Monday 2 April 2012

निर्मुक्त : चिंतामणी - “मी”... 
आयुष्यात सगळ काही "मी" करू शकतो असा गोड़ गैरसमज असलेली लोक असतात... मीही त्यातलाच एक कधीकाळी होतोच... पण थोड्या  आवाक्याबाहेर असणाऱ्या किंबहुना समजण्यापलिकडे असणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात, जिकडे "मी" मीरवताना दुर्लक्ष होते...
ज्याप्रमाणे कोणाच्या पोटी जन्म घ्यावा ह्याचा हक्क मनुष्याला नाही... त्याचप्रमाणे मरणाबद्दलचा सुद्धा... जशा जन्म अणि मृत्यु ह्या गोष्टी प्रत्येकावर थोपवल्या जातात... त्याचप्रमाणे 'आयुष्य', वैयक्तिक जीवन, एकटेपण, जबाबदाऱ्या, विचार, मैत्री, नाते, बंधने अशा बऱ्याच गोष्टी माणसावर लादल्या जातात... त्यातली प्रत्येक गोष्ट लादलीच जाते असे नाही... पण यातली प्रत्येक गोष्ट किंवा एकापेक्षा जास्त गोष्टी कोणा ना कोणावर तरी लादल्या जातातच... बाकी गोष्टी माणुस स्वीकारतो किंवा त्याही स्वीकारण्यास भाग पडले जाते... 
अर्थात त्या लादलेल्या गोष्टींची किंमत लादणाऱ्यापेक्षा, ज्यावर लादल्या गेल्या तोच आयुष्यभर भरतो... इथे मनुष्याची या संदर्भातली दुर्बलता कळते... म्हणूनच माणुस नियती पुढे लाचारच असतो... त्याची जाणीव कोणाला असते वा कोणाला नसते, कोणी जाणीव करून घेतो व कोणी मुद्दाम त्याकड़े डोळेझाक करतो...

माणुस स्वःताचे भविष्य घडवतो म्हणजे काय..?.. निर्भिड होउन, प्रत्येक अडचणीना योग्य वेळी, योग्य निर्णय घेउन आलेल्या संधीला / वेळेला सामोरे जातो आणि त्याचे फलित त्याला चांगले किंवा वाइट मिळते... आता सामान्यपणे भविष्य घडवले म्हणजे चांगलेच फळ... माणुस नेहमी 'मी' हा निर्णय घेतला, 'मी' असे केले - तसे केले, प्रयत्नांची पराकाष्ट केली अणि 'हे' घडवले याचा डंका मिरवतो... पण पराकाष्टा करण्याआधी जर नियतीने तुम्हाला ती संधीच नसती  दिली तर..?.. प्रत्येकवेळी नियती संधी देऊन आपल्यासोबत खेळ खेळत असते... अणि त्या खेळाचे निर्माते आपण असल्याच्या भासात आपण आयुष्यभर जगतो..?..  ॐ श्री गुरुदेव दत्त... 




निर्मुक्त : चिंतामणी - निसर्ग चिंतन...

निसर्गचिंतनातून आत्मचिंतन सुरू होते... त्यातून आत्मज्ञान अधिक व्यापक होते... विकासाच्या नव्या वाटा दिसू लागतात... त्यातून आपल्याला आपल्या मर्यादाही कळू लागतात... आपली आत्मानुभूती जितकी सखोल होईल, तितकी करुणा व जगाविषयीचे अद्‌भुत प्रेम जन्माला येईल... माणसाचे प्रेम तेव्हाच जागृत होते, जेव्हा त्याची आत्मानुभूती विस्तारत जाते... स्वतःच्या पलीकडे जाणे म्हणजे विश्‍वच होणे होय... आपण आणि आपले बाह्य विश्‍व यांत एक अनाकलनीय "भीती' उभी असते... ही भीतीच आपल्याला जगावर प्रेम करू देत नाही... ही भीती स्वनिर्मित असते... भ्रमनिर्मित असते... आपण जगाकडे चुकीच्या पद्धतीने पाहतो आणि आपल्याला जगाचे चुकीचे आकलन होते... 

