Monday 2 April 2012


नामाची संगत ..... नाम-स्मरण गोडी .....

बदलत्या परिस्थितीनुसार आता जीवन धकाधकीचे झाले आहे. .... चंगळवादी संस्कृतीचे साम्राज्य प्रस्थापित झाले आहे..... अशा काळात अध्यात्माच्या या गोष्टी मनाला पटणे अशक् वाटते...... याची आवड असणाऱ्यांची, ओढ असणाऱ्यांची संख्याही कमी होत चालली आहे...... लोकांमध्ये धार्मिक वृत्ती जरूर आहे...... पण सध्या अंधश्रद्धा आणि अज्ञानाने लोक भरकटलेले आहे...... 

लोक अध्यात्माची वाट चुकलेले आहेत...... भक्ती म्हणजे काय हेच ते विसरले आहेत...... चंगळवादाने ते अधिकच अज्ञानी होत चालले आहेत....... अध्यात्माचा मूळ उद्देशापासून ते दूर चालले आहेत...... सध्याचे सणवार, उत्सव यामध्ये केवळ औपचारिकताच उरली आहे...... त्यामध्ये अध्यात्माचे अधिष्ठानच नसते...... पण भक्ती जर खरी असेल तर हे अज्ञान दूर व्हायला वेळ लागणार नाही..... मी म्हणजे आत्मा आहे...... याची अनुभूती यायला वेळ लागणार नाही..... तो चराचरांत सामावला आहे..... तो सर्वत्र आहे..... अविनाशी आहे..... याची अनुभूती हेच विश्वरूप दर्शन आहे..... केवळ भक्तीने हे विश्वरूप दर्शन सहज शक् आहे..... यासाठी अज्ञानाच्या अंधारात भक्तीचा उजेड पडणे गरजेचे आहे....... 

आपल्या मनाला हे चांगले ठाऊक आहे की जर त्याने नामाची संगत धरली तर त्याचे मरण निश्चीत आहे..... अशा परिस्थितीत बहिर्मन नामस्मरणा व्यतिरिक्त सर्व काही करावयास तयार होते..... माशी सर्व ठिकाणी बसते पण निखाऱ्यावर बसत नाही....तसेच मन सगळीकडे बसते.... पण नाम घ्यायला तयार होत नाही.....कारण नामात मनाचे मरण आहे.... 

नामात मनाचे मरण आहे म्हणजेच मनाची चंचलता नामस्मरण केल्याने मोडली जाणार आहे...... मनाचे असे वैशिष्ट्य आहे की मनाला सहजासहजी कोणतीही monotonous गोष्ट करायला आवडत नाही..... मनाला अशी सवय लागली आहे की, एका विषयाचा आस्वाद घ्यायचा मग त्याचा कंटाळा आल्यावर दुसरा विषय शोधायचा...... अशाप्रकारे जगाच्या पाठीवर जे अनेक विषय आहेत त्यांचा आस्वाद घेण्यासाठी मन आतुर असते........ 

मन विषयांच्या ठिकाणी जेव्हा स्थिर होते तेंव्हा ते स्वानंदच अनुभवत असते...... पण यातून त्याला स्वरूपाच्या ठायी असणारा आनंद .....त्या पातळीवरचा आनंद चाखता येत नाही म्हणून त्यात तृप्ततेचा अनुभव येत नाही......या मनाला शिस्त लावण्यासाठीच, त्याला स्वरूपाकडे वळवण्यासाठीच सर्व प्रकारच्या साधना निर्माण झाल्या आहेत...... नामस्मरण ही त्यातलीच एक साधना आहे.....

मी देह आहे अशी आपली समजूत किंवा कल्पना आहे...... ही कल्पना जन्मोजन्मीची आहे...... ही कल्पना म्हणजेच देहबुध्दी होय....... बहिर्मन याच एका कल्पनेवर पोसलेले असते पुष्ट झालेले असते...... ही जन्मोजन्मी पोसलेली कल्पना सोडून द्यावयास बहिर्मन भिते...... सद्गुरूंवरची श्रध्दा एकीकडे नामस्मरण करावयास प्रवृत्त करते तर त्याच वेळेस जन्मोजन्मी पोसलेली ही कल्पना आपल्या नकळत निरनिराळ्या सबबी पुढे करून नामस्मरणाचा आळस, कंटाळा, चालठकल करण्याचा प्रयत्न करते...... 

इतकेच नव्हे तर या जन्मोजन्मी पोसलेल्या कल्पनेमुळे हे सर्व होत आहे हे लक्षातही येत नाही...... त्यामुळे संत संगतीत राहूनही काही माणसे पूर्णपणे कोरडीच राहिलेली आठळून येतात..... त्यासाठी अट्टाहासानेच प्रयत्न करावयास लागतात...... सर्वसाधारण माणसे हा अट्टाहास करण्यात कमी पडतात...... याचाच परिणाम म्हणून सर्वसाधारण माणसाला नामाची गोडी लागू शकत नाही......

नामाला स्वतःची अशी काही गोडी नाही....... ती गोडी आपण निर्माण करावी लागते...... नामस्मरणात आपले हित आहे, त्याने आपल्याला स्वरूपापर्यंत पोहोचता येते...... मग या नामस्मरणाची गोडी का लागत नाही कारण स्वरूपाचे ज्ञान करून घेण्याची आपल्याला आवश्यकता वाटत नाही...... हे ज्ञान नाही करून घेतले तरी आपल्या दैनंदिन जीवनात आपले काही अडत नाही...... अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, शिक्षण, नोकरी, जोडीदार, मुले यांसारखी ती महत्वाची गोष्ट आहे असे आपल्याला वाटत नाही......त्यामुळे आपल्याला नामाचा ध्यास लागत नाही...... आणि त्याची आवश्यकताही वाटत नाही......

मनाकडे देहबुध्दी आहे...... ही देहबुध्दी कल्पनेतुन निर्माण झाली आहे तिला दृष्याचा आधार आहे..... स्वरूप चैतन्य -आनंदघन आहे पण ते ज्ञानेंद्रियांना अनुभवता येत नाही...... देहबुध्दीमुळे मनाला पैसा, किर्ती, प्रतिष्ठा, वैभव यांचे खुप आकर्षण वाटते..... 

खोट्या अहंकाराच्या प्रतिष्ठेच्या कल्पनांमध्ये मनाने स्वतःला अडकवून घेतले आहे.... इंद्रियांची तृप्ती करणे हेच मनाने जीवनाचे ध्येय बनवले आहे...... यामुळे मनाला आपण कोण आहे...मी कोण आहे ? हे जाणावे.... वगैरे प्रश्नांचे उत्तर मिळवावे असे वाटत नाही....... मग नामस्मरणाचे महत्व तरी कसे समजणार आणि त्याची गोडी तरी कशी लागणार ?...

मनाला नामस्मरणाचे महत्त्व समजत नाही म्हणून ते आळस करते..... आळस हा पारमार्थिक भौतिक दोन्ही प्रगतींचा शत्रू आहे...... संतांची देहाने संगत करावीच पण मनाने संगत करणे ही फार महत्त्वाचे आहे...... सतत नामस्मरण-प्रार्थना हीच खरी त्यांची संगत आहे..... याला पर्याय नाही......

नाम-स्मरण-प्रार्थनेची गोडी सर्वांना लागो ही श्री. सदगुरू चरणी प्रार्थना.........

माझे माझे लोप पाऊ दे ....तुझे तुझे उगवू दे ......कोण असे मी.... तो "मी" तो "मी".... सहजपणे कळू दे.... 

 श्री गुरुदेव दत्त......

No comments:

Post a Comment