Monday 2 April 2012

परमेश्वरप्राप्तीची तळमळ... (विवेक स्वातंत्र्य : चिंतामणी (जानेवारी २००२ संपादित)

पुढील गोष्ट आधी कुठे वाचलीही असेल, पण स्वामी विवेकानंदजी यांच्या संदर्भाने नसेल बहुतेकांनी... सद्गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांनी परमेश्वर प्राप्तीसाठी सांगितलेला मार्ग आज आपण अभ्यासाने अनुभवायचा प्रयत्न करायचा... 

सद्गुरू श्री रामकृष्ण परमहंस हे श्री स्वामी विवेकानंदांचे लौकिक, आध्यात्मिक असे सर्वार्थाने गुरू होते... स्वामी विवेकानंदाना अष्टमहासिद्धी प्राप्त होऊन ते योगीपदाला पोहोचण्याअगोदर एक दिवस ते गुरूभेटीसाठी परमहंसांकडे गेले होते... त्या दिवशी गुरू शिष्यांत ब-याच विषयांवर चर्चा झाली... अनेक गोष्टीत स्वामींना परहंसांचे मार्गदर्शन लाभले... अचानक स्वामी विवेकानंदानी गुरूंना विचारले की, 'मला देव कधी भेटेल..?.. तो भेटण्यासाठी मला काय करावे लागेल..?.. श्री परमहंसांनी या प्रश्नाचे उत्तर राखून ठेवले व या उत्तरासाठी उद्या सकाळी नदीकिनारी भेटण्यास आपल्या शिष्याला म्हणजेच स्वामी विवेकानंदांना सांगितले... झाले...

दुस-याच दिवशी स्वामी विवेकानंद म्हणजेच पुर्वाश्रमीचे नरेंद्र लगबगीने श्रीगुरू परमहंसांना भेटायला नदीवर गेले... श्री परमहंस नरेंद्राचीच वाट पहात होते... परमहंसांनी नरेंद्राला नदीत उतरण्याची आज्ञा दिली व स्वतःदेखील त्याच्यासोबत नदीत उतरते झाले... दोघेही नदीत उतरल्यावर परमहंसांनी नरेंद्राला डुबकी मारण्यास सांगितले... त्याप्रमाणे नरेंद्राने डुबकी मारली... परंतू श्वास पुन्हा भरून घेण्यासाठी त्याला वर येता येईना कारण परमहंसांनी पाण्याखालीच त्याचे डोके गच्च ठेवले होते... जोपर्यंत श्वास होता तोपर्यंत नरेंद्र वर येण्यासाठी फारसे प्रयत्न करीत नव्हता... परंतू जसजसा श्वास संपत आला तसतशी त्याची हालचाल वाढली व अगदी शेवटच्या क्षणी परमहंसांच्या हाताला एक जोरदार झटका देऊन नरेंद्र वर आला... तेव्हा त्याच्या जीवात जीव आला... 

आपल्या गुरूंच्या या अनाकलनीय कृतीमागील हेतू नरेंद्राच्या लक्षात येईना... तेव्हा त्याने याबाबत श्रीगुरूंना विचारणा केली, तेव्हा ते म्हणाले की, 'यातच तुझ्या कालच्या प्रश्नाचे उत्तर दडले आहे... फुफ्फुसातील प्राणवायू संपल्यावर ज्याप्रकारे तू तुझ्यातील सर्व शक्तीनिशी माझा विरोध न जुमानता माझ्या हाताला झटका देऊन पाण्यातून वर आलास व श्वास घेतलास तशा तळमळीने जर तू परमेशवरप्राप्तीची साधना केलीस तर अगदी अल्पावधीतच व निश्चितपणे तूला परमेश्वर भेटेल... मी तुझ्या डोक्यावर दाबलेला माझा हात हे मोहाचे व विषयांचे प्रतीक समज... त्यांना न जुमानता सर्व शक्तीनिशी जेव्हा तू तळमळून मायापाशांना जोरदार झटका देशील तेव्हाच तुला प्राणवायुरूपी परमेश्वर साध्य होईल... 

