Friday, 6 April 2012


निर्हेतुक कर्मे कशी करावी…….?

यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यंते सर्वकिल्बिषैः ।

भुंजते ते त्वघं पापा ये पचंत्यात्मकारणात्‌ ॥ गीता ३:१३ ॥

कित्येकवेळा असा अनुभव येतो की कर्माची सुरुवात करताना आपल्या मनात उदात्त भावना असते…… परंतु स्वतःच्या परोपकारी कर्मांचे कौतुक केव्हा होईल….. या वरकरणी रास्त दिसणाऱ्या अपेक्षेत आपल्या मनातील निर्हेतुक बुद्धी कधी नष्ट होते….. ते आपणास कळतसुद्धा नाही….. एकदा मनात कितीही छोट्या अपेक्षेचा प्रवेश झाला की कधी तीचे रुप आक्राळविक्राळ होते….. याचा थांगपत्ता कोणालाही लागत नाही……

उदाहरणार्थ, ‘आपले कौतुक व्हावे’ या अपेक्षेचे ‘दुसऱ्याचे कौतुक करण्याची काय गरज होती...?  या भावनेत सहज रुपांतर होते…… आणि त्यातून प्रत्येकाच्या वागण्यातील दोष बघण्याची नजर बनते…. समाजातील बहुतांशी लोकांत दुसऱ्यांचे दोष बघण्याची जी वृत्ती आहे….. त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे त्यांच्या मनातील ‘आपल्या कर्मांची कुणाला जाणीव नाही’ ही भावना होय…. 

इथे मुद्दा जर सूक्ष्म आहे म्हणून स्पष्ट करावासा वाटतो…….. वरील विवेचनातून आपल्या कर्मांचे कौतुक न करणाऱ्या माणसांचे समर्थन करावयाचा उद्देश नाही…… त्यांचे तसे वागणे चुकीचेच आहे…… पण आपली शाबासकीची अपेक्षासुद्धा तेव्हढीच चुकीची आहे...  असे फक्‍त सांगायचे आहे…… जी माणसे योग्य कर्मांची नोंद घेत नाहीत….. त्यांना या अपकर्मांची फळे भोगावी लागणार आहेतच….. पण आपणसुद्धा फलापेक्षेत गुंतल्याने भगवंतापासून दूर होत आहोत असे इथे म्हणायचे आहे……. आणि शेवटी स्वतःची काय अवस्था होणार इकडे लक्ष देणे महत्वाचे आहे……. इतरांच्या अवस्थेकडे लक्ष द्यायला ते समर्थ आहेतच! असो……

असे सांगावयाचे आहे की निर्हेतुक कर्मे करणे....  अत्यंत अवघड आहे कारण निव्वळ कर्मांचा आरंभ करताना अपेक्षेचा अभाव असणे पुरेसे होत नाही…… अशी कर्मे करीत असतानासुद्धा निरपेक्ष रहायला हवे आणि याहून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कर्मे संपल्यावर त्यांच्याबद्दल संपूर्ण विस्मृती झाली पाहीजे……… नाहीतर भूतकालात केलेल्या कर्मांची आठवण होऊन परत कुठलीतरी अपेक्षा निर्माण होते….. बहुतांशी लोक स्वभावतःच आरंभशूर असल्याने ‘कर्मे निर्हेतुकपणे करण्याचा योग (कर्मयोग)’ करायची इच्छा असूनही त्यांना तो करणे अशक्य होते……. 

एखाद्या तत्वाकरीता विना आक्रोश आयुष्यभर खस्ता काढण्याची सात्विक वृत्ती ज्यांना उपजतच प्राप्त आहे अशा भाग्यवान लोकांनाच खरा कर्मयोग करणे शक्य होते…… आणि ते भरभर स्वतःची प्रगती करुन घेऊन भगवंतचरणी लीन होतात…… आपल्यासारखी सर्वसामान्य माणसे जास्तीतजास्त नव्वद टक्के कर्मे निर्हेतुक करतात आणि बाकीच्या दहा टक्के कर्मांमुळे परत सांसारीक बंधनात अडकतात……. 

ज्याप्रमाणे पुराणातील कथेमध्ये बळीराजाच्या टाचेवरील छोट्याश्या धुलीकणातून कलीने बलिराजात प्रवेश केला…… आणि त्याचा परीणाम कलीयुगाची सुरुवात होण्यात झाली त्याचप्रमाणे आपल्या मनातील निरंतर अस्वस्थतेचे मूळ आपली हेतुपूर्वक केलेली अल्प कर्मे आहेत……. जोपर्यंत कर्मफलाच्या अपेक्षेचे प्रमाण संपूर्णपणे शून्य होत नाही....  तोपर्यंत आपण या जगाच्या रहाटगाडग्यात फिरत राहणार आहोत…… हा संसार जर एक परीक्षा समजली तर असे म्हणा की या परीक्षेत शंभरापैकी अर्धा गुण जरी कमी पडला तर आपण नापास आहोत…….

वरील श्लोकातून ही वस्तुस्थिती भगवान श्रीकृष्ण आपणास सांगत आहेत……. ते म्हणत आहेत की: (कर्मयोगाच्या) यज्ञातून निर्माण झालेल्या समृद्धीचा विनियोगसुद्धा निर्हेतुक बुद्धीने केला....  तरच सर्व पापांपासून मुक्‍तता मिळते……. परंतु (योग्यरीतीने यज्ञ करुनसुद्धा) स्वतःच्या भोगाकरीता यज्ञफलाचे विनियोग करणारे पापच खातात …...

पराकाष्ठेचा प्रयत्‍न करुनसुद्धा आपल्या मनात अहंकाराची वृद्धीच का होते....  याचे कारण इथे सांगितले आहे…... स्वतःच्या देहावर आणि मनातील भावनांवर आधारीत आपल्या अपेक्षांकडे आपुलकीने बघणे म्हणजे अहंकार होय…… मग या अपेक्षा कितीही रास्त वाटल्या तरी त्यातून आपला अहंकारच जोपासला जात आहे….. हे जाणून अत्यंत निष्ठूरपणे आपण सर्व अपेक्षांकडे दुर्लक्ष करणे..... हा एकच अहंकारापासून सुटण्याचा उपाय आहे……..

माझे सर्वांनी कौतुक करावे ही अपेक्षा असो …… किंवा माझ्या हातून वृद्ध पालकांची योग्य देखभाल झालीच पाहिजे....  हा अट्टाहास असो या दोन्ही अपेक्षांत तात्विकरीत्या काही फारक नाही….. कारण या दोन्हीही आपणास मानसिक शांतीपासून दूर नेणाऱ्या आहेत……. “आपल्या हातून जी कर्मे होऊ शकतात तेव्हढी अत्यंत प्रामाणिकपणे करुन पुढील सर्व घडामोडींकडे तटस्थपणे पहात राहणे……. आणि त्याचवेळी जे योग्य असेल ते करीत राहणे”  हा उपाय सर्व संतांनी सांगितलेला आहे…… आणि त्याचे मूळ भगवंतांच्या वरील उच्चारांमध्ये आहे असे वाटते…….

ॐ श्री गुरुदेव दत्त ......

No comments:

Post a Comment