Monday 2 April 2012


बिनखर्चाची उपासना म्हणजे नामस्मरण ........

नवविधा भक्तीमधील नामस्मरण भक्ती वर्तमान कलियुगात सहज, सोपी उपासना आहे.... याबाबत समर्थ रामदास म्हणतात :

स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे नामस्मरणे पावावे समाधान ।। 

देवाचे स्मरण करा.... यासाठी नामात रहा यातून तुम्हाला समाधान मिळेल.... अशी ग्वाही समर्थ देतात...... सहज, सोपी, कोणत्याही वेळी, कुणालाही, कुठेही करता येणारी बिनखर्चाची उपासना म्हणजे नामस्मरण..... हेच या उपासनेचे वैशिष्ट्य आहे... गीतेमध्ये भगवंतानी अर्जुनालायज्ञानां जप यज्ञोस्मिम्हणजे सर्व यज्ञांमध्ये जप अर्थात नामस्मरण श्रेष्ठ असे सांगितले आहे....... अखंड नामस्मरणाचे श्रेष्ठत्वच सांगितले आहे.....

प्रथमं नामचिंतनम् व्दितीयं शास्त्रचर्चा

तृतीयं पूजाअर्चा कनिष्ठं तीर्थयात्रा ।।

असे संस्कृत वचन आहे.... हे वचनही नामस्मरणाचे श्रेष्ठत्व सांगते... नामचिंतन हे या सर्वांपेक्षा निराळे आहे.... ‘नामया शब्दातील ना या दोन अक्षरांची उलटापालट केली तरमनाशब्द तयार होतो... मनाला उत्तम घडविण्याचे कार्य नामस्मरण करते... सद्गुणांच्या सद्विचारांच्या आधारे आपले व्यक्तिमत्त्व प्रकाशमान करण्यासाठी नामस्मरण अत्यंत उपयोगी ठरते... 

आपल्या मनातील विकारांचे उच्चाटन करण्यासाठी नामसाधना प्रभावी आहे..... नामात साधक एकरूप होत असल्याने अहंकाराचा नकळत लय होतो..... अहंकार गळला म्हणजे संकुचितपणाही नाहीसा होतो..... संकुचिततेकडून व्यापकतेकडे जाण्यासाठी नामस्मरणाच्या मार्गाने होणारी प्रगती ही सूक्ष्म मार्गावर होणारी प्रगती असते..... 

आनंदाचे दुसरे नाव समाधान आहे..... वैज्ञानिक अंगाने समाजाची खूप प्रगती होत आहे..... नानाविध वैज्ञानिक साधने सुख देत आहेत..... परंतु, तरीही खरे समाधान मानवाला नाही..... हातून गेलेल्या भूतकाळाची अकारण आठवण आपण करतो..... उद्याच्या भविष्याची अनावश्यक चिंता आपण करतो...... पण समोरचा वर्तमान आनंदाने जगण्याची परिस्थिती असताना आपण त्या वर्तमानाला दुर्लक्षित करतो..... यामुळेच समाधानाची जागा असमाधान घेते..... 

भगवंताच्या नामस्मरणाने मनाला वर्तमानाचा आनंद उपभोगण्याची शक्ती आणि दृष्टीही मिळते..... नामस्मरणात विज्ञानही आहे आणि अध्यात्मसुद्धा...... नामस्मरण हे अध्यात्म आणि विज्ञानाचे सार आहे, म्हणूनच अत्यंत साधा वाटणारा..... पण, मोठय़ा अधिकाराला नेऊन पोहचविणारा तो अव्दितीय मार्ग आहे..... प्रचिती पाहिजे असेल तर नामस्मरण अनुभव घ्यावाच लागेल..... हे लक्षात ठेवावे..... 

श्री गुरुदेव दत्त ........

No comments:

Post a Comment