मायेचा बुर्खा टराटर फाटल्याशिवाय आत्मज्ञान होणार नाही... मायेचा बुरखा केवळ आणि केवळ जीवनातील कटू अनुभव किंवा विरक्ती या दोनच साधनांच्या आधारे फाटू शकतो... यानेच खरे जीवन कळते... आणि ज्ञानाचे पदर उलगडत जातात... खरेच, असे कितीतरी साधक होऊन गेले ज्यांच्यावर अति वाईट प्रसंग आले म्हणून ते ज्ञानी झाले... पण जर ते सातत्य राखू शकतील तरच आत्मज्ञानी होतात... 

ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, 'देवाला जे प्रिय असतात त्यांना तो कमी पैसा व भरपूर संकटे देतो, तर याऊलट त्याला ज्यांची भरपूर परिक्षा पहावयाची असते त्यांना तो मुबलक पैसा व कमीत कमी संकटांचे प्रसंग देतो... मग तरीही देवाची परीक्षा दोघांसाठीहि होतेच, कधी विवंचनेत असलेल्याला अचानक पैसा मिळतो आणि पैसा असलेल्याचा पैसा जातो... यात आपला अहंकारी विचार आणि आचार महत्वाचा ठरतो... त्यातून जो तरेल, ज्याचे पाय जमिनीवरच राहतील तो खरा भक्त..!.. ॐ श्री गुरुदेव दत्त...



ज्ञानी आत्मदर्शन... (विवेक स्वातंत्र्य : चिंतामणी (जानेवारी २००२ संपादित)

माणसाच्या सुखदुःखाची मुळे त्याच्या मनोधारणेत असतात... आशावादी माणूस प्राप्त परिस्थितीत समाधानाने जगतो तर मूलभूत गरजा व्यवस्थित पुऱ्या झालेला निराशावादी माणूस चांगल्या परिस्थितीतही दुःखी असू शकतो... दुःखाचे कारण अति अपेक्षावाद, अयोग्य सवयी, संगत आणि जीवनाकडे पाहण्याचा चुकीचा दृष्टिकोन यात दडलेले असते... 

निश्चितपणे सवय आणि संगत यावर माणसाचे वर्तमान आणि भविष्य अवलंबून असते... संकटाच्या काळात मनाचे संतुलन शाबूत ठेवण्यासाठी सुखाच्या काळात योग्यपणे जपलेली नाती, जोपासलेले छंद आणि जगण्याचे आत्मचिंतन उपयोगी पडते... उत्तम शरीर आणि गरजे इतके अन्न, वस्त्र, निवारा एवढ्या गोष्टी सुखी व्हायला पुरेशा असतात... पण एखाद्या दुःखद घटनेमुळे जीवनात अन्नाची भ्रांत आणि वस्त्रनिवाऱ्याची कमतरता झाली तर माणूस विवंचनेत सापडतो... तो कधी परमेश्वराचा धावा करतो... कधी मानसिक आधार शोधतो... एका असहाय, निराधार अवस्थेत जीवनाची वाटचाल करताना एखाद्या धीर देणाऱ्या शक्तीची त्याला गरज वाटते... काहीजण अयोग्यपणे तंत्र-मंत्र-भविष्य यातही अडकतात... 

तारूण्याच्या वाटेवर असताना विवेकानंददेखील प्रापंचिक विवंचनेत सापडले... त्यावेळी परमेश्वराच्या साकार रूपावर त्यांचा विश्वास नव्हता, पण कालीमातेची उपासना करणाऱ्या श्री रामकृष्णांवर त्यांची पूर्ण श्रद्धा होती... मग रामकृष्णांनी कालीमातेकडे घरच्या माणसांच्या अन्नवस्त्रांसाठी प्रार्थना करावी, अशी त्यांची इच्छा होती... पण रामकृष्णांनी त्यास नकार दिला... नरेंद्रानेच कालीमातेजवळ तशी प्रार्थना करावी असे त्यांनी सांगितले... 

