Monday 2 April 2012


राग एक भावना ..... एक समस्या ..... 

आज विचार करू या, राग म्हणजे काय.... एक मानसिक विचारच.... एक तीव्र भावना....  बघा, या भावने मध्ये... वैतागणे, अपमान, तिरस्कार, आक्रमकता, संतापणे, धुमसणे या भावनांचा समावेश होतो.......

बघा, रागाच्या भरात नको असलेली कॄती करुन झाली की मग आपल्याला वाईट वाटते, असे करायला नको होते असे वाटते.... आपले आपल्या रागावर नियंत्रण हवे असे वाटते.... त्या क्षणी आपण ठरवून टाकतो की यापुढे रागवायचे नाही...पण...असे होत नाही ना, अर्थातच राग यायला आपण काही संत महात्मे नाही ना... कारण आपण राग आवरू शकू या पायरीवर पोचलेलो नसतो.... मनाविरुद्ध झालेल्या कॄतीवर आपण राग या भावनेद्वारे व्यक्त होतो इतकेच...

मित्रांनो... तरीही जसं जसे आपण वयाने आणि अनुभवाने वाढत जातो तस तसे आपण आपला राग आटोक्यात ठेवायला शिकतो.... रागाचा योग्य वापर करायला देखील शिकतो..... रागावून आपला तोल सांभाळायला आपण शिकतो.... पण आलेल्या-झालेल्या रागानंतर येते ते नैराश्य त्यामधे असमाधान, अनुत्साह, पश्चाताप, हतबलता, अपराधीपणा, निराशा या भावना असतात..... नैराश्य ही भावना आपल्याला खरोखरच नकोशी असते आणि यातून बाहेर पडायला आपल्याला मनाची तयारी करून खंबीर रहायला शिकावे लागते......

बघा, एकदा का आपण निराशेने घेरलो गेलो की काही वेळाने मन त्यात बुडून जाते आणि मनाला त्यामधे रहायला आवडायला लागते..... स्वतःची कीव करत मन अजून अजून खोलात जायला लागते..... असे खोलात जात असतानाच अचानक मनाला हे योग्य नाही हे कुठल्यातरी क्षणी जाणवते...... आणि मग मन त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करु लागते.... असा तो जाणीवेचा क्षण जितका पटकन येइल तितके पटकन आपण त्या निराशेतून बाहेर पडू शकतो, अनुभवाने आपल्याला ते ही जमू लागते आणि आपल्या मनाशी आपल्याला कमी झगडावे लागते......

बघा, एखादी गोष्ट मनाविरुद्ध किंवा मनासारखी होत नसेल तर त्याला आपण समस्या म्हणूया. ....अशा वेळी त्या समस्येतून मार्ग काढणे हे आपले उद्दिष्ट असावे...... समस्या आली आणि तिला प्रतिसाद म्हणून आपण React झालो की परिणाम राग...... याउलट Act झालो तर त्यावर उपाय सापडेल......

परंतु कुठली गोष्ट योग्य आहे आणि कुठली अयोग्य हे ठरवितानाही विवेक लागतो......विवेक म्हणजे सारासार विचार करण्याची बुध्दी...... मनावर ताबा जरुरी असतो...... चर्चा करताना किंवा बोलताना आपल्याला राग येईल असे वाटले की लगेच विषय संपवून शांत व्हा..... कधी वादविवाद करू नका.....

आज जर तुम्ही साधक असाल तर या भावनेवर control हवाच....  केव्हा राग येतो हे बघायला साधकाने सुरुवात केली पाहिजे....... मग राग येण्याची कारणे दिसू लागली की का ही कारणे राग उत्पन्न करीत आहेत यावर नजर टाकली पाहिजे...... त्यानंतर राग येण्याच्या कारणांना आपणच महत्व दिले आहे..... असे कळल्यावर का आपण महत्व दिले आहे यावर चिंतन केले पाहिजे.......

स्वतःच्या रागावर ताबा मिळवायला हवा या इच्छेचे सर्वात सूक्ष्मरुप शोधून त्याचे ज्ञान करुन घेण्याचा संयम ज्याला आहे तो खरा विवेकी असतो.......असे समर्थ रामदासानी सांगितले आहे.......

विवेकाने क्रोधावर विजय मिळविता येतो..... तुम्हाला कोणी कुत्रा किंवा गाढव म्हटल्यावर तुम्हाला वाईट का वाटते...? दुस-याने म्हटले म्हणून तुम्ही चार पाय एका शेपटीचे कुत्रे थोडीच बनता ?.... हे तर हवेत झालेले शब्दांचे स्पंदन आहे..... या रितीने विचार केल्यास राग आपोआप शांत होतो...... तुम्ही सतर्क सजग झाले तर रागाला संधीच मिळणार नाही......

जे नैतिक दृष्ट्या कायम सर्वाना कल्याणकारक आणि आनंददायी आहे ते चांगले.......असा विवेक जागा करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करू या...... सद्गुरू आपल्या पाठीशी आहेतच.....

ॐ श्री गुरुदेव दत्त ........

No comments:

Post a Comment