समोरची व्यक्ती आपल्याला शत्रू वाटू लागते... हे बाहेरचे जग जणू आपला छळ करण्यासाठीच जन्मले आहे, असे वाटते... आपली प्रगती रोखणारी कुठली तरी त्रयस्थ शक्ती आपल्या दारात उभी आहे, असा आपल्याला भास होतो... परंतु जग आपल्यापुढे फुलांची ओंजळ घेऊन उभे आहे, हे आपल्या लक्षात येत नाही... 

रोज उगवणारा सूर्य आपल्याला शुभेच्छा देण्यासाठीच आपल्या दारात येतो... परंतु त्याचे प्रेम आपल्याला कळू शकत नाही... गुलजारांची एक कथा आहे... एक भयग्रस्त मुस्लिम तरुण रेल्वेच्या डब्यात एकटाच आहे... बाहेर दंगलीच्या ज्वाळा भडकलेल्या आहेत... त्याच्या हातात सुरा आहे... तो स्वसंरक्षणार्थ दबा धरून बसलेला आहे... भीतीने तो थरथरतही आहे... समोरून असाच एक दांडगा तरुण त्याच्याकडे येत आहे.. दोघेही एकमेकांकडे पाहतात... थरथरतात... घाबरतात आणि शेवटी निकराचा हल्ला करतात... या अल्लाह... मर्मान्ती घाव घेऊन जेव्हा एक कोसळतो, तेव्हा त्या तरुणाच्या लक्षात येते... अरे, हा तर आपलाच मुस्लिम बांधव होता...

माणसाची भयग्रस्तता अशी आंधळी असते... येणारी व्यक्ती आपली मित्रही असू शकते, परंतु त्यावर आपला विश्‍वास नसतो... आपल्या चुकीच्या संस्कारांमुळे, सांस्कृतिक संचितांमुळे, पूर्वग्रह आणि पूर्वद्वेषामुळे माणसाला वस्तुस्थितीचे यथार्थ आकलन होत नाही... आपल्याला वस्तुस्थितीचे यथार्थ ज्ञान होण्याची आवश्‍यकता असते... त्यासाठी योग्य मानसिकता तयार होणे आवश्‍यक असते... भीती कशातून निर्माण होते, हे समजल्याशिवाय तिचे निराकरण करणे अशक्‍य असते...

आपली अस्तित्वप्रक्रिया समजल्याशिवाय जीवन-मृत्यूचे सखोल ज्ञान होणार नाही... हे जग परस्पर-संवादावर, सह-अनुभूतीवर, सहकार्यावर उभे आहे... ज्याक्षणी हा परस्पर-संवाद संपेल, सह-अनुभूती संपेल, सहकार्य संपेल, त्या क्षणी हे जग आणि संपूर्ण विश्‍व नष्ट होईल... म्हणून जाणायचं की, आपण आहोत पाहुणे या जगातील. वागायचं इतक्‍या नम्रतेने आणि आर्जवाने... जणू काही वितळणारा बर्फच... सर्वांचा इतका करायचा आदर की, आपली असूच नये कुठली भूमिका... जाणायचा त्यातील समन्वय... खरेपणा... त्यातून प्रकट होणारे सत्य... आपण जणू आलो आहोत, कुणाच्या घरी आणि आपल्या यजमानाला आपल्याला थोडाही त्रास द्यायचा नाही... 

एखाद्या खोल दरीतल्या जलप्रपातासारखे जिथे विश्‍वाचे सर्व प्रवाह एकत्र येतात, त्यातून आपण होत असतो समृद्ध... एखाद्या गढूळ पाण्याच्या जलाशयाचे एखाद्या नितांत निर्मळ अशा निळ्याभोर सरोवरात रूपांतर व्हावे, तशी असावी आपली अवस्था... त्यासाठी जाणली पाहिजे तथ्यता आपल्याला प्रतीत होणारी... जग एखाद्या गढूळलेल्या पाण्यासारखे असते...