गुरुदेवांच्या आज्ञेखातेर ते कालीमातेपुढे गेले खरे, पण देवीचे साकार निर्गुणरूप पाहून... प्रपंचासाठी काही मागण्यापेक्षा मुखातून शब्द बाहेर पडले... 'आई, मला विवेक दे, वैराग्य दे, ज्ञान दे, भक्ती दे..' याउलट आपण देवापुढे आठ आणे किंवा काही रुपये देऊन, यातही काहीजण मंदिरे, देवळे, आश्रम काढून... न कळलेल्या अहंकाराने उत्तम सुख, मान, प्रतिष्ठा, नकळतपणे मागतात... पण समाजाच्या संसारासाठी ज्ञान, भक्ती आणि विवेकाची मागणी करणारे विवेकानंदजी सारखा साधक विरळाच...

माणूस सतत ज्यांच्या सहवासात वावरतो आणि जे आत्मचिंतन करतो, त्यातून त्याचे आंतरिक व दर्शनी रूप तयार होते... 'गुरू तेथे ज्ञान । ज्ञानी आत्मदर्शन । दर्शनी समाधान । असे तेथे ।' या ज्ञानोबांच्या ओवींची येथे प्रचीती येते... 

आत्मचिंतन हा 'स्व' शी साधलेला संवाद असला तरी ते 'स्व' मध्ये अडकणे नसते... आपला खरा अभ्यास होत गेला कि कळेल... 'स्व' मध्ये अडकलेला माणूस आणि तुरूंगातील कैदी दोघेही आत्मसुखापासून वंचित असतात... स्वकेंद्रित माणसे दुसऱ्यावर खरे प्रेम करू शकत नाहीत... ते स्वतःची उदात्त प्रतिमा तयार करतात... आपली मते, तत्वे आणि धारणा करवितात... त्या प्रतिमेला कोणी तडा दिला तरी ती संतापतात... वास्तविक उच्चपद येऊनही जे विनम्रता जपतात... स्वःता सर्व गोष्टी नम्रतेने करू शकतात... त्यांची उंची पदापेक्षा मोठी असते... पण लायकी नसताना एखादे पद मिळाले तर त्या पदाचा अहंकाराच त्रासदायक ठरतो... अहंकाराचा अंधार दूर करण्यासाठी आत्मकेंद्रीपणा सोडण्याची आणि आत्मपरीक्षणाने आत्मसंवाद साधण्याची गरज असते...

आजच एका ज्येष्ठ साधकाने केलेली प्रार्थना वाचली... हे प्रभो... आता या वयात, प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक विषयावर मी मतप्रदर्शन केले पाहिजे असे नाही... मीच सर्वांना घडविण हा माझा भ्रम दूर कर... साहजिकच सर्वांना सरळ करण्याच्या सवयीपासून मला सावर... मला योग्य विचारशीलतेचे वरदान दे... दुसऱ्यांवर प्रभुत्व न गाजविता मी सेवातत्पर असावे... तिरसट काथ्याकूट न करता मी नेटकेपणाने प्रश्नाला भिडावे... एखाद्या गोष्टीबद्दल दुमत होईल, तेव्हा नमते घेण्याची सुबुद्धी मला दे... कधी कधी माझंही चुकतं, हा जीवनाचा मंत्र मान्य करायला शिकव... अनपेक्षित ठिकाणी चांगुलपणा पाहण्याची आणि तिऱ्हाईत व्यक्तीमधील गुणांचा गुणाकार करण्याची निर्मळ नजर दे आणि हे प्रभो, सदा सर्वांबरोबर शुभ बोलण्यासाठी प्रेरणा दे..!..' 

किती सुरेख आणि प्रांजळ प्रार्थना आहे... ज्ञानरूपी आत्मचिंतनातून स्फुरलेल्या अशा प्रार्थना जीवनाचे सौंदर्य आणि सामर्थ्य वाढवितात... आपण हि प्रार्थना सद्गुरुचरणी उतारवयात कशाला, आजच का करू नये... आज योग्यमार्गी चाललो तर ज्ञानी आत्मदर्शन आणि गुरु दर्शनी समाधान हे लाभेलच... ॐ श्री गुरुदेव दत्त...

No comments:

Post a Comment