते आणि जीवनाला अयोग्यतेपासून दूर ठेवते... योग्य कर्मच आपणाला ईश्वरापर्यंत नेते... ॐ श्री गुरुदेव दत्त... 





आत्मस्वर : चिंतामणी - देवाचा शोध....
एक छोटा मुलगा, आज त्याने काही ठरवले आहे... त्या देवाबरोबर जेवायचे आहे... तो देवाच्या शोधात निघाला... काही खाण्याच्या वस्तू आणि पाण्याच्या बाटल्या बरोबर घेऊन तो घराबाहेर पडला... खूप चालला... एका बागेत गेला... थोडी विर्शांती घेण्यासाठी एका बाकावर बसला... जवळच एक म्हातारी होती... तिच्याकडे त्याचे लक्ष गेले... तिला बहुधा तहान लागलेली होती... त्याने जवळचे पाणी तिला दिले... ती पाणी प्याली...
बाटली परत देताना ती हसली... इतके सुंदर हसणे तो प्रथमच बघत होता... त्याने तिला खाऊ दिला... ती परत तसेच हसली... ते हास्य बघण्याचे त्याला वेडच लागले... तो उठला... दिवस सरत आला होता... आता त्याला घरी परतायचे होते... तो तिथून निघाला... थोडे पुढे गेला... वळून पाहिले... ती म्हातारी गोड हसत होती... तो धावत तिच्याकडे आला... तिला मिठी मारली... तिनेही प्रेमाने त्याला कुशीत घेतले... जराशाने तो निघाला... घरी पोचला... आज तो खूपच खुश दिसत होता... आईने विचारले तसा तो म्हणाला, ‘देव कितीतरी थकला होता आई..!.. भुकेला, तहानेलाही होता... तरी खूप गोड हसत होता...

इकडे ती म्हातारीही घरी पोचली... केवढी आनंदी, केवढी तृप्त! रोजचा शीण नव्हता... एकटेपणाची बोच नव्हती... तिच्या मुलाला सारेच अनपेक्षित होते... ‘कुठे होतीस दिवसभर?’ त्याने आईला विचारले... ती दैवी तंद्रीतच होती... म्हणाली, ‘मला वाटत होते त्यापेक्षा खूप तरुण आहे देव! तरुण कसला? बालच!! न मागता मला सारे दिले... प्रेमाने मिठीही मारली!’ म्हातारीच्या देहावर वसंत ऋतू अवतरला होता... केवढा आनंद, केवढी तृप्ती, केवढे समाधान..!!..

देवाला निवृत्त करायला निघालेल्या किंवा देवाला शोधायला निघालेल्या प्रत्येकानेच ही गोष्ट वाचली पाहिजे... या एका गोष्टीत सार्‍या शंकांचे समाधान सापडेल असे वाटते... सारे अध्यात्म या एका छोट्याशा गोष्टीत साठवलेले आहे...

खरेच... देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो... आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवाण्याची गरज नसते... तो सर्वांना दिसत असतो... म्हणुन मंदीरातला देव टाळला तरी चालेल पण कर्मातला देव कधीही टाळु नका... ॐ श्री गुरुदेव दत्त...




प्रकाश वाटा : चिंतामणी  -  माउलीचे ऋण ....

एका खेडे गावात एक आई आणि तिचा १४ वर्षाचा मुलगा राहत होते...... उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार त्याच्या हातात १० रुपये तरी असावे..... पण घरात १० रुपये नाही म्हणून ती माउली बाजूच्या शेतात राबायला गेली संध्याकाळी मजुरीचे पैसे आणले.....

तितक्यात मुलगा शाळेतून आला आई ला म्हणाला...... मला जेवायला दे ... मी लवकर झोपतो ..... उद्या जत्रेला जायचे आहे सकाळी लवकर उठेन...... मुलगा सकाळी लवकर उठला त्या माऊलीला पण उठवले...... मुलगा अंघोळीला जाताना आईला म्हणाला..... आई लवकर न्याहारी तयार ठेव मी लगेच अंघोळ करून घेतो .....

माऊलीने भाकर करून ठेवली, दुध चुलीवर होते, मुलगा अंघोळ करून आला आई जवळ बसला आणि आई ला म्हणाला ..... मला लवकर दुध आणि भाकरी दे मला उशीर होतोय...... आई ने आजू बाजूला पाहिले दुध उतरवायला काहीच सापडत नव्हते..... पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर ..... माउलीने विचार न करता तसाच दुधाचा टोप हाताने उतरवला ....... गरम दुधाच्या टोपाचे चटके मस्तकाला वेदना देऊ लागल्या हाताची लाही लाही झाली ......

पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर न उशीर होतोय ..... त्या माउलीने पुन्हा टोप उचलून दुध प्यालात ओतले आणि मुलाला दिले..... त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्या मुलाने मान खाली घालून न्याहरी केली...... आई ने जवळचे १० रुपये त्या मुलाला दिले......

मुलगा जत्रेत गेला संध्याकाळी परतला ..... आई ने विचारले बाळा जत्रेत काय काय पहिले मुलाने जत्रेतल्या गमती जमाती सांगितल्या ...... मग आईने विचारले दिलेल्या १० रुपयाचे काय केलेस.... काही खाल्लेस कि नाही....... .

त्या मुलाने आई ला सांगितले की तू डोळे बंद कर मी काहीतरी आणले आहे तुज्यासाठी ........ माऊलीने डोळे बंद केले मुलाने खिश्यातून सांडशी काढून आईच्या हातात दिली ...... आई च्या डोळ्यात त्या संड्शीच्या स्पर्शाने अश्रू आले .... ... आई धन्य झाली ..... तिने पेरलेल्या संस्काराच्या रोपाला पालवी फुटली..... आईच्या हाताला झालेली इजा त्या मुलाच्या मनावर इजा करून गेली.....

तरुण पिढीने मातृ ऋण ,पितृ ऋण ,समाज ऋण म्हणजे काय हे माहित केले पाहिजे...... आई वडिलांची सेवा हे आपले कर्तव्य आहे..... या कर्तव्यात कसूर नको...... ज्या आई वडिलांनी आपल्याला जग दाखवले त्याना विसरू नका.....

मुलांवर, भावी पिढीवर संस्कार करणे आपल्याच हाती असते...... आपलेच संस्कार घेतले जातात....... यासाठी आपल्या सर्वांवर कुटुंबात, समाजात चांगले विचार, संस्कार रुजवण्याची जबाबदारी आहे.... ॐ श्री गुरुदेव दत्त ........

No comments:

Post a Comment