आपली दृष्टीदेखील स्पष्ट नसते... तेव्हा आपले आकलन किती मर्यादित स्वरूपाचे असते, याची आपल्याला कल्पना येत नाही... आपण घाबरतो आपल्या वरपांगी ज्ञानाला, या विश्‍वाला, विश्‍वातील प्रत्येक गोष्टीला... नदीमध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नाही जीव तेव्हाच जातो जेव्हा पोहता येत नाही... आपल्याला पोहता येत नाही आणि नदीतून पुढे पुढे गेलो कि समुद्राने उग्र रूप धारण केलेले... जेव्हा आपल्याला पोहता येईल, तेव्हा हा समुद्र आपला मित्र बनून जाईल... 


खरेतर जीवनात परिस्थिती कधीच समस्या बनू शकत नाही... समस्या तेव्हाच बनते जेव्हा आपणास परिस्थिती सांभाळता येत नाही... परस्पर संबंधांतील मैत्री आणि तिच्यावरील गाढ विश्‍वास म्हणजेच ज्ञान होय... आपण समोरच्या वृक्षाशीही संवाद साधला तर तो आपल्याशी बोलू शकेल, अशीच ही विश्‍वव्यवस्था आहे... एक फुलपाखरू एका फुलाशी संपर्क साधते, त्यातून फळे निर्माण होतात... त्यातून बी आणि पुन्हा वृक्ष अशा महाजंगलाची निर्मिती होते... आपण जेव्हा हे जाणतो, तेव्हा त्या सानुल्या फुलपाखरांपुढेही नम्र होतो... ही विश्‍वात्मकता म्हणजेच जीवन आहे आणि आपल्या मृत्यू म्हणजेदेखील एका नव्या विश्‍वाला जन्म देणारी एक सर्जनशील प्रक्रियाच आहे... म्हणून ज्ञानी माणसे असतात समुद्रापेक्षाही सखोल... त्यामुळे त्यांना नाही ओळखता येत पृथक्‌ करून... म्हणून त्यांचे सामर्थ्य असते अपरंपार... मुख्य म्हणजे ते सामर्थ्य ज्ञानातून येत असल्याने टिकून राहते... त्याचा नाश होत नाही... ॐ श्री गुरुदेव दत्त... 


निर्मुक्त : चिंतामणी - मनशांतीसाठी आज सामाजिक स्तरावर निरनिराळे उपक्रम संस्था चालविल्या जातात… पण लक्षात ठेवा, घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते पण, पाणी त्याचे त्यालाच प्यावे लागते… तसेच इथेही आहे… बालकाला निरनिराळी कला कौशल्ये शिकविता येतात, परंतु; मन ताब्यात ठेवणे शिकवता येऊ शकत नाही… त्यासाठी स्वाध्याय, ज्ञान आणि वैराग्य ह्या तीन गोष्टींची आवश्यकता असते…

ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असल्या तरी याचे मूळ, सुखापेक्षा आयुष्यात मिळणाऱ्या कटू अनुभवात, दु:खात व नैराश्यात सामावलेले आहे… लोक दु:ख कमी करण्यासाठी स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करीत राहतात... काही काळासाठी कामाच्या गडबडीत दु:खाचा विसर पडतो, खरा पण पुन्हा 'येरे माझ्या मागल्या' असाच प्रकार घडतो...

आयुष्याची फिल्म पुढे सरकतच असते... आपण आकांत केला, रडलो, हसलो किंवा आनंदी राहिलो तरी परिस्थितीत काहीच फरक पडत नसतो... कारण आपल्याला दु:ख तेव्हाच होते जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेल्याची जाणीव मनाला होते... मग परिस्थिती हाताबाहेर आहे याची जाणीव जर होत असेल तर भावनांचे प्रकटीकरण का करावे..?.. तसे करून साध्य तर काहीच होणार नाही ही काळ्या दगडावरील रेघ असते...
परंतु; अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करायला माणसाने चुकू नये...

