Monday 2 April 2012


एकमेकां साह्य करु, अवघे धरु सुपंथ…………

समोर आलेली कर्मे निरपेक्षपणे करण्याच्या यज्ञाने या जगातील सर्व शक्ति संतुष्ट होतात व आपोआप त्या आपली काळजी घेतात……. अशा रीतीने तुम्ही देवांची आणि देव तुमची काळजी घेत दोघेही परमप्राप्ती करुन घेतात (११)….. 

परंतु तुमच्या यज्ञाने संतुष्ट होऊन तुम्हाला इष्ट असलेले भोग मिळाले की तेसुद्धा तुम्ही सर्वांबरोबर विभागून मग जे उरेल त्याचा उपभोग घ्यायला हवा. कुणाला न वाटता मिळालेले भोग एकट्याने उपभोगणे म्हणजे चोरी करण्यासारखे आहे (१२)……. Geeta

स्वतःच्या लाभासाठी दुसऱ्यांच्या जीवनात निष्ठुरपणे दुःखद प्रसंग आणणाऱ्या माणसांबद्दलच्या बातम्या वाचतो तेव्हा आपल्या मनात विषण्णतेची भावना येते……. कितीही गरीबीत असलो तर अशा वाममार्गाने पैसे मिळविणे स्वतःला शक्यसुद्धा होणार नाही याची खात्री आपणास असते…..

खरोखर दुसऱ्यांच्या जीवावर धोका उत्पन्न करुन स्वतःची प्रगती करणे अतिशय निंदास्पदच आहे. परंतु आपणा सर्वांच्या जीवनाचा पाया अगदी असाच आहे ही एक दारुण वस्तुस्थिती आहे……. ज्याप्रमाणे देशी दारुत भेसळ करणे चुकीचे आहे त्याचप्रमाणे समोरील रुग्णाला कारण नसताना सर्व चाचण्या करायला लावून ज्या कंपनीने आपणास सर्वात जास्त सूट दिलेली आहे तीची औषधे घ्यायला सांगणेही चुकीचे आहे… हो की नाही?

अगदी लहानपणापासूनची आपली वर्गात पहिला यायच्या धडपडीतसुद्धा बाकी सर्वांना आपल्यापेक्षा कमी गुण मिळायला हवेत अशी इच्छा आहेच की…… नोकरीत एकालाच बढती मिळणार असेल तर बाकी सर्वांना सोडून आपले नाव यावे या इच्छेतसुद्धा इतरांच्या नाराजीचा पाया आहेच…….. लक्षात घ्या की वर्तमानमनाला हादरवून सोडणाऱ्या सर्व घटना आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वमान्य गोष्टींचेच एक अत्यंत पराकोटीचे रुप आहे………

आता तुम्ही म्हणाल की काही मर्यादेपर्यंत दुसऱ्यांना त्रास देऊन स्वतःची प्रगती करुन घेणे ठीक आहे…….. परंतु जीव जाईल इतपत त्रास देणे चुकीचे आहे… परंतु हा आक्षेप निव्वळ बाह्यकृतींवर आधारीत आहे……. तात्विकरीत्या आपण सर्वांनी जणू मान्यच केलेले आहे की आपले सुख दुसऱ्यांच्या दुःखावरच उभे राहणार आहे…….. आपल्या मनातील नैतिकताआपण इतरांना कितपत त्रास देतो यावर अवलंबून आहे……. त्रास अजिबात न देण्यावर नाही…… आणि ही गोष्ट अनादी काळापासून चालू आहे…….

म्हणूनच जेव्हा येशू ख्रिस्ताने ज्याने पाप केले नाही त्यानेच या व्यभिचारीणीवर दगड मारावेतअसे म्हटल्यावर कुणाचीही दगड उचलायची हिम्मत झाली नाही…….. इथे कदाचित तुम्ही असे म्हणाल की या जगात रहावयाचे असेल तर स्वतःच्या प्रगतीकरीता सतत जागरुक राहणे अत्यावश्यक आहे……..

दुसऱ्यांचाच विचार करीत बसलो तर दोनवेळा पोटभर खायला मिळणेही कठीण होईल……… यावर मूलभूत उत्तर असे की जरी तुम्ही खरोखर फक्‍त इतरांच्या भल्यासाठी झटलात तर कधीही तुम्हाला दोनवेळच्या खाण्या-पिण्याची ददात पडणार नाही…...