इथे आपला पारमार्थिक पाया उपयोगी येतो... तो जर मजबूत असेल तर निश्चितपणे स्वामी विवेकानंद यांचे वाक्य आपणास स्मरेल... “तुम्ही स्वतःला कमी समजण्याचे कारण नाही... ईश्वरनिर्मित चराचर सृष्टीचा तुम्हीही एक घटक आहात... तुमच्यामध्ये सर्व प्रकारचे सामर्थ्य सामावले आहे... ते ओळखायला शिकावे...” - स्वामी विवेकानंद...

अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करायला माणसाने चुकू नये... हे आत्मसात करताना वरील वाक्यानुसार हाही विचार व्हावा, आपण चराचर सृष्टीचे घटक आहोत आणि याच सृष्टीचा एक मुख्य नियम म्हणजे आमुलाग्र बदल हा आपणासही लागू आहे... ॐ श्री गुरुदेव दत्त...  







निर्मुक्त : चिंतामणी - ज्ञात..  अज्ञात..  दोष...

माणसाच्या आयुष्यात जीवन जगतांना साधारणपणे कीती तरी प्रकारे देहबुध्दि चे भाव / वाईट कर्म.... क्षणा-क्षणाला माणसाच्या हातुन जाणते किंवा अजाणते पणे घडतात........ त्या वाईट कृतींचे / अविवेकाचे आपण पर्वतचे पर्वत एकत्र करीत राहतो.......ते जो पर्यन्त दूर करणार नाही.... तो पर्यन्त परमेश्वर दर्शन कसे घडणार ...?

म्हणून काय सार व काय असार हे पाहून काय घ्यावे व काय सोडावे हे समजुन विवेकाने वागाव..... आणी समज होण्या करीतां सतत् नामस्मरण करीत असावे..... आपण आत्मबुध्दि कडे दूर्लक्ष करुन देहबुध्दिला महत्व देतो........ तेव्हा त्याच सार जाणून..... नको त्या दुर्गुणांना टाकण्याचा प्रयत्न करायला हवा.... 

अहंकर्तुत्व बुध्दिला सोडण्याचा प्रयत्न करावा..... जसे खडे काढल्या वाचून धान्य घेता येत नाही..... तसेच दोष काढल्या वाचून प्रव्रुत्ति मार्गशुध्द होत नाही..... दोष दोन प्रकारचे असतात.....ज्ञात आणि अज्ञात.... आपल्यामध्ये आंतरिक सुधारणा झाली, तरच खर्‍या अर्थाने आपल्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होतो.... हे आयुष्याचे खरे सूत्र लक्षात ठेवणे जरुरीचे आहे....

स्वतःतील दोष घालवून गुण वाढवणे.... ही आनंदी, समाधानी अन् यशस्वी बनण्याची सोपी युक्ती आहे.... या जगात कुठलीही गोष्ट दोषरहित किंवा काहीच गुण नाही अशी नसते..... प्रत्येकामध्ये थोडे गुण आणि थोडे दोष असतातच.... कुठलीच गोष्ट निर्दोष नसते.... म्हणून दोष नष्ट करा.... आणि गुणांचा विस्तार करा.... 

ज्ञात अज्ञात दोष म्हणजे..... माणूस ज्यावेळी प्रपंचात दंग असतो तेव्हा त्याला आत्मज्ञान होत नाही...... प्रपंचात दंग राहून अनेक अशी कार्य जी उचित नाही ती मनुष्य करतो.... पण अहंकारा मुळे मनुष्य त्यांना उचित समजुन करीत राहतो..... हेच ज्ञात अज्ञात दोष लक्षणे सोडून उत्तम गुण लक्षणांना आत्मसात करायचा प्रयत्न करुन जीवनसार्थक करावे......

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

No comments:

Post a Comment