परंतु तुमचा मुद्दा नुसत्या पोट भरण्याचा नाही……… सध्या सहजपणे अध्यारुत धरलेल्या सुखसोयीसुद्धा तुम्ही पोट भरणेया शब्दांत सामाविष्ट केल्या आहेत……. तो मतितार्थ लक्षात घेऊन असे म्हणावेसे वाटते की जरी तुम्ही इतरांसारखे जगत असलात तरी त्यांच्याप्रमाणे असे जगण्यातच जीवनाचे सार्थक आहे असे समजणे तरी थांबवू शकता ना… देहाने जी कर्मे केली आहेत त्याशिवाय अधिक काही करणे अशक्य आहे असे मानणे तुम्ही थांबवू शकता……… 

असा विचार करणे म्हणजे परमार्थाच्या मार्गावर पदार्पण करणे आहे……….एकदा मनात स्वतःचे परकीयांना त्रास देऊन स्वतःचे सुख मिळविणेअसे वर्तन अजून चांगले होऊ शकते हा विचार स्थिर झाला की जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण सहिष्णुतेने वागायला लागतो……… काही काळाने दया कशी सतत दाखविता येईल किंवा मला झालेला लाभ इतरांबरोबर कसा वाटून घेता येईल याबद्दल सतत चिंतन सुरु होते………

अशावेळी माझी विचारसरणी सर्वसामान्यांपेक्षा किती वेगळी आहे अशी जाणीव ठेवण्याचा अहंकार वाढण्याचा धोका असतो…….. या दोषावर उपाय म्हणजे आज विवेचनाला घेतलेले श्लोक आहेत…….. इतरांना साह्य करुन मग स्वतःचा विचार करणे हा आपणा सर्वांचा धर्मच आहे…….. आपण सोडून बाकी तसे वागत नसले तरी आपले तसे वागणे नैसर्गिक आहे……. त्यात विशेष काही नाही असे भगवान या श्लोकांतून आपणास सांगत आहेत……..

भगवान म्हणत आहेत की: समोर आलेली कर्मे निरपेक्षपणे करण्याच्या यज्ञाने या जगातील सर्व शक्ति संतुष्ट होतात व आपोआप त्या आपली काळजी घेतात……. अशा रीतीने तुम्ही देवांची आणि देव तुमची काळजी घेत दोघेही परमप्राप्ती करुन घेतात (११)….. परंतु तुमच्या यज्ञाने संतुष्ट होऊन तुम्हाला इष्ट असलेले भोग मिळाले की तेसुद्धा तुम्ही सर्वांबरोबर विभागून मग जे उरेल त्याचा उपभोग घ्यायला हवा. कुणाला न वाटता मिळालेले भोग एकट्याने उपभोगणे म्हणजे चोरी करण्यासारखे आहे (१२)……. 

लक्षात ठेवा की स्वकष्टानेमिळविलेली संपत्ती निव्वळ स्वसुखाकरीता वापरणे चोरी करण्यासारखे आहे…….. खरे म्हणजे फक्त स्वतःच्या कष्टांनीच आपणास लाभ झाला आहे असे म्हणणेच बरोबर नाही….. कारण आपल्या इतकेच कष्ट केलेल्या सर्वांना आपल्याप्रमाणे लाभ झालेला आहे…. असे दिसून येत नाही किंवा आपणापेक्षा कमी कष्टात काहीजणांना जास्त लाभ झाला आहे असे दिसते……. याचा अर्थ असा की आपल्या प्रयत्‍नांखेरीज जरुर काही इतर शक्‍ती आपणास मदत करत असल्यानेच आपणास फायदा झालेला आहे……. या शक्‍तींना नशिबया शब्दात गुंडाळून इतरांकडे दुर्लक्ष करायचा निर्णय आपला वैयक्‍तिक आहे हे ध्यानात ठेवा……. भगवंतांनी आपल्या या विचारसरणीचे समर्थन केलेले नाही! तेव्हा वरील श्लोकांवरुन आपणास असे शिकता येईल की………

१. स्वतःच्या लाभासाठी परक्यांना कष्ट देणे अपरिहार्य आहे असे मानणे चुकीचे आहे…
२. जेव्हा सर्व जीवांची उन्नत्ती होते तेव्हाच प्रगती झाली असे म्हटले पाहिजे कारण भगवंताच्या दरबारात सर्वांना एकसारखे लेखले जाते…….
३. स्वधर्माचे निरंतर यज्ञाप्रमाणे पालन करणे हा एकच उपाय आहे…….

ॐ श्री गुरुदेव दत्त ......

No comments:

Post a Comment